तुम्हालाही कसं तरी होतं? अशावेळी तुम्ही काय करता? काय केलं पाहिजे?



कसं तरी होतं! म्हणजे काय होतं नेमकं हे सांगताही येत नाही पण चांगलंही वाटत नाही एवढं खरं. कसं तरी होण्याचा हा अनुभव तुम्हीही घेतलाच असेल. खरं तर हे असं प्रत्येकालाच वाटत असतं. मलाही अनेकदा वाटतं! हे असं का वाटतं? यामागे काय कारण असेल याचा बराच शोध घेतल्यानंतर जाणवलं की याची मुळे आपल्या विचारात आहेत. दिवसभरात मनात कितीतरी विचार येत असतात. काही चांगले तर काही वाईट. यातील कुठल्या विचारावर आपण जास्त विचार करतो त्यावर आपला मूड अवलंबून राहतो. कधी कधी तर अमका एक विचार आपल्या मनाला स्पर्श करून गेला हेही कळत नाही पण, त्या विचारातून निर्माण झालेल्या भावना मात्र आपल्याला सावलीसारख्या चिकटून राहतात. मग मनाची अशी काही अवस्था होते की ती शब्दात सांगता येत नाही, मग आपण म्हणतो मला कसं तरी होतंय! लहानमुलेही या मानसिक स्थितीला अपवाद नाहीत बरं. त्यांच्याही तोंडी तुम्ही अनेकदा हे वाक्य ऐकले असेल. मी तर बऱ्याचदा ऐकलंय! किंबहुना मीच हे वाक्य माझ्या लहानपणापासून अगणितवेळा उच्चारलं आहे. त्यामुळे अमक्या वयातच असं काही तरी होतं, जाणवतं, असं काही नाही. कुठल्याही वयातील व्यक्ति अशाप्रकारच्या अवस्थेतून जातच असते आणि जातेच. पण, हे ‘कसं तरी होणं’ कधी थांबणार आहे का नाही?  

 

खरं सांगू का हे जोपर्यंत आपले श्वास चालू आहेत तोपर्यंत भावनांचे हिंदोळे हे चालूच राहणार. कधी कसं तर वाटणार, कधी आनंद होणार, कधी राग येणार, कधी चिडचिड होणार. हे सगळं चालूच राहणार. मनाच्या या चंचलते वर विजय मिळवायला आपण काही सिद्ध पुरुष किंवा योगी वगैरे नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यात या मनाच्या चंचलतेमुळेच तर अर्थ येतो. चोवीस तास फक्त एकच भावना अनुभवत राहिलो तर त्यात काय मजा आहे? उन्हा नंतर सावली येते म्हणून त्याचा आनंद वाटतो. पावसानंतर ऊन पडतं म्हणून त्याचा आनंद वाटतो. तसच आहे आधी कसं तर वाटतं आणि मग अचानक मन निरभ्र आणि प्रसन्न होतं. म्हणून तर त्या निरभ्रतेला आणि प्रसन्नतेला महत्त्व आहे.

 

जेव्हा जेव्हा कसं तरी वाटेल ना तेव्हा तेव्हा स्वतःला सांगा की हे कसं तरी वाटणं कायमचं नाहीये. त्यासाठी स्वतःला त्रास करून घ्यायची किंवा इतरांना त्रास द्यायची काही गरज नाही. काही वेळाने ही अस्वस्थता, ही हुरहूर, बैचेनी सगळं काही थांबणार आहे. फक्त काही वेळच ही भावना आपल्या सोबत असणार आहे. काही वेळाने आपण दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा विचार करू किंवा दुसरी कुठली तरी गोष्ट आपल्याला आठवेल आणि आपण पुन्हा नॉर्मल होऊच!

 

तरीही हे कसं तरी होणं कशातून जन्मतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे? मग हा संपूर्ण लेख नक्की वाचा!

 

१) अभद्र कल्पना

म्हणतात ना, ‘वैरी न चिंती ते मन चिंती!’ तुम्ही स्वतःबद्दल किती चांगल्या कल्पना करू शकता जरा करून पहा. स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या जवळच्या लोकांबद्दल कायम जर असुरक्षिततेचे विचार तुमच्या मनात येत असतील तर वरचे वर तुम्हाला हे कसं तरी वाटणं अनुभवावंच लागेल. त्यामुळे जाणीवपूर्वक जेव्हा जेव्हा कधी स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या जवळच्या व्यक्तीबद्दल कुठलीही अनामिक किंवा अज्ञात भीती वाटेल, काही अभद्र कल्पना मनात येऊ लागतील तेव्हा जाणीव पूर्वक ती कल्पना रिव्हर्स म्हणजेच उलटी करण्याचा प्रयत्न करा.

 

आता कोरोनाच्या काळात सर्वांनाच स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी वाटते. आपल्याला कोरोना तरी झाला नाही ना? किंवा माझ्या नवऱ्याला. मुलाला, मुलीला किंवा घरच्या कुणा व्यक्तीला तर हा कोरोना गाठणार नाही ना? असे विचार जेव्हा मनात उमटू लागतील तेव्हा ताबडतोब तो विचार उलट्या दिशेने वळवा. मी, माझा नवरा, माझी मुलं, माझे मित्र-मैत्रिणी, माझे कुटुंबीय, सगळेच निरोगी, स्वस्थ, सुरक्षित आणि सुखी आहेत, असा विचार कराल तेव्हा या विचारातून येणारी अस्वस्थता जी वास्तवात अस्तित्वातच नाहीये फक्त आपल्या कल्पनेतच ती आपल्याला वाकुल्या दाखवते हे आपल्याला पटेल. एकदा का ही सकारात्मक बाजू तुम्ही जाणीवपूर्वक स्वीकारलीत की, तुम्हाला पुन्हा कधी अशी भीती वाटेल तेव्हा ती उडवून लावल. प्रत्यक्षात जरी काही झालं तरी त्या परिस्थितीशी तोंड देण्यास सक्षम बनाल. रिव्हर्स मोड कधी घ्यायचा हे आपल्या मनाला बजावून ठेवा. त्यासाठी आपल्या मनात काय चाललं आहे, हे मात्र ओळखता यायला हवं.

 

२) तुलना

म्हटलं ना आपल्या मनात आपल्याही नकळत लाखो विचार येऊन जातात. त्यातलाच एक विचार म्हणजे तुलना. कधी कधी नकळतपणे आपण स्वतःची दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करू लागतो. तिला किंवा त्याला हे जमतं मग मला का जमत नाही? ही तुलना जर सकारात्मक आणि प्राथमिक स्तरावर असेल तर त्याचा फायदाच होईल पण या तुलनेने जर इर्षेचे रूप घेतले तर मात्र तुम्ही स्वतःला चुकीच्या दिशेने नेत आहात. एखादी गोष्ट शिकण्याच्या दृष्टीने तुम्ही स्वतःला प्रेरित करण्यासाठी म्हणून अशी तुलना केलीत तर ते ठीक आहे. पण, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही तुम्ही दुसऱ्याची कॉपी करण्याचा, त्याच्या सारखं होण्याचा, त्याच्या किंवा तिच्या सारखं दिसण्याचा, बनण्याचा प्रयत्न करू लागाल तर मात्र तुम्ही चूक करत आहात. तेव्हा आपण कुणाला तरी आपल्या पेक्षा चांगला/चांगली समजून त्यांच्यासारखं होण्याचा तर प्रयत्न करत नाही ना हेही एकदा तपासून बघा. ही तुलना तुम्हाला आतून निराश करत जाईल आणि तुम्ही मग वरचे वर ‘कसं तर होतंय’ म्हणत इतरांवर आणि स्वतःवर चीडचीड करत रहाल.

३) जे करीन ते उत्तमच करीन

अनेकदा आपल्याला एखादी गोष्ट खूप चांगली जमत असते तरीही इतरांनी मलाच चांगलं म्हणावं, माझंच कौतुक करावं अशा अट्टाहासाने आपण पछाडून जातो. मग आपण स्वतःचीच अति चिकित्सा करू लागतो. एखाद्या वेळेस जरी छोटी-मोठी चूक झाली तरी आपण त्याचा बाऊ करून घेतो. ते मनाला लावून घेऊन हे झालंच कसं असा विचार करत कुढत राहतो.

 

ठीक आहे, यावेळी चुकलंय ना, मग पुढच्या वेळी आपण थोडी खबरदारी घेऊ. जे चुकलं त्यातून काय शिकायला मिळालं ते लक्षात ठेवून पुढे जाऊ अशा विचाराने स्वतःचीही चूक खिलाडूवृत्तीने घेण्याची सवय लावलीत तर ठीक नाही तर आत्मटीका आणि आत्मवंचना तुम्हाला निराशेच्या खाईत नेल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला परिपूर्ण व्हायचं नसलं तरी मागेही राहायचं नाही. काळासोबत चालायचं आहे एवढंच सूत्र लक्षात ठेवलं तरी हे सोपं जाईल.

 

४) आपलं यश म्हणजे आपण नव्हे.

आपण कोण आहोत? आपण म्हणजे आपल्या पदव्या, आपली प्रतिष्ठा, आपला व्यवसाय, आपलं पद की आणखी कुणी? कधी कधी या सगळ्या गोष्टींशी आपण इतके जोडले जातो की हे सगळं म्हणजे आपण अशी आपली ठाम धारणा होते आणि ती इतकी आतवर रुजते की त्यातून बाहेर पडता येतच नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या जगण्याचा एक भाग आहेत. या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण नव्हे. लोकं आपल्याकडे हे सगळे चष्मे लावून बघत असतात आणि मग आपणही त्यांच्याच फुटपट्टीने स्वतःला मोजू लागतो. स्वतःला मोजण्यासाठी किंवा स्वतःची किंमत ठरवण्यासाठी अशी इतरांनी दिलेली फुटपट्टी वापरू नका. आपण आणि आपलं आयुष्य म्हणजे फुटपट्टीनेही मोजताच येणार नाही इतकं विशाल, अथांग आणि अनेक चमत्कृतींनी भरलेलं आहे. आपण इथे या सगळ्याचा आस्वाद आणि आनंद घेण्यासाठी आलो आहोत कुणाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या कसोटीवर उतरण्यासाठी नव्हे.

 

५) आपल्याला वाटतं ते खरंच असतं असं नाही.

बऱ्याचदा आपले विचार म्हणजे आपल्या कल्पना असतात. त्यात नेहमीच १००% तथ्य असेल असं नाही. आपल्या मैत्रिणीने आज आपल्या गुड मॉर्निंग मेसेजला रिप्लायच दिला नाही म्हणजे आज तिला आपला राग आलेला दिसतोय. किंवा परवा आपण तिला जे काही बोलले ते तिला आवडलं नसेल. आज बॉस कसे नाराजच होते आपल्यावर कुणीतरी आपल्याबद्दल कान भरले असतील त्यांचे! असे कितीतरी विचार मनात येतात. यातले कितीतरी विचार म्हणजे फक्त आपल्या कल्पना होत्या हे नंतर कळतं. वास्तव काही वेगळं असतं आणि आपण त्याचा काही तरी वेगळाच अर्थ लावलेला असतो. तेव्हा कधी कुणाबद्दल जर असे विचार मनात आले तरच स्वतःला एवढंच सांगा की, ‘कदाचित ही माझी कल्पना असू शकते, वास्तवात असं काही नसेलही!’

६) मनाला लावून घेणं

कुणी काय बोलावं? कुणी कसं राहावं? हे आपण नाही ठरवू शकत. कधी कधी आपण एका चांगल्या हेतूने काही करतो आणि लोकं त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ काढून आपल्याला दोषाचे धनी ठरवतात. किंवा कधी कधी जवळचेच कुणी असं काही बोलतं की त्याचे ओरखडे मनात खोलवर उमटतात.

 

खरे तर या गोष्टी मनावर खूपच परिणाम करतात, पण हे बघा कुणी काय बोलावं, कसा विचार करावा, हे आपण नाही ठरवू शकत. ते आपल्या हातातही नसतं. मग आपल्या हातात काय असतं तर समोरच्याचं बोलणं, वागणं याचा आपल्यावर आपण किती परिणाम करून घेणार आहोत. काही गोष्टी पटकन विसरायला शिकणं खूपच फायद्याचं असतं. कुणी अपमान केला तर एकतर त्याला तिथल्या तिथे उत्तर द्यायला शिका किंवा मग त्याची बुद्धीच तेवढी, त्याची कुवतच तेवढी असं समजून त्याचं बोलणं टाळायला शिका. शक्यतो जितकं आपण अशा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू तितकं बरं राहील. कारण, याचा त्रास करून घेण्यापेक्षा त्यावर फुली मारणं नक्कीच श्रेयस्कर आहे.

अर्थात आपल्या हातून असं काही कुणाबद्दल घडणार नाही याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. इतरांच्या वागण्याचा किती त्रास करून घेणार त्यालाही काही मर्यादा घातली पाहिजे.

७) आपण प्रेमाचे धनी आहोत

कुणी सतत्याने आपल्याशी चुकीचं वागत असेल आणि ते जर आपण सहन करत असू तर ते पूर्णतः चुकीचं आहे. चुकीचं वागणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीव करून देता आली पाहिजे. इतरांचं आधी माझं काय मी नंतर बघेन असं म्हणून आपणच आपल्या गरजांना प्राधान्य देत नसू तर लोकं आपल्याला गृहीत धरायला शिकतात. तेव्हा इतरांनी आपल्या गरजांचा, प्रधान्यांचा विचार करावा असं वाटत असेल तर आधी तो आपण स्वतः करायला हवा. इतरांनी आपल्यावर प्रेम करावं वाटत असेल तर आधी आपलं स्वतःवर प्रेम हवं. इतरांनी आपला आदर करावा वाटत असेल तर आधी स्वतःला स्वतःचा आदर करता यायला हवा.

‘मीही तितकीच महत्वाचा/महत्वाची आहे.’ हे स्वतःला पटवून द्या आणि त्यानुसार वागा.

 

आपल्याला कसं तर होणं किंवा अस्वस्थ वाटणं याची मुळं ही अशाच काही विचारात दडलेली असतात. ती शोधून त्याची छानणी करता यायला हवी. मला याबाबतीत जे विचार महत्वाचे वाटले ते मी इथे मांडले आहेत. यात तुम्हाला अजून काही भर घालावी अशी वाटत असेल तर कमेंटच्या मध्यातून नक्की सांगा.

 

Post a Comment

0 Comments