मानसिक शांतता मिळवण्यासाठी तुम्ही यातील कोणता पर्याय अवलंबला आहे का कधी?
आजच्या काळात एक गोष्ट प्रत्येकालाच हवी आहे आणि
त्यासाठी काहीजण तर वाटेल ती किंमत मोजायला तयार आहेत! मानसिक शांतता! मानसिक
शांतता म्हणजे काही फार दुर्मिळ, अप्राप्य, असाध्य गोष्ट आहे असे अजिबात नाही. पण,
सध्याचा काळच इतका तणावाचा, चिंतेचा आणि गोंधळाचा आहे की, मानसिक दृष्ट्या अस्थिर
होणं किंवा वाटणं स्वाभाविक आहे.
मानसिक शांतता अनुभवण्याचे अनेक मार्ग आहेत.
काहींना ती संगीतातून मिळते, काहींना ध्यानातून काहींना मोकळ्या हवेत फिरण्यातून!
प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय एकच आहे. मानसिक शांतता!
असे असले तरी कधी कधी मात्र यापैकी कशानेही मन
शांत होत नाही. डोक्यातील विचार चक्रे थांबत नाहीत. अशावेळी काय करावं? अशावेळी
आहे ती मानसिक स्थिती स्वीकारावी आणि आतून नसलं तर किमान वरून शांत राहण्याचा
प्रयत्न करावा. मन चंचल आहे, त्यामुळे कधी अशांत तर कधी शांत हे होतच राहणार आहे.
चोवीस तास आपण आतून शांतच असू तर उपयोग काय मग? अशाने जीवनातील रसच निघून जाईल.
मन नुसतंच शांत करून चालणार नाही तर त्यातून
आपला व्यक्तिगत उत्कर्ष होणंही गरजेचं आहे. मानसिक शांतता अनुभवण्याचा तुम्हाला
तुमचा मार्ग सापडला नसेल तर इथे दिलेल्या पर्यायांपैकी एकाचा किंवा सगळ्याच
गोष्टींचा विचार करू शकता. नेहमीपेक्षा काही तरी वेगळं केल्यानेही मन शांत होतं.
१) स्वतःची ओळख करून घ्या –
आपल्या पैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपण
स्वतःला चांगलेच ओळखतो. पण कधी कधी काही बाबतीत आपण स्वतःलाच अपरिचित असतो. जर
तुम्ही स्वतःला ओळखू शकलात तरच तुम्ही जगाला किंवा इतरांना ओळखू शकाल. मानसिक
शांतता मिळवण्यासाठी हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे. आपण कसे आहोत? आपल्याला काय
आवडतं? याही पलीकडे जाऊन आपली विचारप्रणाली कशी आहे? आपल्या कुठल्या गोष्टी पटतात कुठल्या
पटत नाहीत? कोणत्या गोष्टींबद्दलची आपली मते परिवर्तनीय आहेत आणि कोणती
अपरिवर्तनीय आहेत? स्वतःबद्दल जाणून घेण्याने बऱ्याच गोष्टीतील गोंधळ कमी होईल.
आपली वैशिष्ट्ये
तुमचं स्वतःचं वर्णन करायचं झाल्यास तुम्ही कसं कराल?
आजपर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला?, आता त्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत?, आजवरच्या
आयुष्यात तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी मिळवल्या? कोणत्या गोष्टींवर तुम्ही ठाम राहिलात?
तुमच्यात चांगले काय आणि वाईट काय? स्वतःतील गुणांची तुम्हाला किती कदर आहे? तुमच्यातील
कमतरतेकडे तुम्ही कसे पाहता? स्वतःमधील दोष स्वीकारले का? स्वीकारले असतील तर कसे स्वीकारले?
यातील एखादा दोष कमी व्हावा म्हणून कधी सकारात्मक प्रयत्न केले का? काही गोष्टी करायचे
राहून गेले असे वाटत असेल तर आता त्या करण्याची इच्छा आहे का? त्यासाठी हवी ती ऊर्जा,
पाठींबा आणि इच्छ्शक्ती आहे का?
दोष स्वीकारणे आणि त्यांचा सकारात्मक उपयोग करणे
कोणीही १००% चांगला किंवा १००% वाईट असं नसतं.
आपल्यातही इतरांप्रमाणेच काही दोष, उणिवा, कमतरता या आहेतच. याचा अर्थ असा नाही की
तुम्ही तुमच्या या उणीवांवर, दोषांवर किंवा कमतरतेवर कधीच मात करू शकणार नाही.
किमान या उणिवांची जाणीव झाली आणि तुम्ही बदलासाठी पाऊल उचलले हेही काही थोडके
नाही. या उणीवांचा आपल्या प्रगतीसाठी काही उपयोग होईल का? एखादी गोष्ट आपल्याला
जमत नाही, आपला तो स्वभावच नाही, हे एकदा लक्षात आलं की आपण कोणत्या वाटेला जावं
कोणत्या वाटेला जाऊ नये एवढं तर कळतच. उणिवा किंवा दोषही काही १००% चुकीचे नसतात
तेही गरजेचे असतात. कधी कधी आपल्या या दोषामुळेही आपण एखाद्या मोठ्या संकटांपासून
बचावालेलो असतो. आता या दोषांसाठी किंवा उणीवांसाठी स्वतःला कोसणे सोडून त्यांचा
कुठे कसा वापर करून घ्यायचा हे ठरवलं की त्यांचा फारसा त्रास होणार नाही.
उद्दिष्टे किंवा ध्येये ठरवा
आता तुमचे वय कितीही असले तरी पुढच्या आयुष्यात
तुम्ही काय कराणार आहात किंवा काय करणार नाहीत, हे ठरवू शकता. आपली स्वप्ने,
उद्दिष्टे आणि ध्येये हीच तर आपल्या जगण्याचा खरा प्राण असतात. तुमच्यासमोर काही
तरी उद्दिष्ट असेल तर तुम्हाला निराशा सतावणार नाही. आपल्या क्षमता काय आहेत
त्यानुसार तुम्ही छोटी छोटी उद्दिष्टेही ठरवू शकता. एका नंतर एक पायरीपायरीने
त्यावर मार्गक्रमण करू शकता. स्वतःचा स्वीकार करण्यात ही उद्दिष्टे तुम्हाला मदत
करतील. ही उद्दिष्टे तुमचा रोजचा दिवस कसा जाईल हेही ठरवतील, किंवा रोजचा दिवस कसा
असेल हे ठरवण्यास मदत करतील.
२) तुमचा दृष्टीकोन बदला –
तुम्ही जगाकडे कसे पाहता हे तुमचा
दृष्टीकोनावरून ठरते. तुम्ही जर मानसिक दृष्ट्या स्थिर नसाल किंवा आतून शांत नसाल
तर याचाही परिणाम तुमच्या दृष्टिकोनावर होऊ शकतो. आपले आयुष्य, आपल्या भावना, आपले
अनुभव याबद्दल आपण स्वतःला सतत काही ना काही स्वयंसूचना देत असतो. आपले आयुष्य,
आपले अनुभव, आपल्या भावना यावरून आपला मेंदू सतत काही ना काही निष्कर्ष काढत असतो.
म्हणून दृष्टीकोन बदलल्यास या सगळ्याबद्दल आपले जे पूर्वमत आहे ते बदलेल आणि त्या
भावना सुद्धा बदलतील. आपल्या दृष्टीकोनामुळे आपल्या मेंदूवरही ताण येतो.
निवांत व्हा
धावपळीच्या काळात निवांतपणा म्हणजे एक स्वप्नच
बनले आहे. आपल्याला सतत कशाची ना कशाची घाई लागलेली असते. मानसिक शांततेच्या
बाबतीत मात्र असं होऊ शकत नाही. चटकन किंवा पटकन तुम्ही याबाबतीत तरी काहीच करू
शकत नाही. उलट जितकी घाई कराल तितकी हाती निराशाच लागेल. म्हणूनच आपलं मन शांत
होण्यासाठी त्याला काही वेळ द्यावाच लागेल. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेच
लागतील. दररोजच्या आयुष्यात जे काही चांगले घडत आहे त्याची नोंद घेण्यासाठी वेळ
द्या. एकदा का ही सवय लागली की मग हळूहळू तुमची मानसिकता सकारात्मक होत जाईल. कधी
उदास किंवा निराश वाटलं तरी तो मूड स्वीच करण्याची घाई करू नका. त्याकाळातही
तुमच्या आजूबाजूचे वातावरण किंव घटना याकडे लक्ष देऊन त्यातील बारकावे टिपण्याचा
प्रयत्न करा. याला जागरूक राहणे म्हणतात आणि चांगल्या मानसिक आणि शारीरिक
आरोग्यासाठी हा गुण खूपच महत्वाचा आहे.
राईचा पर्वत करू नका.
कधी कधी गोष्टी खूप छोट्या, साध्या आणि सोप्या
असतात पण आपणच आपल्या कल्पनेने, भीतीने त्यांचा बाऊ करून ठेवतो. कधी कधी आपल्याला
समस्या खूपच मोठी वाटते पण ती तशी असतेच असे नाही. काही समस्येची उत्तरे काळावर
अवलंबून असतात. उदा. तुम्ही आजारी पडलात तर तुम्ही पुन्हा पूर्ववत बरे होण्यासाठी
किमान चार दिवस तरी लागतीलच. डॉक्टरही त्याचा अंदाजाने आपल्याला गोळ्या लिहून
देतात. पण एकाच दिवसात मला बरे वाटले पाहिजे, असा जर हट्ट मनात धरून बसलात तर त्याने
तुमचाच अपेक्षाभंग होणार आणि त्याचा त्रासही तुम्हालाच होणार. हे झाले एक उदाहरण
काही समस्या अशाही असतील ज्यासाठी कदाचित महिन्याचा कालावधी लागेल, काहींसाठी
वर्षाचा किंवा त्यापेक्षाही जास्त. पण, लवकरात लवकर उत्तर मिळाले पाहिजे ही घाई
तुम्हाला संकटातच नेईल. म्हणून समस्या आली तरी त्याचा बाऊ करण्यापेक्षा त्याही
काळात मानसिकदृष्ट्या खंबीर कसे राहता येईल हे पाहणे जास्त श्रेयस्कर ठरेल.
कृतज्ञता
दृष्टीकोन बदलण्यासाठी यापेक्षा दुसरा उत्तम
मार्ग नाही. तुम्हाला मिळालेल्या वरदानांबद्दल किंवा तुमच्याकडे प्रत्यक्षात
असणाऱ्या बेरजेच्या गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञ राहण्यास सुरुवात केलीत तर नक्कीच स्वतःच्या
आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलू शकतो. तुम्हाला आहे त्या परिस्थितीत
समाधानी राहण्याची किल्ली सापडेल. समाधान हा तर मानसिक शांततेसाठीचा महत्वाचा
टप्पा आहे. कृतज्ञतेचं रोप एकदा का लावलंत की, काळासोबत ते मोठंमोठं होत जातं.
स्वीकारा आणि सोडून द्या.
आयुष्यात नेहमीच सगळे दिवस सारखेच नसतात. काही दिवस
मनासारखे असतात तर काही दिवस मनाविरुद्ध! जेव्हा काही मनाविरुद्ध घडत असेल तेव्हा
काय करायचं? तेव्हा जे काही घडत आहे ते कधी तरी थांबणार आहे, संपणार आहे असे समजून
त्यावर अधिक विचारमंथन करणे बंद करायचं. काही प्रश्न काळाच्या हवाली केलेलेच योग्य
ठरते. याचा अर्थ मनातील नकारात्मक भावना दाबून टाकायच्या असे नाही. तर त्या भावनांचा
स्वीकार करायचा पण त्याच्यात गुरफटून जायचे नाही. सतत तोच तोच विचार मनात आणायचा
नाही आणि बळजबरीने त्यापासून स्वतःला सोडवूनही घ्यायचं नाही. या सगळ्या
भावकल्लोळापासून शक्य तितकं अलिप्त राहण्याचा प्रयत्न करायचा.
नकारात्मक होण्याने तुमची मानसिकता अधिकच बिघडेल
आणि एकदा का मानसिकता बिघडली की मग चांगलं काहीच होत नाही. निवडुंग वाट्याला आला
म्हणून काही तो खायचा नाहीये की त्यावर बसायचंही नाहीये. तो एका बाजूला ठेवून
द्यायचा आहे. बस्स नकारात्मक भावना आणि विचारांचंही हेच करायचं आहे.
३) निसर्गाच्या सानिध्यात राहा
मानसिक शांतता मिळवण्यासाठी निसर्ग नेहमीच मदत
करतो. दिवसातील ठराविक वेळ एखाद्या मोकळ्या ठिकाणी फिरून या, बागेतील झाडांना
किंवा कुंडीतील झाडांना पाणी घाला, घरात अजून काही रोपे लावता येत असतील तर ते
करा, बागकाम केल्याने किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्याने त्याचा मानसिक
आणि शारीरिक स्वास्थ्याला फायदाच होतो. सोबत थोडा शारीरिक व्यायामही होईल आणि
मानसिकदृष्ट्याही विश्रांती मिळेल.
यात थोडे सातत्य राखले की, त्याचे पडसाद जाणवतीलच.
पण, सातत्य हवे हे मात्र नक्की!
४) चुकीच्या गोष्टीमागे धावणे सोडा
आपण मानसिक दृष्ट्या अशांत किंवा अस्थिर असतो
तेव्हा चुकीच्या गोष्टीत आनंद किंवा समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो. यातून काही
साध्य तर होत नाहीच उलट त्याचे विध्वंसक परिणाम मात्र जाणवतात. हे जर वेळीच
थांबवले नाही तर आपण स्वतःहूनच मोठ्या संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल.
महागड्या वस्तू
महागड्या आणि भौतिक वस्तूंची रेलचेल असेल तर आपण
अधिक सुखी होऊ हा निव्वळ भ्रम आहे. अशा गोष्टीनी खिशावरील ताण वाढेल. मानसिक स्वास्थ्यात
या गोष्टींचा काडीची मदत होत नाही. तुमच्याकडे किती भौतिक वस्तू आहेत त्यापटीने
तुम्हाला मानसिक शांतता मिळेलच असे नाही. उलट तुमच्या आर्थिक तणावात त्यांच्या
मेंटेनन्सच्याच खर्चाची भर पडेल.
अचूकता
कोणतीही गोष्ट करेन ती अचूकच करेन अशा
मानसिकतेने ती करत असाल तरीही तुमच्या पदरी भ्रमनिरासच येणार. जगात १००% अचूक
किंवा परिपूर्ण असे काहीही नसते. परिपूर्ण होण्याचा किंवा परिपूर्ण राहण्याचा
अट्टाहासही तुम्हाला अधिकाधिक निराश करत जाईल.
आराम
कधी कधी आराम चांगला असतो, पण तो नेहमीच चांगला
नसतो. आयुष्यात पुढे जायचे असेल प्रगती करायची असेल तर आराम हराम आहे ही म्हण कायम
लक्षात ठेवली पाहिजे. नाहीतर तुम्ही नुसते आरामच करत राहाल आणि एकेक करून संधी
हातातून निसटत जातील. मग पुन्हा पश्चाताप आणि पुन्हा निराशा, पुन्हा अस्वस्थता हे
चक्र कधीच सुटणार नाही. तुमच्या कामाला, योग्य तितका वेळ द्या.
इतरांवर प्रभाव पाडणे/ खुश करणे बंद करा
इतरांवर छाप पाडण्यासाठी किंवा त्यांना आनंदी
ठेवण्यासाठीच आपला जन्म झालेला नाहीये. इतरानी मला चांगलं म्हणावं, त्यांनी कौतुक
करावं, म्हणून विनाकारण धडपडण्याने हाती काहीच लागणार नाही. जे तुम्हाला योग्य
वाटतं ते करा इतरांना काय आवडेल काय आवडणार नाही किंवा मग ते मला काय म्हणतील, नाव
ठेवतील, याचाही विचार करून काही होणार नाही. तुमचा आनंद ज्यात आहे ते काम करा.
ज्याचा पुढे जाऊन तुम्हाला किंवा इतरांना काही त्रास होणार नाही. स्वतःलाच कसं
इम्प्रेस करता येईल ते पहा. स्वतः स्वतःवर खुश व्हाल अशी काही कामे करा. एखादे
छोटेसे चॅलेंज द्या स्वतःलाच आणि ते पूर्ण करून स्वतःचीच शाबासकी मिळवा.
आनंद
आनंद हा कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही.
आनंदी तर प्रत्येकालाच व्हायचं आहे, पण आनंदाचा पाठलाग करून आनंद मिळणार नाही.
तुम्ही जे काही करत आहात ते समाधानपूर्वक करत राहा आणि आनंद स्वतःहून तुमच्या
भोवती रेंगाळत राहील. समाधान म्हणजेच आनंद आहे. हे एकदा का पटलं की आनंद तुम्हाला
सोडून कधीच कुठे जाणार नाही. स्वतःकडे लक्ष देणे, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देणे,
यातूनच आनंद मिळणार आहे आणि त्यातूनच मानसिक शांतताही मिळणार आहे.
कुत्रा आपल्या शेपटी मागे धावधाव धावतो आणि दमून
भागून जेव्हा तो बसतो तेव्हा त्याची शेपूटच त्याच्या तोंडाशी येते. मानसिक शांतता
म्हणजे आपलीच शेपूट आहे, त्यामागे धावू लागलो तर ती दूर दूर पळत जाणार, त्याकडे
दुर्लक्ष करून निवांत बसलो तर आपणहून मागे मागे येणार!
मेघश्री श्रेष्ठी
Comments