मानसिक स्वास्थ्य, काळाची गरज!
मानसिक स्वास्थ्य ही
प्रत्येकाची मुलभूत गरज आहे. पण अनेकांना याची जाणीवच नाही. अनेकांना नैराश्य,
तणाव, दु:ख, चिडचिड या बाबी खूपच सामान्य वाटतात. आपल्या संपर्कात एखादी
नैराश्यग्रस्त व्यक्ति आली की लगेच काही महाशय प्रवचन झोडू लागतात. काही काही
लोकांच्या मते सतत उद्योगमग्न राहिल्यास मानसिक नैराश्य भेडसावत नाही. बरोबर आहे हो
तुमचं म्हणनं माणसानं उद्योगी असलंच पाहिजे पण, तो उद्योग निदान आवडायला तरी हवा ना!
मानसिक
स्वास्थ्याच्या बाबतीत अगदी घरापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील बराच सावळा
गोंधळ आहे. अनेकांना आपण मानसिक दृष्ट्या आजारी आहोत हेच पटत नसतं किंवा पटत असलं
तरी ते स्वीकारण्याची हिंमत नसते. मानसिक स्वस्थ्याप्रती समाजात जागरूकता निर्माण
व्हावी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेकडून १० ओक्टोंबर हा दिवस जागतिक मानसिक
स्वास्थ्य दिन म्हणून पाळला जातो.
जागतिक आरोग्य
संघटनेची यावर्षीची थीम आहे, “असमान जगातील मानसिक स्वास्थ्य.”
कोव्हीड महामारीच्या
काळात अनेक जण मानसिक अस्वास्थ्याचे शिकार झाले आहेत. कारण, या काळाने जगण्याची
रीतच बदलून टाकली आहे. जिथे लोक रोज उठून आवरून ऑफिसला जात तिथे रोज उठून लोकांना
घरातच आपआपल्या लॅपटॉपसमोर बसावं लागत आहे. आई घरात असूनही आई नाही आणि बाबा घरात
असूनही बाबा नाही, अशी मुलांची अवस्था तर, घरात असूनही घरातील जबाबदाऱ्यांना न्याय
देता येत नाही ही कुटुंबप्रमुखांची अवस्था. एकंदरीतच एका झटक्यात हे जे पर्यावरण
बदलून गेलं आहे त्याचा काहीतरी ताण हा येणारच ना?
सुरुवातीला हा ताण
दबक्या पावलांनी येईल. एवढं तर होणारच असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करू आणि मग
हळूहळू सांडलेलं पाणी जसं वाट मिळेल तिकडे पसरत जाते तसा हा ताणही आपल्या मनातून
शरीरात पसरत जाईल.
गरीब आणि मध्यम उत्पन्न
असलेल्या देशातील नागरिकांसाठी मानसिक स्वास्थ्य मिळवणे हे खूपच जिकीरीचे आहे. या
देशातील ९०-९५% लोकांपर्यंत मानसिक स्वास्थ्यासाठी लागणारे उपचार पोहोचूच शकत
नाहीत, अशी अवस्था आहे. आजच्या काळात तर मुले आणि त्यातही पौंगडावस्थेतील
मुलांमध्ये मानसिक अस्वास्थ्य हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. असे वर्ल्ड फेडरेशन फॉर
मेंटल हेल्थ (WFMH) यांचे म्हणणे आहे. WFMH च्या आकडेवारी नुसार जगभरात दरवर्षी आत्महत्या करून जीवन संपवणाऱ्यांची
संख्या ही सात लाखाच्या घरात आहे. म्हणजे जगात चाळीसाव्या सेकंदाला एक आत्महत्या
घडते आहे. यातही १५-१९ अशा तरुण कोवळ्या मुलांची संख्या जास्त आहे.
मुलांमधील मानसिक
अस्वास्थ्य लवकरच ओळखता यायला हवं जेणेकरून हाताबाहेर जाण्याआधी त्यावर उपाय करून त्या
मुलाचे पुढील आयुष्य तरी सुखकर करून देण्याची शक्यता वाढते.
कोव्हीड महामारीच्या
काळात जगभर आर्थिक-सामाजिक दरी वाढली आहे आणि या वाढत्या दारीसोबत मानसिक समस्याही
वाढत आहेत. म्हणूनच यावर्षीची थीम आहे, असमान जगातील मानसिक स्वस्थ्य.
WHOच्या मते
जगभरातील २८ कोटी लोक मानसिक अस्वास्थ्याचे शिकार आहेत. सतत मूड बदलणे आणि नैराश्य
या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. मूड बदल ही एक सामान्य बाबा आहे तर नैराश्य एक गंभीर
बाब आहे, जी पुढे जाऊन अधिक घातक रूप धारण करू शकते.
२०१५-१६ मध्ये
केलेल्या राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य सर्वेक्षणात भारतात दर वीस व्यक्तीमागे एक व्यक्ति
नैराश्यग्रस्त आहे. तर एकूण लोकसंख्येच्या १% इतक्या लोकांमध्ये आत्महत्या
करण्याचा टोकाचा निर्णय घेऊ शकतात.
भारतातील १२ राज्यात
केलेल्या सर्वेक्षणानुसार १३-१७ वयोगटातील ९ कोटी भारतीय युवकांना समुपदेशनाची आणि
मानसिक उपचाराची गरज आहे. कोव्हीडच्या
काळात मानसिक अस्वस्थ्यात २५%नी वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.
आजच्या जागतिक
आरोग्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या मानसिक स्वास्थ्यावर एक नजर टाकली
पाहिजे. आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देतोय का हे तपासून पहिले
पाहिजे. मानसिकदृष्ट्या आपण अस्वस्थ आहोत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याबद्दल
मनमोकळेपणाने बोलले पाहिजे आणि गरज असेल तिथे तज्ञांची मदत घेतली पाहिजे.
तेव्हा आजच्या दिवशी
तरी या महत्वाच्या विषयावर बोलायला आणि लिहायला टाळाटाळ करू नका.
Comments