आभाराचा भार हलका करण्यासाठीही लिहिलं पाहिजे!

लिहिल्याने मनातील भावनांना बाहेर येण्याचा मार्ग सापडतो. आज सोशल मिडीयाच्या जमान्यात प्रत्येकालाच रोज काही ना काही नवी पोस्ट करायची असते त्यामुळे भावनांची अभिव्यक्ती होऊन जातेच. आपल्या मनात दररोज कितीतरी विचार येतात आणि त्यातील कोणता तरी एक विचार आपल्या मनाची पकड घेतो आणि दिवसभर आपण त्याच मूड मध्ये राहतो. सकाळी उठल्या उठल्या अचानक आपल्याला एखादी जुनी वाईट घटना आठवली की सकाळी-सकाळीच आपला मूड बिघडून जातो. सकाळचा मूड सावरण्यासाठी मी स्वतःला कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावून घेतली.

 


यामुळे सकाळी-सकाळी काहीही भलते सलते आठवून त्याच विचारात कैद होण्यापेक्षा कृतज्ञतेची पवित्र भावना मनात ठेवून दिवसाची सुरुवात केल्याने मन प्रसन्न होते. विशेषत: एखाद्या अवघड पेचात अडकलो असू तर अशावेळी मनातील आंदोलने नियंत्रित करण्यास या सवयीचा फारच चांगला उपयोग होतो.

 

लॉकडाऊनच्या काळात एकतर बाहेर येण्या-जाण्यास मज्जाव, चोहोबाजूंनी कोरोना, वाढती रुग्ण संख्या, मृतांचा वाढता आकडा, या आणि अशाच बातम्यांचा भडिमार, उद्या काय होईल, याची अनिश्चितता अशा काळात या सवयीने मला मनाची स्थिरता राखण्यास मदत केली. भविष्यातील सर्व चिंता बाजूला सारून आज आत्ता आपण काय करू शकतो, काय केले पाहिजे यावर फोकस करण्यात मदत झाली.

 

अचानक उठले आणि ही सवय मी अंगिकारली असे झाले नाही. त्याआधी याबद्दल मी वाचले होते, युट्युबवर यासंबधीचे व्हिडीओ पहिले होते, सतत तेच ते पाहून वाचून कधीतरी माझ्या मनात विचार आला की एवढीशी गोष्ट करून पाहायला काय हरकत आहे?

 

एक दिवस सकाळी मी सुरुवात केलीच. पहिल्यांदा नेमकं कशाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायची हेच कळत नव्हतं. पण हळूहळू एकेक गोष्टी आपसूकच डोळ्यासमोर उभ्या राहू लागल्या.

 

पहिल्या दिवशी फक्त दहाच गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी दहाचे अकरा झाले. कधीकधी काही गोष्टी विसरल्या जात तर कधीकधी त्याचत्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत होती तरीही कृतज्ञता व्यक्त करण्याची विशेषत: ती लिहून काढण्याची सवय सोडायची नाही यावर मी ठाम होते.

कधी सकाळी लिहायला नाही जमलं तर दुपारी, संध्याकाळी, रात्री, कधी वेळ मिळेल तेव्हा मी लिहित असतेच. यामुळे मला आपल्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, आपलं आयुष्य असं तसं, ह्यांव-त्यांव असल्या सगळ्या रडगाण्यातून मुक्ती मिळाली. म्हणजे मनात हे नकारात्मक विचार येणेच कमी झाले आणि आता तर बंदच झाले. इतरांशी तुलना करून आपण उगाच का दुखी व्हायचं?  हा विचार तर मनात पक्का रुजला.

 


कितीतरी नकारात्मक विचारांना आपण मुद्दाम चिकटून राहिलो आहोत हेही जाणवलं आणि हळूहळू एकेक नकारात्मक विचार गळून पडू लागला. मन लख्ख होऊ लागलं. हळूहळू सकारात्मक विचार रुजू लागले.

 

दिवसभरात काही चांगले आणि सकारात्मक घडलेच तर त्याचीही नोंद घेतली जाऊ लागली. अगदी न कंटाळता घर काम आवरणं म्हणजेही किती मोठी अचिव्हमेंट होती. तेही मनातल्या मनात नोंदवलं जाऊ लागलं. मग सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही वेळेला आपसूकच हात डायरीकडे वळत असत. त्या-त्या दिवसाचे चांगले क्षण नोंदवले जात होते.

 

आजही कधी कधी विनाकारण उदास वाटू लागलं की मी ती डायरी उघडते ज्यात मी फक्त चांगले क्षण लिहून ठेवलेत. त्यामुळे उदासीचे सावट जास्त काळ रेंगाळत नाही, त्या भावनेतून मी कृतज्ञतेचे बोट धरूनच अलगद बाहेर पडते. पुन्हा एकदा शोधत राहते आज काय घडलं कृतज्ञ राहण्यासारखं? मग कित्येक गोष्टी आठवतात. आज चहा चांगला जमला, इथपासून ते आज सगळी कामं सहज आवरली इथपर्यंत कितीतरी गोष्टी आठवतात. सगळ्याच गोष्टी लिहायला नाही जमल्या तर किमान मनातल्या मनात तरी त्याबद्दल मी थ्यँक्यू म्हणतेच.

 

रोज नव्या गोष्टी शोधल्याच पाहिजें असंही नाही, जोपर्यंत नव्या गोष्टी शोधण्याचा ध्यास लागत नाही, तोपर्यंत सुरुवातीच्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत राहिली तरी हरकत नाही. अट मात्र एकच की किमान दहा गोष्टी शोधल्याच पाहिजेत. या दहा गोष्टीत काय काय येऊ शकतं?


१)      आपण राहतो ते घर (भाड्याचे का असेना आपण आपल्या डोक्यावर सुरक्षेचं छप्पर आहे.)

२)     आपली नाती. मुलं कुटुंब, कुटुंबातील इतर सदस्य. त्याचं प्रेम. त्यांचा आधार.

३)      आपण खातो ते अन्न. चहा, नष्टा, त्याची चव, सुगंध, अशा बारीकसारीक गोष्टीही मोजल्या जाऊ शकतात.

४)     आपण अनुभवत असलेल्या सुख-सुविधा, घरातील लाईट कनेक्शन, टीव्ही, कंप्युटर, बेड, गॅस, अशाच वस्तू मोजल्या तर नक्कीच दहापेक्षा अधिक भरतील.

५)     आपले आरोग्य. आपले कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ ही पंचेंद्रिये व्यवस्थित काम करतात, म्हणूनही आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. यातील एकाचेही काम बिघडले किंवा एकाचेही दुखणे सुरु झाले की किती वाईट अवस्था होते आठवून पहा. (या काळात तर आवर्जून आरोग्याबद्दल कृतज्ञ राहिलेच पाहिजे. कारण, आजूबाजूला इतकं काही घडत असतानाही आपण सुरक्षित राहिलो म्हणून)

६)     आपले दिसणे, असणे, किंवा आपल्याला आज डायरी लिहायला वेळ मिळाला म्हणूनही.

७)    रोजचा मिळालेला नवा दिवस, नव्या दिवसात मिळणाऱ्या नव्या संधी, नवी कामं, जुनी कामं

८)     काल घडलेल्या काही चांगल्या गोष्टी, मागच्या काही चांगल्या आठवणी,

९)     आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय,

१०)  आपली आर्थिक स्थिती. (याविषयी तर आवर्जून कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे.)

ही यादी कितीही मोठी होऊ शकते. कधी कधी छोटीही होऊ शकते. मोठी लिहावी की, छोटी याबद्दल कसलेही नियम नाहीत.

 

तुम्ही आयुष्यातील चांगल्या गोष्टींची दखल घेण्यास सुरुवात करता हीच कितीतरी मोठी गोष्ट आहे.

अगदी पेन-डायरी किंवा वही घेऊनच लिहिलं पाहिजे असंही नाही. तुम्ही मोबाईलमध्येही लिहू शकता. यासाठी प्ले स्टोअरवर खास अॅप्सदेखील मिळतात, ते देखील डाऊनलोड करू शकता. अॅप्समुळे तुम्हाला दररोज न चुकता नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला कायमची ही सवय लागेपर्यंत त्याचा फायदा होईल. Gratitude aap सर्च केले तर कितीतरी पर्याय तिथे तुम्हाला सापडतील.

 

वाईट तर सगळ्यांनाच दिसतं, आपल्याला तर सतत आपल्याबद्दल वाईट तेच दिसतं, तर या वाईटाच्या किंवा नकारात्मकतेच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला कृतज्ञतेचा मार्ग निश्चितच उपयोगी ठरेल.

 

ज्या-ज्या गोष्टींसाठी भरभरून कृतज्ञता व्यक्त कराल त्या-त्या गोष्टी अधिकाधिक प्रमाणात आकर्षित कराल.

म्हणून चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडाव्यात किंवा चांगल्या गोष्टीनी आयुष्यात प्रवेश करावा असं जर वाटत असेल तर, आत्तापासून कृतज्ञता व्यक्त करण्यास सुरुवात करा. सुख, समृद्धी आणि यशाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा.


आभाराचा भार हलका करण्यासाठीही लिहिलं पाहिजे!

Post a Comment

0 Comments