एक घर बनाएंगे हम, तेरे घर के सामने!

Image Source : Google


खूपच दूरवर आलो नाही का चालत चालत? परत जायला हवं. घर आपली वाट पाहत असेल. कदाचित रूसलंही असेल आपल्यावर लवकर आलो नाही म्हणून. घरचा रुसवा कसा काढावा या कल्पनेतच परतीचा रस्ता पकडला. शोधत शोधत ओळखीच्या वाटा, पोहोचलो एकडाशी आपल्या घराशी. आपलंच घर पण वाटेवरच्या खाणाखुणा खूपच बदलेल्या. ती जुनी गजबज नव्हती, गोंधळ नव्हता. गर्दी वाहत होती, तिला क्षणभरही उसंत नव्हती, धावण्याच्या स्पर्धेत उतरलेली यंत्र कुणासाठी थांबतील? गजबज असली तरी त्यात जीव होता, ओलावा होता, कुठून तरी एक हाक आपल्यासाठीही येईल, कोणीतरी आपल्यालाही ओळख देईल याची खात्री होती. यंत्र का कुणाला ओळख देतात? त्यांना माझ्या घराशी काही देणं-घेणं असण्याचंही कारण नव्हतं. मग कशा-बशा चुकून-माकून राहिलेल्या खाणाखुणांनी बुजरेपणाने दाखवली ओळख. त्याच ओशाळ ओळखींचा आधार घेत पोहोचले घरापाशी.

 

घर तरी किमान ओळख दाखवेलच अशी आशा होती. शेवटी आपलंच ना ते? दरवाजे होते तसेच, डोळ्यात ओळख लपवून. पूर्वी मी दिसता क्षणी लकाकायचे त्यांचे डोळे. आता डोळे होते, डोळ्यात ओळख होती पण आता त्यात लकाकी नव्हती. थकले होते बहुधा वाट पाहून. त्यांची काय चूक?

भिंतीचा सापळा तोच मात्र आता रंग बदलला होता. आतल्या सापळ्याला पटली होती ओळख पण, नव्या कोऱ्या चकचकीत रंगसमोर बुजलं होतं बिचारं. त्याचा नाईलाज होता. ओळखलं मी न बोलताच. नको बाबा रडूस. डोळ्यात ओळखीचं पानी नको आणूस. मी बोलले असलं काहीतरी मनातल्या मनात आणि समजून घेतलं त्यानंही आतल्याआत!

भिंती-भिंती जोडून बानेलेल्या खोल्यांवर आता वेगळीच जबाबदारी आली होती. साधेपणाने वावरण्याची त्यांना आता मुभा नव्हती. घर आपलंच होतं पण आपलं कुणीच घरात नव्हतं.

 

कोण तुम्ही हा प्रश्न अंगावर येण्याआधी पाय काढता घेऊन पळलेलं बरं. विचार करून फिरले मागे इतक्यात, एक सावली दिसलेली वाकलेली. हात उंच उंच नेत तीही मग दिसेनाशी झाली.  

 

माघारी फिरण्याचे तरी त्राण कुठे उरले होते? जाऊन जाऊन जाणार कुठं प्रश्न बरेच पडले होते.

घर अनोळखी होईल इतक्या दूर जाऊन चूक तर केली आपणच. मग आता घराचा काय दोष?

बांधू पुन्हा एक घर नव्याने आणि जपू त्याचं घरपण!

विसाव्यासाठी एक घर हवं असतं.

विसाव्यासाठी एक हक्काचं घर हवं असतं!

मनात धुन सुरू झाली,

एक घर बनाएंगे हम,

तेरे घर के सामने!

दुनिया बसाएंगे हम तेरे घर के सामने!

Post a Comment

1 Comments

छान लिहिलंय, घरपण राखलेली खरे बुजलीत आता, अस्तित्वातून, आठवणीतून !