सबसे बडा रूपय्या!

रोज उठून तुम्हाला त्याच त्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे का? रोज उठून आज हे बिल भरायचं राहिलं, एवढे पैसे कुठून आणू? घराचं भाडं तटलेय? फोनचा रीचार्ज संपला? हेच प्रश्न तुमच्याही डोक्यात थैमान घालतात? आपल्या गरजा आणि आपली कमाई यांचा मेळ बसत नाही? बरोबर ना? जगातील काही लोकांकडे हवा तितका पैसा आहे आणि काही लोकांकडे मात्र आपल्या मूलभूत गरजा भागवण्या इतकाही पैसा नाही, असे का? काही लोकांना आयुष्यात कधी पैसा कमी पडत नाही आणि काही लोकांना मात्र तो कधीच पुरत नाही. कितीही पगार असो काही लोकांच्या हातात पैसा टिकतच नाही, अशीही माणसे तुम्ही पहिली असतील.

Image source : Google


 

कितीही प्रगती करण्याचा पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी आहे तिथेच अडकून पडल्यासारखे वाटते. पैसा हा सर्वांसाठीच एक महत्वाची गरज आहे. सारे काही पैशानेच होते असे नाही पण पैसा असल्याशिवाय काही होत नाही हेही तितकंच खरं. पैसा बघण्यापेक्षा मन बघा ही सांगणं सोपं आहे, पान एक टप्प्यावर तुमच्याकडे पैसे आहेत का? असतील तर किती आहेत? या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात.

 

आपल्याकडे पैसा येत नाही किंवा टिकत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर यात दोष पैशाचा नाही किंवा तुमचाही नाही, दोष आहे तो तुमच्या दृष्टिकोनाचा! पैशाबद्दल तुम्ही कोणत्या भावना बाळगता यावरच तुमच्याकडे पैसा येईल किंवा नाही हे ठरणार असते.

 

लहानपणापासून पैशाबद्दल आपल्या मनात काही चुकीच्या गोष्टी रुजलेल्या असतात आणि या गोष्टी आपल्या मनात घर करून बसतात. पैसा कामावणं पाप आहे, पैशाचा मोह बरं नव्हे, पैसा तुम्हाला अडचणीत आणू शकतो, पैशाची हाव चांगली नसते, किंवा जर कुणाकडे जास्त पैसा असेल त्याने तो नक्कीच वाईट मार्गानेच कमावला असेल, प्रामाणिकपणे कष्ट करून श्रीमंत होता येत नाही, त्याच्याकडे जास्त पैसा आहे माझ्याकडे मात्र कमी, त्याला माझ्यापेक्षा पगार जास्त आहे, त्याला नेहमीच माझ्यापेक्षा जास्त चांगलं मिळतं. या आणि अशा इर्षेने ग्रासलेल्या भावनांना निश्चितच आपण सदृढ भावना म्हणणार नाही, या सगळ्या भावना पूर्वग्रह दूषित, इर्षेने आणि न्यूनगंडाने पछाडलेल्या आहेत. जर तुम्ही पैशाबद्दल या आणि अशा भावना बाळगत असाल तर, साहजिकच पैसा तुमच्याकडे आला तरी तो राहणार नाही.

 

तुम्ही स्वतः एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून गेलात. तुम्हाला तिथे दहा-बारा दिवस निवांत राहायचे असते, पण तुमच्या लक्षात येते की आपण आल्याने हा पाहून काही खुश किंवा आनंदी दिसत नाही, बहुतेक याला आपण आलेलो आवडलेलं दिसत नाही, आपण आपला मुक्काम गुंडाळलेला बरा, अशा विचाराने तुम्ही लवकरच तिथून काढत पाय घेणार. का तर? तुम्ही आल्याचा आनंद तुम्हाला त्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही. बरोबर ना? जसं तुम्हाला कुणी गृहीत धरलेलं आवडत नाही तसंच अगदी पैशाचंही आहे. पैसा आला तर तुम्ही किती आनंद दाखवता? की तो तर येणारच आहे, महिना भरला म्हणजे आता पगार मिळणारच, कुठे जातात पैसे अशा विचारानेच जर तुम्ही पैशाकडे पाहत असाल तर, पैसही तुम्हाला वैतागणारच आहे. म्हणूनच आलेला पैसा तुमच्या हातात टिकून राहत नाही.

 

आता तुम्ही म्हणाल, मग काय पैसा टिकण्यासाठी किंवा त्याबद्दलचा आनंद दाखवण्यासाठी पुन्हा पैसा खर्च करायचा का? पैसा हातात आला म्हणून काय जोरजोरात सगळ्यांना ओरडून सांगायचं का? मग असं काय करायचं की नेमका आनंद व्यक्त होईल. पैसा मिळाला म्हणून कुणाला आनंद होत नाही? सगळ्यांनाच आनंद होतो. हो हे बरोबर आहे, पण पैसा आल्यावर आनंद झाला तरी पुन्हा तो जाणार म्हणून चिंता वाटू लागतेच की नाही? किंवा एखाद्या वेळेस कुठे जास्तीचा पैसा गेला तर हळहळ वाटते की नाही?

 

अरेरे तिने वीस रुपये किलोने बटाटे आणले आणि आपल्याला मात्र तीस रुपये किलो पडले. असे विचार कितीही नाही म्हटले तरी मनात येतातच.  

 

जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा वस्तु घरात आल्याचा आनंद होतो पण त्यावर पैसे खर्च करावे लागले याचे वाईट वाटते. पैसा खर्च झाला की, त्याबद्दल वाईट वाटून घ्यायची काय गरज? मग आपण पैसे कामावेलेले असतात कशासाठी? स्वतःला हवं ते घेता यावं, फिरता यावं, नेसता यावं, खाता यावं म्हणूनच ना? आपल्या आयुष्याचा दर्जा सुधारवा म्हणूनच तर आपण अगदी जीवाचा आटापिटा करून पैसा कमवत असतो.

 

खरे तर आपण जे काम करतो आहोत ते आनंदाने न करता कुरकुरत करत असू तर त्यातून कधीही आपल्याला पुरेसा पैसा मिळणार नाहीये. म्हणून आधी पैसा कामावण्यासाठी आपण जे काम करतोय त्यातून आपल्याला आनंद मिळतोय का हेही तपासले पाहिजे.

 

पैसा मिळाल्यानंतर आपण आनंद व्यक्त करतो का? पैसा खर्च करून एखादी वस्तु घेतल्यानंतर आपण आनंद व्यक्त करतो का? इतरांनी कामावलेल्या पैशाबद्दल आपल्याला आदर आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर होय अशी असतील तर नक्कीच तुमच्याकडे भरूपूर पैसा येणार आहे आणि तो टिकणार आहे. पान जर या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशी असतील तर कितीही पैसा आला तरी तो तुमच्याकडे टिकणार नाही आणि त्यातून तुम्हाला आनंदही मिळणार नाही.

 

म्हणून आधी पैशाबद्दल आपल्या मनात काय समज आहेत? काय भावना आहेत? पुरेसा पैसा मिळाला नाही तर आपल्याला चालणार आहे का? आयुष्यभर इतरांनाच जास्त पैसा का मिळतो? म्हणून चरफडत राहायचं आहे का?

 

या सगळ्याला नाही म्हणायचं असेल तर या पैशाबद्दलच्या आपल्या भावना आणि दृष्टिकोन बदलावा लागेल. पैशाकडे पाहण्याचा सदृढ म्हणजेच हेल्दी दृष्टिकोन स्वीकारावा लागेल.

 

यासाठीही पुन्हा एकदा कृतज्ञताच आपल्या मदतीला धावून येणार आहे. आज आता तुमच्या खिशात जेवढेही पैसे असतील पुरेसे असतील किंवा अपुरे असतील त्याबद्दल आभार व्यक्त करा. कारण, जेवढे पैसे तुमच्याकडे सध्या आहेत तेवढेही एखाद्याकडे नसतील, नव्हे नसतातच!

 

म्हणून जे काही आपल्याला मिळालेले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. तुमच्या खिशातून किंवा पाकीटांतून पैसे काढून तुमच्या हातात घ्या, आणि त्यांच्याकडे पाहून अभार व्यक्त करा. आभार व्यक्त करणे म्हणजेच आनंद व्यक्त करणे, यासाठी वेगळं काही करायची गरजच नसते. तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुमच्या मनात समाधानाची, आनंदाची आणि कृतज्ञतेची भावना असली पाहिजे.

पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन रुजवण्याची ही पहिली पायरी आहे.

 

 

    

 

Post a Comment

0 Comments