आयुष्यातील ४० वर्षे त्याने सायकलवरून फिरण्यात घालवली!

हिर-रांझा, लैला-मजनू, रोमिओ-ज्युलिएट,  याच मांदियाळीतील आणखी एक नाव म्हणजे, इवान-सायकल. काय डोकं फिरलंय का हिचं? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. पण जितकं प्रेम हिरचं रंझावर, लैलाचं मजनूवर आणि रोमिओचं ज्युलिएटवर होतं तितकच काय त्यापेक्षा जास्तच प्रेम इवानचं सायकलवर होतं. या प्रेमाची आणखी एक सकारात्मक बाजू म्हणजे हिर-रांझा, लैला-मजनू असो की रोमिओ-ज्युलीएट या सर्वांच्या प्रेमाचा शेवट  शोकांतिक होता. इवान आणि त्याची सायकल मात्र शेवटपर्यंत एकमेकासोबत राहिले. या सायकलवरून चाळीस वर्षात त्याने सबंध जग पालथं घातलं. चाळीस वर्षाच्या प्रवासात त्याला जगाची कितीतरी विलोभनीय, मोहक आणि क्रूर रूपे दिसली या सर्वाबद्दल त्याने अनेक पुस्तके लिहिली. ती छापली गेली आणि मोठ्या प्रमाणात वाचलीही गेली. त्याच्या या पर्यटन अनुभवाबद्दल ऐकण्यासाठी कित्येक लोक उत्सुक होते आणि यातूनच इवानला एक व्याख्याता अशीही ओळख मिळाली. कोण होता हा इवान आणि सायकलने त्याला इतकं वेड कसं काय लावलं असेल? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा!

 

Image source : Google

दररोज तेच ते रुटीन ऑफिस ते घर घर ते ऑफिस, तीच कामं, तेच सहकारी, तेच घर आणि घरातील तीच ती परिस्थितीशी घड्याळाच्या काट्याशी बांधलेलं, हिंडण्याफिरण्याचं स्वातंत्र्य असूनही एकाच जागी जखडलेलं, रटाळवाणं आयुष्य जगण्याचा कुणाला कंटाळा येत नाही सांगा? तुम्हालाही अशा आयुष्याचा कंटाळा आला असेलच ना? तुमच्या माझ्यासारखाच इवानही या सरधोपट जगण्याला वैतागला होता. अशा वैतागातून जगाला काही तरी वेगळं करून दाखवण्याचा उर्मीतून तो सायकल घेऊन बाहेर पडला असं अजिबात नाही.

 

त्याला वाटलं घराबाहेर आणि चाकोरीबाहेर पडलं पाहिजे. बस्स आणि तो सायकल घेऊन बाहेर पडला. जिथवर आपले पाय चालतील तिथवर जायचं आणि तिथं जे काही पाहायला मिळेल ते पाहायचं. एवढाच इवानचा शिरस्ता होता. आधीच फिरण्याची आवड असणाऱ्या इवानला असं हे मनसोक्त भटकणं खूपच आवडू लागलं आणि मग तो वेगवेगळ्या देशात, खंडात भटकत राहिला. त्याच्या या भटकण्याला कुठल्याच सीमा नव्हत्या अंटार्टिकाचा बर्फाळ प्रदेश असो की अमेझॉनचं घनदाट जंगल, कधी इवान सायकलवर बसायचा तर कधी सायकल इवानच्या खांद्यावर! पण दोघांनी एकमेकांची साथ काही सोडली नाही.

 

पृथ्वीवरील दुर्गमातील दुर्गम ठिकाणी पोहोचायचे तर सायकल हेच एकमात्र खात्रीशीर साधन! इवानने आपल्या सायकलीचा हॅन्डेल कधीच सोडला नाही. थंडी, ऊन, पाऊस, वादळवारा, कशापुढेच तो बधला नाही.

 

युनायटेड किंग्डमच्या एप्सोममध्ये ६ जानेवारी १९३४ रोजी इवानचा जन्म झाला. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. ट्रेनने प्रवास करणे परवडायचे नाही म्हणून तो आणि त्याचे वडील सायकलवरूनच सहलीला जायचे. जिथवर जाऊ वाटेल तिथवर. सायकलवरून जग पालथे घालण्याची ही प्रेरणा आणि मन:शक्ती त्याला वडिलांकडूनच मिळाली असावी. नाहीतर सायकलवरून सहारा वाळवंट पार करण्याचा नाद कुणी केला असता सांगा?

 

त्याच्या या सायकल सफारीने त्याला अनेक मानसन्मान मिळवून दिले. दक्षिण आणि उत्तर अमेरिकेदरम्यानच्या पनामाजवळील डेरीयन गॅपजवळ पोहोचणारा तो पहिला सायक्लीस्ट होता. नॉर्वेपासून केप ऑफ गुड होप आणि बँकॉकपासून व्लादिवोस्तोकपर्यंत फिरणारा त्याच्या सारखा सायकलस्वार दुसरा कुणी झाला नसेल आणि होण्याची शक्यताही नाही.

 

दरवर्षी तो सायकलवरून जवळपास ६००० मैलाचे अंतर पार करत होता. संपूर्ण पृथ्वीच्या परीघाइतके अंतर त्याने दहावेळा पालथे घातले असेल. एवढ्या मोठ्या प्रवासात त्याला आलेले अनुभव असेच अतरंगी होते. कुठे हत्तीच पाठीमागे लागला तर कुठे पोलिसांनी उचलून जेलमध्ये टाकलं, कुठे दरोडेखोरांनी लुबाडलं तर कुठे उपाशीच राहावं लागलं. कुठे हल्ले झाले तर कुठे अपघात, पण शेवटच्या श्वासापर्यंत त्याची सायकल काही थांबली नाही.

 

आफ्रिकेच्या घनदाट जंगलातून हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याची पर्वा न करता त्याने आपला प्रवास पूर्ण केला. एकदा तर तो सहारा वाळवंटात त्याच्या सायकल सहित रुतून पडला होता. त्याचं नशीब बलवत्तर की तिथून जाणाऱ्या अरबांच्या टोळीला तो दिसला नाही पण त्याची सायकल दिसली आणि त्या सायकलच्या मागून ते इवान पर्यंत पोहोचले. मग या अरबांच्या टोळीने त्याला सहरातील प्रवासाबद्दल मार्गदर्शन केले. जीव वाचवणाऱ्या त्या अरबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून त्याने त्या अरबांना सनस्क्रीम दिली. कदाचित त्याची त्यांना काहीच गरजही नसावी. नंतर त्याने हा किस्सा आपल्या एका पुस्तकात नोंदवून ठेवला.

 

Image source : Google

झांबियामध्ये फिरायला गेला असताना त्याला मलेरियाची लागण झाली. या आजाराने त्याचा जीवच घेतला असता पण झांबिया दुतावासातील अधिकारी इवानच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी इवानला त्याच्या सायकलसह इंग्लंडला सुखरूप पोहोचवले. या आणि अशा अनेक अनुभवांनी इवानची ही सायकलभ्रमंती कधीच खंडित झाला नाही की त्याची उमेद खचली नाही.

 

विश्वास ठेवा वयाच्या ७४व्या वर्षीही हा माणूस सायकलवरून जगभ्रमंती करत होता. २३ ऑगस्ट २००८ रोजी ग्रीसच्या रस्त्यावरून फिरत असताना एक भरधाव आलेल्या कारने इवानला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यातच त्याचा मृत्यू झाला. त्यादिवशी त्या अपघातातून तो वाचला असता तर आजही तो कुठे ना कुठे फिरत राहिला असता हे मात्र नक्की.

 

इतकं फिरून त्यानं कमावलं काय? वेगवेगळ्या देशांची भाषा, तिथली संस्कृती, माणसं याबद्दल त्याला जवळून माहिती घेता आली आणि या अनुभवावर त्यानं अनेक पुस्तकंही लिहिली. अमेरिकेच्याच नाही तर जगभरातील अनेक मोठमोठ्या विद्यापीठातून त्याला व्याख्यानासाठी आमंत्रण येत. जगातील सांस्कृतिक वैविध्यतेवर त्याच्या बोलण्यास त्याच्या इतकं कोणी सक्षम असेल असं वाटत नाही. इवानच्या आठवणी जपण्यासाठी डर्बीशायर मध्ये त्याच्या नावाचे बूट बनवले जातात. ज्याला हायबेल शूज म्हटले जाते.

 

Image source : Google


इतकं सगळं तो कशासाठी करतो असं त्याला कुणी विचारलंच तर तो एकच उत्तर देई, “पक्षी रोज सकाळी उठतात आणि आकाशात झेप घेतात. त्यांना जर तुम्ही का उडता तर त्यांना सांगता  येईल का? त्यांना उडायचं असतं म्हणून ते उडतात. तसंच मलाही फिरायचं असतं म्हणून फिरतो.”

 

“पंछी बनू उड़ के चलूं मस्त गगन में,

आज मैं आझाद हुँ दुनिया के चमन में” या गाण्यातील नायकाप्रमाणेच इवान हायबेल म्हणजे एक आझाद पंछीच होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये. इवानची ही जन्मकहाणी वाचून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? जग फिरण्यासाठी पैसा, व्हिसा आणि पासपोर्ट यापेक्षाही जास्त गरजेची असते ती जिद्द!

 

‘इच्छा तेथे मार्ग,’ म्हटले आहे ते काही उगीच नाही!

 

इवानची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.

 

लेखिका – मेघश्री श्रेष्ठी

Post a Comment

0 Comments