स्वतःवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे हे गुण तुम्हाला माहीत आहेत का?

स्वत:वर प्रेम करणं, स्वतःचं एकूण घेणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःला हवं-नको ते पाहणं म्हणजे स्वार्थीपणा नव्हे. स्वत:वर प्रेम करणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

Image source : Google


तुमच्याकडे कुणी साखर मागायला आले आणि तुमच्या घरी साखरच नसेल तर काय कराल? मागणाऱ्याला रिकाम्या हातानेच परत जावे लागणार. बरोबर ना? तसच काहीसं प्रेमाचंही आहे, जर तुम्ही स्वतःवरच प्रेम करत नसाल तर तुम्ही दुसऱ्याला कुठून प्रेम देणार? आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार अशी म्हण आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवली आहे ती का उगीच? तुम्ही तहानलेले असताना एखाद्या कोरड्या विहिरीतून पाणी काढण्याचा प्रयत्न केलात तर काय हाताशी लागेल? मरणच!

 

Image source : Google

म्हणून इतरांकडून प्रेमाची अपेक्षा करण्यापूर्वी किंवा इतरांवर प्रेम करण्यापूर्वी आपलं स्वतःचं स्वतःवर प्रेम असणं गरजेच आहे. या प्रेमात कोणकोणत्या गोष्टी येतात ते पाहूया.

 

१.  अनेकांना असं वाटतं की स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःतील उणीवांकडे दुर्लक्ष करणे, मेहनत करण्यापासून रोखणे. स्वतःचे फाजील लाड पुरवणे म्हणजे प्रेम नव्हे. उलट या प्रेमात पहिली पायरी येते ती स्वतःला जास्तीत जास्त सुधारत नेणे, स्वतःतील कमतरतेवर मात करणे, त्यासाठी नवनवीन गोष्टी शिकणे, मेहनत घेणे, स्वतःतील उणिवा दूर करून एक चांगला व्यक्ति होण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. आपण स्वतःच जेव्हा स्वतःतील उणिवा शोधायला लागतो आणि त्या दूर करण्याच्या जिद्दीने कामाला लागतो तेव्हा आपणच आपली प्रेरणा बनतो. उसने अवसान आणण्याची गरजच लागत नाही. आपण प्रगती करत राहतो. प्रेम करण्याचा अर्थच हा आहे की, स्वतःला आतून अधिक मजबूत बनवणे. आपल्या भावनांची आणि आपल्या कृत्यांची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेणे. थोडक्यात काय तर स्वतःतील चांगल्या गुणांना उजाळा देणे आणि स्वतःला संयमपूर्वक हाताळणे म्हणजे स्व-प्रेम!

 

२. स्व-प्रेमात असताना भूतकाळातील चुकांकडे दुर्लक्ष केले जात नाही तर त्या चुकांची छानणी करून त्या चुका कशामुळे झाल्या? त्या चुकांतून आपण काय धडा शिकलो? या प्रश्नाची उत्तरे शोधली जातात. मिळालेल्या उत्तराची अंमलबजावणी करण्याचे वचन स्वतःकडूनच पाळले जाईल याबद्दल विश्वास व्यक्त केला जातो. कितीही कठीण प्रसंग आला तरी पुन्हा त्या गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाते. जी व्यक्ति खरच स्वतःवर प्रेम करते ती आपल्या चुकांतून शिकण्याचा प्रयत्न करते ना की चुकांवर  पांघरून घालण्याचा. स्वतःच्या प्रेमात बुडालेली व्यक्ति आपल्या चुकांकडे पाहण्याचा एक निरोगी दृष्टीकोन स्वीकारते. चुका झाल्या हे मान्य करून त्याबद्दल पश्चाताप करत बसण्यात वेळ वाया घालवत नाही.

 

३. स्वतःच्या प्रेमात पडलेली व्यक्ति इतरांशी स्वतःची तुलना करत बसत नाही. इतरांनी कसे यश मिळवले आणि आपण कसे मागे राहिलो याचे पाढे वाचत बसत नाही. उलट ज्या लोकांनी प्रगती केली आहे तिच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळेल. त्यातून आपण काय बोध घेऊ हे पाहते. अशा व्यक्तींच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. स्वतःचा अहं आड न येऊ देता त्या व्यक्तीला स्वतःचे प्रेरणास्थान बनवते आणि तिच्या यशात कोणकोणत्या गोष्टींचा वाटा आहे याचे मोजमाप करून त्या स्वीकारायचा प्रयत्न करते. स्वत:च्या प्रेमात पडलेली व्यक्ति कधीच इतरांच्या प्रगतीबद्दल जळफळाट करून घेत नाही. इतरांच्या प्रगतीमुळे तिला त्रास होत नाही. उलट ती स्वतःशी हेच स्वगत बोलते की, जर अमुक-तमुक व्यक्तीला हे शक्य असेल तर मग मी का नाही करू शकणार? अशा प्रकारे ती इतरांच्या प्रगतीतून प्रेरणा घेते.

 

४. स्वतःच्या प्रेमात पडलेली व्यक्ति आपली मते तपासून पाहते. आयुष्याच्या कोणकोणत्या क्षेत्रात आपण प्रगती करू शकतो, हे अजमावून पाहते. एकाच मताशी चिकटून राहिल्यामुळे आपले नुकसान होत आहे, समोरच्या परिस्थितीची दुसरी बाजू आपण पाहू शकत नाही, असे जर तिला वाटले तर आपली मते बदलण्यास ती मागेपुढे पाहत नाही. उलट आपल्या प्रगतीसाठी जुने दृष्टीकोन सोडून देऊन नवे दृष्टीकोन स्वीकारण्याची तयारी ठेवते. नवे दृष्टीकोन स्वीकारतानाही त्यात कितपत तथ्य आहे हे तपासून पाहते. निव्वळ बदलासाठी बदल अशीही तिची वृत्ती नसते. स्वतःची प्रगती साधण्यासाठी जो बदल आवश्यक आहे तो स्वीकारण्यास ती नेहमीच तयार असते. आपले विचार, आपल्या सवयी, आपल्या कामाची पद्धती, असा सगळ्यांची छानणी करून त्यात बदल करणे आवश्यक वाटल्यास त्याची अंमलबजावणी करते.

 

५. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे आपल्या कामाची गती कशी वाढेल, त्याचा दर्जा कसा सुधारेल याकडे लक्ष देणे. कामाचा दर्जा सुधारण्यासाठी कोणत्या नव्या गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे, त्याकडे लक्ष देईल. स्वतःची कार्यक्षमता कशी वाढेल याकडे लक्ष देते. म्हणजे तिच्या हातून कधीच चुका होणार नाहीत असे नाही पण जरी काम करताना तिच्या हातून काही चुका झाल्या तरी त्या चुका ती सुधारून घेण्याचा प्रयत्न करेल. हे करताना अपराधीभाव न बाळगता आपल्याला अजून सुधारायला वाव आहे, असे म्हणून त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल. आपल्या कामाच्या बाबतीत आपण कुठे कमी पडतो का हे तपासून पाहिल. याचा अर्थ असाही नाही की ती व्यक्ति परिपूर्णतेच्या ध्यासाने झपाटून जाईल. कोणतीही व्यक्ति परिपूर्ण होऊ शकत नाही या वास्तवाची तिला चांगली जाणीव असते आणि आपणही परिपूर्ण नाही किंवा आपल्याला परिपूर्ण बनायचेही याचे भान राखूनच जमेल तितक्या सुधारणा अंमलात आणते.

 

६. स्वतःच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीला या प्रेमाचे काही अद्भुत फायदे मिळत असतात. जसे की, -

जागरूकता – अशी व्यक्ति आपल्या भावनांच्या बाबतीत जागरूक राहायला शिकते. आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडते. भावनांच्या आहारी न जाता प्रत्येक भावनेची तीव्रता तपासून पाहते. कोणतीही भावना निर्माण होण्यामागील प्रेरणा तपासते. आपली मानसिक स्थिती योग्यरीत्या ओळखते आणि त्यात सुधारणा करण्याकडे लक्ष देते. कोणतीही कठीण परिस्थिती निर्माण झालीच तर संतुलन ढळू न देता त्यातून मार्ग काढण्याचे विविध विवेकी पर्याय तपासून बघते.

निराशा आणि चिंता या दोन्ही पासून दूर असते – काही लोकांना चिंता आणि निराशा या दोन्ही गोष्टीनी पूर्णत: घेरलेले असते. या गोष्टी तुम्हाला स्वतःच्या प्रेमापासूनही दूर ठेवतात. या नकरात्मक भावनांपासून दूर राहायचे असेल तर स्वतःचा स्वीकार करता यायला हवा. म्हणूनच स्वतःवर प्रेम करणाऱ्या स्वतःच्या संवेदना ओळखणाऱ्या व्यक्ति कधीही स्वतःची खरडपट्टी काढत नाहीत त्या परिस्थितीची उलट-सुलट दोन्ही बाजूंनी तपासणी करून बघतात आणि मग योग्य तो दृष्टीकोन स्वीकारून त्यानुसार वाटचाल करतात. याउलट ज्यांना स्वतःवरच प्रेम नसते अशा व्यक्ति स्वतःचाच धिक्कार करत राहतात. स्वतः कसे नालायक आहोत याची उजळणी करत राहतात आणि स्वतःच स्वतःच्या शत्रू बनतात.

 

७. स्वतःवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो. याचा अर्थ असा नाही की त्या दुसऱ्यांसाठी काही करतच नाहीत किंवा करणारच नाहीत. पण त्याच्या प्राधान्यक्रम त्या स्वतः असल्याने त्यांना इतरांसाठी स्वतःला किती त्रास द्यायचा असतो हे माहीत असते. स्वतःच्या क्षमतेबाहेर जाऊन ते इतरांसाठी काही करण्याचा आणि त्यांना लुळे-पांगळे बनवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. त्या इतरांना मदत करतील, त्यांच्या पाठीशी उभ्या राहतील पण यामुळे स्वतःला त्रास होणार नाही. स्वतःचे आणि इतरांचेही नुकसान होणार नाही हे आधी पाहतील. स्वतःच्या गरजा मागे ठेवून इतरांना मदत करणे घातक असते याची त्यांना चांगली जाणीव असते. म्हणून मदत करण्याचीही एक मर्यादा असते हे यांना चांगले ठाऊक असते. इतरांशी जुळवून घेतील, त्यांना सहानुभूती दाखवतील, इतरांची काळजी घेतील, पण यावेळी स्वतःची हेळसांड होणार नाही याकडेही कटाक्षाने पाहतील.

 

८. स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ति स्वतःवर विश्वास ठेवते, स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवते आणि तिचा स्वतःच्या स्वप्नांवरही विश्वास असतो. स्वतःचा बिनशर्त स्वीकार करते. स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवत नाही. स्वतःच्या उणीवांचा दोषांचा स्वीकार करते. इतरांकडून मान्यता मिळण्याची वाट पाहत नाही. इतरांनी कौतुक करावं म्हणून धडपडत नाही. स्वतःच स्वतःवर कठोर टीका करत नाही. अशा व्यक्तीला आत्मपरीक्षण आणि आत्मक्लेश  यातील अंतर पुरेपूर समजते.

 

स्वतःला विनाकारण कुठल्याही ठरलेल्या चौकटीत बसवण्याचा अट्टाहास करत नाही. स्वतःचे अवमूल्यन करत नाही. अपयशाची भीती बाळगत नाही. त्यामुळे प्रयत्न करण्यासही कमी पडत नाही. आणखी एक प्रयत्न करायला काय हरकत आहे, असा विचार करून स्वतःला पुन्हा कार्यरत करते. खचून जात नाही.

 

स्वतःवर प्रेम करण्यासारखी नितांत सुंदर गोष्टी दुसरी कुठली असूच शकत नाही. यामुळे आपली मानसिकस्थिती चांगली राहते. जगण्यातील आनंद शोधण्याची वृत्ती वाढते. स्वतःकडे आणि इतरांकडेही सकारात्मक दृष्टीने पाहण्याची कला अवगत होते. आजूबाजूच्या व्यक्तींशी असलेले नाते अधिक दृढ होते. स्वतःवर प्रेम करता येणे ही देखील एक कला आहे. ही कला शिकणे थोडेसे अवघड असेल पण अशक्य निश्चितच नाही.

 

स्वतःवर प्रेम करून तर पहा, अवघं जगणंच सुंदर होऊन जाईल!

 

Post a Comment

0 Comments