एकाच वेळी ३० हून अधिक इंग्रज शिपायांचे शिर उडवणाऱ्या उदा देवीची शौर्यगाथा!

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात कोट्यावधी लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंग, राजगुरू सुखदेव, सारखे क्रांतिवीर फासावर चढले. क्रांतिकारी बाबू गेनू सारख्या कित्येकांनी इंग्रजांशी लढता-लढता आपला प्राण त्याग केला, हे तर आपल्याला माहीत आहेच. पण, याच संग्रामातील काही कथा आणि व्यक्ति अशाही आहेत ज्यांची इतिहासाने पुरेशी दखल घेतलेली नाही. आपल्या प्राणाचे बलिदान देऊन ३० पेक्षा जास्त ब्रिटीश सैनिकांना धारातीर्थी पडणाऱ्या उदा देवी पासी या विरांगणेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कदाचित फक्त मोजक्या लोकांनाच याची माहिती असेल बहुतांश लोकांना नाही. धाडस, शौर्य, जिद्द, जोश आणि पराक्रम यांची धगधगती ज्वाला म्हणजे उदा देवी! उदा देवीच्या पराक्रमाची ही गाथा वाचल्यानंतर तुमचे रक्तही सळसळल्या शिवाय राहणार नाही.

 

Image source : Google


तो काळ होता १८५७ चा. भारतात सर्वत्रच ब्रिटीश विरोधी रोष शिगेला पोहोचला होता. विविध संस्थानिकांपासून सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाच्या मनात ब्रिटीश विरोधी असंतोष खदखदत होता. ठिकठीकाणच्या संस्थानातून ब्रिटिशांच्या विरोधात मोहीम छेडली जात होती. या उठवात स्त्रियाही पुढे होत्या. राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल यांच्यासारख्या शाही स्त्रियांनी ब्रिटिशांविरोधात दिलेला लढा तर सर्वांना ज्ञात आहे पण या शाही स्त्रियांच्या सैन्यात शामिल होऊन प्रत्यक्ष मैदानात उतरणाऱ्या स्त्रियांची मात्र म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. इतिहासाच्या पानात अदृश्य झालेली अशीच एक दलित विरांगणा म्हणजे उदा देवी पासी. पासी या दलित जातीतील असूनही आपल्या पराक्रमाने तिने इंग्रजांना धडकी भरवली होती. आजच्या स्वातंत्र्यदिनी उदा देवीची ही शौर्यगाथा आपण नक्कीच आळवली पाहिजे.

 

शहीद उदा देवी पासी या बेगम हजरत महल यांच्या महिला तुकडीत सामील होत्या. त्यांचे पती मक्का पासी हे लखनऊचे सहावे नवाब वाजीद आली शाह यांच्या सैन्यात भरती झाले होते. मक्का पासी प्रचंड शूर आणि पराक्रमी होते.

 

भारतीयांचा रोष चिरडण्यासाठी इंग्रज सैन्यांनी ठिकठिकाणच्या संस्थानांवर हल्ले सुरु केले होते. १० जून १८५७ रोजी इंग्रज सैन्याने अयोध्येवर हल्ला केला होता. लखनऊ जवळच्या ईस्माइलगंजमध्ये मोलवी अहमद उल्लाह शाहच्या नेतृत्वाखालील एक तुकडी इंग्रजांशी लढत होती. या तुकडीत मक्का पासी देखील त्वेषाने इंग्रजांवर तुटून पडत होते. इंग्रजांशी लढता लढता मक्का पासी याच युद्धात शहीद झाले.

 

आपले पती युद्धभूमीवर शहीद झाले हे ऐकून उदा देवी काही काळ उद्विग्न झाली पण खचून न जाता आपल्या पतीच्या बलिदानाचा सूड घेण्याचा निर्धार करून तीही महिला सैन्य तुकडीत सामील झाली. उदाला जिथे तिथे फक्त इंग्रजांचेच शिर दिसत होते, कधी एकदा आपल्यातील हा त्वेष बाहेर पडून त्याला वाट मिळते असे तिला झाले होते. पतीच्या बलिदानाने तिच्यातही लढाईचा जोश संचारला होता. तिने आणखी काही महिलांना सोबत घेऊन दलित महिलांची तुकडीच स्थापन केली. बेगम हजरत महलच्या महिला सैन्यात उदा देवीची ही तुकडी सामील झाली. त्यांना आवश्यक ते डावपेच शिकवले जात होते. उदा देवी प्रत्येक डावपेच जलद गतीने आत्मसात करत होती.

 

शेवटी १६ नोव्हेंबर १८५७चा तो दिवस उजाडला आणि उदाला पराक्रम आणि शौर्य गाजवण्याची संधी मिळाली. ज्या ज्या भागात भारतीय सैन्याने उठाव केला आहे तिथे तिथे हल्ले करण्याचे ब्रिटीशांचे लक्ष्य होते. लखनऊच्या सिकंदर बागेमध्ये जमलेल्या भारतीय सैनिकांवर इंग्रजांनी हल्ला केला. उदा देवी आणि तिच्या महिला तुकडीने इंग्रजांसमोर एक मजबूत भिंत उभी केली जेणेकरून इंग्रजांना या बागेमध्ये प्रवेशच करता येणार नाही.

 

Image source : Google



आधुनिक शस्त्रास्त्रे असणारी ब्रिटीशांची तुकडी या महिला वीरांगणांच्या तुकडीला सहज नमवू शकत होती, पण त्यांच्या जिद्दीला नाही. आपल्या सैनिकांची ताकद कमी पडते असे दिसल्यावर उदा देवीने जवळच्याच एका उंच आणि डेरेदार पिंपळ वृक्षाचा आधार घेलता. त्या अवाढव्य आणि बहारदार पिंपळावर ती सरसर चढली. तिच्या सोबत बंदूक आणि दारुगोळा होताच. दाट पर्णांनी आच्छादलेल्या त्या पिंपळ वृक्षावर आपला मृत्यू बसला असेल याची इंग्रज सैनिकांना काय कल्पना. सिंकदर बागेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या इंग्रज सैनिकांवर अचानक दारूगोळ्याचा वर्षाव होऊ लागला. एक-दोन नव्हे तर एकामागून एक तब्बल ३६ ब्रिटीश सैनिक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले.

 

आत प्रवेश करणाऱ्या आपल्या सैनिकांवर हा असा हल्ला कुठून होतोय हेच इंग्रज अधिकाऱ्यांना लक्षात  येईना काही काळ हे अधिकाऱ्यांचीही घाबरगुंडी उडाली. अचानक हवेतून होणारा गोळीबाराचा मारा दिसत होता, खाली धारातीर्थी पडणारे आपले सैनिक दिसत होते पण त्यांच्यावर नेमका कोण आणि कुठून हल्ला करत आहे हे मात्र काही केल्या कळत नव्हते.

 

इतक्यात एका इंग्रज सैनिकाचे लक्ष पिंपळाच्या झाडाकडे गेले आणि हा दारुगोळा तिथूनच खाली येत असल्याचे त्याने पाहिले. पानांच्या आड त्याला हालचाल जाणवली आणि त्याने थेट तिथे निशाणा साधला. उदा देवीला गोळी लागताच ती पिंपळाच्या झाडावरून खाली पडली. उदा देवी खाली पडताच इंग्रज अधिकारी कॅम्पबेल, या तरुण धाडसी योद्धा आहे तरी कोण हे पाहण्याच्या उत्सुकतेने तिथे पोहोचला आणि पाहतो तर काय तो तरुण म्हणजे पुरुषांचा वेश धारण केलेली एक स्त्री होती. तिचे नाव होते उदा देवी पासी. उदा देवीच्या पराक्रमाने कॅम्पबेलही भारावून गेला, एका वीर योद्ध्याला सलामी देण्यासाठी त्याने आपली हॅट उतरवली आणि उदा देवीला सॅल्युट केले.

 

उदा देवीचा हा पराक्रमाची दखल लंडन टाईम्स सारख्या प्रथितयश दैनिकाने देखील घेतली. त्या इंग्रजी वर्तमान पत्रातून या शूर, पराक्रमी, धाडसी विरांगणेबद्दल भरभरून माहिती छापून आली होती. इंग्रज इतिहासकारांनी उदादेवीचे  भरभरून कौतुक केले आहे.

 

उदा देवी पासीच्या हौतात्म्याला आज शेकडो वर्षे उलटून गेली आहेत. या शेकडोवर्षात फक्त तिच्या पासी जातीतील बांधव सोडल्यास कुणीच तिच्या या शौर्याचे स्मरण करत नाही. अगदी अलीकडे काही वर्षापूर्वी जिथे ही लढाई लढली गेली होती त्या लखनऊच्या सिकंदर बागेत उदा देवीचा सैनिकी वेशातील एक पुतळा उभा करण्यात आला आहे. तिच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी आणि तिच्याबद्दल आदरांजली वाहण्यासाठी पासी बांधव तिच्या पुण्यतिथी निमित्त या पुतळ्याजवळ जमतात आणि तिच्या शौर्याची उजळणी करून प्रेरणा घेतात.

 

 उदा देवीचे हे शौर्य, पराक्रम, तिची जिद्द, तिचा त्वेष आणि तिची प्रेरणा फक्त पासी समाजापुरती मर्यादित ठेवणे म्हणजे आपल्या संकुचितवृत्तीचे दर्शन आहे. या शूर, विरांगणेचे हौतात्म्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. आपण या आजच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उदा देवी पासी आणि मक्का पासी यांच्या शौर्याला वंदन करून त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्ति केली पाहिजे. स्वतंत्र भारताचे एक स्वतंत्र नागरिक म्हणून आपण इतके तरी केलेच पाहिजे.

 

Post a Comment

0 Comments