आजच्या तरुणांच्या समस्या कधी समजून घेणार?

सळसळता उत्साह म्हणजे युवा, जल्लोष म्हणजे युवा, आनंद म्हणजे युवा, असे अनेक विशेषणे लावून आजच्या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या जात आहेत. पण आजच्या युवावर्गासमोर ज्या समस्या आ वासून उभ्या आहेत त्यांची कुणी दखल घेणार आहे की नाही? हा कळीचा मुद्दा आहे. आजची पिढी जी इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या प्रभावात वाढते आहे जगते आहे या पिढीचे प्रश्नही तितकेच वेगळे आणि गुंतागुंतीचे आहेत. काय तुम्ही आजकालची मुलं हे ऐकवताना आमच्या काळी अस होतं तसं नव्हतं अशा शिळ्या कढीला ऊत आणताना या पिढी समोरील वास्तवाकडे डोळेझाक करून चालणार नाही. दोन पिढ्यांतील संघर्षाला जनरेशन गॅपच्या नावाखाली दुर्लक्षूनही चालणार नाही.


जग झपाट्याने बदलत आहे. आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल की फक्त एका दशकाच्या कालावधीत कितीतरी गोष्टी बदलल्या आहेत. सामाजिक गुंतागुंत वाढत चालली आहे. म्हणूनच आजच्या पिढीला ज्या समस्या भेडसावत आहेत त्यांची तीव्रताही कित्येक पटीने वाढली आहेया समस्या काय आहेत ते मांडण्यासाठीच आजचा हा लेखनप्रपंच!

Image source : Google


१. शिक्षण –

आजच्या पिढीचे भवितव्य हे शिक्षणावरच अवलंबून आहे. पण प्रत्येकालाच चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल याची खात्री नाही. दर्जा तर राहूदेच पण, काहीना तर आजच्या काळातही शिक्षण मिळवणे दुरापास्त झाले आहे. शिक्षण घेतले तरी त्यातील जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहू की नाही हे सांगणे कठीण.

काही काही तर असेही अभागी आहेत ज्यांना शालेय शिक्षण अर्ध्यावरच सोडून द्यावे लागते. शाळा, कॉलेज, ची भरमसाठ फी, वह्या पुस्तकांसाठी येणारा खर्च, यामुळेही अनेकांना शिक्षण म्हणजे एखादी अप्राप्य गोष्ट असावी असे वाटते. कोव्हीड काळात तर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांचा आणि तरुणांचा आकडा वाढतोच आहे.

शाळेत प्रवेश घेतला तरी शालेय शिक्षण हेही पूर्वी सारखे हसत-खेळत राहिलेले नाही. लहानवयापासूनच अभ्यास, अपेक्षा, स्पर्धा, अशा कित्येक गोष्टींचा ताण झेलतच ही पिढी मोठी होत आहे. शिक्षण उपलब्ध झाले असले तरी ते सर्वांच्याच पचनी पडत आहे असेही नाही. यात शाळा आणि पालकांनी मुलांच्या शिक्षणाबद्दल थोडी समंजस आणि उदार भूमिका दाखवणं गरजेचं आहे.

Image source : Google



२. मित्रांचा दबाव –

आपले मित्र आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून मिळणारी मान्यता, आदर या गोष्टी तारुण्यात खूपच महत्वाच्या असतात. एखादी गोष्ट जमली नाही की जसे पालक हिणवतात तसे सोबतचे मित्रही हिणवतात. पालकांचे हिणवणे आणि मित्रांचे हिणवणे यात जमीन-अस्मानचा फरक असतो. विशेषत: पौंगडावस्थेतील मुलांना या समस्येचा सामना करावा लागतो. आजच्या तंत्रज्ञान, इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या जमान्यात या दबावाने एक वेगळेच रूप घेतले आहे.

दारू, ड्रग सारख्या नशिल्या पदार्थांचे सेवन करण्यापासून ते सेक्स पर्यंत कुठल्याही गोष्टींचे आव्हान दिले आणि स्वीकारले जाऊ शकते. मित्र-मैत्रिणींमध्ये आपण फट्टू नाही हे दाखवण्यासाठी अनेकदा अशी विचित्र आव्हानं स्वीकारली जातात. यात आपल्या हातून नकळतपणे आपल्याच निरागसतेचा खून होतोय हे कळण्याइतपतही या मुलांना समज आलेली नसते पण काही तरी करून दाखवण्याची खुमखुमी आणि इतरांच्या थट्टामस्करीला बळी पडण्याची भीती निरागसतेवर मात करून जाते.

Image source : Google



३. नैराश्य –

मागच्या कुठल्याही पिढी पेक्षा या पिढीला ही समस्या तीव्रतेने भेडसावत आहे. नैराश्य, डिप्रेशन, नर्व्हस ब्रेकडाऊन या गोष्टी आज खूपच सामान्य बनल्या आहेत. शाळेपासून घरापर्यंत, समाजापासून नातेवाईकांपर्यंत अनेकांच्या अपेक्षांचे ओझे मनावर घेऊन खरोखर असह्य आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थेने केलेल्या एका सर्वेनुसार १५% तरुण आज नैराश्याचे बळी ठरत आहेत. यासाठी काही लोक तंत्रज्ञानाला जबाबदार धरतात.

सतत अपडेट राहण्याची गरज ज्यातून फोमोसारखी (fear of missing out) भीती मनावर रेंगाळत राहते. त्यातून सतत कुठल्या न कुठल्या गोष्टींची माहिती जमवणे, त्या माहितीची पडताळणी करणे, त्यात भर घालणे, अशा कितीतरी गोष्टी मानसिक पातळीवर सुरु राहतात. ज्याने मनाला, मेंदूला थकवा येऊ शकतो. एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न ज्याला मल्टी टास्किंग सारख्या गोंडस नावाने ओळखले जाते, यामुळेही मनावर आकारण ताण येतो. अशा कितीतरी संकल्पनांनी या पिढीला वेठीस धरले आहे.

Image source : Google



४. मानसिक छळवणूक –

फक्त मुलीच छेडछाडीच्या बळी ठरतात असे नाही तर याचा फटका मुलांनाही बसतो आहे. कोणतीच व्यक्ति परिपूर्ण असू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही उणीव, कमतरताही असतेच. पूर्वीच्या काळीही एकमेकांना चिडवणे हिणवणे असे प्रकार होते. पण त्याचा अतिरेक होत नव्हता. आजच्या काळात मात्र ही चिडवा-चिडवी आणि हिणवा-हिणवी अत्यंत हिणकस थराला पोहोचली आहे. एखाद्या व्यक्तीची एखादी चूक पकडून त्यावरून तिचा सतत हिणवणे, डिवचणे आणि त्यातून आनंद घेणे हा प्रकार वाढतो आहे आणि त्यात काही गैर आहे असे कुणालाच वाटत नाही. सोशल मिडियावर तर अशा हा हिणकस कमेंट्स मुळे कित्येक लोकांचे मानसिक स्थैर्य उध्वस्त झाले असेल. आपल्या अशा हिणकस कमेंट्समुळे समोरच्याला काही त्रास झाला तर? हा विचारही हल्ली कुणाच्या गावी नसतो.

Image source : Google



५. एकल पालकत्व –

कुटुंब ही संकल्पनाच कमकुवत ठरत आहे. त्यामुळे घटस्फोटांचे प्रमाणही वाढते आहे. अशावेळी मुलांना एकाच कोणत्या तरी पालाकासोबत राहण्याची वेळ येते. एकाच पालकाला मुलांच्या सगळ्या भावनिक गरजा पूर्ण करता येणे अशक्य आहे. त्यामुळे मुलांच्या भावनिक विश्वात घडणाऱ्या उलथापालथी लवकर लक्षात येत नाहीत. यातून एककल्लीपणा, एकलकोंडेपणा, किंवा कुणालाच न जुमानण्याची वृत्तीही वाढू लागते. अशा एकल पालाकासोबत वाढणाऱ्या मुलांना आजूबाजूच्या समाजाकडूनही विनाकारण हेटाळणी अनुभवावी लागते.

भावनिक आणि कौटुंबिक गुंतागुत तितक्याच क्लिष्ट व्यक्तिमत्वाला जन्म देते. त्यामुळे उध्वस्त कुटुंब संस्थेचा फटका बसलेली ही पिढी आहे, हेही आपण ध्यानात घेऊया.

Image source : Google



६. पालकांचा दबाव –

शिक्षण, मित्र आणि पालक अशा तिहेरी पातळीवर आजच्या तरुणांना दबाव सहन करावा लागतो आहे. स्पर्धेच्या काळात मुलांना शिक्षणासोबतच आणखी काही कलागुणांची ओळख करून देणे वेगळे आणि त्या कलागुणातही मुलाने किंवा मुलीने अव्वल ठरावे ही अपेक्षा वेगळी. याच अपेक्षेने अनेक मुलांचा ताण वाढवला आहे.

चांगले मार्क्स मिळण्यापासून चांगले करिअर करण्यापर्यंत या अपेक्षांनी जागोजागी आव्हानं उभी करून ठेवली आहेत. आपली मुलं ही आपल्या सारखीच समान्य मुलं आहेत सुपर हिरो नाहीत याची लवकर जाणीव करून घेणं महत्वाचं आहे. पालकांच्या अवास्तव अपेक्षांमुळे तारुण्याच्या उंबरठ्यावरील मुलांमध्ये वर्तनसमस्या दिसू लागल्या आहेत. त्यांच्यात स्वजाणीव विकसित होण्यापूर्वीच तिचा बळी जात आहे.

Image source : Google



७. स्वतःचाच अस्वीकार –

बदलेला आहार, जीवनशैली, यामुळे लठ्ठपणा ही एक मोठी समस्या सर्वांनाच भेडसावत आहेत. यामुळे आरोग्यविषयक गुंतागुंत तर निर्माण होतेच शिवाय मानसिक गुंतागुंतही वाढते. आजचा जमाना हा सोशल मिडीयाचा जमाना आहे. दररोज स्वतःचे फोटो अपलोड करून ढिगाने लाईक मिळवण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही. सोशल मिडियावर लाईक मिळवण्यासाठीही शरीराचा आकार खूप महत्वाची बाब आहे. सर्वांकडेच अशी आदर्श शरीरयष्टी असेल असे नाही. त्यामुळे आपल्या शरीराबद्दल अनास्था निर्माण होत आहे. मी अशीच आहे असाच आहे मी लोकांना आवडतच नाही ही नकरात्मक भावना स्वतःचाच द्वेष करण्यास भाग पाडत आहे. वयाच्या ज्या टप्प्यावर स्वीकृतीची सर्वाधिक गरज असते तिथे स्वतःकडून स्वतःची हेटाळणी करण्याकडे कल झुकत आहेशरीराचा आकार, रंग, ठेवण हे काही मनुष्याच्या हातची गोष्ट नाही. जे मिळाले आहे त्याचा आदर करायचा सोडून त्याबद्दल न्यूनगंड वाढतो आहे. . यातून गंभीर मानसिक समस्या उद्भवत आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

Image source : Google



८. व्यसनाधीनता –

सगळ्या बाजूने कोंडीत आणि निराशेच्या गर्तेत सापडलेली ही पिढी नशेच्या आहारी गेली नाही तरच नवल. नजरेच्या धाकात ही पिढी राहील अशी अपेक्षा करणे बाळबोध पणाचेच ठरेल. ज्या वेगाने यांना काही गोष्टी मिळतात तो पाहिल्यास चक्क अंगाचा थरकाप होतो. ड्रग. सिगारेट, दारू, अॅडल्ट फिल्म अशा सगळ्या नको त्या गोष्टी चुटकीसरशी यांना उपलब्ध होऊ शकतात. ही उपलब्धताच यांच्या भविष्याला उध्वस्त करत आहे. बालगुन्हेगरीचे प्रमाण वाढते आहे. झगमगाटी चकचकीत दुनियेची सीमारेषा यांच्या खूपच जवळ आली आहे.

Image source : Google



९. दारिद्र्य –

या आधुनिक जगात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढती दरी किती खोल आहे हे पिढीने चांगलेच अनुभवले आहे. ही दरीच त्यांना आपल्या सोबत गटांगळ्या खायला लावत आहे. एकीकडे भीषण दारिद्र्य आणि दुसरीकडे चकचकीत दुनियेसमोर अस्तित्व टिकवून ठेवण्याचे विचित्र आव्हान जे या पिढीसमोर उभे आहे ते या आधीच्या पिढ्यांनी पहिले किंवा अनुभवले असण्याची शक्यता खूपच कमी आहे.

Image source : Google



१०. बेरोजगारी –

शिक्षण हेच या पिढीचे मुख्य भांडवल आहे, पण काही लोकांना हे शिक्षणच दुरापास्त झाले आहे. त्यातही दर्जेदार आणि कौशल्यपूर्ण शिक्षण नसल्याने या पिढीसमोर बेरोजगारीच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. कमी किंवा अर्धवट शिक्षण घेऊन जगण्याचा स्तर उंचावता येत नाही. स्वतःला सिद्ध करता येत नाही. चांगले आयुष्य जगण्याचे स्वप्नही पूर्ण करता येत नाही. यातून हाती काय लागते तर एक मोठा शून्य.

Image source : Google



११. आरोग्य समस्या-

कोरोना महामारीमुळे तर कधी नव्हे ती आरोग्याची चिंता तीव्र झालीच आहे पण त्याच्याही आधी बदलती आहारपद्धती, जीवनशैली, यामुळे आरोग्याच्या कितीतरी समस्या निर्माण झाल्याच आहेत त्यात कोरोना नामक भयाण राक्षसाची भर पडली इतकेच काय ते. ढासळते आरोग्य आणि त्यासोबत येणाऱ्या आर्थिक, मानसिक अस्थिरता ही तर या पिढीच्या पाचवीलाच पुजली आहे.

Image source : Google



१२. चंगळवाद –

चंगळवाद इतका बोकाळला आहे की समाधान म्हणजे काय हेच या पिढीला माहीत नाही. त्यात समाधान म्हणजे काय, मन:शांती म्हणजे काय हे यावरच्या प्रवचनांचा तर भरपूरच मारा होतो आहे. मात्र तरीही गरजा आणि हाव यांची कमान मात्र चढतीच आहे. हे पाहिजे, ते हवं, अशा सगळ्या मागण्याच्या जंजाळात ही आजचा तरुण पुरता गुरफटून गेला आहे. आनंद हा भौतिक वस्तूशी जोडला गेला असल्याने भौतिक वस्तूंची जमवाजमव म्हणजेच सुख अशीही एक संकल्पना यांच्या मनात ठाण मांडून बसली आहे. त्यातून निर्माण झालेल्या स्पर्धेत हे स्वतःच गळाभर बुडालेले आहेत.

Image source : Google



१३ अकाली प्रौढत्व –

स्वत:ला सिद्ध करणे, स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे, स्वतःची ओळख निर्माण करणे या सगळ्या संकल्पनांचा अवास्तव माराही याच पिढीला सहन करावा लागत आहे. लहानवयातच या स्पर्धेत स्वतःला झोकून देऊन जबाबदारीच्या ओझ्याने ही पिढी पूर्णत: वाकून गेली आहे. यामुळे त्यांना बालपण अनुभवण्याची संधीच राहिलेली नाही. प्रत्येक मुल कसे एक्स्ट्रापॉवरफुल आहे हेच सांगण्याची स्पर्धा त्यांच्यातील मुलालाच मारून टाकत आहे. त्यामुळे बालपण नसलेली पिढी असे विशेषण या पिढीला लावले तरी ते वावगे ठरणार नाही.

या आणि अशाच समस्यांच्या जंजाळात अडकलेल्या या पिढीला यावर्षी आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे ती म्हणजे बदलत्या अन्नव्यवस्थेशी जुळवून घेत जैव विविधता कशी टिकवून ठेवायची बद्दलही तिलाच विचार करायचा आहे. पण त्याआधी त्याच्या समस्यांचा एकदा तरी विचार आपण करणार आहोत की नाही? खरे तर एका लेखात या सगळ्या समस्यांचा सखोल आढावा घेणं शक्यच नाही आणि तो उद्देशही नाही. फक्त यांची जाणीव तरी आपल्याला झाली तरी हे लिखाण सार्थकी लागेल.

 

 

 

 

Post a Comment

0 Comments