तुमच्या तणावाचा ताण तुमच्या खिशाला तरी सोसावा लागत नाही ना? एकदा तपासून बघाच.

इतर कुठल्याही भावनेपेक्षा तणावाची भावना खूपच जास्त प्रभावी आणि दमनकारी असते. कुठल्याही एका गोष्टीचा जरी आपल्या मनावर तणाव राहीला असेल तर, त्याचा प्रभाव आपल्या इतर कामांवरही दिसून येतो. तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न कराल त्यात हा तणाव अडकाठी आणल्याशिवाय राहणार नाही. कालपर्यंत ज्या गोष्टी आपण अगदी सहजतेने करू शकत होतो त्याच गोष्टी करताना आज मात्र अचानकच अवघड आणि कठिण वाटू लागतात. तणाव तुमची आर्थिक घडीही विस्कटू शकतो. तणाव आणि पैसा यांचा तर खूप जवळचा संबंध आहे. अनेकांसाठी अपुरा पैसा हाच तणावाचे मोठे कारण असतो.

Image source : Google


सगळी नाटकं करता येतात, पण पैशाचे नाटक करता येत नाही असे म्हटले जाते. म्हणूनच आपल्या भावनांचा आपल्या खिशावर परिणाम होतो का हेही एकदा तपासून पाहूयात.

तणाव निवळावा म्हणून आपण अधिक खातो. म्हणजे नकळतपणे आपल्याकडून अधिक खाल्लं जातं, हे जसं आपल्या लक्षात येत नाही तसच तणावामुळे आपण आपल्या खिशातील पैसे वाया घालवतोय हेही कळत नाही.

आज मूड ऑफ आहे, मग काय करावं बरं...? “पिज्झा वगैरे मागवूया,” किंवा

“आज जरा कॉफीसाठी बाहेर जाऊया.”

“आज एक खंबा होऊनच जाऊदे, खूप दिवस झोप पण लागली नाही,”

“एखादी छोटी ट्रीप तरी प्लान केलीच पाहिजे.”

"एक पार्टी तर झालीच पाहिजे."

Image source : Google


स्वतःचा मूड बदलण्यासाठी म्हणून किंवा स्वतःचेच लक्ष तणावावरून दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीत गुंतवण्यासाठी म्हणून आपण असे काही तरी मार्ग निवडतो जिथे आपल्याला अधिकच आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आणि मग याचा परिणाम आर्थिक नियोजन कोलमडण्यावर होते, यात वादच नाही. आपण जो काही खर्च करत आहोत, तो जर फक्त आपला तणाव निवळावा म्हणून तर करत नाही ना? हे एकदा तपासून पाहणे आवश्यक आहे. तसे जर असेल तर आपला तणाव तर निवळणार नाहीच, पण त्यात जास्त भर पडेल.

नात्यांमध्ये तणाव असेल तर त्याचाही परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. ज्या व्यक्तीसोबत तुमचे नाते बिनसले आहे त्याला खुश करण्यासाठी म्हणून एखादं गिफ्ट देणं, त्याच्यावर पैसे खर्च करणं आणि करत राहणं. नातं टिकवण्यासाठी पैशाचीच आवश्यकता असते असं नाही. नात्याला पुरेसा वेळ दिला, समोरच्याचं बोलणं ऐकून घेतलं तरी पुरेसं असतं पण, तसं न करता आपण त्या व्यक्तीसाठी काहीतरी वस्तू विकत घेऊन तिला खुश करण्याचा प्रयत्न करतो. असे केल्याने ती व्यक्ति खुश होईल की नाही हे सांगता येणार नाही. पण तुमचा खिसा मात्र नाखूष होईल.

 

Image source : Google

महिन्याकाठी जी बिलं द्यावी लागतात ती तुम्ही नीट जपून ठेवली पाहिजेत. ती बिलं वेळेवर चुकती करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. वीजबिल, किरणा बिल, घरभाडे, पाणी बिल, शाळेची फी, रिक्षावाल्याचे बिल,  या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकत्रित करून ठेवण्याची आणि  महिन्याच्या शेवटी ही सगळी बिले वेळेवर द्यायची सवय लावून घ्या. शक्यतो ही बिलं तुमच्या बँक खात्यातून अपोआप डेबिट करण्याची सोय असेल तर ती करून ठेवा ज्यामुळे या बिलांची चिंता करत बसण्याची वेळ येणार नाही. यातील कोणतंही बिल थकवू नका. ही सगळी बिले भरल्यानंतर त्याच्या पावत्याही तितक्याच काळजीने जपून ठेवा.

आर्थिक निर्णय हे खूपच काळजीपूर्वक घेतले पाहिजेत. घाईघाईत घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. बचत करायची असेल तर त्यासाठी कुठला मार्ग खात्रीचा आणि निर्धोक असेल हे आधी जाणून घ्या. मगच त्यात पैसे गुंतवा. घाई जशी महागात पडू शकते तशीच आर्थिक बाबतीत केलेली दिरंगाईही महागात पडू शकते. म्हणून आपण घेतलेले आर्थिक निर्णय हे एखाद्या भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले असू नयेत. तणावाच्या काळात आपण उतावीळपणे एखादी आर्थिक जोखीम घेण्याची शक्यता असते. अमुक मित्राने अमुक कंपनीत पैसे गुंतवले म्हणून मीही तिथेच गुंतवले, पाहुण्यांनी सांगितले म्हणून गुंतवले, अशा कारणांनी पैसे गुंतवले आणि नंतर फटका बसला तर झालेली आर्थिक झीज भरून निघू शकत नाही. त्यासाठी शांत डोक्याने आणि योग्य अभ्यास करूनच निर्णय घ्यावे लागतील. असे निर्णय तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतील.

बऱ्याचदा तणावामुळे आपली मती गुंग झालेली असते. अशावेळी आपण अधिक उत्साहाने काम करू शकत नाही. कामात लक्ष लागत नाही.  कामात लक्ष लागत नाही म्हणून तुम्ही कामाला बुट्टी मारली तर त्यामुळे त्या दिवसापुरते बरे वाटेल पण शेवटी जेव्हा कमी पगार हातात येईल तेव्हा काय होईल? पुन्हा पुढचे आर्थिक नियोजन कोलमडून पडेल. पुन्हा तुमच्या खिशालाच याचे परिणाम  भोगावे लागतील. 

आर्थिक सुरक्षेसाठी आपण अनेकदा काही नियोजन केलेले असते. आपला खर्च, आपली बचत, गुंतवणूक यासाठी एखादा नीटनेटका प्लान आखलेला असतो. पण तुम्हाला माहितेय का इतर कुणापेक्षाही तुमचा तणावच या प्लानमध्ये जास्त अडथळे आणू शकतो. तणावाखाली असताना एखादी चांगली गोष्टही वाईट भासू लागते आणि वाईट गोष्टही अधिक मोहात पाडू शकते. कदाचित तणावाच्या आहारी जाऊन तुम्हीच स्वतःला वारंवार सांगाल हा प्लान मी नीट तडीस नेऊ शकत नाही. हा प्लान अमलात आणायचा म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखंच आहे. इत्यादी इत्यादी ज्यामुळे तो प्लान शेवटपर्यंत तडीस जाण्याआधीच त्याला तुम्ही मुरड घालून मोकळे व्हाल. हाती आलेला पैसा कसाही खर्च करण्याची सवय तुम्हाला अशा प्लानपासून नेहमीच दूर ठेवेल, हे लक्षात घ्या.

आपण जेव्हा मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसतो तेव्हा समोरची परिस्थिती आपल्याला आहे त्यापेक्षा अधिकच गंभीर भासत असते. तणावपूर्ण मानसिकतेत असताना आपली कल्पनाशक्ती कधीही सकारात्मक दिशेने जात नाही. उलट आहे ती परिस्थितीच अजून चिघळली तर, अजून वाईट झाली तर, अजून बिघडली तर, अशा कल्पना करत आपण कल्पनेतच त्या परिस्थितीचा बाऊ करून ठेवतो. त्यामुळे ताण कमी होण्याऐवजी तो आणखी वाढतो. 

तुमच्या तणावाचा तुमच्या आर्थिकस्थितीवर काही विपरीत परिणाम होणार नाही यासाठी तुम्हाला थोडे सतर्क राहावे लागेल. यासाठी महिन्याच्या बजेटचा आराखडा तयार करा आणि त्या मर्यादा रेषेच्या बाहेर आपला खर्च जाणार नाही याची काळजी घ्या. सुरुवातीला तरी काही दिवस हा प्लान अंमलात आणताना तुमचे मन कच खाईल. यासाठी आपल्या मनाला वेळोवेळी आवर घाला. वास्तव परिस्थितीत काल्पनिक आपत्तीची भर घालण्याची मुभा तुमच्या मनाला अजिबात देऊ नका. 

अगदी घर भाड्यापासून ते शाळेच्या फीपर्यंत जो काही महिन्याचा खर्च होतो ती रक्कम आधीच बाजूला काढून ठेवा किंवा ज्या-त्या अकाऊंटला हे पैसे वेळेवर ट्रान्स्फर होतील अशी सोय करून ठेवा. अॅटोमॅटिक पैसे ट्रान्स्फर करण्याची तरतूद असली की ही बिले थकवली जात नाहीत आणि मग त्यांचे ओझेही राहत नाही. गरज नसलेल्या वस्तूंवर पैसे खर्च करताना एकदा तिथे दहादा विचार करा. त्याऐवजी हेच पैसे बचत कसे होतील किंवा आपल्या बचत खात्यात कसे वर्ग करता येतील याकडे लक्ष द्या.

 

Image source : Google

महिनाभर अमुक गोष्टीवर अमुक एवढे पैसे खर्च होतात याचा एकदा अंदाज आला की त्यातही काही अनावश्यक गोष्टी आहेत का शोधून काढा. ते पैसे वाचवणे शक्य असेल तर लगेच हा विचार अंमलात आणा. वर्षभरात कधी दवाखाना, कुणाचे लग्न, वाढदिवस, असे अचानक काही खर्च समोर उभे रहातात. अशी ऐनवेळी काही पैशाची निकड भासली तर त्यासाठी म्हणून काही पैसे आधीच बाजूला काढून ठेवता येत असतील तर ती सवय लावून घ्या. यासाठी एक वेगळी आरडी करू शकता. अचानक आलेल्या खर्चाला तोंड देण्यासाठी जेव्हा तुम्ही पूर्वतयारी केलेली असते तेव्हा तुम्हाला त्याचा ताणही जाणवणार नाही.

कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जातील याकडे लक्ष द्या. खर्चाचा हिशोब ठेवण्याची सवय लावून घ्या. ज्यामुळे तुम्हाला वेळोवेळी तुमच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेता येईल. आपला खिसा रोड होण्यास किंवा मजबूत होण्यास आपण स्वतः जबाबदार आहोत ही जबाबदारी एकदा स्वीकारली की, आर्थिकस्थिती अपोआपच स्थिर होत जाईल. 

तणाव ओळखून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे वेगवेगळे उपाय अंमलात आणावे लागतील तरच तणावाचा प्रभाव आटोक्यात येईल. 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing