उठा,लिहा, बोला, आज संपूर्ण जग तुम्हाला ऐकायला उत्सुक आहे!

Image source : Google

युवा म्हणजे कोण ? देश, समाज, कुटुंब, शहर यांच्या भल्यासाठी, उन्नतीसाठी, झटणारा तो युवा! ज्याच्याकडे बल आणि युक्ती यांचा संगम आढळतो तो म्हणजे युवा! भविष्याची कमान आणि भूतकाळाचे संचित ज्याला सांभाळायचे आहे तो म्हणजे युवा! अशा या युवावर्गाच्याही स्वतःच्या काही समस्या असू शकतात. त्यांच्या स्वविकासात अडचणी येऊ शकतात. नवनव्या संकल्पना साकारताना, त्या संकल्पना अंमलात आणताना या युवावर्गाला काही अडथळे पार करावे लागतात. त्यांच्यातील संघर्षशील वृत्तीला, सर्जनशीलतेला, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील समस्या जाणून घेऊन त्यांना हिंमत देण्यासाठी जगभर १२ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. शिवाय, जगभरातील ही युवाशक्तीच बदलाची कारक आहे, हेही आपल्याला विसरून चालणार नाही.

 

देशाची आणि समाजाची प्रगती ही त्या देशातील आणि समाजातील युवकांच्या सहभागाशिवाय अपूर्ण आहे. त्यांना देशासाठी समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, त्यांनी केलेल्या कामाची दाखल घेतली गेली पाहिजे, वेगवेगळ्या देशातील युवकांनी समाजाच्या आणि अखंड मानवजातीच्या भल्यासाठी काही कल्पना मांडल्या असतील तर त्या सर्वदूर पोहोचल्या पाहिजेत. याच उद्देशाने १९९९ पासून हा दिवस साजरा करण्यात येतो.

 

आजच्या आधुनिक आणि प्रगत युगातील तरुणांनाही काही समस्या आहेत. आजही काही देश प्रदेश आहेत जिथे तरुणांना चांगले शिक्षण मिळत नाही, त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभूत गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. शिक्षण, आरोग्य, सन्मान यांच्यासाठी आजही या युवकांना संघर्ष करावा लागत आहे. अशा युवकांसाठी आपण काय करू शकतो यावर संपूर्ण जगभरात विचारमंथन होणे गरजेचे आहे. या युवकांपुढील समस्या जगासमोर आल्या पाहिजेत. त्यावर इतरांनी काही उपाय सुचवावेत, त्यासाठी पुढाकार घ्यावा, म्हणून ठिकठिकाणी चर्चासत्र, संमेलन, रॅली किंवा असेच काही कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक देशातील तरुणांपुढे अनेक प्रकारचे सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्न आहेत, याकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून हा खास दिवस!

प्रत्येक दिवस साजरा करताना युनो कडून दरवर्षी त्या-त्या घटकांसाठी एक विशिष्ट थीम ठरवली जाते. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय युवा दिवसाची थीम आहे, “ट्रान्सफॉर्मिंग फुज सिस्टम्स : युथ इनोव्हेशन फॉर ह्युमन अँड प्लॅनेटरी हेल्थ.” सगळीकडचीच अन्न व्यवस्था झपाट्याने बदलत आहे. या बदलाशी जुळवून घेत पृथ्वी आणि त्यावरील जैव विविधता कशी टिकून राहील, यासाठी तरुणांनी सामुहिक आणि वैयक्तिक प्रयत्न करण्यावर भर द्यावा म्हणून त्यांच्यासाठी सहाय्यक यंत्रणा कशी उभारता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. बदलत्या अन्न व्यवस्थे प्रमाणेच हवामान बदल, आरोग्य विषयक समस्या, सामाजिक समावेशकता आणि जैव विविधतेचे संवर्धन या गोष्टीतही तरुणांनी आपले योगदान देणे गरजेचे आहे, या समस्यांशी दोन हात करण्यासाठी तरुणांचा सहभाग आवश्यक आहे. किंबहुना ही त्यांचीच जबाबदारी आहे याची जाणीव करून देणं ही काळाची गरज आहे.

यावर्षीचा आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सांगताना संयुक्त राष्ट्राचे सचिव अँटिनिओ गुटेर म्हणाले, “सर्वांसाठीच एक सुरक्षित आणि चांगलं भविष्य निर्माण करण्याची जबाबदारी तरुणांच्या शिरावरचा हे. आपल्या अन्न व्यवस्थेत जे बदल होत आहेत, त्यामुळे आपल्या समोर जी आव्हानं उभी राहत आहेत, त्यावर जगभरातील तरुणांकडे काय उपाययोजना आहेत, या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी कोणत्या नाविन्यपूर्ण कल्पना शोधून काढल्या आहेत का हे जाणून घेणं गरजेच आहे. अर्थात ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवत असताना, एकट्या तरुणांनीच ती पार पाडावी अशी अपेक्षा नाही. त्यांना याकामात अनेक घटकांचे सहाय्य आणि जाणत्या पिढीचे मार्गदर्शनही आवस्यक आहेच. आजची युवा पिढी या साठी जे काही काम करत आहे ते समजून घेण्याची आणि मागची पिढी यासाठी जे काम करत आहे त्यात तरुणांना सहभागी करून घेण्याचीही आवश्यकता आहे.सर्वांसाठी समावेशक, न्याय्य आणि शाश्वत विकासाचे स्वप्न पाहत असताना या कामात तरुणांचा सहभागी होण्याची संधी देणं किंबहून त्यांना सहभागी करून घेण्याची हमी देणं ही आपली जबाबदार आहे, असा संदेशहीअँटिनिओ गुटेर यांनी आपल्या भाषणातून दिला आहे.

आंतरराष्ट्रीय युवा दिवसासाठी गेल्या वर्षी म्हणजे २०२० ची थीम होती, “जागतिक घडामोडीत युवकांचा सहभाग.” सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जी विकास कामे होतात, त्यासाठी जे नवे कायदे आणि धोरणे निर्माण केली जातात, त्यामध्ये युवकांचा सहभाग वाढवण्यावर गेल्या वर्षी भर देण्यात आला होता.

 थोडक्यात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर तरुणांचा सहभाग वाढवणे आणि या सगळ्याबाबत त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. हेच महत्त्व अधोरेखित व्हावे, याकडे आपल्या सर्वांचे लक्ष वेधले जावे, म्हणून हा दिवस साजरा करणे आवश्यक आहे.

 

या सगळ्या प्रश्नांसाठी आजचे युवक काय करू इच्छितात, त्याच्या काय कल्पना आहेत, त्यांना कुठल्या अडचणी भेडसावत आहेत, याबद्दल तरुणांनी किमान आज तरी आपला आवाज उठवला पाहिजे. उठा,लिहा, बोला, आज संपूर्ण जग तुम्हाला ऐकायला उत्सुक आहे!

 

 

Post a Comment

0 Comments