भारतातील पहिली महिला डॉक्टर आणि स्त्री सबलीकरणाचे आदर्श उदाहरण : कादंबिनी गांगुली

आजचे गुगलच्या होमपेज वरचे डूडल तुम्ही पहिलेच असेल. आज भारतातील पहिली महिला डॉक्टर आणि पहिली महिला पदवीधर कादंबिनी बोस यांची १६० वी जयंती आहे.  आजच्या काळातही जिथे बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण धोक्यात आले आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीने या समस्येमध्ये आणखी जास्त भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे, तिथे १९ व्या शतकात कादंबिनी गांगुली यांनी स्त्री शिक्षणाचा हट्ट धरला. स्वतः पदवी घेतली आणि वैद्यकीय शिक्षण घेऊन स्वतःचा खाजगी दवाखानाही चालवून दाखवला. १९ व्या शतकातील रूढी परंपराचा कर्मठ विरोध झुगारून आत्मोन्नती आणि स्त्री उद्धाराची अवघड वाट चोखाळणाऱ्या कादंबिनी गांगुली यांचा जीवनप्रवास आवर्जून वाचायला हवा. 

Image source : Google image


त्याकाळातील कादंबिनी गांगुली यांचे हे यश पाहून डोळे दिपून जातात. नव्या आणि स्वातंत्र भारतातील स्त्री कशी असेल याचे एक आदर्श उदाहरण कादंबिनी यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिले. कादंबिनी गांगुली यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते कादंबिनी बासू. ब्राह्मो समाजाचे कार्यकर्ते आणि स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते द्वारकानाथ गांगुली यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या कादंबिनी गांगुली म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. ब्रिटीश भारतातील पहिली महिला पदवीधर, पहिली महिला डॉक्टर इथ वरच कादंबिनी यांची ओळख सीमित राहत नाही. पारतंत्र्याच्या बेडीत अडकलेला भारत मुक्त व्हावा म्हणून धडपडणारी एक स्वातंत्र्य योद्धा, स्त्रियांच्या आरोग्य विषयक प्रश्नावर काम करणारी एक सामाजिक कार्यकर्ती आणि स्वतःच्या व आपल्या देश भगिनींच्या उद्धारासाठी पुढाकार घेणारी सुधारक असे कितीतरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला चिकटले आहेत.

 

युरोपियन वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला होत्या. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण देणाऱ्या पहिल्या महिला हाही सन्मान त्यांच्याच नावावर नोंदवलेला आहे. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या महिलांना ज्या आरोग्य विषयक समस्या भेडसावतात त्याकडे लक्ष वेधून घेण्याचे काम त्यांनी केले. महिला आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित करून महिलांमध्ये जागृती घडवून आणण्याचे कामही त्यांनी केले.

 

१८ जुलै १८६१ रोजी बिहार मधील भागलपूर येथे त्यांचा जन्म झाला. त्याचे वडील ब्रिजकिशोर बासू ब्राह्मो चळवळीत सक्रीय होते. ब्रिजकिशोर त्याकाळी शिक्षक म्हणून कार्यरत होते.  महिलांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी आणि महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी त्यांनी १८६३ साली भागलपूर माहिला समितीची स्थापना केली होती. ही भारतातील पहिली महिलांची संघटना होती. त्यांनी लहानपणापासूनच कादंबिनीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. तिच्या कतृत्वाला वाव मिळेल याकडे लक्ष दिले. वडील ब्रिजकिशोर यांच्या या बंडखोर विचारांचा कादंबिनीवर प्रभाव न पडता तरच नवल.

लहानग्या कादंबिनीने बंग महिला विद्यालयातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर हे विद्यालय बेथ्यून स्कूल या नावाने ओळखले जाऊ लागले.

१८७८ मध्ये कादंबिनीने कलकत्ता विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली. ही परीक्षा पास होणारी ती पहिली भारतीय विद्यार्थिनी होती. ही परीक्षा पास करून तिने एक नवा इतिहास रचला होता. १८८३ साली कादंबिनीने आपली स्नातक परीक्षा पास केली. चंद्रमुखी बासू आणि कादंबिनी बासू या ब्रिटीश भारतातील पहिल्या महिला पदवीधर होत्या.

 

शिक्षण घेण्यासोबतच कादंबिनीने प्रत्येक सामाजिक रूढीला आव्हान देण्याचेही काम केले. ब्राह्मो समाजाचे कार्यकर्ते आणि स्त्री मुक्ती विचाराचे प्रवर्तक आणि शिक्षक असणाऱ्या द्वारकानाथ गांगुली यांच्याशी तिने विवाह केला. द्वारकानाथ गांगुली हे विधुर होते. दोघांच्याही वयात तब्बल सतरा वर्षांचे अंतर होते. या विजोड विवाहालाही समाजातून खूप मोठा विरोध झाला. अनेकांनी तर ते पती-पत्नी असल्याचेही मान्य केले नाही. अगदी ब्राह्मो समाजाचे सदस्यही याला अपवाद नव्हते. त्यांच्या लग्नाला ब्राह्मो समाजातील एकही व्यक्तीने उपस्थिती लावली नाही. दोघांच्या वयात अंतर असले तरी त्यांच्या विचारात अंतर नव्हते.

 

पदवी नंतर शिक्षणाला रामराम करू इच्छिणाऱ्या कादंबिनीला द्वारकानाथ यांनीच पुढचे शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. तिने वैद्यकीय शिक्षण घ्यावे ही त्यांचीच इच्छा होती. पण, त्याकाळी महिलांनी शिक्षण घेण्याची कल्पना म्हणजे सामाजिक द्रोहच. तिच्या उच्च शिक्षण घेण्याच्या निर्णयाने तत्कालीन समाज दुखावला गेला होता. बंगबासी या एका नियतकालीकाच्या संपादकांनी देखील तिच्या या उच्च शिक्षणाच्या निर्णयाची खिल्ली उडवली होती.

आपल्या पत्नीविरोधात असभ्य भाषेत लिहिणाऱ्या या संपादकाला द्वारकानाथ यांनी कोर्टात खेचले होते. ज्या पेपरमध्ये त्याने हे उलटसुलट विचार छापले तो कागदच संपादकांना गिळायला भाग पाडले. शिवाय, एका सुशिक्षित महिलेची बदनामी केल्या प्रकरणी त्या संपादकाला सहा महिन्याचा तुरुंगवास आणि शंभर रुपयांचा दंड भरावा लागला होता.

 

डॉक्टर तर व्हायचे होते पण हे वाटते तितके सोपे खचितच नव्हते. कलाकात्यात त्याकाळी कलकत्ता मेडिकल कॉलेज (सीएमसी) हे एकच मेडिकल कॉलेज होते आणि या कॉलेजने वैद्यकीय शिक्षणासाठी मुलींना प्रवेश देण्यास नकार दिला होता. कादंबिनीकडे आवश्यक ती पात्रता असूनही फक्त ती एक महिला असल्याच्या करण्याने तिला डावलले जात होते. कादंबिनी आणि द्वारकानाथ यांनी या कॉलेजच्या या निर्णयाविरोधात रान उठवले आणि कॉलेजच्या अधिकाऱ्यांना त्यांचा निर्णय बदलण्यास भाग पाडले. इतका आटापिटा केल्यानंतर २३ जून १८८३ रोजी तिला मेडिकलसाठी प्रवेश मिळाला. आजच्या काळातील नीट परीक्षा उत्तीर्ण होण्याहूनही त्याकाळातील ही समाजिक रूढी तोडण्याची परीक्षा निश्चितच अवघड होती. पण कादंबिनी यांनी यात यश मिळवले. १८८६ साली तिला मेडिकल कॉलेज ऑफ बेंगालची पदवी मिळाली. या पदवीमुळे तिला एक डॉक्टर म्हणून स्वतःचा दवाखाना चालवण्याचाही परवाना मिळाला होता.

कादंबिनीच्या यशाने फ्लॉरेन्स नाईटिंजेल आणि अॅनी बेझंट यांचेही लक्ष वेधून घेतले. तिच्या या घवघवीत यशाबद्दल दोघींनीही तिची स्तुती केली होती.

१८८८ साली ती लेडी डफरीन हॉस्पिटलमध्ये रुजू झाली तेव्हा तिला महिना ३०० रुपये पगार मिळत होता. आजच्या काळात ही रक्कम साडे चार लाख प्रतीमहिना इतकी भरेल. इतकी भरभक्कम रक्कम मिळत असूनही कादंबिनीला हवा तो मानसन्मान मात्र मिळत नव्हता. तिच्या सोबत काम करणाऱ्या ब्रिटीश लेडी डॉक्टर्स तिला बरोबरीचे स्थान देत नसत उलट तिला पाण्यात पाहत असत. या दुजाभावाला कंटाळून तिने नोकरी सोडली आणि स्वतःची खाजगी प्रॅक्टीस सुरू केली.

 

पुढील शिक्षणासाठी तिने इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. १८९२ रोजी तिने कलकत्ता सोडले. डब्लिन, ग्लासगो आणि एडिनबर्ग मधील प्रशिक्षण पूर्ण करून तिने एकाच वेळी तीन डिप्लोमा पूर्ण केले. त्यावर्षीच्या १४ विद्यार्थ्यांपैकी इतके मोठे यश मिळवणारी ती पहिली महिला होती आणि अर्थातच एवढे मोठे यश मिळवणारी पहिली भारतीय महिलाही होती.

 

इंग्लंडवरून परत आल्यानंतर तिने आपली प्रक्टिस पुन्हा सुरू ठेवली. तोपर्यंत द्वारकानाथ तिची साथ सोडून निघून गेले होते. त्यांच्या पश्चात एकटीने समाजाचा रोष झेलत तिने आपले काम सुरू ठेवले. तिने बालरोग आणि स्त्रीरोग या विषयातील प्राविण्य मिळवले होते. इंग्लंड मधून परत आल्यावर तिच्या करिअरला एक वेगळे वळण मिळाले लेडी डफरीन हॉस्पिटलमध्ये सिनिअर पदावर तिची नियुक्ती करण्यात आली. सहकारी डॉक्टरही आता तिच्याशी अदबीने वागत होत्या. हॉस्पिटलमधील नोकरीपेक्षा तिच्या खाजगी प्रॅक्टिसला चांगला प्रतिसाद मिळत होता म्हणून तिने पुन्हा एकदा आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

१९०६ साली भरलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्षपदही तिने भूषवले होते. तिचे सामाजिक कामही जोरात सुरू होते. बंगालच्या फाळणीनंतर कादंबिनीने कलकत्ता येथे महिलांचे अधिवेशन भरवले. १९०८ साली तिने दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहींना मदत करण्यासाठी एका संघटनेची स्थापना केली.

आसाम मधील चहाच्या मळ्यातील कामगारांच्या शोषणाविरोधातही तिने आवाज उठवला होता. बिहार आणि ओडीसा तील खान कामगार स्त्रियांच्या प्रश्नावरही तिने काम केले. या संबधी १९२२ मध्ये सरकारने एक चौकशी समिती नेमली होती कवयित्री कामिनी रॉय यांच्या सोबत कादंबिनीने देखील या समितीसमोर आपले मत मांडले होते.

 

भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? आनंदीबाई जोशी की कादंबिनी गांगुली हाही प्रश्न सर्वाना नेहमीच गोंधळात टाकतो. खरे तर दोघींनीही एकाच वर्षी डॉक्टर पदवी मिळवली होती. पण, आनंदीबाई वयाच्या २१व्या वर्षीच निवर्तल्या त्यामुळे त्यांनी पदवी घेतली असली तरी त्या काम करू शकल्या नव्हत्या. १८८६ साली दोघींनी पदवी मिळवली पण १८८७ मध्येच आनंदीबाईंचे निधन झाले. त्यामुळे कादंबिनी गांगुली या वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरतात.

कादंबिनी गांगुली यांच्या समकालीन आणखी एका महिला डॉक्टरचे नाव घेतले जाते ते म्हणजे, अॅने जगन्नाथ. अॅने जगन्नाथ हिने १८८६-८७ मध्येच मद्रास मेडिकल कॉलेज मधून मेडिकल सायन्स मधील सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला होता. कादंबिनी प्रमाणेच तिनेही स्कॉटिश कॉलेजमधून ट्रिपल बोर्ड डिप्लोमा पूर्ण केला होता. १८९२ मध्ये ती इंग्लंडहून परत आली आणि कामा हॉस्पिटल मध्ये तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली पण त्यानंतर दोनच वर्षात तिचेही निधन झाले.

 

ज्याकाळात महिला डॉक्टर  म्हणजे निव्वळ एक परिकल्पना ठरली असती त्याकाळात सर्व प्रकारच्या विरोधांना डावलून कादंबिनीने हा सन्मान पटकावला. आपल्या डॉक्टर होण्याच्या आपल्या महत्वाकांक्षेसोबत ती एक उत्तम गृहिणी आणि आठ मुलांची आई देखील होती. सामाजिक-राजकीय कार्यकर्ती होती. तरीही एक डॉक्टर असलेल्या सामाजिक जबाबदारीकडे तिने कधीच दुर्लक्ष केले नाही.

 

या सगळ्या धावपळीत तिलाही उच्च रक्तदाबाने गाठले पण, तिने कधीच याचा बाऊ करून माघार घेतली नाही. शेवटच्या दिवशीही ती एका पेशंटचे ऑपरेशन करून घरी आली आणि अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले. स्वतःसाठी वैद्यकीय मदत मिळवण्या इतपतही उसंत तिला नियतीने दिली नाही. वयाच्या ६३ व्या वर्षी ७ ऑक्टोबर १९२३ रोजी तिचे निधन झाले.

 

आयुष्यभर महिलांच्या हक्कासाठी झटणाऱ्या कादंबिनी गांगुली यांचे योगदान येत्या काळातही प्रेरणादायी ठरेल हे निश्चित.

 मेघश्री श्रेष्ठी

 

Post a Comment

0 Comments