मूड बदलण्यासाठीचा हुकमी मंत्र!

from google


कधीकधी अचानकच आपल्याला उदास, निराश वाटू लागते. कामात लक्ष लागत नाही. थोड्याशा कामानेही थकवा जाणवतो अशावेळी आपल्या मनाला थोड्या अतिरिक्त उर्जेची गरज असते. आपला डाऊन झालेला मूड थोड्याशा प्रयत्नाने पुन्हा अप करू शकतो. यासाठी गरज असते स्वतःच्या विचारांना सकारात्मक दिशा देण्याची. दररोज सकाळी काही सकारात्मक वाक्यांची आठवण आपल्या मनाला करून दिल्यास उदासीचे हे ढग पटकन हटण्यास मदत होईल. नकारात्मक विचारांची गर्दी कमी होऊन आपल्या कामातील एकाग्रता वाढेल.

मनाचा समतोल साधायाचा असेल तर, मनाला सकारात्मक विचारांचे खाद्य पुरवणे खूपच गरजेचे आहे. ज्यामुळे तणावाच्या काळात ही आपले मन लगेच थकणार नाही किंवा हरणार नाही. मनाला सकारात्मक विचारांची सवय कशी लावायची याची क्लृप्ती शिकून घेतलीत तर तुम्ही कधीच नैराश्याच्या ताणतणावाच्या आहारी जाणार नाही. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार तर येतच राहतात पण, तुमच्या मनाला तुम्ही सकारात्मक विचारांवर ठाम रहायची सवय लावलेली असल्यामुळे कुठल्याही वळणावर तुमच्या मनाचा तोल ढळणार नाही हे मात्र निश्चित.

मनाला सकारात्मक विचारांची सवय लावणे ही काही फार मोठी अवघड गोष्ट नाही. आज तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असलात तरी तुम्ही थोड्याशा प्रयत्नाने हे सहज साध्य करू शकता. जसे जसे तुम्ही या सकारात्मक वाक्यांचा पुनरुच्चार कराल, त्यातील भावनांशी एकरूप व्हाल, तसतसे तुम्हाला हे विचार सत्यात उतरल्याचा अनुभव निश्चितच येईल.

 

from google

 मनात येणारे नकारात्मक विचार आपल्याला भरकटवतात. अशा नकारात्मक भावना, विचार, व्यक्ति किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या ध्येयाच्या मार्गातील अडथळे निर्माण होत आहेत अशा सगळ्या गोष्टींपासून हळूहळू तुम्ही मुक्त होत जाल. स्वतःमध्ये आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये ज्यांना काही फरक घडवून आणायचा आहे त्यांनी तरी आधी या सगळ्या क्लृप्त्यांचा प्रयोग करण्यास सुरुवात केली पाहिजे.

यासाठीचा पहिला मंत्र आहे. दिवसभरातील छोट्या-छोट्या सकारात्मक गोष्टींची दखल घेणे. अनेकदा अशा छोट्या गोष्टीच आपला मूड बदलण्यास कारणीभूत ठरतात.

दिवसभरात अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात ज्यामुळे आपण आनंदी होतो किंवा उदास होतो. आपल्याला उदास करणाऱ्या गोष्टींपेक्षा आपल्याला आनंदी करणाऱ्या गोष्टींची जेव्हा आपण दाखल घ्यायला लागू तेव्हा निश्चितच आपल्या मूडमध्ये बदल होईल. रोज सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या मनाला सांगायचं आहे की आज मी मनाला आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींची नोंद घेणार आहे. ही नोंद तुम्ही मनातल्या मनात घेऊ शकता किंवा या नोंदी लिहून देखील ठेवू शकता. उदा. – आज माझा चहा अगदी उत्तम मला हवा तसा झाला आहे. आजची सकाळ अतिशय प्रसन्न आहे. आज मी वेळेत उठले/उठलो आहे. आज मी माझी कामे वेळेत उरकली आहेत. अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुमचा मूड चांगला बनवू शकतात. यामुळे नकारात्मक गोष्टीवरून लक्ष हटवून ते सकारात्मक गोष्टींकडे वळवण्याची सवय लागेल.

from google
 

रात्री झोपण्यापूर्वी आजच्या दिवसात किती चांगल्या गोष्टी घडल्या त्यांची उजळणी करण्याची सवयही मनाला प्रसन्न आणि ताजेतवाने करते. यामुळे मन आनंदी राहते. रात्री झोपताना जर तुम्ही प्रसन्न आणि आनंदी मूड मध्ये असाल तर उद्याची सकाळही तितकीच आनंदी आणि प्रसन्न असेल.

यासाठी एकच नियम पाळण्याची गरज आहे, रोज सकाळी उठताना आपल्या मनाला आपण सांगायचे आहे की, मला आज दिवसभरात घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टीतील आनंद शोधायचा आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी या छोट्या-छोट्या आनंदाची उजळणी करून झोपायचे आहे.

हा साधासा नियम तुम्हाला मनाचा समतोल साधण्यास अतिशय उपयुक्त ठरेल यात वाद नाही. यानंतरची क्लृप्ती आपण पुढच्या लेखात पाहू.

कुणाकुणाला हा नियम आज आणि आत्तापासूनच अंमलात आणण्यास आवडेल? त्यांनी कमेंट करून नक्की सांगा.

 

 


Post a Comment

0 Comments