बौद्ध धर्मातील स्त्री विचार- लता दिलीप छत्रे

 


 स्त्री देखील माणूस असते आणि तिलाही मानवीभावभावना असतात, त्या व्यक्त कारणाचा, स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचा अधिकार स्त्रीला आहे. आज भारतीय स्त्री स्वतंत्र असली तरी तिच्या मानेवरील परंपरा आणि कर्तव्य यांचा पारंपारिक जू तर आहेच सोबत स्वतःला सिध्द करण्याच नवं आव्हान देखील. यात तिची कुतरओढ होत आहे. भारतीय संस्कृतीत पाश्चात्य देशातील स्त्रीवादाच्या संकल्पना लागू होणार नाहीत. कारण इथली सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी आहे. तेंव्हा भारतीय स्त्रीला आपल्या परंपरेत राहूनच स्वतःच्या मुक्तीच्या वाट शोधता येतात का, हा विचार अग्रस्थानी ठेवून लेखिका लता छत्रे यांनी हे पुस्तक लिहीलं आहे. या पुस्तकातून आपल्या सांस्कृतिक चौकटीत राहून आपल्या मुक्तीच्या वाटा शोधता येतात का याचा धांडोळा तर घेतला आहेच परंतु ही वाट किती उदात्त होती याचीही प्रचीती या पुस्तकातून येते.

आपला हा दृष्टीकोन मांडताना लेखिका लिहितात, सर्वसाधारणपणे असे दिसते की, भारतीय संस्कृतीमधील स्त्री कितीही अन्याय झाला तरी आपली सामाजिक, सांस्कृतिक तसेच कौटुंबिक चौकट मोडून किंवा या चौकटी बाहेर पडण्याचा विचार करत नाही. मग भारतीय स्त्रीला आपल्या परंपरेत आपल्या व्यक्तित्वाचा विकास करण्याच्या दृष्टीने बौद्ध धम्माचा विचार कितपत उपयोग होतो यादृष्टीने हे पुस्तक महत्वाचे आहे.

यातील पहिले प्रकरण आहे, बौद्ध तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून स्त्री समस्याचे स्वरूप यामध्ये स्त्री-समस्यांचे स्वरूप, बौद्ध तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून स्त्री समस्या, बौद्ध तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनारून स्त्री-समस्या निरोध अशा मुद्द्यांच्या आधारे यामध्ये भारतीय स्त्रियांच्या समस्येचे नेमके स्वरूप स्पष्ट करताना सांगितले आहे, परंपरागत संस्काराचे ओझे, स्वतःविषयीची प्रतिमा, त्या प्रतिमेला जपण्याचा अट्टाहास, स्वतःविषयीचे आणि समाजाविषयीचे गैरसमज, तसेच समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि हा दृष्टीकोन बाजूला सारून परंपरागत चौकट मोडणाऱ्या स्त्रिया समाजाच्या रोषाला कारणीभूत होतात. भारतीय स्त्रीवर संस्कृतीकरणाद्वारे द्रौपदी, सीता, अहिल्या, मंदोदरी, तारा, पंचकन्याचा आदर्श थोपवला जातो.

बौद्ध धम्मविचारानुसार दुःखाचे मूळ हे अविद्येत आहे, यातही स्त्रीचे स्वतःविषयीचे ज्ञान, स्त्रीचे समाजाविषयीचे ज्ञान, समाजाचे स्त्रीविषयीचे ज्ञान असे, कंगोरे आहेत.

समाजाने स्त्रीला आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श गृहिणी याच भूमिकेत बांधले आहे आणि हि भूमिका हाच आपला स्वभाव असा स्त्रीचा समज आहे. कितीही फरफट झाली तरी या भूमिकांशी ती प्रतारणा करू शकत नाही. स्वतःविषयीचे अज्ञान आणि समाजाविषयीचे अज्ञान यातच स्त्रियांच्या दुखाचे मूळ आहे.

बौद्ध तत्वज्ञानाचा आधार घेत यावर उपाय शोधताना लेखिका लिहितात, स्त्रीला तसेच समाजालाही स्त्रीचे खरे स्वरूप समजणे आवश्यक आहे. स्त्री-समस्या सोडवीत असताना स्त्री आणि पुरुष अशी द्विधृवात्मक मांडणी न होता, प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो अथवा पुरुष तिचा खास स्वभाव असतो, तिला तिचे अस्तित्व असतेच, असे मान्य करावे लागेल. स्त्री-पुरुष या सामाजिक आणि जीवशास्त्रीय भेदाच्या पलीकडे जाऊन आपल्याला वक्तीकडे व्यक्ती म्हणून बघणे कसे शक्य आहे, याचे उत्तर बौद्धांच्या नितीशास्त्रामध्ये सापडते. आपल्या आचार आणि विचारांमध्ये कशी समानता आणता येईल याचे मार्गदर्शन आपल्याला बौद्धांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाच्या आधारे मिळते.

 

या पुस्तकाच्या दुसर्या प्रकरणात बौद्धांचा संस्कृतीनिरपेक्ष दृष्टीकोन आणि स्त्री-विचार याची चर्चा करण्यात आली आहे. प्रत्येक संस्कृतीमध्ये एक तर स्त्रीला माता, देवी म्हणून पूजले गेले आहे किंवा कुलटा, चेटकीण असे संबोधून तिची हेटाळणी करण्यात आली आहे. कुठल्याही धर्मात स्त्रीला मोक्षाचे द्वार खुले नव्हते. हिंदू धर्माच्या चौकटीत देखील चार आश्रमांचा किंवा पुरुषार्थांचा विचार करताना, स्त्रीचे स्थान गौण मानले आहे. एक गृहस्थाश्रम वगळता तिला कोणत्याच आश्रमात तिचा विचार करण्यात आलेला आहे. चार पुरुशार्थातील अर्थ या पुरुशार्थामध्ये ती पतीच्या  गैर्हजीरीत त्याच्या संपत्तीचे संवर्धन करण्याची आणि विनिमय करण्याची तेवढी मुभा देण्यात आली आहे. स्त्रीधनाची सुत दिली असली तरी त्यावर पूर्ण हक्क दिलेला नाही. म्हणजेच धार्मिक अंगाने स्त्रीचा विचार गौण आहे. "याउलट, गौतम बुद्धांनी निर्वाणाचे द्वार स्त्रियांसाठी खुले करून संस्कुतीनिरापेक्ष दृष्टीकोनातून स्त्रियांकडे पाहण्याचा पहिला प्रयत्न केला."  स्त्रीकडे संस्कृतीनिरपेक्ष दृष्टीकोनातून बघण्याची गरज का आहे? मुळात सांस्कृतिक संकल्पनाच निर्माण का होतात? त्यांचा आणि स्त्री प्रश्नाचा नेमका संबध काय? संस्कृतीनिरपेक्ष दृष्टिकोनाचे स्वरूप काय? बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारे याची उत्तरे देण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

अविद्या किंवा अज्ञान जेसे दुःख निर्मितीला कारणीभूत ठरते त्याचप्रमाणे ते सांस्कृतिक संकल्पना आणि मूल्यांच्या निर्मितीलाही कारणीभूत ठरते. याबाबत अधिक विस्ताराने लिहिताना लेखिका म्हणतात, "मातृत्व ही संकल्पना अज्ञानातून निर्माण झाली. मातृत्व नसलेल्या स्त्रीला टोचून बोलले जाते, छळ केला जातो. स्त्री-सहन करते कारण संस्कृतीकीकरण आणि सामाजिकीकरण यांच्या प्रक्रियेतून स्वतःची अशी जी ओळख झालेली असते तीच ओळख आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असल्याचे ती मानू लागते."

याकडे संस्कृती निरपेक्ष दृष्टीकोनातून पाहिल्यास.. मुल होणे किंवा न होणे यात त्या स्त्रीचा काहीच दोष नसतो हे पटेल, यामुळे इतरांनी तिला दुषणे देण्याचा किंवा तिने स्वतःला कमी लेखण्याचे कारण नाही. व्यक्तीच्या कृतीचा संबध तिच्या लिंगाशी न जोडता लिंगभेदभावाशी जोडल्यास व्यक्ती म्हणून समजून घेणे सोपे जाते. अशा पद्धतीने विचात केल्यास समाजात स्त्रीला ती केवळ स्त्री असल्यामुळे दुःख भोगावे लागते या पराचालीत वैदिक विचाराला छेद बसतो.

या पुस्तकाच्या तिसर्या प्रकरणात स्त्रीवादी-साहित्य आणि थेरीगाथा यांची चर्चा केली आहे. स्त्रीवादी साहित्याची व्याख्या आणि त्याची व्याप्ती सांगून झाल्यावर थेरीगाथा हे पहिले स्त्रीवादीसाहित्य असल्याचा दावा लेखिकेने केला आहे. थेरीनि लिहिलेले साहित्य हे त्यांच्या अनुभव विश्वावर आधारलेले आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत स्त्रीची होणारी घुसमट आणि या घुसमटीतून बाहेर पडल्यावर मुक्तीचा झालेला अविष्कार यांचे चित्रण या थेरीगाथेतून आले आहे. थेरीच्या लिखाणाचे वैशिष्ट्य सांगताना लेखिका म्हणतात, "थेरी आपले अनभव सांगत असताना आपण दुःखी आहोत एवढेच सांगून थांबत नाही, तर ती त्या दुःखाची कारणमीमांसा करते. अशी कारणमीमांसा केल्यावर त्या करणापासून ती स्वतःला वेगळे करण्याचा प्रयत्न करते. असा प्रयत्न करताना ती कोठेही हिंसेचा वापर करीत नाही किंवा तत्कालीन समाजव्यवस्थेविरुध्द बंद पुकारत नाही, तर आपणहून त्या समाजव्यवस्थेपासून अलिप्त राहून स्वतःच्या विवेक्बुधीला अनुसरून वागते. जणू काही तिला हे सांगायचे असते की, समाजाला जसे वागायचे असेल तसे वागू देत, पण या सामाजिक रूढी, परंपरांच्या चुकत मी किती अडकायचे ते मीच ठरवणार.

यानंतरच्या बौध्दवाङमयातील माराची व्यक्तिरेखा- एक स्त्रीवादी अन्वयार्थ, चौथ्या प्रकरणात मार आणि थेरी यांच्यातील संवाद आणि स्त्रीवादी सृष्टीकोनातून त्याचे महत्व विषद केले आहे. मार हा तत्कालीन समाजातील स्त्री=विषयक दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतो, माराचा दृष्टीकोन कसा चुकीचा आहे हे सांगताना, त्याचा द्वेष किंवा तिरस्कार करता नाहीत.

या पुस्तकातील पाचवे प्रकरण आहे, भारतीय स्त्री विचाराच्या संदर्भात लिंगबदल-एक स्त्रीवादी आकलन. येथे आपले सामाजिक स्थान बदण्यासाठी स्त्रीला लिंग बदलाची आवश्यकता असते का, या प्रश्नाचे उत्तर भारतीय संस्कृतीतील आत्मा-अनात्मा या सिद्धांताच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आत्म्याची शाश्वतता मानणाऱ्या  वैदिक संस्कृतीमध्ये लिंगबदलाचा संबध आत्म्याच्या पुनर्जन्माशी जोडलेला दिसतो, तर अनात्मा मानणाऱ्या बौध्द संस्कृतीमध्ये लिंगबदलाचा संबध स्वभावाशी जोडलेला दिसतो. बौध्द संस्कृतीनुसार  पुनर्जन्म न घेता किंवा निसर्गदत्त लिंग न बदलताही स्त्री स्वतःच्या कर्तुत्वावर समाजातील स्वतःचे स्थान बदलू शकते.

बुद्धाने संघामध्ये स्त्रियांना प्रवेश देऊन त्यांच्यासाठी मोक्षाचे द्वार खुले केले. बौध्द संघाने स्त्री स्वान्तात्र्याच्या अनुषंगाने नेमके काय योगदान दिले याची चर्चा सहाव्या प्रकरणात करण्यात आली आहे. स्त्रियांना संघामध्ये उपसंपदा देताना वेगळा विधी नव्हता, बौध्द धर्मामध्ये स्त्रियांना त्या स्त्रिया आहेत म्हणून कधीच कमी लेखले गेले नाही. गौतम बुद्धांनी स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता स्त्रियांकडेही निर्वाणास इच्छुक असलेली एक व्यक्ती याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहत असत.

थेरीगाथामधील स्त्री-दर्शन या सातव्या प्रकारणात वेगवेगळ्या थेरींच्या जीवनानुभवाविषयी चर्चा केली आहे.बोध्द संघामध्ये प्रवेश केल्यावर थेरींनी आपले जे अनुभव शब्दबद्ध केले त्यावरून, समाजातील सामान्य स्त्रियांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश पडतोच पण, गौतम बुद्ध आणि बौध्द धम्माचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय होता... हेही समजते. या स्त्रिया जीवनाच्या सामान्य स्तरातून आल्या असल्या तरी त्यांनी ज्ञानप्राप्ती केलेली आहे, संसारिक मोहावर विजय मिळवून आपण निर्वाणास पत्र असल्याचेही सिद्ध केले आहे. या स्त्रियांचा जीवनाचा संघर्ष आणि त्यावर त्यांनी केलेली मात पाहता, त्या निश्चितच प्रेरणादायी आणि तेजस्वी वाटतात.

आठवे प्रकरण वज्रयान बौध्दपंथातील   स्त्री-विचार - कल्पना आणि वास्तव... यामध्ये वज्रयानपंथीयांच्या मातृत्वाच्या दृष्टिकोनाविषयी चर्चा केली आहे. मातृर्वाच्या प्रचलित अर्थापेक्षा वेगळा अर्थ वज्रयानपंथीयांना अपेक्षित आहे. लिंग, लिंगभाव आणि लिंगभाव वैशिष्ट्ये यामध्येही त्यांनी फरक केला आहे. त्यांना स्त्रीशक्ती म्हणजे जीवशास्त्रीय दृष्ट्या जी व्यक्ती स्त्री आहे अशी व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीमध्ये प्रसव क्षमता आहे अहि व्यक्ती अभिप्रेत नाही तर जी व्यक्ती  ज्ञानी आहे, अशी व्यक्ती अभेप्रेत आहे. ते प्रज्ञेला म्हणजेच ज्ञानाला माता म्हणतात.

जन्म देणाऱ्या मातेपेक्षा जीवन देणारी माता आणि भरणपोषण करुन त्याला समाजामध्ये एक चांगली व्यक्ती म्हणन जगण्यास सक्षम बनवणारी व्यक्ती, अशी व्यक्ती ही स्त्री किंवा पुरुष दोन्ही असू शकते, अशी  माता वज्रयान पंथीयांना अभिप्रेत आहे. अशा प्रकारे वज्रयान पंथीयांनी स्त्रियांकडे पाहण्याची जी एक वेगळी दृष्टी दिली त्याबद्दल या प्रकारांत चर्चा करण्यात आली आहे.

स्त्रीयांना स्वतःबद्दल आणि समाजाबद्दल योग्य ज्ञान मिळवल्यास त्या सक्षम होऊ शकतात. असा एक आशावाद जागवणारा विचार या पुस्तकातून मांडला गेला आहे.

© मेघश्री श्रेष्ठी.



 

 

 

 

 

Post a Comment

2 Comments

Ganesha raut said…
स्त्री पुरुषाच्या संभोगाने जीव जो येतो जन्माला,
जखमी करतो, स्तनपान करतो, रातभर रडतो
घाबरवून टाकतो त्या स्त्रीला,
नऊ महिन्याचा त्रास भयंकर ठाऊक असतो आईला,
नावही त्याच गावही त्याच सगळं क्रेडिट बापाला,
लग्नाआधी तिही असते मुलगी एका आईची,
सगळ्यांसाठी सगळं करते जात ही सुंदर बाईची,
आजची मुलगी आई उद्याची तिच्याविना तू शून्य जणू,
प्रसन्न होते घर, मन, आंगण देवीचा अवतार जणू!