आई होताना -१

 

समोर क्षितिजा पर्यंत पसरलेला अथांग समुद्र! काठावरच्या त्या छोट्याशा मंदिराच्या पायरीवर बसून मी एकटक त्या समुद्राकडे बघतीये. किती अथांग आहे हा? जिथं पर्यंत नजर पोहोचतेय तिथं पर्यंत फक्त हाच आहे. असे वाटतेय पलीकडच्या किनाऱ्यावरील सूर्य याला अधाशासारखा पिऊन टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि हा त्याला गिळण्याचा! सूर्य याला पिऊ शकत नाही आणि हा सूर्याला गिळू शकत नाही तरीही समोरच्या पटलावरील चित्र बघून माझ्या मनात तरी हीच कल्पना उठली. हळूहळू सूर्य समुद्रात बुडू लागला. या शेवटच्या क्षणीही तो त्याच्या किरणांनी समुद्राच्या लाटांवर नक्षी काढत होता. मजेदार रंग उधळीत होता. तो समुद्रावर त्याच्या उबदार प्रेमाची पखरण करत होता. समुद्र मात्र वेड्यासारखा फक्त किनाऱ्याकडे बेभान होऊन उसळत होता. जणू किनाऱ्यावर त्याची कोणीतरी वाट पाहत असावं. किंवा जणू तो माझ्याकडेच येत असावा. जणू तो मला आत बोलवत असावा. समोर हा दूरदूर पर्यंत पसरलेला समुद्र पाहून माझ्या मनातील कल्पनेचा वारूही त्याच्यासारखाच उधाणला होता. या असीम समुद्रात मिसळून जावं आणि स्वतःही त्याच्यासारखच अथांग व्हावं. जमेल का असं अथांग होणं? पण, मला जमलं तरी कोणीतरी उगीच माझा थांगपत्ता काढीत येईलच. मग माझ्या अथांगपणावरही प्रश्न उपस्थित होईलच!  का? कसं? कुणासाठी? काय कारण असावं? अशा अथांग प्रश्नांच्या मालिकेला जन्म देण्यात पुन्हा अर्थ काय आहे? मनात अशा विचारांनी इतका उच्छाद मांडला असताना मी त्या समुद्राच्या उठणाऱ्या लाटांशी, त्याच्या गाजेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत होते. समुद्राला डोळ्यासमोर ठेवून मी माझ्यातील अनंत शक्यतांचा परीघ मोजण्याचा प्रयत्न करत होते. आत एक उधाणलेला समुद्र बाहेरच्या समुद्रात विलीन होण्यास अजिबात तयार नव्हता.

या सगळ्या उलथापालथी सुरु असतानाच तो मात्र वाळूत रेघोट्या मारण्यात व्यस्त होऊन गेला होता. त्याने रेघोट्यांचा एक अस्ताव्यस्त संसार उभा केला होता. माझ्या दृष्टीने त्या फक्त वाळूत उमटलेल्या रेषा होत्या. अर्थहीन. पण, त्याच्या दृष्टीने त्या प्रत्येक रेषेला अर्थ होता. क्षणात मी समुद्रावरून त्या वाळूतील रेषेवर आले. याच्याजवळ कल्पनाशक्तीचा एवढा खजाना कुठून बरं आला असेल? त्या वाळूत मारलेल्या रेघोट्यांशीही त्याने संवाद सुरु केला होता. प्रत्येक रेषेशी त्याचं हितगुज सुरु होतं. जणू त्या रेषा म्हणजे चालतीबोलती माणसे होती त्याच्यासाठी.

हो त्याच्यासाठी त्या रेषा खूप काही होत्या. आणि माझ्यासाठी त्या रेषा निरर्थक होत्या. कारण वाळूतील त्या रेषा काही कायमच्या सोबत राहणाऱ्या नव्हत्या. ती त्याची कल्पना होती. कल्पना नेहमी सत्यापेक्षा वेगळी असते. जशी काही वेळापूर्वी मी कल्पना करत होते. सूर्याने बुडण्याची आणि समुद्र कोरडा पडण्याची. पण, यातील काहीच झालं नाही, होणारही नाही.

काही वेळाने जेंव्हा मी म्हंटलं त्याला “नेल्सन बस्स झालं आता घरी जाऊया,” तेंव्हा त्या वाळूवरच्या रेषा सोडून जाणं त्याच्या किती जीवावर आलं होतं. त्या वाळूत त्याने मांडलेला प्रपंच त्याला सोडवत नव्हता. पण, नाईलाजाने त्याने त्यावर एक नजर टाकली आणि मनाची तयार केली. तो उठला आणि माझा हात हातात धरून चालू लागला.  पण, मला माहित आहे पुढे हा नवीन काही तरी पाहिल आणि मग तो वाळूचा प्रपंच त्याच्या डोक्यातूनही पुसून जाईल. मग पुढे तो फुग्यासाठी रडला. मग आणखी कशासाठी. आणखी कशासाठी.

एकेकाळी आपण ही असेच वाळूच्या किल्ल्यांसाठी, फुग्यासाठी, खेळण्यासाठी रडत नव्हतो का? हो रडत होतो. कालांतराने आपण या गोष्टींसाठी रडणं सोडून दिलं. दिलं कि नाही? पण त्यासाठी काही काळ तर जावा लागलाच. असाच तोही मोठा होईल. हळूहळू मोठा होईल तसतसा तोही या सगळ्या गोष्टींसाठी रडणे सोडून देईल. त्यालाही कळेल वाळूचा किल्ला, प्लास्टिकची खेळणी आणि रबरी फुगे आपल्या सोबत कायम राहत नसतात.

 

आपण आज या वस्तूंसाठी रडत नसलो तरी इतर बऱ्याच गोष्टींसाठी रडत असतोच. कितीतरी अपेक्षांसाठी, इच्छांसाठी झुरत असतोच. कधी एखाद्या वस्तूसाठी कधी एखाद्या व्यक्तीसाठी. हळूहळू वाळूच्या किल्ल्याप्रमाणे यातलाही गुंतलेला जीव निराकार होत जातो. पण, गुंतणं आणि झालेला गुंता सोडवत बसणं यापेक्षा आयुष्यात वेगळं काय करतो आपण?

पुन्हा पुन्हा वाळूचे किल्ले बांधण्याची आपलीही बालिश हौस फिटलेली नसतेच, असे कित्येक किल्ले कोसळले तरी. विश्वास असतो उद्याचा किनारा नवा असेल, समुद्रही असेल आणि नवा खेळ मांडण्यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करत राहू. माझा हात हातात घेऊन आता तो आपल्याच सावलीशी खेळत होता, कधी मला त्या सावलीबद्दल सांगत होता. कधी सावलीला माझ्याबद्दल. नव्या गोष्टीत मन गुंतवण किती सोपं असतं. जेंव्हा मन निरागस, मोकळं आणि स्वच्छ असतं. जेंव्हा त्यात मागे पडलेल्या गोष्टींबद्दल खेद नसतो आणि येणाऱ्या संधीबद्दल आशंका नसते. त्याच्या निरागस चेहऱ्यावरील स्मित मला हेच शिकवत होतं. मी आई होता होता, कधी तोच माझी आई होऊन जातो कळतही नाही.

 ©मेघश्री

 


Post a Comment

7 Comments

Amit Medhavi said…
अंतर्मुख करायला लावणारे सत्यकथन..
Harish Shinde said…
अत्यंत सुंदर लेखन आणि एवढ्याच तोलामोलाचं कथन.भरीव अनुभव
अप्रतिम शब्द मांडणी,वाचकाला खिळवून ठेवणं हे लेखिकेचे बलस्थान
Meghashree said…
धन्यवाद हरीश दादा, धन्यवाद अमित सर
Unknown said…
अप्रतिम....
Unknown said…
छान..शेवटच्या काही ओळी अभिव्यक्तीला अर्थ देतात.
Sanjaygurav said…
अपेक्षा कधीच संपत नाहीत...आणि एक डाव संपला की दुसरा सुरू होतोच..फक्त एका डावातून दुसऱ्या डावात सहज सामावायची कला जमली पाहिजे.. हेच जीवन.
सुंदर लिहिले आहे.👌👌👌