ती आणि तिचे स्थान...

 

आजूबाजूंच्या महिलांच्या आयुष्यावर एक नजर टाकली की आज २१व्या शतकात महिलांचे समाजात काय स्थान आहे हे स्पष्ट होते. यासाठी आजूबाजूची काही उदाहरणे मांडणे मला आवश्यक वाटते. माझ्या शेजारी राहणारी प्रिया (नाव बदललं काय नाही बदललं काय कुणाचं नशीब तर आपल्या लिहिण्याने बदलणार नाही). तर ही प्रिया तिशीच्या आसपासची. जेमतेम दहावी पर्यंतच शिक्षण. नवरा चांगला कमावता आहे. पण, कामानिमित्त दहा-पंधरा दिवस बाहेरच असतो. तो घरी आला की प्रियाचा उत्साह ओसंडून वाहतो. तो घरी असेल तोच दिवस तिच्यासाठी सणावाराचा. पण, प्रियाचा संसार वरवर असा गोंडस दिसत असला तरी, आतून ती खूपच सैरभैर असते. तिचे डोळे सदा न कदा पाण्याने डबडबलेले आणि जरा बोलू लागली की आवाज कापरा होतो. कदाचित तिच्या मनात जे आहे, ते बाहेर आणण्यास जणू कुणी तरी कडक बंदी घातली असावी. प्रियाला एक मुलगाही आहे. तिसरीत शिकतो. घरी बहुतांश वेळा प्रियाची सासू, प्रिया आणि तो नऊ वर्षांचा मुलगा तिघेच असतात. प्रियाचा नवरा सुधीर, पंधरा-आठ दिवसातून आला तरी, तो नेहमी फोन आणि पुढच्या कामाचे मिटींग्ज यातच बिझी असतो. कधी तिला बाहेर फिरायला नेलंय, कधी तिला वेळ दिलाय अस काहीही नाही. वनरूम किचनच्या संसारात मिळणारी प्रायव्हसीही जेमतेमच. प्रिया नेहमी उदास आणि निरुत्साही असते म्हणून सासू सतत तिच्या विषयीच्या तक्रारीचा पाढा वाचत असते. तिच्या कडून कामात काही चूक झाली तर अख्ख्या गल्लीला ऐकू जाईल अशा आवाजात तिचा उद्धार करत असते. बिचारी प्रिया मात्र मान खाली घालून ऐकून घेते.

परवा शेजारच्या काकू तिला समजावत होत्या. नवऱ्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर. त्याचं चित्त संसारात लागावं असं वाटत असेल तर तूच त्याला तुझ्याकडे वळवला पाहिजेस. म्हणजे नवरा बाहेर शेण खातो हे सगळ्या गल्लीला माहित आहे. तरी तिचे खापर प्रियावरच फोडले जाते. अशा सगळ्या वातारणात भांबावलेली प्रिया आतल्या आत घुसमटत एकच उत्तर शोधत असते, ‘माझी काय चूक?’

मला वाटतं, ही का नाही भांडत स्वतःच्या हक्काच्या प्रेमासाठी? सतत गृहीत धरल्याचा आणि सतत अपराधी वृत्तीचे ओझ वागवत राहण्याचा कंटाळा येत नाही का हिला? का नाही स्वतःच्या अस्तित्वासाठीही हिचा आवाज बाहेर पडत? सतत उद्धार करणाऱ्या सासूला आणि सतत तुसडेपणाची वागणूक देणाऱ्या नवऱ्याला जाब विचारावा असं हिला का वाटत नाही? कुठल्या ओझ्याखाली दबून गेला आहे हिचा आवाज?

नात्यातील एक दूरची बहिण आहे, सुश्मिता. नवरा बायको गेले वर्ष-दीड वर्षे झालं वेगळे राहतात पण, तिला अजूनही आशा वाटते की कधीतरी त्याच्या मनाला पाझर फुटेल आणि हिची प्रियाराधना सफल होईल. कधीतरी नवरा बायकोतील आणि त्यायोगाने आई आणि मुलीतही जे अंतर आणि दुरावा निर्माण झाला आहे, तो मिटेल. पण, बायकोचा फोनही उचलण्याची ज्याची इच्छा नाही त्या नवऱ्याच्या काळजाला कसा आणि कधी पाझर फुटणार कोण जाणे? तोवर हिने झुरत कुढत राहायचं. याशिवाय पर्याय नाही का? करिअर आणि संसार यांच्यात ताळमेळ बसवायला जरा कुठे कसूर झाली की लगेच तिने दोन्ही पैकी एका गोष्टीवर पाणी सोडणे अनिवार्य आहे का? पण, तीही अजून माझं कुठे चुकलं हेच उत्तर शोधण्यात गुरफटलेली आहे. तिने न केलेल्या चुका मान्य केल्या तरी त्यावर पांघरून घालून तिला पुन्हा एक संधी देण्याची कुणाचीही इच्छा नाही. अनिश्चित काळासाठीची ही जी शिक्षा तिच्यावर लादण्यात आली आहे, त्याबद्दल कुणालाही काडीचीही खंत वाटत नाही.

सुधा काकूंनी नवऱ्याच्या माघारी, कधी हॉस्पिटलमध्ये तर कधी हॉटेलमध्ये मिळेल तिथे काम करून पोटाच्या गोळ्यासाठी घर, शिक्षण, नोकरी, छोकरी सगळं काही मिळवून दिलं. तोच मुलगा जेंव्हा आईला घोडा लावण्याची भाषा करतो तेंव्हा पंचवीस वर्षांच्या कष्टाचं पाणी झाल्याची जी भावना त्यांच्या वाहत्या डोळ्यातून ओघळते ती पाहून हतबल व्हायला होतं.

असा आहे समाज आणि हे आहे आपल्या समाजातील स्त्रीचे स्थान असे म्हंटले की, लगेच काही लोकांच्या सकारात्मक भावना दुखावतात. तुम्हाला फक्त वाईटच पाहण्याची सवय लागले म्हणून आमच्याच नावानी खडे फोडतात. कित्ती स्त्रिया पायावर उभ्या राहिल्यात ते का नाही दिसत? समाज बदलतोय! आत्ता स्त्रिया कुठे नाहीत सांगा? सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. तुम्हाला आयती संधी कोण देणार? स्वकर्तृत्वाने पुढे जाणाऱ्या स्त्रिया दिसत नाहीत का तुम्हाला? असे प्रश्न विचारून हे लोक स्वतःचीच पाठ थोपटून घेत असतात. बुरखा घालून पत्रकार परिषद घेणारी महिला महापौर बघून आम्ही अभिमान वाटून घ्यावा का? केंद्रीय पत्नीच्या राजीनाम्याची घोषणाही तिचा नवरा करत असेल तर याचाही आम्ही अभिमान वाटून घ्यावा का? आणि म्हशीसाठी चारा आणायला गेलेली आमची बहिण जर सुखरूप घरी परतत नसेल तर अशा समाजाचा आम्ही अभिमान वाटून घ्यावा का?

नकारात्मक बाबी मांडण्याची कुणाला हौस नसते. वास्तव नकारात्मक असते म्हणून कोणी तिचा अस्वीकार करू शकत नाही. हे सत्य स्वीकारले तरच पुढच्या बदलाची रूपरेषा आखणे सोपे जाईल.

 ©मेघश्री



Post a Comment

4 Comments

खरंय,आपण नकारात्मक लिहायचं असं ठरवून लिहीत नाही. वास्तव नेहमी नकारात्मकच असते. 😊लिहीत राहा
भारतीय समाजाची एकूणच उदासीनता आहे ही.