Posts

काय सांगू तुला?

काय सांगू तुला मी रोज किती झुरतो, असावं गळत नाहीत पण रोज रडतो, तुझा हात धरून चालताना, वाटलं आभाळ हाती आलं, नाचली माझ्या अंगणात जेंव्हा तुझी इवली पावलं, तुझ्या पहिल्या रडण्यानं, फुलवली अगणित स्वप्नं, माझ्या डोळ्यात. तुला मिळावं, तुझं आभाळ म्हणून, राबलो जन्मभर, ताईत बनवून तुला, बांधली गळ्यात. चार दिवसांच्या प्रेमासाठी, विसरलीस; तुझ्या डोळ्यांनी जग बघणारा बाप. बापाच्याच पाठीत, सुरा खुपसण्याच केलंस पाप. शिकवलं भरपूर तुला,   म्हणून आज हसतो हा समज मला. त्यांच्या हातात आता चांगलंच हत्यार मिळालंय, हसून कुत्सितपणे म्हणतात, याच्या पोरीनं, जातीबाहेर लग्न केलंय. खरा असेल जातीवंताचा तर, घडवील अद्दल तिला, समाजाचा हा क्रूर न्याय नाही कळायचा तुला. भाऊ-बहिण नातेवाईक सगळ्यांनीच वाळीत टाकलय मला, आयुष्याच्या कातरवेळी सार्यांनीच दगा दिला. आपल्याच माणसांशी लढण्याची नाही आता हिम्मत, व्यवस्थेच्या कायद्याला काळजाची नाही किंमत. © मेघश्री श्रेष्ठी-नाईक.

वळणावर

काही कविता हरवल्यात आणि त्यांच्या पाऊलखुणाही. भेटावं असं कुणी उरलं नाही, जेंव्हा पासून, तुही हरवलास. थांबला असशील कदाचित अजूनही त्याच वळणावर पण, परतुन यावं की न यावं... याचं उत्तर सापडत नाहीये! ©मेघश्री श्रेष्ठी.

उदासी

संवादाच्या सगळ्या शक्यता संपल्याचं असतील तर,  मला आवडेल पुन्हा माझ्या कोशात परतायला,  जिथे असते माझ्यासोबत, नेहमी उदासीनतेची खिन्न सावली. © मेघश्री श्रेष्ठी.

अमृतशिंपण

पुन्हा एकदा तीच खेळी, तू सभ्य मी अफूची गोळी, मी मेनका चित्तभंगी, तू साधू ज्ञान योगी, मी अमृत शिंपण चांदण्याचे, वैराग्या तुझी फाटकी झोळी. © मेघश्री श्रेष्ठी.

डॉन

देव आधी भावाचा भुकेला होता, आता पैश्यांचा भुकेला झालाय. आधी आम्ही देवाकड मागण मागायचो, आता रोज उठून देवालाच आमच्याकडून काही तरी हव असत. देव आधी भजनाच्या तालावर डोलायचा, आता डीजेच्या तालावर थिरकतो. आम्ही म्हणायचो देवा माझ रक्षण कर, आता देवालाच सेक्युरिटी लागते. आधी देव अहिंसेचा मार्ग दाखवी, आता देवानच आम्हाला हातात बंदुका घ्यायाला भाग पाडलाय, देवानच सांगितलय, हृदयात देव पहा म्हणणार्याला आणि माझ्या बद्दल उलटसुलट बोलण्यार्याला गोळ्या घाला. आधी देव निराकार होता, सगुण होता, आता देव कधीही कुठेही आकार घेतो आणि गुणांचा उजेड पाडतो, आधी देव सगळ्यांचा होता, आता तो फक्त श्रीमंताचा आहे. म्हणून तर देशाला हजारो कोटींचा चुना लावणारा ‘मल्ल्या’ सुखरूप निसटतो, आणि जगण्यासाठी इवलीशी जमीन शोधणारा ‘आयलान’ बुडून मरतो. कोंबडा, कोंबडी, बकरी आता तर, माणसांचा ही त्याला बळी लागतो. देव आधी प्रेमळ पिता होता आपला, आता तो जगाचा डॉन झालाय. देवान आम्हाला घडवल, कि आम्हीच देवाला बिघडवलं? © मेघश्री श्रेष्ठी-नाईक.     सरुड

कधी कधी

कधी कधी तू असतोस सखा, मनाच्या तळघरा पर्यंत असतो, तुझा वावर. कधी कधी मात्र, बंद करावी वाटतात, मनाची कवाडं, तुझ्यासाठीही. कधी कधी, तुझ्या मिठीत झोकून द्यावं वाटतं, स्वतःला, कधी कधी किळस वाटते तुझ्या स्पर्शाचीही. कधी कधी, तू भासतोस जादुगार, सभोवताल मोहवून टाकणारा, कधी कधी, उगाच वाटते भीती तुझ्या, जादुई बोलण्याचीही. कधी कधी तू हवा असतोस, आत्ता या क्षणी घट्ट मिठीत. कधी कधी तू नकोही असतोस, नजरेसमोर. कधी कधी वाटतं, हा अन्याय असावा तुझ्यावर, कधी कधी वाटतं, तूच जुलूम करतोस माझ्यावर. कधी कधी वाटत, डुंबावं तुझ्या नजरेत, जाणून घ्याव्यात, आकार उकार तुझ्या देहाचा, अधारानी तपासावी, तुझ्या श्वासातील लय. बिचकत बिचकत व्यक्त होताना, कधी तू आश्वासक वाटतोस, तर कधी दुष्टही. तुझ्याकडे अजूनही मी माणूस म्हणून पाहू शकत नाही. पण का? कारण शेवटी तू एक पुरुष आहेस. © मेघश्री श्रेष्ठी-नाईक.

मालकी हक्क

तू नको म्हणत असतानाही, मी तोच फोटो ठेवला माझ्या डीपीवर आत्ता.... कमेंट आले माझ्या प्रोपिकवर 'व्हेरी हॉट...!!!' बघ ना... अगदी मला बहिणीप्रमाणे मानणाऱ्या मला भावाप्रमाणे असणाऱ्या, मानलेल्या भावानेही तिचं कमेंट दिली. तुझ्या एखाद्याही पिक वर येत नसेल ना अशी कमेंट? कशी येईल! तुझ्या लिस्टमधल्या बायकांची नजर अजून तयार झाली नसेल, पुरुष नावाच्या वस्तूकडे पाहण्याची... किंवा झाली असेल तरी.... त्यांना अडवत असतील, त्यांच्या संस्कारांचे उंबरठे. बघ माझ्या मित्र यादीतले कित्येक मित्र, मला ओळखतही नाहीत, तरी मी त्यांच्यासाठी असते डीअर, हॉट आणि सेक्सी. ऐक ना, मलाही वाटतं, तुझ्याही प्रो-पिकला,   कुणी तरी म्हणावं सेक्सी आणि हॅंडसम.... माझ्याशिवायही तू असावास कुणाचा तरी क्रश. म्हणजे बघ ना तू आवडणारा, मी एकटीच कशी असू शकेन? इतरही कुणी असेल जिला तू आवडत असशील..... म्हणजे माझ्या डीपीवर कसे बिनधास्त रिअॅक्ट होतात... तसच व्हावं कुणी, तुझ्याही डीपीवर रिअॅक्ट......