म्हणतात ना लग्न पाहावे करून! पण लग्नानंतर होणाऱ्या कसरतीचं काय?

लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. खरेदी, इव्हेंट, फोटोशूट, या सगळ्या गदारोळात आयुष्यात कायमसाठी येणारं एक नवं माणूस, नवी जबाबदारी आणि नवं नातं यांच्याशी जुळवून घेणं जमेल का? हा प्रश्नही मनाला सतावत असतो. थाटामाटात लग्न झाल्यावर पहिली सुरुवात असते ती आयुष्यात आलेल्या या सगळ्या नवख्या गोष्टी समजून घेण्याची आणि या बदलाशी जुळवून घेण्याची!

नवरा-बायको हे नातं कधीच फक्त दुहेरी नसतं. यात अनेक पदर असतात. पण हा सगळा डोलारा तेव्हाच नीट सांभाळला जाऊ शकतो. जेव्हा नवरा-बायको मधील नातं जास्त घट्ट, समंजस आणि अतूट असेल.
आपल्या जोडीदाराशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतात. पूर्वी नात्यांसाठी, नाती तगवण्यासाठी म्हणून काही विशिष्ट कष्ट घ्यावे लागतात, हे कुणाच्या गावीही नव्हतं. आता काळ बदलला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे नाती टिकवणं आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणं खूप महत्वाचं बनलं आहे.
जोडीदारासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि उत्तरोत्तर हे नातं फुलवण्यासाठी कोणत्या गोष्टी फायद्याच्या ठरतील हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
लग्न मग ते प्रेम विवाह असो की अरेंज्ड आपल्या जोडीदाराचं आपल्यावर प्रेम आहे का, ते कायम असंच राहील का? आपण जोडीदाराला आनंदी ठेऊ शकू का? कधी दुरावा निर्माण झालाच तर काय होईल अशा शंका प्रत्येकाला सतावतात. या सगळ्या शंका-कुशंकांवर मात करून पुढे जाणारी जोडपीच वैवाहिक आयुष्याचा आनंद घेऊ शकतात.
महत्वाचं म्हणजे नात्याची जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे. आपल्या जोडीदाराच्या सुखदुखात सहभागी होणं, त्याला साथ देणं, त्याला सांभाळून घेणं ही आपली जबाबदारी असते. जसं प्रेम देणं ही आपली जबाबदारी आहे तसंच समोरच्याच्या प्रेमाचा स्वीकार करणं ही देखील आपली जबाबदारी असते.
‘माझ्या मनातील त्यानं/तिनं ओळखलं पाहिजे अशा अपेक्षा नात्याला कमकुवत करतात. म्हणून तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही, हे स्पष्ट करणं तुमची जबाबदारी असते. तसंच जोडीदाराला काय आवडेल काय आवडणार नाही हे समजून घेणंही आपली जबाबदारी असते. या सगळ्या अवघड आणि नाजूक गोष्टींवर फक्त संवादातूनच तोडगा निघू शकतो. अगदी आवडत्या रंगापासून ते सेक्सपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्ही बोलल्याशिवाय तुमच्या जोडीदाराला कळणार नाहीये.
परफेक्ट जोडीदार ही गोष्ट जगात प्रत्यक्षात अस्तित्वात नसते. म्हणून त्याच्यातील दोषही स्वीकारता आले पाहिजेत. हवं तर ते कमी करता येण्यासाठी काही मर्यादेपर्यंत प्रयत्न करता येतात.
आपण आपल्या पूर्वानुभवावरून काही गोष्टी डोक्यात पक्क्या धरून ठेवलेल्या असतात. उदा. माणसं अशीच असतात. पुरुष असेच असतात, स्त्रिया अशाच असतात. तुमच्या जोडीदार या मापदंडात बसेलच असं नाही. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यासाठी अधिकाधिक वेळ देणं, अगदी शाळेतील गमती-जमती, मित्र-मैत्रिणी, आवडती पुस्तकं, ठिकाणं, फिल्म, हिरो-हिरॉइन अशा अनेक बारीकसारीक गोष्टींवर ऐसपैस गप्पा मारता आल्या पाहिजेत. चांगला जोडीदार होण्यासाठी चांगली मैत्रीण/मित्र होणं खूप गरजेचं आहे.
अंगणात येणाऱ्या चिमण्या ते घरासाठी लागणारं किराणा सामान या प्रत्येकाबाबत एकमेकांची मतं काय आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा. सरकत जाणारा वेळ हा एकमेकांना जवळ आणण्यासाठी सत्कारणी लावता यायला हवा. नाहीतर, फक्त ‘वेळ नाही,’ याच एकमेव कारणांनी कित्येक संसार कोमेजून जातात. मला जोडीदार आहे, हे दाखवण्यासाठी म्हणून एकमेकांच्या आयुष्यातील शो-पीस बनून राहतात.
घरातील कामात एकमेकांची मदत घ्या. यामुळे बॉंड strong होतो. दोन व्यक्तींमधील नातं दृढ होण्यासाठी काही तरी निमित्तं शोधावी लागतात, ती नसतील तर ती निर्माण करावी लागतात. म्हणून समान इंटरेस्ट काय आहेत आणि भिन्न आवडी-निवडी काय आहेत हे समजून घ्यायला हवं. कुठल्या गोष्टी एकत्र केल्याने जास्त आनंद मिळतो आणि कुठल्या गोष्टी आपण आपली प्रायव्हेट स्पेस म्हणून एकेकटे करू शकतो हे ठरवता आलं पाहिजे.
महत्वाचं म्हणजे आपली आवड समोरच्यावर लादता येत नाही, ही मर्यादा समजून घ्यायला हवी. एखाद्या गोष्टीत आपल्या जोडीदाराला रस नसेल, तर त्यासाठीच हट्ट धरून बसण्याऐवजी त्यातून काय वेगळा मार्ग काढता येईल हे संवादाने ठरवता येतं. एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची समान उत्सुकता असली पाहिजे. बायको दिवसभर घरात असेल, तर तिचा दिवस कसा होता आणि नवरा बाहेर असेल तर त्याच्या दिवस कसा होता, याबद्दल बोलणं व्हायला हवं. तरच संसाररथाची ही दोन्ही चाकं एका रस्त्यावर समान वेगाने चालताहेत की नाही हे कळू शकेल.
नव्याचे नऊ दिवस म्हणून एखाद्याला किराणा सामान आणायला मदत करणं, हे काम आवडू शकतं. पण नंतर जर हे काम त्याला बोअर वाटणार असेल तर काय? शेवटी ही एक मुख्य जबाबदारी आहे, ती एकाच कुणाच्या तरी एकाच्या अंगावर ढकलून चालणार नाही. त्याची समान विभागणी करता यायला हवी.
घरातील महत्वाची कामं, जबाबदाऱ्या, व्यवसाय, नोकरी आणि छंद याबाबत एकमेकांचे विचार समजून घेतले पाहिजेत.
या नात्यात शब्दावीण संवाद साधण्याची कला ज्याला आत्मसात झाली, त्याचा संसार अधिक चांगला फुलेल हे समजून घ्यावं. एकमेकांच्या नजरेला नजर देणं, मिठी मारणं, चुंबन, कडलिंग आणि सेक्स तुमच्या नात्याला अधिक आनंदी बनवतात.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जोडीदाराबद्दल सकारात्मक विचार करणं, त्याच्या हेतूबद्दल संशय न घेणं. त्याच्या प्रत्येक कृतीला नकारात्मक मापदंड लावून मोजण्याचा प्रयत्न केल्यास हे नातं अधिकाधिक कमकुवत होत जाईल. म्हणून संवादाच्या सगळ्या शक्यता अजमावून पाहता आल्या पाहिजेत. अर्थात, हे प्रयत्न जेव्हा दोन्ही बाजूंनी होतील तेव्हाच सुखी संसाराचं चित्र पूर्ण होईल. 
 

 

Post a Comment

1 Comments

लग्न ही संकल्पन्नाच मुळी तडजोडीवर टिकून आहे .तिथे दोघांनीही तडजोड करायला हवीच .