निराश मानसिकता असणाऱ्या जोडीदाराशी कसं जुळवून घ्यायचं?


असं म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण बरेचदा नवरा-बायकोचा स्वभाव हा नेमका उलटा निघतो असं का बरं? हा प्रश्न तर अनेकांना सतावत असेल. पती-पत्नीच्या स्वभावात अंतर का असतं? याचं उत्तर तर काही देता येणार नाही, पण स्वभाव वेगळे असले तरी, एकमेकांसोबत adjust कसं करायचं हे मात्र आम्ही सांगू शकतो.

जोडीदार जर नकारात्मक आणि निरुत्साही असेल तर, अशा जोडीदाराशी कसं पटवून घ्यायचं?



काही लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असतो, तर काही लोकं नेहमीच निराश मानसिक अवस्थेत असतात. अशा लोकांसोबत राहताना, अनेकदा उत्साही, आनंदी व्यक्तीची घुसमट होऊ शकते. कारण, अर्थातच स्वभाव भिन्नता! असं असलं तरी, काही छोट्या-छोट्या युक्त्या वापरून तुम्ही आनंदी राहू शकता आणि जोडीदारालाही समजून घेऊ शकता.

जोडीदार नकारात्मक किंवा निराश मानसिकतेत जगणारा आहे, म्हणून तुम्हीही तोच दृष्टीकोन स्वीकारू नका. स्वतःच्या गरजा, स्वतःचा आनंद यासाठी जोडीदारावर अवलंबून राहणे सोडा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ द्या. तुमचा आहार, शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे, ही जबाबदारी तुमचीच आहे. त्यासाठी जोडीदाराला धारेवर धरण्याची आवश्यकता नाही. शारीरिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी चांगला पोषक आहार घ्या. व्यायाम करा. काही शारीरिक तक्रारी असतील तर, जोडीदाराची वाट न पाहता, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

बरेचदा अनेक लोकांचा असा गैरसमज असतो, की जे मला आवडतं तेच माझ्या जोडीदारालाही आवडायला हवं किंवा त्याला आवडणार नसेल तर मी पुन्हा या गोष्टी करणार नाही. हे दोन्ही दृष्टीकोन तुमच्या मानसिक आरोग्यासाठी तर घातक ठरतातच, पण तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकतात.

तुमचे आवडते छंद जोपासा. त्यासाठी वेळ द्या. समान आवड असणारे मित्र-मैत्रिणी शोधा. त्यांच्या सोबत वेळ घालवा. यामुळे जोडीदारावर अवलंबून राहणे कमी होईल. 

तुमचे छंद तुम्ही जोपासा आणि त्यांचे छंद जोपासण्यास त्यांना मोकळीक द्या. आवडी-निवडी जुळणार नसतील, तर त्या एकमेकांवर लादून संसाराची ओढाताण करण्यात अर्थ नाही.

दिवसातील काही क्षण सोबत घालवा. यावेळेत एकमेकांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे समजून घ्या. त्याला/तिला न सांगता, न बोलता कळायला हवं असा बालिश हट्ट काही कामाचा नाही. न बोलता मनातील गोष्टी कोणालाही ओळखता येत नाही. एकमेकांशी बोलताना आधी त्यांचे म्हणणे समजून घ्या. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पटकन पोहोचू नका. बरेचदा बोलताना काही असहमतीचे विषय निघाले तरी त्याबद्दल घाईघाईत मत मांडू नका. विषय समजून घेण्यासाठी थोडा वेळ तरी द्यायला हवाच. स्वतःसाठी आणि जोडीदाराच्या मानसिक आरोग्यासाठीही या गोष्टी महत्वाच्या आहेत.

एकत्र फिरायला जाण्याचा प्लॅन करा. एकत्र वेळ घालवताना कोणकोणत्या गोष्टी करू शकता, याबद्दल विचार करा. तुमचे विचार, भावना स्पष्ट पण नम्रपणे मांडायला शिका. नुसत्याच संसारातील कुरबुरी, यानं असं केलं, त्यानं तसं केलं, अशा तक्रारींचा पाढा वाचण्यातच वेळ वाया घालवू नका. सध्याच्या युगात एकत्र घालवण्यासाठी एकतर फार कमी वेळ मिळतो, त्यावेळेत ही आपण आपला विचार सोडून जग काय करतं हेच डिस्कस कर बसलो, तर बरेच आनंदी क्षण ह्तातून निसटून जाऊ शकतात. त्याऐवजी एकत्र गाणी ऐकणे, खेळ खेळणे.,मुव्ही बघणे, पुस्तक वाचणे, अशा कितीतरी गोष्टी प्लॅन करता येतील.

फक्त त्याला/तिला आवडतं म्हणून करतो. अशा गोष्टी जबरदस्तीने लादून घेऊ नका. त्यांची आवड-निवड जपण्यासोबतच स्वतःची आवड-निवड जपण्याला प्राधान्य द्या.

जास्तीत जास्त सकारात्मक राहण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी जोपर्यंत आपण वेळ काढत नाही, तोपर्यंत आपल्याला आयुष्य आनंदी आहे असं वाटत नाही.

तुम्ही कितीही समजून घेतलं स्वतःच्या इच्छा मारल्या, त्यांच्या मनासारखं करण्यासाठी स्वतःचं मन मारत राहिला, यामुळे नाती टिकत नाहीत. यामुळे फक्त मनात संताप, खदखद आणि आयुष्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. आपल्या आजूबाजूची सगळीच नाती स्वार्थी आहेत, असं वाटायला लागतं. आनंदासाठी इतरांवर अवलंबून राहिलात तर तो कधीच मिळणार नाही. म्हणून स्वतःच्या आनंदाच्या जागा स्वतः शोधायच्या आणि त्या जपायच्या.

तुम्हाला गृहीत धरलं जातंय असं वाटत असेल तर त्याबाबत स्पष्ट बोला. तुम्हालाही तुमचं आयुष्य जगण्याचा, नव्हे आनंदाने जगण्याचा हक्क आहे. त्यांच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊ देऊ नका.

पती-पत्नी म्हटलं की, बऱ्याच गोष्टी साचेबंद पद्धतीने गृहीत धरल्या जातात. चार लोकं काय म्हणतील, या सुत्रापुढे बरेच जण मान तुकवून आणि मन मारून जगतात. अशी तडजोड एक दिवस तुम्हालाच आतून संपवून टाकेल. तेव्हा, स्वतःसाठी थोडं स्वार्थी झालात तरी चालेल. 

Comments

Popular posts from this blog

नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing