अत्याधिक संवेदनशील असणे म्हणजे काय? या व्यक्तींचे काही खास गुण जाणून घ्या. (What is hyper sensitivity, know more)


 अरे किती विचार करशील दे ना सोडून...

असं कुणी कितीही सांगितलं तरीही एखादी व्यक्ती मनातून काही गोष्टी लवकर काढत नाही. झालेली घटना, प्रसंग किंवा साधा संवादही अशा व्यक्तीच्या मनात सतत घोळत असतो. वरवर पाहता ही एक प्रकारची एंक्झायटी वाटत असली तरी काही व्यक्तींच्या बाबतीत हा कुठलाही मनोविकार नव्हे तर तो त्यांच्या व्यक्तीमत्वाचाच प्रकार असतो. ज्याला आपण ‘टू सेन्सिटिव्ह’ असं म्हणून उडवून लावतो. पण, या ‘टू सेन्सिटिव्ह’ व्यक्ती नेमक्या असतात तरी कशा? याचा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर आणि त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या लोकांवर नेमका काय परिणाम होतो जाणून घेऊया या लेखातून.

हायली सेन्सिटिव्ह व्यक्ती (HSP) हा एक व्यक्तिमत्वाचा दुर्मिळ प्रकार आहे. एकूण लोकसंख्येपैकी फक्त २०% लोकं या प्रकारात मोडतात. त्यातही HSP असलेल्या दोन व्यक्तींमध्ये कमी अधिक तीव्रता जाणवू शकते. या व्यक्तींच्या मेंदुतील अंतर्गत रचनेमुळेच अशा व्यक्तीना बाह्य किंवा अंतर्गत चेतना अधिक तीव्रतेने जाणवते. यांची ज्ञानेंद्रिये अत्याधिक संवेदनशील असतात.

इलेन अरोन आणि आर्थर अरोन या दोन मानसशास्त्रज्ञांनी १९९०च्या दशकात HSP या संकल्पनेचा शोध लावला. १९९६ मध्ये इलेनचं ‘द हायली सेन्सिटिव्ह पर्सन हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यानंतर या संकल्पनेकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर आजतागायत यावर संशोधन सुरूच आहे.

‘फार विचार करत जाऊ नको’, फार मनावर घेऊ नको, ही वाक्य तुम्हालाही ऐकावी लागतात. कितीही प्रयत्न केला तरी एखादी घटना/प्रसंग/व्यक्तीचे वर्तन यामुळे तुम्ही फार चटकन आणि अतिप्रमाणात अस्वस्थ होता? मग तुम्ही देखील HSP असू शकता. अर्थात, अत्याधिक संवेदनशील असणे हा काही मनोविकार नाही. तो आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रकार असतो. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टींना असणारा प्रतिसाद हा अधिक तीव्र स्वरूपाचा असतो. म्हणजे छोट्यातील छोट्या गोष्टीतही यांना जास्त आनंद मिळतो. त्याचप्रकारे छोट्या गोष्टीही यांना जास्त त्रासदायक ठरतात.

अशा प्रकारच्या व्यक्तीमध्ये आढळणारे काही गुण –

भितीदायक, हिंसक आणि अस्वस्थ करणारे चित्रपट किंवा सिरियल्स (दृश्ये) टाळणे –  या प्रकारचे दृश्य पाहून हे लोक जास्त अस्वस्थ होतात. त्यांची मानसिकता विचलित होते. ज्याचा परिणाम त्यांना अधिक काळापर्यंत जाणवत राहतो.

सुंदरता यांना अधिक आकर्षित करते. मग ती मानवी असो किंवा एखाद्या कलेतील. एखादे पेंटिंग, चित्रपट किंवा नैसर्गिक नजरा असो कलात्मक वस्तुतून व्यक्त होणारे सौंदर्याचा यांच्यावर खोलवर परिणाम दिसून येतो. त्याचा मोह यांना सुटत नाही.

तीव्र प्रकाश, अधिक गोंधळ, आवाज, संगीत अशा गोष्टींचा यांच्यावर चटकन परिणाम होतो. अंगात घातलेले कपडेही आरामदायक नसतील तर त्याचा यांना त्रास होतो.

एखादा दिवस खूप दगदगीचा, धावपळीचा गेला असेल तर यांना रीलॅक्स होण्यासाठी खूप वेळ लागतो. एकांतात बसणे हीच यांच्यासाठी थेरपी असते. शांत होण्यासाठी इतर माणसांपासून थोडा वेळ काढणं अत्यावश्यक असतं. त्याशिवाय असे लोक मानसिकदृष्ट्या लवकर स्थिर होत नाहीत.

यांचे व्यक्तिगत जीवन किंवा मानसिक स्थितीही फारच गुंतागुंतीची असते. एकाच वेळी समृद्ध आणि तापदायकही. प्रत्येक गोष्टीचा खोलात जाऊन विचार करण्याची सवय असते. तसेच यांच्या भावना आणि भावनिक आंदोलनेही खूप तीव्र असतात. त्यातून सावरण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो.



एखादी व्यक्ती अत्याधिक संवेदनशील असण्यामागची कारणे –

एखादी व्यक्ती अत्याधिक संवेदनशील असण्यामागे बरीच कारणे असतात. यात पर्यावरण, अनुवांशिकता, बालपण, आणि उत्क्रांती यांचाही समावेश होतो. अत्याधिक संवेदनशीलता ही फक्त मनुष्यप्राण्यातच नाही तर, इतर प्राण्यांतही पाहायला मिळते. एखाद्या उत्क्रांतीच्या टप्प्यात विकसित झालेल्या एखाद्या जनुकीय बदलामुळे देखील अत्याधिक संवेदनशीलता दिसून येते. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यात सतत सतर्क आणि सावध राहण्याच्या स्थितीमुळेही हा बदल झालेला असू शकतो. अत्याधिक संवेदनशील व्यक्तींना धोके चटकन जाणवतात तसेच त्या नेहमी सतर्क आणि सावध असतात. यामुळे बरेचदा त्यांना तणाव जाणवतो.

बाल वयात आवश्यक ते सुरक्षित वातावरण, पालकांचा सहवास, त्यांचे प्रेम आणि सुरक्षितता मिळाली नसेल, पालकांकडून सतत हेटाळणी झाली असेल तर अशा व्यक्तीही अत्याधिक संवेदनशील बनतात. बालपणी काही नकारात्मक अनुभव किंवा छळ झाला असेल तर अशा व्यक्तीतही अत्याधिक संवेदनशीलता दिसून येते.

अत्याधिक संवेदनशील असण्यात जनुकांचीही भूमिका असू शकते. अत्याधिक संवेदनशीलता हा मागच्या पिढीकडून मिळालेला वारसा असू शकतो. तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती अत्याधिक संवेदनशील असेल तर तुम्हीही अत्याधिक संवेदनशील असण्याची शक्यता वाढते.

हायपर सेन्सिटिव्हीटी HSP आणि इतर मेंदुविकार किंवा मनोविकार यांची गल्लत होऊ शकते.

अंतर्मुखी व्यक्तिमत्व – अत्याधिक संवेदनशील व्यक्ती आणि अंतर्मुख व्यक्ती दोघांनाही एकाच वेळी अधिक उत्तेजना देणाऱ्या गोष्टी सहन होत नाहीत. परंतु यातही फरक असतो अंतर्मुखी व्यक्ती या सामाजिक उत्तेजना मिळाल्याने विचलित होऊ शकतात. जसं की, गर्दीच्या ठिकाणी किंवा एखाद्या समारंभात गेल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू शकतं. तिथल्या वातावरणाने ते विचलित होतील. पण अत्याधिक संवेदनशील व्यक्ती या सामाजिक उत्तेजनेसोबतच अत्याधिक प्रकाश, आवाज, गोंधळ अशा गोष्टींनीही विचलित होऊ शकतात.

संवेदन विकार : काही लोकांमध्ये संवेदन विकार असतो ज्याला SPD म्हंटले जाते. अशा व्यक्तीमध्ये संवेदनांवर नीट प्रक्रिया करता येत नसल्याने संवेदनांना प्रतिसाद देताना ते गोंधळलेले दिसतात. शिवाय, त्यांची ही प्रतिक्रियाही अगदी संथ आणि सावकाश असते. याउलट अत्याधिक संवदेनशील व्यक्तींची प्रतिक्रिया ही अधिक उत्स्फूर्त आणि अत्याधिक उत्साहपूर्ण असते.

ऑटिझम – अत्याधिक संवेदनशीलता आणि ऑटिझम यातही खूप फरक आहे. अत्याधिक संवेदनशील व्यक्ती या अधिक उत्साही आणि उत्स्फूर्त असतात. तर ऑटिझम असणाऱ्या व्यक्ती या अतिउत्साही किंवा गतीमंद असे दोन्ही असू शकतात.

एडीएचडी – अत्याधिक संवेदनशीलता आणि एडीएचडी या दोन्ही मध्येही गफलत होऊ शकते. दोन्ही प्रकारच्या व्यक्तीमध्ये अति उत्साह आणि उत्स्फुर्तपणा दिसून येत असला तरी, एडीएचडीमध्ये वर्तन विकार दिसून येतात. अशा व्यक्ती लक्ष एकाग्र करू शकत नाहीत. फार काळ स्थिर राहू शकत नाहीत. अत्याधिक संवेदनशीलता असणाऱ्या व्यक्तीमध्ये अशा समस्या आढळत नाहीत.

अत्याधिक संवेदनशील असण्याचे काही फायदे आहेत तसे तोटेही आहेत. छोट्यातल्या छोट्या गोष्टीही यांना खूप आनंद देऊन जातात. अगदी एखादं सुंदर फुल, गार वाऱ्याची झुळूक, एखाद्या व्यक्तीचं स्मित, अशा गोष्टींमुळे यांचा मूड बदलून जातो. यांच्याकडे काही नसले तरी ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल या सदैव कृतज्ञ असतात. साधं रुचकर जेवण मिळाल्याबद्दल, चहा घेतल्याबद्दल, अशा बारीकसारीक गोष्टींनीही या कृतकृत होतात. एखाद्या व्यक्तीशी नाते जोडतानाही या खूप भावूक असतात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे सहानुभूती पूर्वक ऐकून घेतात. त्याच्या दु:खाशी समरसून जातात. त्यांच्या भावनांची तीव्रता जाणू शकतात.

पण, याच गोष्टी यांच्यासाठी नुकसानकारकही ठरतात. परंतु अत्याधिक संवेदनशील व्यक्ती म्हणून स्वतःकडील या क्षमतेचा योग्य वापर करण्याची कला आत्मसात केल्यास तुम्ही पूर्ण आनंदी आणि समाधानी आयुष्य जगू शकता. यासाठी काही गोष्टींवर जाणीवपूर्वक काम करावे लागेल. तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या, सहन न होणार्‍या गोष्टींपासून, व्यक्तींपासून, घटनांपासून शक्य तितके दूर राहा. आयुष्याकडे किंवा घटनांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन अवलंबण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अस्वस्थ करतील असे सिनेमे, कथा कादंबऱ्यांपासून दूर राहा.

तुमच्यावर दबाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा. इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट करू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना वेळेवर नकार द्यायला शिका आणि त्यांच्यापासून अंतर राखायला शिका.

घरातील वातावरण अधिक शांत आणि प्रसन्न राहील, तुम्हाला पुरेशी विश्रांती घेता येईल याची काळजी घ्या.

अत्याधिक संवेदनशील व्यक्तींना प्रत्येक गोष्ट अधिक खोलवर जाणवते. त्यांच्या भावना मग त्या सकारात्मक असोत किंवा नकारात्मक अधिक तीव्र असतात. याचा अनेकदा तुमच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमचे नातेसंबंध, करिअर यावरही परीणाम जाणवतो.

स्वतःची नीट ओळख करून घेतलीत आणि स्वतःला अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केलात तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या अडचणी कमी होतील. याचा अर्थ सतत स्वतःला रोखून धरा असं नाही. आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचे किंवा त्यांना योग्य पद्धतीने हाताळण्याचे तंत्र आत्मसात केल्यास नक्कीच तुम्ही नक्कीच आनंदी आणि सुखी व्हाल.

 

 

 

 

 

 

Post a Comment

5 Comments

Anonymous said…
अत्यंत महत्त्वाचा भाग तुम्ही छान
Anonymous said…
खूप छान लेख आहे
Anonymous said…
खूप छान लेख आहे. ह्या लेखातून चांगली माहिती मिळाली. धन्यवाद
Anonymous said…
उत्कृष्ट लेखन आणि चांगली माहिती....