जाणून घेऊया मेडिटेशनबाबतचे समज आणि गैरसमज !



मेडिटेशन कसे करावे? आपण योग्य पद्धतीने मेडीटेशन करतो की नाही? मेडिटेशन करताना विशिष्ट अनुभव आलेच पाहिजेत का? मेडिटेशन सुरू केल्यानंतर लोकांना असे अनेक प्रश्न छळत असतात. विशेषत: मेडिटेशन योग्य पद्धतीने होते की नाही हे कसे ओळखायचे, या बाबतीत लोकांच्या मनात बराच संभ्रम असतो. 
मेडिटेशनचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ताणताणाव हाताळण्यासाठी, कठीण प्रसंगात मन स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी, मनातील गोंधळ टाळण्यासाठी, एखाद्या शारीरिक व्याधीशी झुंजत असताना आणि भावनिक समतोल राखण्यासाठी याचा फायदा होतो. 
परंतु यासोबत अनेक गैरसमज जोडले गेले आहेत ज्यामुळे सामान्य व्यक्तीच्या मनात मेडिटेशन बद्दल एक गूढ आकर्षण तर वाटतेच पण ही गोष्ट आपल्या आवाक्यातील नाही असेही वाटते. 

तुम्हाला मेडिटेशन करण्याची भीती वाटत असेल, कंटाळा येत असेल किंवा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मेडीटेशन करता येत नाही असे वाटत असले तरी तुम्ही मेडिटेशन करत राहा. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, असे म्हटले आहेच. जेव्हा तुम्ही नियमितपणे मेडिटेशन करत राहाल. तेव्हा त्याचे फायदे तुम्हाला जाणवू लागतील. मेडिटेशन करत राहिल्याने त्याबद्दलचे गैरसमज देखील दूर होतील. 
मेडीटेशनबद्दलच्या काही चुकीच्या समजुतीमुळे मेडिटेशन म्हणजे आवाक्याबाहेरची गोष्ट आहे असे अनेकांना वाटते. या गैरसमजुती कुठल्या आहेत ते बघू आणि त्या कशा चुकीच्या आहेत हेदेखील या लेखातून आपण जाणून घेऊ. 
१) मनातून विचार नाहीसे झाले पाहिजेत –
मेडिटेशनला बसल्यानंतर तुमच्या मनातील विचार पूर्णतः थांबले पाहिजेत. विचारशून्य अवस्था अनुभवता आली पाहिजे, असा एक दृढ गैरसमज दिसून येतो. पण आपल्या मनातील विचारचक्र कधीच थांबत नाही. मनातील विचार थांबणार नाहीत पण त्या विचारांमुळे निर्माण होणाऱ्या भावनांचे तटस्थ निरीक्षण करता येते. मनात येणाऱ्या विचारांपासून अलिप्तता अनुभवता आली तरी, तुमचे मेडिटेशन चांगल्या पद्धतीने सुरू आहे हे लक्षात घ्या. 

मेडिटेशन करताना मनात एखादा विचार आला तर त्यासोबत वाहवत न जाता अलिप्तपणे त्या विचाराकडे पाहता आले तरी तुमच्या मेडिटेशनचा उद्देश सफल झाला असे समजा. विचार शून्य अवस्था अनुभवण्यासाठी अस्वस्थ होण्याची गरज नाही. विचार आले तरी त्यापासून अलिप्तता, तटस्थता अनुभवणे, विचार आणि भावना यात वाहवत न जाणे, हा मेडिटेशनचा मुख्य उद्देश आहे.

२) मेडिटेशन केल्यानंतर मन शांत झाले पाहिजे –
प्रत्येकवेळी मेडिटेशन केल्यानंतर मन शांत होईलच असे नाही. विशेषत: तुम्ही जर एखाद्या तणावपूर्ण स्थितीतून जात असाल तर मेडिटेशन केल्यानंतर तुमचा तणाव थोडासा हलका होईल पण, तो पूर्णतः निघून जाईल असे नाही. मेडिटेशननंतर तुमचे मन पूर्ण शांत किंवा हलके झाले नाही तरी थोडा फार तणाव तरी नक्की निवळेल. 

मेडिटेशनमुळे तुम्हाला मन पूर्ण शांत झाल्याचा अनुभव आलाच तर ठीकच पण, जरी तसा अनुभव नाही आला तरी काही हरकत नाही. याचा अर्थ तुमची मेडिटेशनची पद्धत चुकीची आहे असे होत नाही. 

कधी कधी एखाद्याचा उत्साह वाढतो. कुणाला आतून शांत वाटते. मेडिटेशनमुळे तुम्हाला दोन्ही पैकी कोणताही एक अनुभव येऊ शकतो. जो काही अनुभव तुम्हाला येईल त्याचा स्वीकार करा. 

३) तुम्ही Meditation साठी खूप वेळ बसले पाहिजे – 
मेडिटेशनसाठी तुम्ही १० मिनिटे ते पुढे कितीही वेळ बसू शकता. अर्धा तास/एक तास वेळ काढलाच पाहिजे तेव्हाच मेडिटेशनचा फायदा होतो हा गैरसमज आहे. तुम्ही अगदी काही मिनिट जरी श्वासोच्छवासाची गती आणि लय बदलून त्यावर लक्ष केंद्रित केले तरी पुरेसे आहे. 
मेडिटेशनची निश्चित वेळ समजून घेण्यासाठी तुम्ही एखाद्या अॅपचा किंवा टायमरचा वापर करू शकता. ज्यावरून तुम्ही किती वेळ बसला किंवा तुमच्या वेळेत काही वाढ झाली का? हे पाहता येईल. एकूणच दिवसातील अगदी काही मिनिटांचा वेळ जरी तुम्ही मेडिटेशनसाठी दिला तरी हरकत नाही. त्यासाठी खूप वेळ दिला पाहिजे असे काही नाही. 

४) मेडिटेशनमुळे तुम्ही निष्क्रिय होता –
मेडिटेशन केल्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही आहे तशी स्वीकारण्याची सवय लागते. ज्यामुळे तुम्ही आयुष्यात कोणताही बदल करू इच्छित नाही. समस्या सोडवण्यापेक्षा त्यासोबत तडजोड करण्याची वृत्ती वाढते. मेडिटेशन तुम्हाला निष्क्रिय बनवते. मेडिटेशनबाबत असेही काही गैरसमज आहेत. 


 मेडिटेशनमुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रसंग, घटना, परिस्थिती यांकडे अलिप्तपणे पाहून त्याबाबत तटस्थ अनुमान लावू शकता. याचा अर्थ तुम्ही आयुष्याबाबत बेफिकीर होता असे होत नाही. उलट तटस्थपणे मूल्यमापन करण्याच्या सवयीमुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्यांवर वस्तुनिष्ठ पद्धतीने उत्तरे मिळवू शकता. तुमचे निर्णय घेताना भावनिक न होता परिस्थितीचा साकल्याने आणि व्यावहारिक दृष्टीने विचार करून समाधान शोधू शकता. यामुळे तुमचे काही नुकसान न होता, तुमच्या प्रश्नांची व्यावहारिक उत्तरे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरतील. 

आयुष्यातील प्रसंगांना, घटनांना प्रतिसाद देताना तुम्ही भावनिक न होता अधिक वस्तुनिष्ठ दृष्टीकोन स्वीकाराल. यामुळे तुमच्या आयुष्यात निर्माण होणारे गोंधळ कमी होतील. 

५) समस्या निर्माण झाल्या याचा अर्थ तुम्ही मेडिटेशन करत नाही –
जे लोक Meditation करतात त्यांच्या आयुष्यात भावनिक समस्या आल्याक नाही पाहिजे. अशा लोकांना मानसिक त्रास होतच नाहीत. असे समज खूप चुकीचे आहेत. मेडिटेशन करूनही जर कधी तुम्ही अस्वस्थ झालात, तणाव जाणवला याचा अर्थ तुमचे मेडिटेशन चुकते असा होत नाही. 

काही लोकांसाठी काहीही न करता बसून राहणे शक्य नसते. यामुळे त्यांचा तणाव अधिक वाढतो. काही लोकांना स्वतःच्या विचारांकडे तटस्थ दृष्टीने पाहणे शक्य होत नाही, अशावेळी ते अस्वस्थ होऊ शकतात. पण याचा अर्थ त्यांची मेडिटेशन करण्याची पद्धत चुकीची आहे, त्यांना मेडिटेशन जमतच नाही असा अर्थ होऊ शकत नाही. 

कधी मेडिटेशन करताना लक्ष एकाग्र होईल कधी नाही. कधी शांत वाटेल कधी नाही वाटणार. याचा अर्थ मेडिटेशन करण्यात काही अर्थच नाही मेडिटेशन करून काही फायदा होत नाही, असे नाही. कधी कधी तुमची एकाग्र नाही झालात, शांत नाही झालात याचा अर्थ तुम्ही मेडिटेशन सोडून दिले पाहिजे असा होत नाही. 

कधी ना कधी तुम्हाला हे कौशल्य नक्की जमेल आणि नाही जमले तरी त्याने काही फरक पडत नाही. 

६) मेडिटेशन करताना झोप येता कामा नये –
अनेकांना मेडिटेशन करताना झोप लागते. याचा अर्थ मेडिटेशन चुकले असा होत नाही. तुम्हाला झोप तेव्हा लागते जेव्हा तुमचे शरीर आणि मन पूर्णतः रीलॅक्स होते. ज्यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते. हे पूर्णतः नैसर्गिक आहे यात चुकीचे काही नाही. मेडिटेशन करताना झोप येते याचा अर्थ मेडिटेशन होत नाही, असा नाही. झोप येत असेल तर चांगलेच आहे. उलट तुमच्या झोपेच्या वेळेत तुम्ही मेडिटेशन केले तर तुमच्या झोपेची क्वालिटी सुधारण्यास याची मदत होईल. 

ज्यांना अतिविचार केल्याने झोप लागत नाही किंवा झोपच लागत नाही. झोप लागली तरी सारखी जाग येते, अशा लोकांसाठी ही एक चांगली थेरपी आहे. उलट ज्यांना मेडिटेशन करताना झोप येते अशा लोकांनी झोपेच्या वेळेत मेडिटेशन केले तर त्याचा अधिक चांगला फायदा होऊ शकतो.  

७) मेडिटेशन म्हणजे एक थेरपी आहे –
मेडिटेशन म्हणजे थेरपी नाही. थेरपी सारखाच याचा फायदा होत असला तरी थेरपीपेक्षा मेडिटेशन पूर्णतः वेगळे आहे. थेरपीमध्ये तुमच्या भावनिक समस्यांवर काम केले जाते आणि यासाठी तुम्हाला एका तज्ज्ञाची मदत घ्यावी लागते. मेडिटेशन तुम्ही तुमच्या पातळीवर करू शकता. यासाठी दुसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागत नाही. परंतु, मेडिटेशन करणाऱ्या व्यक्तीला थेरपीची गरज नसते असे म्हणू शकत नाही. मेडिटेशन करत असाल आणि जर तुमच्या कौन्सिलरने तुम्हाला थेरपी सजेस्ट केली असेल तरी तुम्ही थेरपी घ्यायला हवी. थेरपी आणि मेडिटेशन दोन्ही केल्याने कदाचित तुम्हाला लवकर आणि प्रभावी परिणाम मिळू शकतात. 

मेडिटेशनमध्ये तुम्ही स्वतः स्वतःचे परीक्षण करू शकता. परंतु मेडिटेशन थेरपीला पर्याय ठरू शकत नाही. मेडिटेशन आणि थेरपी एकमेकांना पूरक ठरू शकतात. मेडिटेशन करत असताना तुमच्या थेरपीचा तुमच्यावर किती परिणाम होतो याचे मुल्यमापन करू शकता. पण दोन्ही मध्ये निश्चितच फरक आहे. 
अमुक एक गोष्ट जमली तरच मेडिटेशन जमले असे नाही. जरी काही गोष्टी जमत नाहीत असे वाटले किंवा मेडिटेशनचा अपेक्षित परिणाम मिळत नाही असे वाटले तरी तुम्ही मेडिटेशन थांबवू नका. इतरांना फायदा होतो मग मला काही नाही अशी तुलना करून अस्वस्थ होऊ नका. स्वतःला मागे खेचू नका. 

व्यक्तीच्या मानसिक क्षमतेनुसार प्रत्येकाला जाणवणारे परिणाम वेगवेगळे असू शकतात, हे लक्षात घ्या. 

Post a Comment

1 Comments

Anonymous said…
खूप उपयुक्त लेख