मोहित करहानाला संशोधनासाठी मिळणार पावणे दोन कोटीची फेलोशिप! (Mohit karhana)

लहरों से डरकर नौका पार नहीं होती,

कोशिश करने वालों की कभी हर नहीं होती|

प्रयत्न करत राहणाऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळतेच. याचे ताजे उदाहरण म्हणजे हरयाणाचा मोहित करहाना! २२ वर्षाच्या मोहित करहानाला (Mohit Karhana) अमेरिकेच्या केंटुकी युनिव्हर्सिटीकडून (University of Kentucky) पीएचडी साठी पावणे दोन कोटीची स्कॉलरशिप जाहीर झाली आहे.

indiatimes.com


हरियाणा राज्यातील गुरूग्राम जिल्ह्यातील गुलाखुवास गावापासून मोहितचा प्रवास सुरू झाला. शालेय जीवनापासूनच मोहित अभ्यासात हुशार होता. त्याची आई बबिता करहाना यांनी नेहमीच आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्या स्वतः देखील सरकारी सेवेत कार्यरत आहेत.

मोहितची आई बबिता यांना लग्नानंतर उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य झाले नाही. लग्नानंतर काही वर्षानी त्यांच्या पतीचा गंभीर अपघात झाला ज्यामुळे सुमारे दीड वर्षे तरी त्यांना आयसीयूत ठेवावे लागले होते. अशा सर्व खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण अतिशय चांगल्याप्रकारे पूर्ण केले. त्यांची मुलगी अंजली चंडीगड विद्यापीठातून बीटेक करत आहे. मोहित दिल्लीतून नीट परीक्षेची तयारी करत होता. बबिता यांना यावर्षी हरियाणा विद्यापीठाच्या वतीने मदर्स डे निमित्ताने दिला जाणारा मदर्स प्राईड अॅवॉर्ड देखील मिळाला आहे.

 

Twitter.com

आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय मोहितने आपली आई बबिता आणि वडील सतीश यांनाच दिले. त्याच्या मते यशात तर सगळेच सहभागी होतात पण माझ्या अपयशातही माझे आई-वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शिवाय,लहानपणापासून शिक्षकांनीही माझ्यावर खूप प्रेम केले आणि माझ्याकडून कसून तयारी करवून घेतली म्हणूनच मी आज हे यश पाहू शकलो. डॉ. विनोद मलिक आणि डॉ.सुरेंद्र सिन्हा यांचे त्याने विशेष ऋण व्यक्त केले. मलिक यांच्या अचूक मार्गदर्शनामुळेच मला माझे यश प्राप्त करणे शक्य झाले असे मोहित म्हणतो. तर डॉ सुरेंद्र यांनी मला नवनव्या तंत्रांची ओळख करवून दिली ज्याशिवाय मी आज इथवर पोचलो नसतो. या दोन्ही गुरुवर्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा मला खूप फायदा झाला असे मोहित सांगतो.

फक्त अभ्यासच नाही तर मोहित माउंटनिंग, क्विझ कॉम्पिटीशन आणि एन. एस.एस.मध्येही सक्रीय सहभाग होता. अनेक स्पर्धेत त्याने यश मिळवले आहे. जीआरइ परीक्षेतही त्याने ३४० पैकी ३११ गुण मिळवल होते. मोहितला संशोधन क्षेत्रात विशेष रस आहे. केंटुकी विद्यापीठात डॉ. प्रदीप कचरू यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्लांट पॅथोलॉजीमध्ये संशोधन करणार आहे. दरमहा एक लाख सत्तर हजार रुपयांच्या स्कॉलरशिप सोबत त्याला फ्री ट्युशन आणि स्टुडंट स्वास्थ्य विमा देखील मिळणार आहे.

CMO Hariyana यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून मोहितचे अभिनंदन केले आहे. 

बौद्धिक क्षेत्रात भारतीय विद्यार्थी दररोज नवनवीन मानांकन स्थापन करून आपल्या देशाचे नाव अधिकाधिक उंचावत आहेत. ही खरोखर आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. मोहितचे हे यश भारताच्या खेड्यापाड्यात राहूनही उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.


मेघश्री श्रेष्ठी 

 

Post a Comment

0 Comments