विज्ञान आणि ‌तंत्रज्ञान क्षेत्रात अमुल्य योगदान देणाऱ्या डॉ कमल रणदिवे



आज विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही भारतीय महिला उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. विज्ञान आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात भारतीय महिलांची वाट सुकर व्हावी म्हणून इतिहासात काही महिलांनी आपले योगदान दिले आहे आणि त्यातीलच एक नाव म्हणजे डॉ कमल रणदिवे. आज त्यांची १०४वी जयंती आहे आणि त्यांच्या या शतकोत्तर जयंती दिनाचे औचित्य साधून गुगलने आजचे डूडल त्यांना समर्पित केले आहे. डॉ कमल रणदिवे यांनी स्तनाच्या कॅन्सर संदर्भात महत्वपूर्ण संशोधन केले. त्यांच्या या संशोधन कार्यासाठी त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्याकाळी विज्ञान क्षेत्रात महिलांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी होती. विज्ञान क्षेत्रात महिलांनाही वाव मिळावा म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन भारतीय महिला वैज्ञानिक संघ स्थापन केला. या संस्थेच्या त्या संस्थापक सदस्य होत्या. विज्ञान आणि शिक्षण यांच्या सहाय्याने समाजात समानता प्रस्थापित केली जाऊ शकते असे त्यांचे मत होते, याच उद्देशाने त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात काम केले. या संस्थेतर्फे खास महिलांसाठी ११ कॉलेजस चालवले जातात आणि  महिलांना संशोधन कार्यात प्रोत्साहन देण्यासाठी महिला संशोधकांना विशेष शिष्यवृत्ती दिली जाते.

१९४९ साली त्या भारतीय कॅन्सर संशोधन केंद्रात एक संशोधक म्हणून रूजू झाल्या. याच काळात त्यांनी पेशी विज्ञानात डॉक्टरेट मिळवली. जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून फेलोशिपवर संशोधन पूर्ण केले. तेथील शिक्षण संपल्यानंतर त्या मुंबईतील आयसीआरसीमध्ये (भारतीय कर्करोग संशोधन केंद्र) परतल्या. इथे काम करता करताच त्यांनी देशातील पहिल्या टिश्यू कल्चर प्रयोगशाळेची स्थापना केली. कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या विविध जीवाणूंचाही त्यांनी शोध लावला.

कॅन्सर आणि अनुवांशिकता यांच्यातील संबंधही सर्वात आधी त्यांनीच दाखवून दिला. त्यानंतर आजवर झालेल्या अनेक संशोधनातून कॅन्सर आणि अनुवांशिकता यांच्यातील संबंध सिद्ध झाले आहेत. फक्त कॅन्सरच नाही तर कुष्ठरोगास कारणीभूत ठरणाऱ्या मायको बॅक्टेरियमवरही त्यांनी संशोधन केले आणि कुष्ठरोगासारख्या गंभीर आजारावर लास शोधण्यातही योगदान दिले.

परदेशात राहून संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांनी भरतात येऊन आपल्या ज्ञानाचा वापर भारताच्या उन्नतीसाठी करावा यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. १९८९ साली आयसीआरसी मधून निवृत्त झाल्यांनतर त्यांनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात जाऊन, विशेषत: खेड्यातील महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सर विषयी जागृती आणण्याचे काम केले.

 

कमल रणदिवे यांचे मूळ नाव कमल समर्थ असे होते. लग्नानंतर त्या कमल रणदिवे या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांचे वडील पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात जीवशास्त्राचे प्राध्यापक होते. कमल यांनी चांगले शिक्षण घेऊन विज्ञान क्षेत्रात देशके नाव उज्वल करावे असे त्यांच्या वडिलांचे पहिल्यापासून स्वप्न होते. आपल्या वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यात कमल यशस्वी ठरल्या. १९१७ साली पुण्यातच त्यांचा जन्म झाला. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे सुरुवातीपासूनच त्यांची शैक्षणिक कारकीर्द अतिशय उज्वल राहिली. नवनवीन गोष्टी शिकणे आणि त्यात प्राविण्य मिळवण्याचा त्यांना छंदच लागला होता. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनीही जीवशास्त्राच पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

पेशिविज्ञान विषयात पी.एचडी मिळवल्यानंतर पीएचडीनंतरच्या संशोधनासाठी त्यांनी कॅन्सर हा विषय निवडला. आज भारतात दर दहा व्यक्तीमागे एक व्यक्ती कॅन्सरग्रस्त आहे. अशा काळात डॉ. कमल रणदिवे यांचे योगदान खूपच महत्त्वपूर्ण ठरते. कॅन्सर आणि कुष्ठरोग या दोन्ही दुर्धर आजारावर त्यांनी सुमारे २०० शोधनिबंध सदर केले आहेत.

१९६४ साली त्यांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने दिला जाणारा पहिला सिल्वर जुबली रिसर्च अॅवॉर्ड मिळाला होता.

११ एप्रिल २००१ रोजी वयाच्या ८३व्या वर्षी त्यांचे  निधन झाले.

 

गुगलने बनवलेल्या डुडलमध्ये त्या सूक्ष्मदर्शिकेतून निरीक्षण करताना दिसत आहेत. हे डुडल भारतीय आर्टिस्ट इब्राहीम रायतीकांत यांनी बनवले आहे. हे डुडल बनवण्याची प्रेरणा इब्राहीम यांना कुठून मिळाली असे विचारले असता ते म्हणाले, “काही कारणांनी मला त्यांच्या आयुष्याचा आणि त्यांनी विज्ञान क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. एक व्यक्ती म्हणूनही त्यांना जाणून घेतल्यानंतर त्यांनी माझ्यावर जी छाप सोडली ती माणूस म्हणून मला समृद्ध करणारी आहे. म्हणूनच मी हे डुडल बनवले.”

 

कुष्ठरोग आणि कॅन्सर अशाद दुर्धर आजाराबाबत समाजात अजूनही पुरेशी जागृती आलेली नाही. अशा काळात डॉ. कमल रणदिवे यांचे काम आपल्यासाठी एक मोठा आधारस्तंभ ठरते आहे, त्या निमित्ताने त्यांच्याबद्दल आपले ऋण व्यक्त करणे आणि त्यांनी आधीच या क्षेत्रात जे काही भरीव कामगिरी केली आहे त्याची उजळणी करणे आणि दाखल घेणे महत्वाचे आहे.

 

Post a Comment

0 Comments