स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी आणि शांती मिळवण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटेही वेळ नाही का?

कृतज्ञता ही सर्व सकारात्मक भावनांची जननी आहे, असं म्हटलं जातं. बुद्ध म्हणतात, तुमचा प्रत्येक दिवस कृतज्ञतेने सुरु करा. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणत असे की मला माझे आयुष्य सुखकरपणे जगता यावे म्हणून ज्या-ज्या लोकांची मदत होते त्या सर्वांप्रती मी दिवसातून शंभर वेळा कृतज्ञता  व्यक्त करतो. गोतम बुद्धापासून ते अगदी दलाई लामा यांच्यापर्यंत अनेकांनी कृतज्ञतेचे महत्त्व पटवून दिले आहे आणि ते आचरणातही आणले आहे. या सगळ्या महान लोकांच्या महानतेचे रहस्यच हे होते की ते कृतज्ञ होते.

 


तुम्हीही जर स्वतःला ही सवय लावून घेतली तर याचे असंख्य फायदे तुमच्या आयुष्यात उतरू लागतील. रोजच्या आयुष्यात कृतज्ञ राहण्याची सवय लावून घ्यायची असेल तर सुरुवातीला तरी तुम्ही कृतज्ञता लेखन केले पाहिजे. कृतज्ञता व्यक्त केल्याने नेमके काय फायदे होतात जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

 

कृतज्ञता लेखन किना कृतज्ञता जर्नल लिहिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सकारात्मक राहता येते आणि आपल्यातील सकारात्मकता वाढीस लागते. तुम्ही कोणकोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहात हे जेव्हा तुम्ही लिहून काढता तेव्हा जीवनाबद्दल आणि जीवनातील सद्य परिस्थितीबद्दलही तुमच्या मनात आशावाद निर्माण होतो. ही सकारात्मकता हळूहळू तुमच्या आतपर्यंत झिरपत जाते. कितीही गंभीर प्रसंग ओढवला तरी त्याने तुमचे चित्त डळमळीत होत नाही तर त्यातून शांतपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करता. मग अशी सकारात्मक व्यक्ति होण्याची इच्छा असेल तर कृतज्ञता जर्नल लिहायला सुरुवात करा. मी जेव्हा स्वतः कृतज्ञता लेखन करायला सुरुवात केली तेव्हा मला हे जाणवलं की परिस्थितीचा जितका बाऊ आपण करतो आहोत तितकी काही परिस्थिती बिकट नाहीये. याही काळात आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडत आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आणि आशावादी झाला. हे मानसिक परिवर्तन करण्याचे सामर्थ्य मला कृतज्ञतेनेच दिले.

 

दररोज घडणाऱ्या चांगल्या गोष्टी किंवा तुम्ही साध्य केलेली एखादी गोष्ट, एखाद्या दिवसात एखादे विशिष्ट काम पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी झालात, तुमची ऑफिसमधील मिटिंग यशस्वी झाली, तुमचा पगारवाढ झाला, किंवा नेहमीपेक्षा एखादा दिवस जास्तच आनंदात गेला, अशा छोट्या छोट्या गोष्टींची जेव्हा तुम्ही नोंद ठेवू लागता तेव्हा तुमच्या मनातील स्वप्रतिमा देखील उजळायला लागते. दिवसभारत तुमच्या हातून ठरवलेल्या कोणकोणत्या गोष्टी पूर्ण झाल्या याबद्दल जरी तुम्ही जर्नलमध्ये लिहून ठेवलंत तरी रोजची प्रगती पाहून तुम्हाला स्वतःलाच तुमचा अभिमान वाटेल.

 

अशा छोट्या छोट्या गोष्टींची जेव्हा मी झोपण्यापूर्वी आवर्जून दखल घेऊन आभार व्यक्त करते तेव्हा अपोआपच गेलेल्या दिवसाबद्दल माझ्या मनात एक सकारात्मक आणि समाधानाची भावना असते. आजचा दिवस चांगला गेला, ही भावना आतून खूप म्हणजे खूप आनंद देते. अशाप्रकारे रोजच्या दिवसातील आनंदी क्षणांची आणि माझ्या प्रगतीची मी दखल घेत असल्याने माझा रोजचाच दिवस आनंदी होत आहे.

ज्या दिवशी मला कृतज्ञता जर्नल लिहायला जमत नाही त्या दवशी किमान मी मनातल्या मनात तरी दिवसभरतील चांगल्या घटनांची मनातल्या मनात उजळणी करते आणि यासगळ्या चांगल्या घटना मला अनुभवायला मिळाल्या या बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते.

 

रोज रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर निवांत आणि शांत झोप लागते. कारण, आपण समाधानाच्या भावना सोबत घेऊन झोपी जातो. जे विचार झोपताना मनात रेंगाळत असतात तेच विचार आपल्या अंतर्मनात पोहोचतात. म्हणून झोपण्यापूर्वी तरी आवर्जून चांगला आणि सकारात्मक विचार करावा. कृतज्ञतेहून चांगला आणि सकारात्मक विचार दुसरा कोणताच नसेल असे माझे मत आहे.

 

आपल्याला सतत कसली तरी रुखरुख जाणवते. ही रुखरुख म्हणजे असमाधानाची भावना म्हणजे आपण फक्त आपल्याकडे हे नाही ते नाही याचीच उजळणी करतो आणि स्वतःला असमाधानी करतो. याउलट आपल्याकडे कितीतरी गोष्टी आहेत, यातील कित्येक गोष्टी मिळवण्यासाठी कित्येक लोकं अजूनही धडपडताहेत. मग आपल्याला ती गोष्ट मिळाली आहे तर त्याबद्दल कृतज्ञ राहायला नको का? गोष्ट म्हणजे वस्तूच नव्हे तर कदाचित तुमच्या आयुष्यातील, तुमच्या नात्यातील एखादी व्यक्ति, एखादी घटना किंव एखादा प्रसंग देखील असू शकतो ज्यामुळे तुमच्या आयुष्याला, विचारांना एक कलाटणी मिळाली.

 

कृतज्ञता व्यक्त केल्याने आपला मनावरील ताण कमी होतो. हे तर होणारच कारण आपण सकारात्मक होऊ लागतो आणि आपल्या मनातील नकारात्मक विचार आपसूक नाहीसे होऊ लागतात, त्याजागी सकारात्मक विचारांची पेरणी होऊ लागते. ज्याच्याकडे समाधान आणि कृतकृत्य झाल्याची भावना आहे, त्याला ताण येईलच कसा सांगा. आपले मना स्थिर आणि कणखर होऊ लागते. त्यामुळे कुठल्याही प्रसंगात अतितणाव जाणवत नाही.

 

हे सगळे फायदे तुम्हालाही फुकटात मिळवायचे असतील तर आजपासूनच कृतज्ञता जर्नल लिहायला लागा. यासाठी फार वेळ नाही फक्त दहा मिनिटे खर्च होतील आणि स्वतःच्या सुखासाठी, आनंदासाठी दहा मिनिटे म्हणजे काहीच नाही.

 

सोशल मिडीयावर तासनतास वेळ घालवून मनस्ताप विकत घेण्यापेक्षा कृतज्ञता जर्नल लिहून समाधान, शांतता आणि आनंद मिळवणे फायद्याचेच ठरेल.

 

 

 

Post a Comment

0 Comments