पुनीत काळाच्या पडद्यावर ठसा उमटवणारा 'रिअल हिरो'!
काल
दुपारी ती बातमी धडकली आणि धक्काच बसला. अवघ्या ४६ व्या वर्षी कन्नड पॉवर स्टार
पुनीत राजकुमार याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू. पहिल्यांदा कू मराठी अॅपवर
जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा विश्वासच बसला नाही. अशीच अफवा असेल असे समजून त्याकडे
दुर्लक्ष केले. पण, नंतर विवध न्यूज चॅनेल्सवरूनही जेव्हा ही बातमी प्रसारित होऊ
लागली तेव्हा मात्र मन सुन्न झाले. पुनीथ राजकुमारच्या जाण्याने संपूर्ण कन्नड
चित्रपट सृष्टी दु:खाच्या खाईत लोटली गेली आहे. त्याच्या अशा अवचित जाण्याच्या
बातमीने त्याच्या दोन चाहत्यांचाही हृद्यविकाराने मृत्यू झाला आहे तर एका
चाहत्याने आत्महत्या ऐकल्याचे समजते. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या
चाहत्यांनाही ही बातमी पचवणे खूप अवघड गेले असणार. फिटनेस, अॅक्टिव्हनेस आणि दानशूरता यासाठी ओळखला जाणारा पुनीत असा जाऊ शकतो हेच मुळी
अविश्वसनीय! मरणानंतरही तो आपले दोन्ही डोळे मागे ठेवून जातोय. ( त्याचे वडील, सुपरस्टार
डॉ. राजकुमार यांनीच १९९४ सालीच आपल्या कुटुंबातील सर्वांनीच नेत्रदान करावे अशी तरतूद केली आहे.)
एक
कलाकार म्हणून तर तो ग्रेट होताच पण माणूस म्हणूनही तो खूपच ग्रेट होता.
काही
दिवसापूर्वी त्याला पाठीच्या स्नायू दुखीचा त्रास सुरु झाला होता. त्याच्या
डॉक्टरांनी त्याला अतिहालचाल करण्यास मनाई केली होती. चित्रपट करतानाही फार
त्रासदायक स्टेप्स असतील असे डान्स करण्यास नकार दे, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला
होता. पण, एकदा का मी चित्रपट स्वीकारला की त्यातील कोणत्याच गोष्टीना नकार देऊ शकत
नाही, से म्हणून त्याने डॉक्टरांचा सल्ला फरसा मनावर घेतला
नाही. डॉक्टरांचे थोडे ऐकले असते तर कदाचित ही वेळ आलीच नसती की काय असेही वाटते.
शेवटी काळ आणि वेळ कोणालाच चुकलेली नाही हेच खरे!
पुनीतची
स्क्रीन आणि कॅमेऱ्याशी ओळख झाली ती अवघ्या सहा महिन्यांचा असताना.
१९७६ साली डॉ. राजकुमार यांचा ‘प्रेमदा कानिके’ नावाचा एक चित्रपट
आला होता जो सुपर-डुपर हिट ठरला. या चित्रपटात पहिल्यांदा त्याने आपल्या
वडिलांसोबत स्क्रीन शेअर केली होती. तेव्हापासून पुनीत राजकुमारचा एक कलाकार म्हणून
सुरु झालेला प्रवास अनेक दिशांनी विस्तारत गेला. तो अभिनेता होता, गायक होता, अँकर आणि दिग्दर्शकही होता.
पुनीतचे मूळ नाव लोहित होते. मुख्य अभिनेता म्हणून त्याने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले ते
पुनीत या नावाने.
तब्बल
१६ चित्रपटातून त्याने चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम केले. त्याची ‘बेटद हुव्वू’ या चित्रपटातील भूमिकेसाठी १९८५ साली उत्तम बालकलाकारासाठी दिला जाणारा
राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. शिवाय त्याच्या ‘चलीसवू मोडगळु’ आणि ‘येर्डू नक्षत्रगळु’ या दोन चित्रपटांसाठी
त्याला राज्य पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतरही अनेक पुरस्कार आणि मानसन्मान
त्याला मिळत राहिले. फक्त पुरस्कारच नाही तर रसिक प्रेक्षकांच्या हृदयावरही त्याने
हक्काने राज्य केले.
लहानपणापासुनच
अभिनय आणि संगीताचे धडे गिरवणाऱ्या पुनीतला औपचारिक शालेय शिक्षण मात्र घेता आले
नाही.
भरभरून
यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळूनही आपल्या समाजाबद्दलच्या उत्तरदायित्वाचा त्याला
कधी विसर पडला नाही. वेळोवेळी वेगवेगळ्या कारणासाठी त्याने सढळ हाताने मदत करून त्याने
आपली सामाजिक जबाबदारीही तितक्याच समर्थपणे निभावली. या जागतिक महामारीच्या काळात
त्याने कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता
निधीमध्ये ५० लाख रुपयांचा निधी दिला होता. २०१९ साली उत्तर कर्नाटकात मह्पुराने
थैमान घातले होते तेव्हाही त्याने मुख्यमंत्री नैसर्गिक आपत्तीनिवारण निधीसाठी ५
लाख रुपये दिले होते. गरीब लोकांसाठी तो २६
अनाथाश्रम, १५ कन्नड माध्यमाच्या शाळा,
१६ वृद्धाश्रम, १९ गोशाळा, चालवत असे.
तो फक्त रील हिरो नव्हता, तर रिअल हिरो होता, हे त्याच्या कामातूनच सिद्ध होते.
शिवाय, टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमातून जो काही पैसा जमा होतो तो सगळा पैसा
विविश सामाजिक संस्थांकडे वळवला जातो. यातील एकही रुपया त्याच्या कुटुंबीयांकरता
वापरला जात नाही. कित्येक कन्नड माध्यमाच्या शाळांनाही त्याने भरभरून मदत केली
आहे.
ताकदीचा
अभिनेता आणि लोकांचा कैवार घेणारा एक सहृद गमावल्याने अनेकांना एक विषण्ण पोकळी
जाणवत आहे. बॉलीवूड कलाकारांपासून, ते पंतप्रधान नरेंद्र मोदिपर्यंत सगळ्यांनीच
शोक व्यक्त केला आहे. त्याच्यासोबत काम केलेल्या कन्नड आणि दाक्षिणात्य चित्रपट
सृष्टीतील कलाकारांना तर त्यांच्या भावना व्यक्त करण्यास शब्दच सापडत नसल्याचे म्हटले
आहे.
Image source : Google |
त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही. २९ चित्रपटातून आपल्या कलेने आमचे मनोरंजन करणारा हा हाडाचा कलाकार त्याच्या कलेच्या रूपाने तरी आपल्या सोबत आहे हाच एक दिलासा म्हणावा लागेल. एक कलाकार म्हणून तू आम्हाला जे काही भरभरून दिलेस त्याबद्दल आम्ही नेहमीच तुझ्या ऋणात राहू!
Comments