संवादाचा पूल की संशयाची झूल? नाते कशावर टिकेल?

माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत वेगवेगळ्या भूमिकेत जगत असतो. प्रत्येक नात्याची भूमिका वेगळी असली तरी, त्याचा पाया मात्र एकच असतो, तो म्हणजे विश्वास. फक्त नवरा-बायको किंवा प्रियकर प्रेयसी यांच्यातच नाही तरी आई-मुलगी-मुलगा-वडील, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणी, अशा सगळ्याच नात्यात विश्वासाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. विश्वासाचा हा पायाच डळमळला तर, नात्याला तडे जायला सुरुवात होते. माणूस कोणत्या एकाच नात्यावर जगतो असं नाही तर त्याला नात्यांचं सुरक्षित पर्यावरण हवं असतं. या पर्यावरणातील एका जरी नात्याला धक्का लागला तरी त्याचा इतर सगळ्याच नात्यांवर परिणाम होतो.

 

Image source : Google Image


मनात एकदा का संशयाचं मूळ रुजू लागलं की याने तुमची मानसिकता तर बिघडतेच पण तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींचीही मानसिकता बिघडून जाते. ज्याच्यावर संशय घेतला जातोय त्या व्यक्तीवर तर हा थेट भावनिक हल्लाच असतो. हा हल्ला कसा परतवून लावायचा याचं जर योग्य ज्ञान त्या व्यक्तीजवळ नसेल तर, ती व्यक्ती भावनिकतेच्या लाटेत वाहवून जाण्याचीच शक्यता जास्त. अशा वाहवत जाण्याला न कळत आपल्याकडूनच हातभार लावला जातो.

 

पहिल्यांदा तुमच्या मनात एक छोटीशी शंका जन्म घेते. मग तुम्ही शंकेखोरपणे समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक हालचाली अगदी दुर्बिणीतून तपासू लागता. तुमची ही डिटेक्टिव्ह नजर समोरच्याच्या डोळ्यात खूप लागते. मग त्याची चीडचीड सुरु होते. दोघांच्या चीडचिडीतून हळूहळू तक्रारी जन्म घेतात. पुढे या तक्रारी मोठ्या होत जातात आणि मग त्यातून जन्माला येतो दुर्लक्षितपणा.

 

पुढे हा दुर्लक्षितपणा वाढत जातो आणि मग जन्माला येते टाळाटाळ, कारणे, उत्तरे आणि असंख्य प्रश्नांचा भला मोठा गुंता जो कधी सुटणार की नाही हेच कळत नाही.

 

बघा सुरुवात कुठून झाली तर एका साध्याशा शंकेतून आणि त्यातून भल्या मोठ्या प्रश्नाचं भूत कधी मानगुटीवर बसलं काळालंच नाही.

 

सासूला वाटते सुनेला आपली कदर नाही. तिच्या मनात आपल्याबद्दल प्रेम नाही, आदर नाही. मग ती सुनेच्या प्रत्येक गोष्ट उलटसुलटपणे तपासू लागते. सासूबाईंची ही चिकित्सक नजर सुनेला हळूहळू इरिटेट होऊ लागते. मग सुनेला वाटते सासूबाईना कुठली गोष्ट पटतच नाही. मग दोघींची धुसफूस वाढता वाढता इतकी वाढते की, एकतर घर तुटतं किंवा नातं तुटतं. प्रेम, ओलावा, भावनिकता या गोष्टींना काही अर्थच उरत नाही उरते ती फक्त शुष्कता आणि कोरडेपणा. जो कधीच नातं टिकवून ठेवू शकत नाही.

 

संशय ही गोष्ट फक्त चारित्र्या पुरती सीमित नाही तर तिचा आवाका खूप खूप मोठा आहे.

आईला वाटतं लेकाला आपली काळजी नाही. वडिलांना वाटतं आपला मुलगा कधी आपलं ऐकतच नाही. मुलाला वाटतं आपल्या आई-वडिलांना आपली कदरच नाही. एक साधी शंका मनात उमटते आणि मग हळूहळू गैरसमाजांच जाळं वाढू लागतं. नात्यातील विश्वासाला हादरे बसू लागतात.

 

एका घरात राहूनही कुटुंबातील सदस्यांशी आपुलकीनं संवाद साधण्याची इच्छा उरत नाही. घराच्या चार भिंती या फक्त भिंतीच बनून राहतात त्यांच्यातील जिवंतपणा कधीच हरवलेला असतो. घरातील वृद्धांना आपल्या समस्या मांडता येत नाहीत आणि लहानांना नेमकं चाललंय काय हेच कळत नाही.

 

तुमच्या मनात जेव्हा शंका निर्माण होईल तेव्हा तिला वेळीच आवरा. तिची मुळे रुजणार नाहीत याची दक्षता घ्या. आपल्या प्रत्येक नात्याबद्दल शक्य तितका सकारात्मक विचार करा. संवाद आणि वाद यातील फरक समजून घ्या. भांड्याला भांडे लागले तरी  पुन्हा खेळीमेळीने, एकत्र राहून सहवासाचा आनंद लुटा.

 

नातं मग ते कोणतंही असो त्यातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करावा लागतो. कुठलेच नाती कायमस्वरूपी गृहीत धरून चालत नाही.

 

 

Post a Comment

0 Comments