काही लोकांना तुमच्यापेक्षा जास्त तुमच्याशी भांडण्यातच इंटरेस्ट असतो!

भांडणं होण ही तशी सामान्य बाब. तसही भांडणाने प्रेम वाढतं असं म्हणतात. प्रेमातील चव जपणारी, लटकी, लुटुपुटूची भांडणं होण्यात काही वाईटही नाही म्हणा! पण जर कुणी मुद्दामच तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करत असेल. सतत तुमचा अपमान करत असेल, तुमच्याशी वादावादी करुन समाधान मिळवत असेल तर? काही लोकांना भांडण करण्याची हौसच असते आणि ते फक्त आपल्या जाळ्यात कोणी बकरा अडकतो का या संधीच्या शोधात असतात. आता अशा लोकांच्या जाळ्यात अडकून बकरा व्हायचं की भुर्रकन उडणारं कबुतर व्हायचं हे तुम्हीच ठरवा.

 

Image source : Google image

मुद्दाम भांडणं उकरून काढणारी लोक असतात तरी कोण? या लोकांचे चार प्रकार पडतात. पहिले म्हणजे ज्यांना तुमच्यावर नाहक इर्षा वाटत असते असे. दुसरे म्हणजे ज्यांना स्वतःबद्दल अजिबात आत्मविश्वास नसतो, सतत भीती आणि तणावाखाली असतात असे. तिसरे ज्यांना आपण कुणाला तरी आपल्या बोलण्यातून दुखावत आहोत हे त्यांच्या गावीही नसणारे. आपल्या बोलण्याचा वागण्याचा समोरच्यावर काय परिणाम होईल याची जराही फिकीर नसणारे निष्काळजी आणि फटकळ लोक आणि चौथे तुमच्यावर प्रेम करणारे.

 

समोरचा माणूस या चारपैकी कुठल्या प्रकारात बसतो हे आधी पहा आणि मग त्याच्या रागाला किंवा अपमानाला कसं उत्तर द्यायचं हे ठरवा.

 

ज्या लोकांना तुमच्याशी इर्षा वाटत असते. त्यांना तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी त्याच कौतुक करणार नाहीत. त्याबद्दल काही ना काही उणीदुणी काढतील आणि तुम्हाला टोमणे मारत राहतील. तुम्ही त्यांना काही उत्तर द्यायला गेलात तर लगेचच तुम्हीच कशी सुरुवात केली हे पटवून देतील आणि तुमच्यावरच खापर फोडतील. ज्यांना स्वतःबद्दल आत्मविश्वास नसतो, सतत भीती असते अशा लोकांना वाटते तुम्ही त्यांचे काही तरी वाईट कराल आणि त्याच्या भीतीपोटी ते काही तरी बोलून बसतात ज्यामुळे तुम्हाला राग येऊ शकतो. तिसरे फटकळ बोलणारे यांच्या जिभेला हाड नसते. यांना इतरांच्या भावनांची कदर नसते.

 

चौथ्या प्रकारात मोडणारे जे खरोखर तुमच्यावर प्रेम करतात ते आई-वडील आपल्याला कधी काही बोलतात. याचा अर्थ त्यातून तुम्हाला कमीपणा दाखवणे हा त्याच्या उद्देश नसतो तर तुम्ही खरोखरच तुमच्यात काही सुधारणा करावी अशी त्यांची अपेक्षा असते. तेव्हा अशा लोकांनी जरी तुमचा अपमान केला. तुम्हाला चार शब्द सुनावले तरी ते शांतपणे ऐकून घ्या. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय यावर विचार करा आणि तुम्ही जो अर्थ काढला आहे तो कसा अंमलात आणायचा याचे आराखडे बांधा. चौथ्या प्रकारातील लोकांविषयी जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण, जसे ते तुमचा रागराग करतात तितकेच भरभरून प्रेमही करतात आणि प्रेमाच्या व्यक्तीला रागावयाचा हक्क नाही तर मग कुणाला असणार? बरोबर ना?

 

आता पहिले ज्यांना इर्षा करायची असते. अशा लोकांचे टोमणे शांतपणे ऐका. त्यावर लगेचच प्रतिक्रिया देण्याची घाई करू नका. तुम्हाला त्यांचा राग आला आहे हेही दाखवू नका. उलट स्वतःच्या प्रगतीवर फोकस करा. समजा तुम्ही शालेय विद्यार्थी आहात आणि तुमची एखादी मैत्रीण किंवा मित्र तुमच्याशी इर्षा करत असेल त्यातून तुम्हाला टोमणे मारत असेल तर त्याला उत्तर न देता स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. तुमचे वाढलेले मार्क्स हेच त्याला योग्य उत्तर असेल. तुमच्या ऑफिसमधील एखादा कलीग सतत तुमची उणीदुणी काढत असेल तर त्याला उत्तर देण्यात आणि त्यावर विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुमचे काम कसे सुधारेल याकडे लक्ष द्या. तुमच्या कामामुळे तुमच्या कंपनीच्या प्रगतीला कसा हातभार लागू शकतो हे पहा. तुमचे काम, तुमचे वाढलेले कौशल्य आणि तुमची प्रगती हेच त्या सहकाऱ्यासाठी योग्य उत्तर ठरेल.

 

जे सतत तणावाखाली वावरत असतात. ज्यांना आत्मविश्वास नसतो असे लोक जर तुम्हाला बोलत असतील, उचकवत असतील तर त्यांच्यावर दया करा. कारण, त्यांचे फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी त्यांच्याकडे  योग्य जागाच नाहीये. एकदा दोनदा त्यांनी आक्रमकपणा दाखवला असेल तर त्यानंतर त्यांच्याशी नीट बोला. त्यांचं वागणं तुम्हाला कसं त्रासदायक ठरत आहे हे एकदा बोलून बघा. कदाचित त्यांना त्यांची चूक उमगेल आणि ते पुन्हा बोलताना सावध राहतील. तसेच चुकून तुमच्या हातून ते दुखावले गेले असतील तर स्वतःही बिनधास्तपणे हे मान्य करा की ते अनवधानाने झालेली चूक होती. अशा लोकांशी संवादाचा पूल सांधता आला तर ठीक नाही तर यांच्यावरही फुली मारायला विसरू नका.

 

फटकळ लोकांच काय आता बोलतात आणि नंतर विसरून जातात पण निर्लज्जपणे तीच गोष्ट करण्याचे अजिबात सोडत नाहीत. अशा लोकांना जशास तसे उत्तर देणे कधी कधी चांगले ठरते पण, जर हे नेहमीच होत असेल तर सरळ यांच्यापासून हातभर अंतर राखून राहायला शिकलेलं केव्हाही चांगलं.

 

हाती चले बाजार कुत्ते भौके हजार ही म्हण तुम्ही कधी तरी ऐकली असेलच. कुत्रे भुंकतात म्हणून हत्तीने कधी आपली चाल बदलायची नसते आणि त्यांना उत्तर देण्यात वेळही घालवायचा नसतो.

 

आवश्यक त्या गोष्टीवरजेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो तेव्हा अनावश्यक गोष्टी अपोआप मागे पडत जातात. तरीही एखाद्याचे वागणे तुम्हाला जास्तच त्रासदायक वाटत असेल तर त्याबाबत तुम्ही बोललं पाहिजे. विनाकारण मान खाली घालून त्रास सोसण्यातही काही अर्थ नसतो हेही लक्षात घ्या. घाईघाईत किंवा आत्ता मला असे वाटते म्हणून किंवा मला हे सहनच होत नाही, माझा असा स्वभाव नाही अशा कारणांनी भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका.

 

समोरची व्यक्ति जेव्हा आपला अपमान करते तेव्हा निश्चितच राग येतो. त्यावर आपणही लगेच रागारागात व्यक्त न होता स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या व्यक्तीने केलेला अपमान सतत मनाशी न घोळता त्याचा विसर पाडला पाहिजे.

 

तो मला असं बोलला. ती मला असं बोलूच कसं शकते? यावर सतत विचार घोळवत बसण्याऐवजी हे लक्षात घ्या की, तो किंवा ती काय बोलली किंवा त्यांनी काय बोलले पाहिजे हे मी ठरवू शकत नाही. त्यांच्या बोलण्यापेक्षाही मला माझी कामे महत्वाची आहेत. मी त्यावर फोकस करणार.

 

मनातील राग घालवण्यासाठी मनाला शांत होण्यासाठी थोडा वेळ द्या. या वेळेत स्वतःशी बोलण्याची काही सकारात्मक वाक्ये तयार करा. उदा. मी शांत आहे. माझे लक्ष माझ्या कामावर केंद्रित आहे. मी स्वतःवर खूप प्रेम करतो. अशा सकारात्मक वाक्यांची उजळणी केल्याने मन सकारात्मक दिशेने कार्यप्रवण होते.

 

जेव्हा केव्हा हा अपमान आठवेल तेव्हा तेव्हा त्यात गुरफटून जाण्यापेक्षा एखाद्या चित्रपटातील दृश्य पहिल्याप्रमाणे त्याकडे तटस्थतेने पहा. आपल्यासाठी आपण महत्वाचे आहोत आपला राग महत्वाचा नाही. इतरांच्या जाळ्यात न फसता स्वतःचा मार्ग तयार करता यायला हवा.

 

 

Post a Comment

0 Comments