आयुष्यावर बिनशर्त प्रेम करता यायला हवं!
Image source : Google |
“आत्ता कुठे डिग्री
झाली इतक्यात जॉब पण लागला? काय एकेकाचं नशीब नाही!”
“बरं आहे बाई तुझं एकटा
जीव सदाशिव कुणी विचारणार नाही की टोकणारं नाही.”
“काय हो नशीब बिचारीचं,
आत्ता कुठे जरा चांगले दिवस आले होते तोवर कर्ताधर्ता मुलगा गेला.”
आजूबाजूच्या लोकांच्या
आयुष्यावर आपण सहजपणे अशा टिप्पण्या करत असतो. सगळ्याचंच आयुष्य सारखं नसतं. आपल्याला
समोरच्याची एक बाजू दिसते जी आपल्या दृष्टीने चांगली किंवा वाईट असते. पण दुसरी
बाजू दिसत नाही जी अजून चांगली किंवा वाईट किंवा आणखी काही तरी असू शकते.
जेव्हा जेव्हा
इतरांच्या विषयी तुलना करण्याची इच्छा निर्माण होईल तेव्हा तेव्हा स्वतःला हे
समजावून सांगितलं पाहिजे की, कदाचित यापेक्षाही त्यांच्या आयुष्यात काहीतरी निराळं
सुरू असेल जे आपल्याला दिसणार नाही. आपल्याला कळणार नाही किंवा आपण त्याची
कल्पनाही करू शकणार नाही.
तो त्याच्या ठिकाणी योग्य आणि आपण आपल्या ठिकाणी. सफरचंदाने संत्र्याशी स्पर्धा करण्यात काय हाशील सांगा? दोघांचीही चव वेगळी, गुणधर्म वेगळे तरी त्यांची ओळख एकच ना? कामही एकच माणसाला पोषणमुल्ये पुरवणे. तसेच आपण आपल्या आपल्या आयुष्यात राहून एकच काम करण्यासाठी जन्मलो आहोत. काय आहे आपले काम? तर हे जीवन अधिक सुखकर करणे स्वतःसाठी आणि इतरांसाठीही!
आपलं आयुष्य
त्यांच्यासारखं का नाही? हा प्रश्न तुलना निर्माण करतो आणि तुलना आयुष्यात दु:ख
आणते. सगळ्याचंच आयुष्य एकसारखं असतं तरजगणं किती रुक्ष वाटलं असतं ना? बघा
तुम्हाला आवडते तीच भाजी तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाला आवडली असती आणि दररोज न
चुकता तुम्ही तीच भाजी खाल्ली असती तर? थोड्यावेळासाठी कल्पना म्हणून हे छान वाटेल
पण, प्रत्यक्षात जेव्हा हा प्रयोग करुन पहाल तेव्हा नक्कीच काही दिवसांत तुमची
आवडती भाजी नावडती होऊन जाईल.
सगळ्यांनी
तुमच्यासारखेच कपडे घातले असते. सगळेजण तुमच्याच आवडत्या हॉटेलमध्ये जेवायला गेले
असते. असं जर झालं असतं तर, किती मोठा गोंधळ उडाला असता. म्हणून प्रत्येकाची चॉइस
वेगळी आहे हे किती चांगलं आहे ना? आपण आपली आवड जपतो ते त्यांची आवड जपतात आणि
यातून नकळतपणे विविधता जपली जाते. आयुष्यात एकसुरीपणा येत नाही.
आपल्या आयुष्याचा
प्रवास इतरासारखा नाही हेच योग्य आहे. सगळ्यांचाच प्रवास सारखा असता तर इतरांपेक्षा आपल्याकडे वेगळी काही क्षमता आहे
हेही आपल्याला कळलं नसतं. आपल्या आवडी निवडी काय यांचीही ओळख झाली नसती. आपल्या
आयुष्याचे ध्येय काय हे शोधण्याची संधी मिळाली नसती. जे आहे जसं आहे ते आपलं आहे.
आपलं आयुष्य आहे, आपला प्रवास आहे, आणि तो फक्त आपला आहे म्हणून त्याच्यावर प्रेम
करता यायला हवं.
प्रत्येकाच्या
आयुष्याची धाटणी वेगळी, प्रवास वेगळा, ज्याची त्याची कुवत वेगळी, तेव्हा तुलना
करुन स्वतःला कमी लेखाल्याने काय होईल? स्वतःचाच आत्मविश्वास कमी होईल. ज्यामुळे
यश अजूनच हुलकावणी देत राहील.
तुमच्या आणि सुखाच्या
मध्ये हे अडथळे कुणी निर्माण केले? तुलनेने! आणि ही तुलना सुरू कुणी केली? अर्थातच
तुम्ही. म्हणजे आपले खरे वैरी कोण? याचं उत्तर आता तुम्हीच शोधा.
आपल्या जोडीदारावर,
प्रियकराच्या बाबतीत कसे आपण पझेसिव्ह असतो. त्यांनी फक्त आपलंच असावं म्हणून हट्ट
धरतो. तसच आयुष्याचं नाही का? आपलं आयुष्य फक्त आपलंच आहे. ते इतर कुणाचंही होऊ
शकत नाही, या कल्पनेनेच आपलं आपल्या आयुष्यावरचं प्रेम भरभरुन उतू जायला हवं.
Image source : Google |
आपण आजपर्यंत घेतलेले
अनुभव, आनंद, दु:ख हे सगळंच तर फक्त आपलं असतं. इतरांशी तुलना करुन आपण हा फक्त
आपला असलेला वाटा उगाचच झिडकारत असतो. उगाच स्वतःला दु:खी करतो. जे आहे ते आपलं
आहे, या आपलेपणाने आयुष्याकडे पाहण्याची नजर गवसली तर, आणि काय हवं?
म्हणून विनाकारण
इतरांशी तुलना करण्याची सवय सोडूया आणि जे आहे त्यावरच भरभरुन प्रेम करायला शिकूया.
आयुष्य जगण्याचा सुखकरपणे जगण्याचा पहिला मंत्र आहे आयुष्यावर बिनशर्त प्रेम करणं.
Comments