अवयव दान, श्रेष्ठ दान!

मृत्यू हे एक अटळ आणि सुंदर सत्य आहे! आपण मेल्यावर आपलं किंवा आपल्या पाठीमागे राहणाऱ्यांचं काय होत असेल? हे कळण्याची काहीच सोय नाही. असली तरी अजून तरी ज्ञात नाही. मनुष्य देह निष्प्राण झाल्यानंतर बहुतांश वेळा त्याला जाळले किंवा पुरले जाते. व्यक्त ज्या धर्माची अनुयायी असेल त्यावरून हे जाळणे किंवा पुरणे ठरवले जाते. काही धर्मात याहूनही दुसरा मार्ग अनुसरला जातो. (उदा. पारशी) मेल्यानंतर मनुष्य देहाची कोणत्या ना कोणत्या प्रकारे विल्हेवाट लावली जातेच. पण जाळण्या किंवा पुरण्याऐवजी तुम्ही आणखी एक मार्ग स्वीकारू शकता, तो म्हणजे शरीर किंवा शरीरातील काही अवयव दान करणे.

 

Image source : Google

जाळले किंवा पुरले गेल्याने कोणाचा काय फायदा होईल हे सांगता येत नाही. किंबहुना फायद्यापेक्षा यात तोटेच अधिक आहेत, हेही मान्य केले पाहिजे.

 

जिवंतपणी तर आपण माणूस म्हणून आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी खूप काही करतो. बहुतांश वेळा 'मी त्याच्यासाठी इतकं केलं, पण त्याला काही याची जाणीवच नाही,' असंही घोकत राहतो. इतरांसाठी करूनही त्याचं समाधान अनुभवण्यापेक्षा त्याबद्दल तक्रारीच सांगत राहतो.

 

'मी मुलांसाठी अमुक एवढं करून ठेवलं.' 'मी माझ्या भावासाठी केलं, बहिणीसाठी केलं, भावाच्या बहिणीच्या मुलांसाठी केलं,' असे पाढे वाचत राहतो.

 

“दिल्याने वाढत राहते,” “दान हेच सर्वश्रेष्ठ पुण्य,” अशी अनेक सुभाषिते ऐकून पण आपण इतरासाठी केलेलं कधी विसरू शकत नाही.

 

इतरांसाठी करूनही लक्षात राहणार नाही किंवा मी केलं, मी दिलं ही भावनाच उरणार नाही. असं कधी होईल? अर्थातच मृत्यूनंतरच. अवयवदान ही अशीच एक संधी आहे, की जिथे दिल्या नंतर दिल्याची भावना उरत नाही. आपण कुणाला दिलं? का दिलं हेही कळत नाही पण आपल्या अशा देण्याने नक्कीच त्या कुणा अज्ञात व्यक्तीच्या आयुष्याला एक अर्थ मिळालेला असतो. त्याला जगण्याची उमेद आणि उभारी मिळालेली असते. आपल्या पश्चातही आपले काही अवयव इतर कुणासाठी तरी उपयोगी पडू शकतात.

 

Image source : Google

खरे दान तेच जे दिल्यानंतर लक्षात राहत नाही, अशी आपल्या संस्कृतीत दान देण्याची व्याख्या केली आहे. मग हे जे खरंखुरं दान आहे, ते आपण जिवंत असताना आपल्या हातून होणं शक्य नाही पण, आपल्या पश्चात नक्कीच होऊ शकतं. म्हणूनच तर, "अवयव दान, श्रेष्ठ दान," ही घोषणा अतिशय सार्थ आणि समर्पक ठरते, कारण या दानानंतर कोणताही अहंभाव उरत नाही आणि इतर कुणाला तरी जगण्याची उमेद मिळते ती वेगळी. 

 

अवयव दानाबद्दल ही जाणीव जागृती करण्यासाठी आजचा दिवस म्हणजे १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो. अवयव दान करणे म्हणजे काय? अवयव दान कसे केले जाते? कुठली व्यक्ति अवयव दान करण्यास पात्र ठरते? मृत्यू पश्चात कोणकोणते अवयव दान करता येतात आणि जिवंतपणी कोणकोणते अवयव दान केले जाऊ शकतात? अशा अनेक शंका लोकांना सतावत असतात. या सगळ्याची उत्तरे देऊन लोकांच्या मनातील शंका दूर करणे आणि त्यांना अवयव दान करण्यास प्रेरित करणे या उद्देशाने जागतिक पातळीवर हा दिवस साजरा केला जातो.

 

आजच्या दिवसाचे औचित्य साधत, अवयव दान संबंधी जाणीव जागृती करण्यासाठी माजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन  यांनी “अवयव दान  (म्हणजे) – जीव वाचवण्यासाठी, आशा वृद्धिंगत करण्यासाठी आणि आनंद पसरवण्यासाठी घेतलेली एक सुंदर शपथ,” असे ट्विट केले आहे.“

 

मानवी जीवन ही निसर्गाकडून मिळालेली एक सर्वांग सुंदर भेट आहे. इतरांचे जीव वाचावेत, त्यांच्या जीवनातही आनंदाचे कारंजे फुलावेत या उद्देशाने केलेली मदत ही तर त्याहून सुंदर आणि कारुण्य पूर्ण कृती आहे. तुमच्या मृत्यू पश्चातही तुम्ही इतरांना मदत करण्याचा आनंद घेऊ शकता. आपल्या अवयवाच्या रूपाने या जगात वावरू शकता. इतरांच्या आनंदात सहभागी होऊ शकता. हे सांगण्यासाठीच भारत सरकारच्या राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रदान संस्थेकडूनही, “दान करण्याचा पर्याय असताना तुम्ही (मृतदेह) जाळून किंवा पुरून का टाकता?" अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात आला आहे.

 

जिवंतपाणी किंवा मृत्यूनंतर कायदेशीररित्या आणि संमतीपूर्वक करार करून एखाद्या व्यक्तीचा अवयव दुसऱ्या व्यक्तीत प्रत्यारोपित करणे म्हणजे अवयव दान. यासाठी ट्रासंप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टीस्स्युज अॅक्ट १९९४ नुसार आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करू शकता.

 

जात, धर्म, पंथ लिंग, वंश अशा सर्व भेदाभेदा पलीकडे जाऊन कुठलीही व्यक्ति आपले अवयवदान करू शकते. यासाठी फक्त त्या व्यक्तीची वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली असली पाहिजेत. त्याव्यक्तीला कावीळ किंवा एड्स सारखा संसर्गजन्य आजार झालेला नसावा ही मात्र त्यातील एक महत्वाची अट आहे. पूर्णतः निरोगी असलेली वक्ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अवयव दान करण्याचे प्रतिज्ञापत्र करून देऊ शकते. हे प्रतिज्ञापत्र नॅशनल ऑर्गन अँड टिस्स्यु ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO)  National Organ and Tissue Transplant Organisation (NOTTO) च्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला यासाठीचे प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागेल. या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्ही  Form-7 As per THOA हा फॉर्म डाऊनलोड करून तो भरू शकता. त्यानंतर हा फ्रॉम तुम्ही NATIONAL ORGAN AND TISSUE TRANSPLANT ORGANISATION - 4th Floor, NIOP Building, Safdarjung Hospital Campus, New Delhi-110029. या पत्त्यावर पोस्ट करू शकता.

संबधित विभागाकडून तुम्हाला एक डोनर कार्ड भेटेल जे तुम्हाला कायमस्वरूपी स्वतःजवळ जतन करून ठेवावे लागेल. ज्यामुळे इतरांनाही कळेल की तुम्ही मरणोपरांत तुमचे अवयव दान केले आहेत.

 

याव्यतिरिक्त व्यक्ति जिवंतपणीही काही अवयव दान करू शकते. ज्या अवयवातील काही अंश काढल्याने त्या व्यक्तीला निर्धोकपणे आपले जीवन जगता येईल. पुढील काळात यामुळे त्याच्या आरोग्यात कुठलीही गंभीर गुंतागुंत होणार नाही असे अवयव दान करता येतात पण त्यासाठी कायदेशीर संमती घ्यावी लागते. जिवंत असताना व्यक्ति रक्तदान करू शकते. शिवाय जिवंतपणी व्यक्तीला एक किडनी, पॅन्क्रीयाजचा काही भाग, आणि लिव्हरचा काही भाग दान करता येऊ शकतो. तर मृत व्यक्तिचे हृदय, फुफ्फुस, आतडी, किडनी, पॅन्क्रीयाज आणि लिव्हर दान केले जाऊ शकतात. हृदयातील झडपेच्या ऊती, कॉर्निया, त्वचा, अस्थी, या अवयवातील ऊतीही वापरल्या जाऊ शकतात.

 

टीप : आरोग्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमचे फॅमिली डॉक्टर आणि संबंधित तज्ञ यांच्याशी सल्ला मसलत आवर्जून करा. फक्त इंटरनेट वरील माहिती किंवा तत्सम जुजबी माहितीवरून आरोग्याबाबत कोणतेही प्रयोग करू नयेत.  

 

Post a Comment

0 Comments