संपन्न आणि घरंदाज कुटुंबातील जानकीदेवी बजाज यांनी घरच्या समृद्धीचा त्याग करून स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले.

Image source : Google

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिला आघाडीवर होत्या. यापैकी खूप कमी नावं आपल्या ओळखीची आहेत. बरीच नावं तर अजूनही अज्ञात आहेत. असेच एक नाव म्हणजे जानकीदेवी बजाज. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या आणि त्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनांत सहभागी होणाऱ्या जानकीदेवी बजाज यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत.

 

जानकी देवी यांचा जन्म १८९३ साली मध्यप्रदेश मधील जवोरा गावातील एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यांची आई मैना देवी म्हणजे साधेपणा आणि प्रेमळतेचे मूर्तिमंत प्रतीक. त्यांना दोन भाऊ होते चिरंजी लालजी आणि पुरुषोत्तम दास. हे कुटुंब पैशाने धनवान होते आणि मानानेही. गावातील सर्व थरातील लोकांना कधीही कशाचीही मदत लागली तरी, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता हे कुटुंब इतरांना मदत करण्यास सरसावत असे. हिंदू वैष्णव कुटुंबात जन्मलेल्या जानकीदेवी अशा पारंपरिक आणि उदार वातावरणातच मोठ्या झाल्या.

१९०२ साली वयाच्या नवव्या वर्षी जानकीदेवी यांचा जमनालाल बजाज यांच्याशी विवाह झाला. हेच ते जमनालाल बजाज ज्यांनी पुढे  प्रसिद्ध बजाज उद्योगाचा पाया रचला. जमनालाल यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर जानकीदेवी बजाज कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ति बनल्या. लग्नानंतर त्या आपल्या पतीसोबत महाराष्ट्रातील वर्ध्यात राहायला आल्या. जमनालाल बजाज हे गांधींचे कट्टर अनुयायी होते. साधी राहणी उच्चविचार सारणी हे गांधींचे तत्व या कुटुंबाने पूर्णत: स्वीकारले होते. जानकीदेवी देखील गांधी विचाराने प्रभावित झाल्या होत्या. जानकीदेवी एका समृद्ध कुटुंबातील होत्या पण, त्यांच्यावरील गांधी विचारांचा प्रभाव इतका होता की त्यांनी आपल्या अंगावरील दागिन्यांचा त्याग केला. मरेपर्यंत त्यांनी एकही दागिना घातला नाही.

तत्कालीन उच्च कुलीन स्त्रीयांसाठी पडदा पद्धत किती महत्वाची होती ते ही आपण जाणतोच पण, समाज बदलाचा ध्यास घेतलेल्या जानकीदेवींनी या पडदा पद्धतीचाही त्याग केला. इतकेच नाही तर आपल्या परिवारातील आणि समाजातील इतर महिलांनाही त्यांनी पडदा पद्धत त्यागण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या आचरणाने प्रभावित झालेल्या हजारो महिलांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वतःला या कर्मठ बंधनातून मुक्त केले. पडदा पद्धतीसारख्या एका जुनाट रूढीतून त्यांनी या महिलांना स्वातंत्र्य मिळवून दिले होते.

त्यांनी विदेशी वस्तूंचा आणि कपड्यांचा त्याग केला. स्वतः खादीचा स्वीकार केला. १९२१ साली त्यांनी स्वदेशी चळवळीतही भाग घेतला. विदेशी कपड्यांची होळी करून त्यांनी स्वतःसोबतच इतरांनाही खादी स्वीकारण्यास उद्युक्त केले. त्या स्वतः सुद्धा चरख्यावर सुतकताई करत आणि इतरांनाही घरोघरी जाऊन चरखा चालवायला शिकवत. यामुळे खादीच्या प्रसार आणि प्रचारासोबतच ग्रामीण भारत स्वावलंबी होत होता.

 

गांधींचा संदेश सामान्य लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या घरोघरी जाऊन गांधी विचार सांगत असत. वर्ध्यातील मंदिरात त्याकाळी हरिजनांना प्रवेश दिला जात नसे. १७ जुलै १९२८ रोजी त्यांनी आपले पती जमनालाल बजाज यांच्या सोबतीने वर्ध्याच्या लक्ष्मी-नारायण मंदिरात हरिजनांसह मंदिर प्रवेश आंदोलन केले. या दिवसापासून वर्ध्यातील मंदिराचे प्रवेशद्वार सर्वांसाठी खुले झाले. त्यांचे अस्पृश्यता आंदोलन मंदिरापर्यंतच मर्यादित राहिले नाही. आपल्या घरातील स्वयंपाक करण्यासाठी ही त्यांनी एका अस्पृश्य स्त्रीची नेमणूक केली.

आपल्या आसपासच्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची ऊर्मी जागावी म्हणून त्या गावोगावी फिरून लोकांमध्ये जागृती घडवून आणत. त्यांच्या संपर्कात आल्याने कित्येक लोक स्वातंत्र्याच्या आशेने पेटून उठले. अनेकांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवला. या काळात त्यांना ब्रिटीशांचा खप्पामर्जी अनेकदा सहन करावी लागली. कित्येकदा तुरुंगवास भोगावा लागला.

 

महिला शिक्षित झाल्याशिवाय त्यांची कुटुंबे सुधारणार नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी महिला शिक्षणासाठीही ठोस पावले उचलली. संत विनोबा भावे यांच्या सोबतीने ग्रामसेवा, भूदान चळवळ आणि गोसेवा सारख्या चळवळीतही योगदान दिले. गोसेवेची तर त्यांना इतकी आवड होती की कित्येक वर्ष त्या अखिल भारतीय गोसेवा संघाच्या अध्यक्ष होत्या. फक्त जमनालाल आणि जानकीदेवीच साधेपणाच्या पाइक होत्या असे नाही तर त्यांचे संपूर्ण कुटुंबच साधी राहणी म्हणजे काय याचे एक मृतीमंत उदाहरण होते. खुद्द विनोबाजी देखील जानकीदेवींचा आणि त्यांच्या मुलांचा साधेपणा पाहून थक्क झाले होते. विनोबाजी म्हणजे देश पातळीवरील केवढे मोठे नेतृत्व! पण ते सुद्धा स्वतःला जानकीदेवींचे लहान भाऊ समजत असत. शेवटपर्यंत विनोबाजी आणि जानकी देवींच्या कुटुंबातील हे प्रेमळ संबध अबाधित राहिले.

त्यांनी ‘मेरी जीवन यात्रा’ नावाने स्वतःचे आत्मचरित्रही लिहिले. १९६५ साली त्यांचे हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतासाठी त्यांनी केलेले अतुलनीय काम आणि त्याग लक्षात घेऊन १९५६ साली भारत सरकारने पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

 

त्यांच्या स्मरणार्थ बजाज कुटुंबीयाकडून जानकी देवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था या दोन संस्थांची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय जानकीदेवी बजाज संस्था ही ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे.

त्यांच्या पश्चातही ग्रामीण भारत अधिक मजबूत करण्याचे काम अविरतपणे सुरु आहे, याचाही आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.

 

जानकीदेवी यांच्यासारख्याचा हजारो, लाखो स्त्रियांनी त्याकाळी घर, कुटुंब, प्रथा, परंपरा यांच्यापेक्षा देशसेवा आणि देशबांधव यांना महत्त्व देऊन जे योगदान दिले त्यामुळेच आजच्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आकारास आले आहे, या सगळ्या स्त्रीयांबद्दल आपण सदैव ऋणी आहोत. देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी त्यांची आठवण काढून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे स्वतंत्र भारतातील एक स्वतंत्र नागरिक या नात्याने आपले आद्यकर्तव्य आहे.

 

 लेखिका - मेघश्री श्रेष्ठी


Post a Comment

2 Comments

Sheetal said…
खूप छान माहिती