भारतीय वृक्ष दिन!

source : Google Image


 





अलीकडच्या दिवसात आपल्या कानावर एक शब्द सातत्याने पडतोय तो म्हणजे ऑक्सिजन! तो ऑक्सिजन जो या कोरोना संकटात अनेकांना न मिळाल्याने त्यांना प्राण गमवावे लागले.  आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू ज्याचा मूलभूत स्त्रोत आपल्या पृथ्वीवरील वृक्ष आहेत. आज भारतात १५ मे ला 
' भारतीय वृक्ष दिन ' साजरा केला जातो.

            पाणी हे जीवन असेल तर झाडे ही आपला श्वास आहेत हे आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. पण हा श्वासच विकासाच्या नावाखाली कधी तोडला जातो हे आपल्याला समजत नसतं. कधी समाजकंटक, कधी चैनीखोर लोक या झाडांची कत्तल करत असतात. कदाचीत त्यांना आज दवाखान्यात सहज उपलब्ध न होणाऱ्या ऑक्सिजनची किंमत कळाली नसावी. जगण्यासाठी माणूस वृक्षांवर अवलंबून असतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तो वृक्षांपासून भागवत असतो. झाडांपासून इतकं सुख मिळवणारा माणूस आज मात्र दुर्दैवाने वृक्षांच्या विनाशास कारणीभूत ठरत आहे.


          पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कुटुंबातील संख्या वाढू लागली की त्यांचे घर वाढतात आणि घरे बांधण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते. त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यासाठी कुटुंब नियोजनसारख्या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार अधिक वेगात करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर वर्षाला घरातील फर्निचर बदलणाऱ्यांनी थोडा त्यांचा विचार बदलावा. राष्ट्रीय विकासकामांच्या मध्ये जर झाडे येत असतील तर सरकारने त्याबाबत योग्य भूमिका घेतली पाहिजे. गावागावांमध्ये झाड दत्तक योजना राबविल्या पाहिजेत. शिवाय मानवाने प्रदूषणाला आळा घालणे तर आवश्यक आहेच परंतु, हे काम अप्रत्यक्षपणे वृक्ष अतिशय प्रभावीपणे करू शकतात. संतुलित पर्यावरणासाठी पृथ्वीवरील किमान ३३ टक्के जमीन झाडांच्या छायेत असणे गरजेचे आहे. 



             आज जागतिक तापमानात कमालीची वाढ होत आहे. ही परिस्थिती उद्भवण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे, बेसुमार वृक्षतोड. विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्प राबविण्यासाठी जगभरात मोठ्या संख्येने वृक्षांची कत्तल होत आहे. परिणामी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, प्रदूषणासारख्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वृक्षतोड थांबून वृक्षारोपण झालं पाहिजे, हे मत प्रत्येक भारतीयांच्या मनात बिंबवले पाहिजे. तसेच जेव्हा तुमच्या नजरेत वृक्षतोड होत असेल तेव्हा राष्ट्रीय हरित लवाद, स्थानिक वृक्ष प्राधिकरण अशांसारख्या निमसरकारी विभागांना, सामाजिक संस्थांना किंवा वृत्तपत्रांना आपण थेट कळवून गुन्हेगारांवर कारवाई करू शकता.

         आपल्या शेतीप्रधान देशाने वृक्षरोपणात जर उच्चांक गाठला तर भारत महासत्तेच्या दिशेने एक पाऊल पुढे नक्कीच असेल. त्यामुळे झाडे जगवूया आणि देश वाचवूया इतकंच सांगेन. तुम्हा सर्वांना भारतीय वृक्ष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

© लखन चौधरी

Post a Comment

1 Comments