भारतीय तंत्रज्ञान दिवस!

भारताने ११ मे १९९८ ला पोखरण येथे यशस्वी अणु चाचणी पूर्ण केली. आणि खऱ्या अर्थाने देशात तंत्रज्ञानाची क्रांती झाली. म्हणून सन १९९९ पासून देशात ११ मे ला ' राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन ' साजरा केला जातो. विशेष म्हणजे याच दिवशी भारताने 'ऑपरेशन शक्ती' या क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी केली होती. त्याच बरोबर बंगळुरूच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या 'हंसा ३' या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली होती. शिवाय डीआरडीओ ने 'त्रिशूल' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढवलं होतं. त्यामुळे ११ मे हा दिवस भारतीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला.

          १९९५ मधे सुरु झालेल्या अनुचाचणीच्या भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने ती चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर मात्र भारताने कोणतीही कसर सोडली नाही. अब्दुल कलाम आणि त्यांची टीम यांनी पोखरण स्थळाचा सखोल अभ्यास केला. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अनुचाचणी झाली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम, आर. चिदम्बरम, अनिल काकोडकर, के. संथानम व त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे भारत जगभरात अणुशक्ती म्हणून उदयास आला.

           अणुबॉम्बची चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यामुळे कधीही न संपणाऱ्या पाश्चात्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले. आज भारताने इस्रो, डीआरडीओ, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजच्या माध्यमातून तंत्रज्ञानात गरुडझेप घेतली आहे.

             रशियाने क्रायोजनिक इंजिन देण्याचे नाकारल्यानंतर भारताने तेही स्वतःच्या बळावर तयार करून दाखविले. अमेरिकेने महासंगणक देण्याचे नाकारल्यानंतर भारतात सीडॅक या संस्थेने महासंगणकांची परम मालिका तयार केली आणि अमेरिकेला भारताची बौद्धिक ताकद दाखवून दिली. अवकाश संशोधनात आणि तंत्रज्ञानात भारत आता आघाडीचा देश आहे. लॉंच व्हेईकल टेक्नॉलॉजी ते उपग्रहांची रचना, ते तयार करणे, त्याचा वापर या सर्व क्षेत्रात भारताने प्रावीण्य मिळविले आहे. संपर्क, प्रसारण, हवामान, आपत्कालीन व्यवस्थापन, टेलिमेडिसीन या क्षेत्रात भारताने उपग्रहांचा नेमका वापर केला आहे. त्यामुळे भारतीयांना अशक्य बाब कोणतीच नाही हेच यातून सिद्ध होते.

           भारतीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीत वाटा उचलणाऱ्या प्रत्येक भारतीयाला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

1 Comments

कंटेंट सोबत प्रातिनिधिक फोटो टाकता आला तर छान वाटेल.