मी झाडावर उगवलो असतो तर!

 


त्या दिवशी मी प्रेमला सांगत होते,

“बाहेर जाऊ नको खेळायला. ऊन आहे, झाडावर चढू नको पडशील, सारखं सारखं बाहेर राहू नये/खेळू नये, कोरोना आहे,” इत्यादी इत्यादी इत्यादी.

माझी कॅसेट सुरू होती.

‘हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको.’

माझं हे बोलणं ऐकून तो वैतागला. तो रडत म्हणाला, “का जाऊ देत नाही मला बाहेर तू? मला खेळायचं आहे. मला कळतंय कशी काळजी घ्यायची स्वतःची. किती किरकिर लावते. तुला होण्यापेक्षा एखाद्या झाडावर उगवलो असतो, किती बरं झालं असतं.”

 

त्याच्या या वाक्यानंतर मला धक्का बसला. मी शांत बसले. तो जेवायला लागला. त्याचं जेवण होईपर्यंत मी त्याला काहीही बोलले नाही आणि जेवण केल्यानंतरही नाही. त्या क्षणी माझ्यासमोर फक्त चांदण्या नाचत होत्या. माझ्या लेकानेच मला दिवसा चांदण्या दाखवल्या होत्या. आता या वेळी माझ्याजवळ दोन पर्याय होते. एक मी स्वतःला भावनिक त्रास करून घ्यावा, माझा मुलगा असं कसं बोलू शकतो? त्याला माझा वीट कसा येऊ शकतो? माझी काळजी त्याला कळत कशी नाही?, वगैरे वगैरे वगैरे. किंवा मी घडल्या प्रकाराची दुसरी बाजू बघण्यासाठी स्वतःला वेळ देऊ शकत होते. पहिलं मी स्वतःला सावरलं. त्याला किंवा स्वतःला भावनिक त्रास देण्यात किंवा करून घेण्यात काहीच हाशील नाही, हे आतापर्यंतच्या अनुभवावरून मी स्वत:ला काटेकोरपणे बजावले आहे.

 

आता थोडा वेळ थांबून दुसरी बाजू बघण्याची वेळ होती. जेव्हा ही दुसरी बाजू मी तपासली आणि माझ्या मनात कायमची रुजवली, तेव्हा अक्षरश: माझ्या घरातले चित्र पूर्ण बदलून गेले.

 

काय होती ही दुसरी बाजू पहिलं म्हणजे त्याच्या त्या वाक्याचा गैर अर्थ न काढता इमोशनल ड्रामा न करणे. तो जरी माझा मुलगा असला तरी, तो एक स्वतंत्र व्यक्ती आहे, हे मान्य करणे. जरी लहान असला तरी त्याच्या डोक्यामध्ये त्याचा स्वत:चा मेंदू आहे. जरी तो लहान असला तरी त्याला विचार करता येतो आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची याची नैसर्गिक उर्मी प्रत्येकाकडेच असते तशी ती त्याच्याकडेही आहे. उलट त्याची काळजी करण्याचा/घेण्याचा ताबा मी माझ्या हातात घेतल्याने त्याच्यातील ही नैसर्गिक उर्मी दाबली जात होती.

 

आई म्हणून मला माझ्या माझ्या मुलाची काळजी असणं स्वाभाविक होतं. तसंच त्याला त्याचा खेळ आणि त्याची आवड जपण्याचं स्वातंत्र्य होतं नव्हे आहे. थोडसं मागे जाऊन मी हा सगळा प्रवास आठवला. आई झाल्यापासूनचा आई होतानाचा प्रवास!

 

पहिल्या महिन्यात गर्भ राहतो त्यानंतर प्रत्येक महिन्यात गर्भाची टप्प्याटप्प्याने वाढ होते आणि फळ पिकल्यानंतर जसं ते झाडापासून तुटणे क्रमप्राप्त असतं, अगदी तसंच बाळाची वाढ झाल्यानंतर त्याची आपल्याशी जोडलेली नाळ तुटणेही क्रमप्राप्त आणि एक नैसर्गिक गोष्ट आहे. आईच्या पदराखाली वाढल्या वरच मुले सुरक्षित राहत असतील तर मुळात ती गर्भातून बाहेर येण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया का घडली असती?

 

निसर्गानं ज्या अर्थी एका विशिष्ट टप्प्यावर दोन देह स्वतंत्र होण्याची व्यवस्था केलेली आहे याचाच अर्थ एक व्यक्ती म्हणून दोघांनाही काही स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते दोघांनीही स्वीकारावं ही निसर्गाचीच इच्छा किंवा रीत, पद्धत आहे.

 

दुसरी गोष्ट अकरा वर्षाच्या मुलाला कशाचा तरी वैताग आला. पटकन काहीतरी बोलून गेला. पण मी तीस वर्षांची व्यक्ती अकरा वर्षाच्या मुलाच्या बोलण्यामुळे जर दुखावली जात असेल तर अर्थातच बालिशपणा माझ्यात आहे, त्याच्यात नाही.

 

खरंतर निसर्गाने मला मुलं किती सहजतेने दिली. त्यांच्यासाठी कुठले नवस करावे लागले नाहीत की, कुठली ट्रीटमेंट घ्यावी लागली नाही. अगदी गर्भ राहील्याच्या पहिल्या दिवसापासून ते बाळाचा जन्म होईपर्यंत सगळ्या गोष्टी नैसर्गिक रीतीने पार पडल्या. आजूबाजूला बघितलं तर लक्षात येते कित्येक जोडपी आपल्याला मूल नाही म्हणून दुखी आहेत. आपल्याला आई-वडील होण्याचा आनंद मिळत नाही म्हणून दुखी आहेत. मग हे सुख तर मला निसर्गत: मिळालेलं आहे.

 

निसर्गाची इच्छा आहे की मी सुखी राहावं आणि म्हणून विनासायास निसर्गाकडून मिळालेल्या या भेटीबद्दल मी आधी निसर्गाची कृतज्ञ आहे. मला माझ्या मुलाच्या सुरक्षेची काळजी वाटणे स्वाभाविक असलं तरी त्याबद्दल चिंता, भीती, तणाव, असुरक्षितता, संशय, कुडणे-झुरणे अशा नकारात्मक भावना किंवा नकारात्मक ऊर्जा व्यक्त करून मी स्वतःला दुःखी करत होते आणि अर्थातच मी माझ्या मुलांनाही दुखी करत होते, निसर्गाचे आभार मानल्यानंतर पहिली गोष्ट जाणवली ती ही की, निसर्गाला मी आनंदी राहावं असं वाटतं आहे. त्याअर्थी निसर्ग माझ्या मुलालाही आनंदाने सुरक्षा देण्यात तितकाच तत्पर आहे. गरज आहे ती माझा दृष्टिकोन बदलण्याची. माझ्या मुलाला त्याची काळजी कशी घ्यायची स्वतःला कसं सांभाळायचं याची उपजत अक्कल आहे. हे आधी मी स्वतःला समजावलं. त्याच्या सुरक्षेचा ताबा माझ्या हातात घेतल्याने मला तर त्रास होतोच शिवाय त्यालाही त्रास होतो. त्यामुळे त्याच्याबद्दल कोणतीही नकारात्मक भावना, नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जा व्यक्त करण्याऐवजी त्याच्याविषयी त्याच्यासाठी सकारात्मक रीतीने काय काय करू शकते याचा शोध घ्यायला सुरुवात केली. पहिले तर माझ्या मनातली असुरक्षितता, भीती, संशय, चिडचिड या सगळ्या नकारात्मक भावना काढून टाकल्या आणि मी माझ्या मेंदूला मनाला सकारात्मक ऊर्जा देऊ लागले. ही सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी मी काही सकारात्मक वाक्यांचा आधार घेतला. काय होती ती वाक्य? ‘माझी मुलं सुरक्षित आहेत.’ आणि हो आहेतच. जरी ती बाहेर खेळत असली तरी ती संध्याकाळ झाल्यावर तरी सुखरूप घरी परत येतातच. त्यांचा त्यांचा आनंद लुटत आहेत. हे त्यांचं वय आहे खेळायचं त्याची मजा लुटत आहेत. ती सुखरूप आणि सुखी आहेत. ही पहिली सकारात्मक गोष्ट मी माझ्या मनात भरवायला सुरुवात केली. दुसरे सकारात्मक वाक्य होते, माझ्या मुलांचं माझ्यावरती प्रेम आहे. हो, माझ्यावरती प्रेम आहे म्हणून ती माझ्या जवळ येतात. माझा लाड करतात. मला स्पर्श करतात. माझ्याजवळ हट्ट करतात. मला घट्ट मिठी मारतात. त्यांनी कितीतरी पद्धतीने कितीतरी वेळा माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलेलं आहे. मग एक नकारात्मक वाक्य त्याच्या तोंडून निघालं म्हणून त्यांनी दिलेली ही सगळी सकारात्मक ऊर्जा नाकारता येते का? तर अजिबात नाही. मी पहिल्यांदा हे स्वीकारलं की ती सुरक्षित आहेत, माझ्यावर प्रेम करतात आणि ते आनंदी आहेत.



जसजसं या सकारात्मक गोष्टी माझ्या मनावर बिंबवत गेले. तसं तसं मला माझ्या मुलांमध्ये बदल दिसू लागला. मुलांनाही माझ्यामध्ये बदल दिसू लागला. त्यांच्यातला आणि माझ्यातला बदल मिळून एकूणच घरातल्या वातावरणात बदल दिसू लागला. घरातलं वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल तर आणखी काय हवे?

 

आणि तेव्हापासून एक गोष्ट मी मनाशी पक्की केली की, मी माझ्या मुलांच्या बाबतीत कधीही नकारात्मक विचार करणार नाही. माझी मुलं माझ्यावर प्रेम करतात. माझी मुलं सुरक्षित आणि सुखी आहेत. माझ्या मुलांना सगळ्या चांगल्या सवयी आहेत आणि माझी मुलं घरा बाहेरही मी शिकवलेल्या गोष्टी आणि संस्कार यांचा विसर पडू देत नाहीत. अशी सकारात्मक वाक्यं जेव्हा मी स्वतःशी बोलायला सुरुवात केली, तेव्हा खरोखरच मुलांमध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये बदल दिसू लागला. माझं त्यांच्याशी जे वागणं होतं तेही हळूहळू बदलत गेलं.

 

 

म्हणून फक्त स्वतःबद्दलच नाही, स्वतःच्या मुलांबद्दलच नाही, तर मुलांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मी सकारात्मक विचार करायला सुरुवात केली. मुळात ती सुरक्षित आहेत या एकाच वाक्याने माझ्यातील सगळी नकारात्मक ऊर्जा बदलून गेली. ती सकारात्मक झाली. गरज आहे ती स्वतःला बदलण्याची याची मला पुन्हा एकदा प्रेमच्या ‘त्या’ एका वाक्याने जाणीव करून दिली. मी माझ्या अतिरेकी प्रेमाने त्याचे नुकसान करत होते. त्याचीही मला जाणीव झाली. माझी मुलं खंबीर बनत आहेत किंबहुना त्यांनी तसं खंबीर बनावं म्हणून निसर्गतः त्यांच्यामध्ये काही सुप्त गोष्टी दडलेल्या आहेत, त्या माझ्या अतिरेकाने आतच दाबून रहात होत्या. त्या आता बाहेर पडतात आणि त्यांचा खऱ्या अर्थाने विकास होतो आहे. म्हणून मुलांच्या बाबतीतही अतिरेकी प्रेम घातक ठरू शकते, नव्हे ठरतंच. म्हणून मुलांचं स्वातंत्र्य मान्य करूया. एकमेकांच्या परिघात हस्तक्षेप करण्याच्या काही मर्यादाही लक्षात घेऊया आणि त्यांचे नैसर्गिक जगणं अधिक अधिक फुलवुया.

 

त्यासाठी स्वतःच्या मनाला सकारात्मक दिशा देण्याची गरज आहे इतकच!

 

 

Post a Comment

4 Comments

A mit said…
Ossum, realy the thoughts are like inspiration
I wish the best wishes for your blog
Anonymous said…
'स्वातंत्र्यातलं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य'असं नेमाडे हिंदू कादंबरीत म्हणतात. मुलांची निरागसता हिरावून घेण्याचे अधिकार कुठल्याही आईवडिलांना नसतात. पण संस्काराच्या नावाखाली ती निरागसता खुडून काढायचीच कामे जास्त. आपण छान लिहिले आहे. शुभेच्छा!



Shrikant Dherange said…
'स्वातंत्र्यातलं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य'असं नेमाडे हिंदू कादंबरीत म्हणतात. मुलांची निरागसता हिरावून घेण्याचे अधिकार कुठल्याही आईवडिलांना नसतात. पण संस्काराच्या नावाखाली ती निरागसता खुडून काढायचीच कामे जास्त. आपण छान लिहिले आहे. शुभेच्छा!