सर्टिफिकेट!

 

मुलीने कसं संस्कारी असलं पाहिजे. मोठ्याने बोलू नये, हसू नये, खिदाळू नये, प्रश्न विचारू नये, नको त्या गोष्टीत डोकं लावू नये, खाजगी भागावर मुकाट्याने टाके घालून घ्यावेत का तर उद्दीपन होऊ नये. मित्रांच्यात मिसळू नये, का तर अशीतशी मुलगी समजतील, रात्रीचे, नव्हे नव्हे; संध्याकाळी सात नंतर घरात कसे येता येईल ते पाहावे, घरचे म्हणतील त्याच्या गळ्यात माळ घालावी आणि पुढे तो म्हणेल तसे वागावे. मग त्याने भलेही तू जीव दे आणि जीव देण्यापूर्वी तुझा व्हिडीओ बनवून मला पाठव (का तर खात्रीसाठी. खरेच तू मेली का?) असे म्हटले की काय करावे?

तिने स्वतःचा विचार करावा, आई-वडिलांचा विचार करावा आपल्या आयुष्याचा विचार करावा.

थू तुमच्या **डीवर. हो शिवी येते. कारण, तुम्ही तिला मशीन समजता. तुम्हाला हवे तेंव्हा तिने मृदू व्हावे आणि तुम्हाला हवे तेंव्हा कठीण. वा रे दुनिया.

एक तर तुम्ही तिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होऊ देणार नाही. सतत संस्कार, परंपरा करत तिच्या मर्यादा दाखवत राहणार आणि म्हणे वेळ आली की तिने खंबीर बनले पाहिजे. एका दिवसात माणसाच्या मनाचा पोत बदलतो? एका क्षणात मेणाचे लोखंड करण्याची किमया तर खुद्द परमेश्वरालाही जमणार नाही. पण, तुम्हाला वाटते ती तिने जमवली पाहिजे. का? तर पुन्हा तेच तुमची संस्कृती टिकली पाहिजे ना... तुमच्या संस्कृतीत देवी वगैरे म्हणून आरती करण्याची जी सोय आहे, तीचा वापर झाला पाहिजे ना म्हणून. काली दुर्गा वगैरेची उदाहरणे देऊन तिच्या वर्मावर बोट ठेवता आले पाहिजे ना म्हणून.

Pintrest picture

        एकोणिसाव्या वर्षी तुम्ही लग्न लावून देणार आणि तिकडे काही त्रास झाला तर तुम्ही निघून ये म्हणून सांगणार. मग आधीच का जड झाली होती ती? त्याचं उत्तर नाही तुमच्याकडे. निघून ये म्हणून सांगणार आणि पुन्हा एक दोन वर्षात तुम्ही दुसरा बघणार. तिथे काही झाले तर मग खापर कोणाच्या डोक्यावर फोडणार? तिच्याच. का तर एक सोडून दुसरे करून दिले तरी तुला सांभाळता आलं नाही. मग भाषणं झोडणार तुम्ही आयुष्यात कणखर वगैरे व्हायचे असल्याची. पण, तुम्हाला हे नाही कळत की कणखर बनण्यासाठी आपण कधी तिला मदत केली नाही, सहाय्य दिले नाही. उलट आपल्या समोर मान तुकवते म्हणून तिचे उदात्तीकरण केले, तिचा गौरव केला. आणि जेंव्हा ती सत्व हरवून बसते तेंव्हा आपण काय सांगणार?

      कणखर बन!

वीस वर्ष तुम्ही सांगत राहणार तू शेळी आहेस आणि अचानक एक दिवस तुम्हाला वाटणार की ती वाघीण बनली पाहिजे. थोडी तरी लाज येऊद्या असल्या दुटप्पीपणाची!

मग आधीपासूनच तिला मॅरेज मटेरियल बनवण्या ऐवजी कणखर बन का नाही शिकवलं? एक आयेशा आत्महत्या करते तेव्हा समाज जागा होतो. पण बारकाईने पाहिल्यास आजूबाजूला कितीतरी आत्महत्या घडत असतात. मीच पहिल्यात कित्येक आत्महत्या. ऐकलय त्याबद्दल.

चारित्र्य, समाज, संस्कृती, इतिहास, परंपरा, दैवतीकरण, हवे तेव्हा हवे ते हत्यार काढून तुम्ही तिला खेळवत राहणार. आणि तरीही काही नाही झालं की मग आहेच सबलीकरण आणि सक्षमीकारण.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे परवाच्याच एका निकालात पत्नीने पतीजवळच राहिले पाहिजे असे बंधन नाही. आता हे कायद्याने बंधन नसेल. पण, चालरीत तर हेच सांगते ना. बाई, दिल्या घरी तू सुखी राहा.  सुख नसले तरी सुखी मान स्वतःला. आणि स्वतः सुखी नसलीस तरी सुखी ठेव इतरांना.

काही जण  यावर पण तुटून पडतात. आताच्या मुली कुठे अशा राहतात? का रहावं पण त्यांनी असं? का त्यांनी स्वत:च्या अस्तित्वाला तिलांजली देऊन तुमची घरं सुखी करावीत? तुमचा वंश वाढवावा? मशीन आहेत का तुम्हाला हवे तेंव्हा हवा तो आनंद देणाऱ्या? घरचं जमलं पाहिजे, नोकरी जमली पाहिजे, वरून दोन-तीनवेळा परफॉर्मन्स दिला पाहिजे. जणू काही मांसाचा गोळाच! खेळायला मिळालेला.

म्हणे आताच्या पोरींना जरा काही कमी पडून चालत नाही. जणू काय आताच्या पोरींसमोर आताचे नवरे तारे तारका पण तोडून आणून द्यायला कमी करत नाहीत अशा अविर्भावात सगळं बोलणं.

मुलींचे आईवडील असाल तर तिला आधी स्वतःला जपायला शिकवलं पाहिजे, तिला स्वतःचा सन्मान ठेवणं शिकवलं पाहिजे. जग गेलं तेल लावत आपल्या आनंदाशी प्रामाणिक राहायला शिकवलं पाहिजे. हो आनंदाशी प्रामाणिक राहायला शिकवलं पाहिजे. कारण, एकवेळ त्यांना आनंद घेता आला तरी त्याबद्दल अपराधभाव निर्माण नाही झाला पाहिजे.

एकीकडे पोरी मिळत नाही म्हणून रडतील. आजकालच्या पोरींच्या किती अपेक्षा म्हणून त्यांच्या नावाने खडे फोडतील पण, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत यांचा विचारही लग्नासाठी करवत नाही. हां पण याच बायका एखाद दिवस शेज सजवायला चालतील. वरून मग त्यांना कळत नाही का? एका दिवसासाठी कशाला तयार व्हायचं? असले प्रवचन देऊन त्यांनाच गुन्हेगार ठरवतील.

कारण एकदा का विधवा झाली, नवऱ्याने टाकून दिली, पोरं झाली की बाईला भावना उरत नाहीत. नव्हे त्या उरल्याच नाही पाहिजेत. त्यांनी असेच जगायचे भावनांचा कोंडमारा करत. नाहीतर दुसऱ्याच्या भावनेला बळी पडत.

मागच्या महिन्यात संक्रांतीचा सण झाला. अनेक ठिकाणी अशा महिलांना बोलवून त्यांच्यासाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. चिमुटभर हळदी-कुंकू लावले की त्यांचा सन्मान त्यांना परत मिळतो. किती हा बालीशपणा? त्या चिमुटभर हळदीकुंकवाच्या पलीकडेही त्यांना माणूस म्हणून काही प्राथमिक भावना आहेत. आणि त्या त्यांनी व्यक्त केल्या की मग त्या टाकावू!

२०१९ साली दिवसाला ६० गृहिणीनी आत्महत्या केली आहे. भारतात आत्महत्येच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास महिलांच्या आत्महत्येचे प्रमाण जवळपास ६०% आहे. आयेशावर आत्महत्या करण्याची वेळ का येते माहितेय का कारण आपण असे हे ढोंगी आहोत म्हणून. मला वाटतं समाज म्हणून आपल्याला मिळालेलं सर्टिफिकेट आहे ते.


आयेशाच्या वडलांनी २०१९ मध्ये तिच्या नवऱ्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. पण शेवटी २०२० मध्ये तिने स्वतःच स्वतःच्या जीवनाचा न्यायनिवाडा केला. कारण, कदाचित तिच्या सुरक्षेसाठी इथली  यंत्रणा सक्षम नसल्याचाच अनुभव तिने घेतला असेल.

आता आपण आपल्या अभ्यासाने आणि परफॉर्मन्सने हे सर्टिफिकेट बदलणार की फ्रेम करून ते भिंतीवर टांगणार?

 

 

Post a Comment

0 Comments