कर्पूरगौरं करुणावतारं!

“त्राही माम, त्राही माम,” करत राक्षसांच्या त्रासापासून बचावासाठी पळ काढणारे देवगण, हातात चिपळ्या घेऊन ‘नारायण, नारायण’ बोलणारे पण इकडचे तिकडे नि तिकडचे इकडे करून लावालावी करण्यातच धन्यता मानणारे नारदमुनी, शेषनागाच्या शय्येवर पहुडलेले आणि देवी लक्ष्मीकडून सेवा करवून घेणारे भगवान विष्णू, कमळात विराजमान झालेले त्रिमुखी ब्रह्म, या सर्वांपेक्षा अंगाला भस्म फासलेला, विष प्यायल्याने नीलकंठ ठरलेला, गळ्यात साप आणि डोक्यावर गंगेचा भार वाहणारा, भोळा सांब सदाशिव मला जास्त प्रिय आहे. कृष्णाची राधा होण्याची कल्पना मला कधीच भावली नाही. पण, शिवाची पार्वती होण्याचा रोमँटिसिझम मला जास्त भावतो.

 

म्हणून माझा पहिला क्रश आहे तो महाशिव! सृष्टीचा तारणहार!

 

गुगलवरून साभार

सांसारिक जीवनाचा पाया रचणारे शिव पार्वती हे पहिले दाम्पत्य मानले जाते. इतर देव आणि देव पत्न्या यांच्यापेक्षा शिव-पर्वतीची प्रेमकहाणी खूपच हटके आहे. शिवाचे सतीवरील प्रेम, तिच्या हट्टा पुढे विरघळणारे त्याचे कोमल हृदय आणि तिच्या विरहाने तापदग्ध झालेला तांडव करण्यास उद्युक्त झालेला शिव. शिवाची ही सगळी रूपे विलोभनीय वाटतात.

 

या सगळ्या प्रसंगात त्याच्या मनाची जी निर्मळ, भोळसट, निष्कपट अवस्था आहे तिच्या मोहात पडायला होते.

 

आजही लग्न झाल्यानंतर अनेकांच्यात गोंधळ घालण्याची प्रथा आहे. या गोंधळात शिव-पार्वतीच्या लग्नाची आणि त्याच्या यशस्वी संसाराची गोष्ट सांगितली जाते. त्यांच्या प्रमाणे यशस्वी संसार व्हावा म्हणून वधू-वरास शुभाशीर्वाद दिले जातात.

 

शिवाने पार्वतीला कधीही स्वतःपेक्षा कमी मानले नाही. तिला नेहमीच आदराचे स्थान दिले आणि समानतेचा दर्जा दिला. पार्वती आपल्या मनातील विचार शिवा पुढे व्यक्त करण्यास कधीच कचरत नाही. शिव आणि पार्वतीतील संवाद हा प्रश्नोत्तर रुपी संवाद आहे. म्हणजेच पार्वतीला शिवाला प्रश्न करण्याची मुभा आहे आणि प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा अधिकारही. पार्वतीच्या प्रश्नाने किंवा तिच्या हट्टामुळे शिवाचा अंहकार कधीही दुखावला जात नाही.

 

पार्वतीनेही शिवासाठी केलेली आराधना, तपस्या आणि त्याच्यासाठी दिलेली परीक्षा याला तोड नाही. हिमालया सारख्या राजाची मुलगी असूनही स्मशानात भटकणाऱ्या शिवाची निर्मळ वृत्ती तिला आकर्षित करते. त्याच्या रंगरूप आणि त्याचे ध्यान यापेक्षाही ती त्याच्या गुणावर भाळते.

 

अर्धनारी नटेश्वर होऊन शिवाने, पार्वती आणि मी एकमेकांपासून अजिबात वेगळे नाही, हे दाखवून दिले. त्याला स्त्री शरीराची लाज वाटत नाही. उलट तो स्वतःसोबत स्त्री शरीरही सन्मानाने मिरवतो.

 

गुगलवरून साभार

त्याच्यात आणि पार्वतीमध्ये कितीही वितुष्ट आले तरी ते दोघे कधीही विभक्त होत नाहीत. थोड्याश्या विसंवादाने त्यांच्यातील नात्याला कायमचा तडा जात नाही. कित्येकदा त्यांच्यात विवादाचे प्रसंग येऊनही त्यांचे एकमेकांवरील प्रेम तसूभरही कमी होत नाही. शिव आणि पार्वती मधील नाते हे समानतेचे नाते आहे. शिव नेहमीच पार्वतीच्या मताचा आदर करतो.

 

म्हणून आजच्या काळातील दाम्पत्यालाही त्यांच्या दाम्पत्य जीवनाची सुरुवात करण्यापूर्वी शिव-पार्वतीच्या दाम्पत्य जीवनाची गोष्ट सांगितली जात असावी.

 

शिव म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजेच शिव. एकमेकांशिवाय त्यांचे व्यक्तिमत्व अपूर्ण आहे. शिव होणे म्हणजे प्रेम पाशात अडकूनही विमुक्त राहणे, शिव होणे म्हणजे स्वतःला विभागूनही पूर्णत्वाचा अनुभव घेणे. शक्ती होणे म्हणजे निर्मोहाचा मोह करणे. त्यांच्या प्रेमाने अनेक समाज मान्य रितीरिवाजांचे उल्लंघन केले असले तरी त्यांच्या प्रेमासारखे पूर्णत्व अन्यत्र सापडत नाही, हेही तितकेच खरे.


कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।

सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि।।

कर्पूरगौरं - कापरासारखा शुभ्र

करुणावतारं - जो साक्षात करुणेचा अवतार आहे

संसारसारं- जो या संसाराचा सार आहे

भुजगेन्द्रहारम् - भूजंगाचा म्हणजेच सापाचा हार गळ्यात घालणारा

सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि - पार्वतीसह सदा माझ्या हृदयात वसणाऱ्या शिवला माझे नमन असो.

Post a Comment

7 Comments

Sheetal said…

अगदी बरोबर, सुंदर विश्लेषण
खूप छान!
अतिशय सुंदर नाते ! सामान्य माणसांनी देखील आपली नाती अशी सुंदर, समतोल ठेवली तर?
Unknown said…
खूप छान माहिती व सादरीकरण 👌👌👌👌
Unknown said…
खूप सुंदर लेख