सांगलीची द्राक्षे आता चालली थेट अमेरिकेच्या बाजारपेठेत

 मातीतून सोनं उगवण्यची किमया साधायची असेल तर पाण्यासारखा घाम गाळण्याची आणि कष्टाला कल्पकता, आधुनिकता आणि व्यवहाराचीही जोड द्यावी लागते. आपल्या सांगलीतील काही शेतकऱ्यांनी अशीच आपल्या जिद्दीतून ही किमया साधली आहे, वाचा त्यांच्या जिद्दीची गोष्ट सुधीर नलवडे यांच्या लेखणीतून!

हापूस आंबा हा प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवरील भागात पिकतो. पण खाण्यासाठी  "देवगड" हापूस आंब्याला जगभरात जी मागणी आहे. त्यासारखी मागणी इतर भागात पिकणाऱ्या हापूस आंब्याला नक्कीच नाही. जगभरातील आंब्याचा "राजा" म्हणून देवगडचा हापूस आंबा जगमान्य आहे. 

फोटो सौजन्य सुधीर नलवडे


याच प्रमाणे सांगली जिल्ह्यात पूर्व भागात प्रामुख्याने तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज,  खानापूर आणि पलूस व जत तालुक्यातील काही भागात मोठया प्रमाणात द्राक्षे व द्राक्षेपासून 'मनुका (बेदाणा)' चे उत्पन्न घेतले जाते. आर्थिक उलाढाल असलेली एक मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे. या भागात पिकणारी 'द्राक्षे व मनुका' खाण्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. देशासह जगभरातील अनेक भागात 'द्राक्षे व मनुका (बेदाणा)' चा पुरवठा या भागातून केला जातो. 



याच भागामधील खानापूर तालुक्यातील घाटमाथ्यावर म्हणजेच पळशी, हिवरे व भिवाघाट परिसरात अन त्यातल्या त्यात प्रामुख्याने "पळशी" गावाच्या हद्दीत रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय पद्धतीने जवळपास 90 टक्क्यांच्या आसपास म्हणजेच चारशे (400) एकर परिसरात 'द्राक्षे' चे उत्पादन घेतले जाते. या भागातील लोक  खूप कष्टाने, त्यागाने, पाण्याची प्रचंड कमतरता असूनही लाभलेल्या निसर्गाच्या(वातावरण व जमीन) देणगीचा व संधीचा पुरेपुर वापर करून अक्षरशः जमिनीतून भरघोस निर्यातक्षम  'द्राक्षे' उत्पादन घेतात. 



या भागात रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या द्राक्षांना प्रामुख्याने युरोप व अमेरिकेत खूप मोठया प्रमाणात मागणी आहे. जवळपास 400 ते 500  द्राक्षे कंटेनर या भागातून परदेशात पाठविले जातात. अनेकदा प्रत्यक्ष युरोप व अन्य देशातील खरेदीदार या भागात द्राक्षे शेतीला भेट देण्यासाठी येतात. खूप मोठया परकिय चलनाची उलाढाल या भागात होते.



अलीकडच्या काळात अनेक वर्षांनी पळशी गावातील द्राक्षे शेती पाहण्याचा योग जुळून आला. 21 व्या शतकामध्ये बदलतं चाललेल्या शेती व्यवस्थेचा म्हणजेच पाऊस, पाणी, वातावरण यांचा बारकाईने अभ्यास. पारंपरिक व बदललेल्या नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये केलेला योग्य वापर. जागतिक द्राक्षे बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यासाठीची आवश्यक असलेली क्षमता. पाणी सिंचनाचे महत्व ओळखुन पाण्याचा शेतीमध्ये योग्य पद्धतीने केलेला वापर. आणि सर्वात महत्त्वाचे जुन्या पिढीबरोबर ज्ञानाची देवाणघेवाण व बदलत्या तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करत नव्या पिढीने नोकरीच्या मागे न धावता स्वतःला या क्षेत्रात झोकून दिले आहे. शेतीकडे केवळ पारंपरिक पद्धतीने उत्पनाचे साधन न पाहता, शेती ही "व्यवसाय" म्हणून केली तर क्रांतिकारक असे आमुलाग्र बदल नक्कीच घडवता येतात हे या गावातील तरूणांनी अलीकडच्या काळात दर्जेदार निर्यातक्षम द्राक्षे उत्पादन घेऊन स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे.



त्यामुळेच लाभलेल्या निसर्गाच्या (वातावरण व जमीन) देणगी आणि संधीचा पुरेपुर वापर करून जमिनीतून सोनं काढणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांच्या जिद्दीला "सलाम" !!


- सुधीर नलवडे, तासगाव जि. सांगली

9923109900




Post a Comment

0 Comments