संवाद आत आणि बाहेर

 कुठल्याशा अबोध जाणीवा का छळत असतील आपल्याला नेहमी? कोणी असेल कुठे अस्वस्थ त्याचा आपल्याशी काय संबंध? तसाही हरेक क्षण कोणी एकच भावना जगत नाही. मग आपण कुणाच्या तरी एकाच क्षणाला कस काय त्याचं संपूर्ण आयुष्य समजू शकतो? शिता वरून भाताची परीक्षा होते, तशी एका क्षणावरून कुणाच्या आयुष्याची परीक्षा होऊ शकत नाही.

जिथ स्वतःला मुक्त व्हावंस वाटतं. तिथ कदाचित दुसऱ्या कोणाच्या तरी मुक्तीची बीजं पेरलेली असू शकतात.

: त्याला नक्कीच वाटत होतं आपण पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडलोय. तो बोललाही तिला तसं.... तिलाही आवडतो आपण असंही वाटलं त्याला....

तिच्या मंद स्मित हास्यानं जरी भुरळ घातली असली त्याच्या मनावर तरी.... हे असे खूप काही 'पण' आणि 'तरी' ..... दोघांच्या मध्ये उभे होते....

: प्रेम.... का केलं आपण? ती सतत एकच प्रश्न विचारून छळत असते. केलं की झालं? झालं की होतं? अर्थांची शब्दाशी पाठशिवणी नेहमी चालूच असते. त्यांचा हा खेळ कधी गंमतीदार वाटतो कधी क्रूर वाटतो. कधी वाटतं हा खेळ यांचा नाही आपलाच चाललाय...

पण आणि तरीही तो आवडतो आतून... खूप आतून...

त्याने दरवाजे बंद केलेत, त्याच्या आत जाण्याचे आणि तिच्या आत...? तिच्या आत एक 'तो' आहे. हे त्याला माहित नसावं किंवा असलं तरी त्याकडे दुर्लक्ष करत असावा... जाणूनबुजून.

: ती आवडत असली आपल्याला तरी.... तिचं तिचं एक स्वतंत्र आयुष्य आहे. ज्यावर आपण कधीच हक्क सांगू शकत नाही. कारण आयुष्याचा एक तुकडा तिने दिला होता दुसऱ्याला! हेच कधी विसरू शकत नाही आपण! कोणी कधीच कधीच विलीन होऊ शकत नाही इतर कुणात. होऊही नये. अंतर राखून नातं निभावता आलं पाहिजे. दोन इच्छा. दोन जाणीवा. दोन शरीर. यात अलगपणा असतोच. तो जपावा लागतो. तिला नाही पटणार हे कदाचित!

: एकमेकांशी संवाद साधतानाही आपण हातचं काहीतरी राखूनच बोलतो नाही? पूर्ण बोलावं वाटत नाही. पूर्ण मोकळं व्हावं वाटत नाही. खुलेपणाची भीती. भीती नव्हे दहशतच चक्क. इतके कसे कुणाशी मोकळेपणाने बोलू शकतेस? इतके कशी खुलेपणाने हसू शकतेस? का आणि कसं? हे नाही सांगता येत. खरंच मोकळेपणाने बोलले का? हेही नाही सांगता येत.

"खरं तर कुठेच कधीच अवकाश मिळाला नाहीच मोकळेपणाने बोलण्याचा! उगाच आपलं वाटत मी बोलते.... आणि जितकी बोलते तितकच आत खूप.... आत कोंडूनही ठेवते स्वतःला स्वतःच.... माहितेय मला काही अधिकार नाही कुणाला माझ्या आतल्या आवारात वावरण्याचा....."

:स्वतःच्या बेड्यातून तिला जर मुक्त व्हायचंच नसेल तर,.... तर.... आपले कष्टही व्यर्थच जाणार आहेत. काही बिघडत नाही अजून एक जीव....आजन्म कैदी झाला म्हणून!

हेच तर प्राक्तन आहे.... तिचं....

संवाद आतला आणि बाहेरचा. यातली तफावत हीच प्रत्येक नात्यातील एक मोठी समस्या असते. 

दोन मनांचा मनातल्या मनात मनाशीच चाललेला संवाद. जो कधी पोचेल का एकमेकांच्या मनात या प्रतीक्षेत...

Getty Images


 

Post a Comment

0 Comments