सुशांत प्रकरणातून मी तरी हाच धडा घेतला!

 

गेले दोन-अडीच महिने झाले, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युच्या बातमीने आपल्या सर्वांना हैराण करून सोडले आहे. सुरुवातीला एका गुणी कलाकाराच्या अशा अचानक जाण्यानं सर्वांनाच हळहळ वाटली. नंतर मिडिया आणि राजकारण्यांनी या प्रकरणाला जे वळण दिले आहे ते पाहून प्रचंड चीड येत आहे. एखाद्याच्या मृत्युनंतर त्याच्या सगळ्या वैयक्तिक तपशिलांचा असा बाजार मांडणे घृणास्पद वाटते आहे. परंतु ही गोष्ट एक खूप महत्वाचा धडा शिकवून जाते.

नैराश्याचे, उदास वाटण्याचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. अशावेळी कुणाच्या मनात आत्महत्येचा विचार येत नाही? काही क्षण असतात असे की संपवून टाकावं हे सगळं असं वाटतं. आपण संपलो की आपल्यासोबत सगळच संपेल! असा एक भाबडा विचारही यामागे असतो. पण, खरंच आपल्यासोबत सगळंच संपतं का? अजिबात नाही. ज्या पद्धतीने या प्रकरणात प्रत्येकजण काठी घालून काहीतरी हाती लागतं याचा अंदाज घेत आहे, ते पाहिल्यावर निश्चितच वाटतं की आपल्या मागे सगळं संपत नाही. उलट काही जणांना आयतं कोलीत मिळू शकतं, त्यांची त्यांची भाकरी भाजून घ्यायला.

आपल्या सोबत सगळं संपेल आणि मागे राहिलेल्यांना काहीच दुःख उरणार नाही. कारण, आपणच त्यांच्या दुःखाचे मूळ आहोत, असा वाईट-साईट विचार करत जीवनयात्रा संपवणाऱ्यात एकटा सुशांतच आहे असे नाही. सुशांत प्रकारणानंतरही आत्महत्या होत आहेत आणि होत राहतीलच.

पण, सुशांतने जर आत्महत्या केली नसती, तर तो एक अपयशी व्यक्ती आहे असे कुणी म्हणू शकले असते का? नक्कीच नाही. त्याच्या आयुष्यात ज्या काही समस्या सध्या सुरु होत्या त्यातून तो कधीच बाहेर पडू शकला नसता का? याचंही उत्तर नक्कीच ‘नाही’ असंच आहे. आयुष्यात कुठलीही वेळ कायमची राहत नाही. सुशांतकडे कुणीच अपयशी व्यक्ती किंवा अपयशी कलाकार म्हणून पाहिलं नाही आणि पाहिलंही नसतं.

पहिल्यांदा त्याला पीके मध्ये पहिला तेंव्हाच त्याने आपली छाप सोडली होती. छोटीशी भूमिका होती त्याची पण, लक्षात राहील अशीच होती. त्यानंतरही त्याने जे काही चित्रपट दिले त्याची बरी-वाईट चर्चा होत राहिली. अगदी अलीकडचे छीछोरे किंवा त्याच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झालेला ‘दिल बेचारा’ असो. सहज अभिनयाची त्याची एक वेगळी शैली होती. हे सगळे पाहता एक त्रयस्थ म्हणून तो अपयशी ठरेल/ठरला असता, असले कुठलेही आडाखे आपण बांधू शकत नाही.

पण, तुम्ही किंवा मी जरी त्याला अपयशी मानण्यास तयार नसलो तरी, तो स्वतःला कुठल्या ना कुठल्या पातळीवर अपयशी मानत होता. त्याने स्वत:ला असं अपयशी समजण्यातून किंवा स्वतःच स्वतःला कमी लेखण्यातून ही कृती फळास आली असावी. त्याने ही समजूत स्वतःमध्ये घट्ट रुजवली होती, कदाचित.

पण, यातून एकच धडा मिळतो. जग तुम्हाला वाईट म्हणेल किंवा चांगले म्हणेल. लोकांचा किंवा त्रयस्थ व्यक्तींचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन काहीही असो, तुमचा स्वतःचा दृष्टीकोन खूप महत्वाचा आहे. तुम्ही स्वतःला काय समजता यावर तुमचे आणि तुमच्याशी संबधित इतरांचेही भविष्य अवलंबून आहे. म्हणून स्वत: बद्दल, स्वतःशी, स्वतःच चांगले बोला.  तुमचा स्वतःचा स्वतःशी होणारा संवाद जर सकारात्मक असेल तर, सगळ्या अडचणी, सगळे अडथळे लीलया पार करता येतात.

पण, अगदी लहानपणापासून आपणाला ही सवय लागलेली आहे. काहीही लहानमोठे कारण घडले की आपण एक तर दुसऱ्याला दोष देतो आणि दुसऱ्याला दोष देता येत नसेल तर स्वतःला दोष देत बसतो. इथून मागे आपण स्वतः स्वतःबद्दल कितीदा वाईट विचार केला हे एका क्षणासाठी फक्त आठवा. तुम्हाला कळेल की जितका वाईट विचार आपण स्वतःबद्दल करतो तितका तर आपला शत्रू किंवा तुम्हाला ज्या व्यक्तीपासून त्रास होतो ती व्यक्तीही करत नसेल. म्हणून, आधी स्वतःला दोष देणे, कमी लेखणे, एकदा केलेली चूक हजारदा घोकत बसणे हे सगळे थांबवण्याचा प्रयत्न करा. अचानक जादूची कांडी फिरल्याप्रमाणे हे होणे शक्य नाही. पण, हळूहळू सवय होत जाईल. तुम्ही स्वतः स्वतःशी स्वतःबद्दल चांगलं बोलणं ही मन हलकं करण्याची कला आहे. जेंव्हा केंव्हा स्वतःवर वैतागाल, चिडाल, दोष द्याल, तेंव्हा एक सेकंद थांबून या विचारांचे निरीक्षण करा आणि ठरवा खरेच मी स्वतःला इतके छळणे योग्य आहे का? नाही. अजिबात नाही. झालेल्या गोष्टी भलेही सुधारता येत नसतील पण, सोडून देता येतात. त्यासाठी स्वतःचाच तिरस्कार करण्याची गरज नाही. अशा वेळी स्वतःवर प्रेम करा. कारण, हीच ती वेळ असते जेंव्हा इतर कुणापेक्षाही जास्त तुम्हाला तुमची स्वतःची गरज असते.

सुशांत प्रकरणातून मी तरी हाच धडा घेतला.

© - मेघश्री श्रेष्ठी



Post a Comment

2 Comments