भारतातल्या या सात गावात आजही संस्कृत भाषा बोलली जाते!

 


संस्कृत म्हणजे देवभाषा असे मानले जाते. ही भाषा फक्त देवांची असल्याने एका विशिष्ट वर्गापुर्तीच मर्यादित होती. आज जवळपास ही भाषा मृतप्राय झाल्यात जमा आहे. कारण, संस्कृत देववाणी म्हणून सीमित राहिल्याने ती लोकांची भाषा बनू शकली नाही. आज शाळेत संस्कृत शिकवण्याचे प्रमाणही कमी आहे. काही विद्यार्थी संस्कृत हा विषय फक्त स्कोरिंग वाढवणारा विषय म्हणून निवडतात. बाकी सामान्य लोकांचा आणि या भाषेचा संपर्क कधीच तुटला आहे. देववाणी असल्याने काही श्लोक, मंत्र यांच्या रुपात ही भाषा आजही जिवंत आहे. पण, या श्लोकांचा किंवा मंत्रांचा अर्थ सामान्य लोकांना अजिबात समजत नाही. केवळ पिढ्यानपिढ्या घरात श्लोक म्हंटले जात आहेत म्हणूनही त्याचा रट्टा मारणारे अनेकजण आहेत. ही भाषा देवनागरी लिपीत म्हणजे (देवाच्या नगरीत वापरली जाणारी लिपी) लिहिली जाते. असे असले तरी भारतात संस्कृत थोड्याफार प्रमाणात आजही जिवंत आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतात काही गावे अशी आहेत जिथे घराघरात संस्कृत भाषा बोलली जाते. या गावातील वृद्ध व्यक्तीपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वजण संस्कृत बोलतात. अगदी मंदिर आणि शाळेपासून ते पान टपरी पर्यंत इथे संस्कृत बोलली जाते. इथे अगदी रस्त्यावरची किंवा नळावरची भांडणं देखील संस्कृत भाषेतूनच होतात.

१.       मत्तूर कर्नाटका, -

मत्तूर हे कर्नाटकच्या राजधानी बेंगलोर पासून ३०० किमी अंतरावर, तुंग नदीच्या काठी वसलेले एक छोटेसे खेडे. शिमोगा पासूनही हे गाव फक्त ८ किमी अंतरावर आहे. या गावात सामान्य लोकं रोजच्या व्यवहारातही संस्कृत भाषेचा वापर करतात आणि हेच या गावाचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे. या गावात एक जुने रामाचे मंदिर आहे. सोबतच एक शिवालय, सोमेश्वर आणि लक्ष्मीकेशवाचेही मंदिर आहे. या गावातील सर्व जातीचे धर्माचे आणि सर्व स्तरातील लोक संस्कृत बोलतात. अगदी मुलेही सहज संस्कृत बोलतात.

कर्नाटकाची राज्यभाषा कन्नड आहे हे तर आपण जाणतोच. पण, तरीही या गावातील लोकांनी अगदी प्रयत्नपूर्वक आणि जाणीवपूर्वक संस्कृत भाषा जपण्याचा प्रयत्न केला आहे. ५००० लोकसंख्येच्या या गावात संस्कृत न येणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.

या गावात संकेथी या ब्राह्मण समुदायाची वस्ती मोठ्या प्रमाणात होती. हे लोक सुमारे ६०० वर्षापूर्वी केरळवरून इथे येऊन वसले होते. अगदी १९८० पर्यंत या गावातही कर्नाटकातील इतर गावांप्रमाणे कन्नड बोलले जायचे. व्यवहारातील भाषा कन्नडच होती. तसेही भारतात संस्कृत ही भाषा ब्राह्मणांची भाषा म्हणून ओळखली जाते. परंतु या गावातील एका मठाच्या पुजाऱ्यांनीच संपूर्ण गावाला संस्कृत भाषा शिकण्याचे आवाहन केले. संपूर्ण गावाने ही भाषा आत्मसात केली. इथल्या मुलांनाही लहानपणा पासून संस्कृतचे धडे दिले जातात. आज या गावातील सर्व जातीधर्माचे लोक संस्कृत अगदी सहजगत्या बोलतात.

२.      होसहळ्ळी, कर्नाटका –

या गावाला मत्तुरचेच जुळे गाव म्हणून ओळखले जाते. तुंगनदीच्या दुसऱ्या बाजूला वसलेल्या या गावातील लोकही संस्कृत भाषा सहजतेने बोलतात. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गमका कला. ही इथली लोकसंस्कृती आहे, ज्याद्वारे गाण्यातून पूर्वजांच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या जातात. हे गाव शिमोगा पासून फक्त ४ ते  ५ किमी अंतरावर आहे. अगदी दररोज केल्या जाणाऱ्या शीळोप्याच्या गप्पाही इथे संस्कृतमधूनच चालतात.

३.      झिरी, मध्यप्रदेश –

मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील सारंगपूर तालुक्यात हे छोटेसे गाव वसलेले आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम हजार भर असेल. परंतु या गावाने आजही आपल्या पुराणकालीन भाषेचे अस्तित्व जपून ठेवले आहे. इथली स्थानिक भाषा मालवी आहे. परंतु इथे अगदी आबालवृद्धही संस्कृत भाषा बोलतात. गेल्या सोळा वर्षात या गावातील लोकांनी ही भाषा आत्मसात केली आहे. संस्कृत भारती नावाच्या एका संस्थेने इथे संस्कृत संभाषण शिबीर घेण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून या गावातील लोकांना संस्कृतचा परिचय झाला. हळूहळू गावकऱ्यांचा या भाषेतील रस इतका वाढत गेला की गावातील प्रत्येकानेच ही भाषा शिकून घेतली. आज संस्कृत हीच त्यांची दैनंदिन व्यवहाराची भाषा बनून गेली आहे.

४.      ससाना, ओडीसा –

ओडीसातील गजपती जिल्ह्यापासून दूरवर वसलेले हे एक लहान खेडे. इथे ब्राह्मण समुदायातील लोकांची संख्या जास्त आहे. इथले अनेक लोक सरकारी संस्थेत काम करतात. पण, या संस्थाचा व्यवहारही संस्कृतमधूनच चालतो. फक्त ३०० लोकवस्तीच्या या गावातील प्रत्येक घरात एक संस्कृत पंडित आढळेल. या घरातील संस्कृत पंडित संस्कृत माध्यमाच्या सरकारी शाळेत शिकवण्याचे काम करतात. घरातील एका तरी मुलाला संस्कृत माध्यमाच्या शाळेतील शिक्षण मिळेल आणि त्याला या पुरातन भाषेचे अचूक ज्ञान मिळेल याची काळजी इथे घेतली जाते.

५.      बघुवार, मध्यप्रदेश

मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील हे गाव. नरसिंहपूर पासून अवघ्या २१ किमी अंतरावर वसलेले आहे. परंतु या गावाची मुख्य भाषा संस्कृत आहे. गावातील बहुसंख्य लोक हीच भाषा बोलतात. या गावानेही या पुरातन भाषेचे जतन केले आहे.

६.     गनोडा, राजस्थान –

 राजस्थानच्या बन्स्वारा जिल्ह्यातील हे गाव. या गावातील लोक एकमेकांशी बोलताना अगदी सहजपणे संस्कृत भाषा बोलतात. या गावातील स्थानिक भाषा होती वागडी. काही दशकांपूर्वी इथले लोक याच भाषेत बोलत असत. परंतु या गावात एक संस्कृत शाळा उघडण्यात आली. अगदी प्राथमिक पासून ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत या शाळेत संस्कृत मधूनच शिक्षण दिले जाते. या गावातील सर्व मुले याच शाळेत शिकतात. इथले शिक्षक मुलांना संस्कृत शिकण्यासाठी, बोलण्यासाठी, प्रोत्साहित करत असतात. मुलांना संस्कृतची एवढी गोडी लागली आहे, की ते शाळेत आणि घरातही संस्कृतच बोलतात. मुलेच संस्कृत बोलतात म्हंटल्यावर पालकही आपसूकच संस्कृतकडे वळले. हळूहळू संपूर्ण गावाने संस्कृतलाच आपली बोलीभाषा बनवून टाकली. आज गावातील प्रत्येक व्यक्तीला संस्कृत बोलता येते.

७.     मोहद, मध्यप्रदेश –

मध्यप्रदेशच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील हे आणखी एक खेडे. खारगाव या जिल्ह्याच्या ठिकाणा पासून ६० किमी अंतरावर वसले आहे. या गावातील बहुसंख्य लोक संस्कृत भाषा बोलतात. कर्नाटकच्या मत्तुरचाच कित्ता इथेही गिरवला जात आहे. या गावात तीन प्राथमिक शाळा आहेत. याच शाळेतून संस्कृतचे धडे दिले जातात. संस्कृत सर्वांनाच सहजरीत्या शिकता यावी म्हणून या गावातही विशेष प्रयत्न सुरु आहेत. अगदी रोजच्या वापरातील वस्तूला संस्कृत मध्ये काय म्हंटले जाते याच्या चिठ्ठ्या करून त्या-त्या वस्तूवर चिकटवण्यात आल्या आहेत.

अशा रीतीने भारतातील या गावांनी संस्कृत भाषा जपण्याचा आणि ती वृद्धिंगत करण्याचा वसा घेतला आहे. यासाठी त्यांना संस्कृत भारती संभाषण या संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाहिलेल्या संस्थेकडून विशेष सहाय्य मिळत आहे.

 

 

 

 




Post a Comment

1 Comments

वाह....❤️. अशा अनेकविध गोष्टी वाचायला आवडतील.