कोण बघल?

 


पंधराव्या वर्षी लग्न झालेल्या कविताला फक्त येणा-जाणाऱ्या गाड्यांचा बोर्ड तेवढा वाचता येत होता. पंधराव्या वर्षापर्यंतही अगदी रोजच्या रोज शाळेत जाऊन शिकता  येईल अशी सोय नव्हतीच. घरी चार बहिणी, दोन भाऊ. एवढ्या मोठ्या संसारात प्रत्येकालाच काही ना काही वाटा उचलणं भाग होतं. कवितावर ही घरच्या शेळ्या आणि म्हशींची जबाबदारी होती त्यामुळं शिक्षणाचा श्री गणेशा होऊन तो तेवढ्या वरच थांबला होता.

पोरीच्या जबाबदारीतून मोकळं होण्यासाठी आई-वडिलांनी लवकरात लवकर लग्न लावून दिलं. पण, नवरा दारुडा. दोघांचे सतत खटके उडत राहिले. कविता पण काही बसून खाणाऱ्यातली नव्हती. ती पण लोकांच्या शेतात जाऊन भांगलन करायची. दोघांच्या संसाराच सूर जरा कुठ जुळला की नवऱ्याच्या घरचे लगेच त्यात काही ना काही बिब्बा घालायचेच. शेवटी कविता कंटाळून माहेरी आली. नवऱ्याने लाख रुसवा काढायचा प्रयत्न केला पण ती ऐकत नव्हती. सासरच्या लोकांचा जाचच एवढा होता की स्वतः कमवून आणलेलं शांत बसून खाताही येत नव्हतं. ती म्हणे, “आपण माझ्या माह्यारात राहू, तू पन मिळेल ते काम धंदा कर आन मी पण करती.” पण, ते नवऱ्याला काही पटत नव्हतं. सासुरवाडीत राहून जगणं त्याला मान्य नव्हतं. त्याची दारू वाढली. इतकी वाढली इतकी वाढली की एक दिवस त्या दारूनं त्यालाच संपवून टाकला.

एकट्या कविताच्या जीवावर तो चार वर्षांची मुलगीही सोडून गेला. आता कविताला माहेरातच राहणं भाग होतं. ती माहेरात राहू लागली पण, भावजयीला तिचं ओझं होऊ लागलं. आई म्हणे, भावाच्या संसारात काटा होऊ नको. मग कवितानं स्वतःचंच एक पत्र्याच शेड उभं केलं. चार घरची धुनी भांडी धरली. मुबलक पैसा हातात खेळू लागला. घरकामासोबतच पुन्हा म्हसारांचा संसार थाटला. कुणी कामाला येशील का कविता विचारलं तर कविताच्या तोंडून कधी नाही हा शब्दच आला नाही. मिळेल ते काम धरायची. छोट्या पोरीला पण, संगती घेऊन जायची. एकटी पोरगी आहे, आपल्याला तिच्यासाठी करेल तेवढं थोडच असा विचार करून कविता नुसती घाण्याचा बैल झाली. आता तिचा हव्यास तिला चार घास थंडाव्यानं खाऊ देत नव्हता.

एकट्या लेकीसाठी दागिने, बँकेत एफड्या, पिग्मी, दावणीत म्हसरं असा तिच्यान जमेल तसं रग्गड करून ठेवलं तीनं. “कशाला एवढं धावून धावून करतीस गं कवे?” असं कुणी विचारलंच तर ती म्हणे, एकटी पोरगी माझी. कोण बघणार तिला?

माझ्या माघारी तिला कोण बघणार? ती एकटी पडेल. पैसा बघून तरी तिला चांगलं स्थळ मिळेल. अशा विचार चक्रात ती नेहमी गुरफटलेली असे. तिला ताप येत होता. खोकला होता. तरी ती एकही दिवस, कामाचा खाडा करत नसे. शेवटी ताप-खोकल्याने तिला कायमची आपल्या सोबत नेली आणि दहा वर्षाची पोरगी खरोखर एकटी पडली.

कविता खूप करत राहिली पोरीसाठी पण, पोरगी एकटी पडेल हा तिचा विचार शेवटी सत्यात उतरला होता.

थोडं सावरून तिने आधी जागून घेणं शिकलं असतं तर...! पैश्यापेक्षाही माझी साथ तिला महत्वाची आहे, हे तिनं जाणलं असतं तर....! मी कायम माझ्या लेकीच्या पाठीशी राहीन, असा विचार तिने केला असता तर पोरगी एकटी पडली नसती. कविताच्या प्रश्नाचं उत्तर तिच्याजवळच होतं. पोरगीला कोण बघल? तर पोरगीला मी बघेन हेच तीच उत्तर होतं. पण, हा मी सोडून..., स्वतःला सोडून, ती उत्तरासाठी भरकटत राहिली.


© मेघश्री श्रेष्ठी.

Post a Comment

1 Comments

आपले विचार आपलं भविष्य ठरवतं. म्हणून सकारात्मकता ठेवली पाहिजे. छान संदेश.