पोकळी, खरी आणि खोटी!



 

हे खरं खुरं स्वप्न आहे. अर्ध्या तासापूर्वी अंथरुणातून उठण्यापूर्वी या देहाने बंद डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न. मला खरच कळत नाही मी स्वप्नात आहे का? पण, हो मी स्वप्नातच होते. एकाच वेळी भय, कुतूहल, ओढ आणि प्रीती जागवणाऱ्या अद्भुत दुनियेचा हा अनुभव आहे. 

मी एका मैत्रिणीच्या घरी आहे. तिचं घर म्हणजे एक भला मोठा जुना वाडा. त्या वाड्यातील खोल्यांचे छत इतके उंच होते की, आजच्या काळात मधल्या भागात एक स्लॅब टाकला असता तर आणखी एक मजला तयार झाला असता. पण, दुमजली वाटावा अशा उंचीचा तो वाडा एक मजलीच होता. मैत्रिणीच्या घरी तिच्या तीन बहिणी आहेत. त्यांचे चेहरे कधी स्पष्ट दिसतात कधी अस्पष्ट दिसतात. त्यांचे चेहरे कधी ओळखीचे वाटतात तर कधी अनोळखी. त्या फक्त हसतात खिदळतात पण, काय बोलताहेत ते ऐकू येत नाही. माझी मैत्रीण त्यांच्या हसण्या-खिदळण्याला दाद देत तीही त्यांच्यात सामील होतेय. समोर जे काही अनाकलनीय सुरु आहे, त्याकडे मी फक्त शून्य नजरेने पाहत आहे. मी ही आतून हसण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटतंय खूप दिवस झालेत मी यांच्याकडे येऊन आणि आता त्या माझा पाहुणचार करून थकून गेल्यात. त्यांना माझ्यापासून सुटका हवी आहे. मला त्यांच्या नजरेत हे भाव स्पष्ट दिसतात. त्या इतक्या कंटाळल्यात मला की त्यांना माझ्या नजरेला नजरही देऊ वाटत नाहीये. माझी मैत्रीण त्यांच्यासमोर हतबल दिसतेय. इतकं असतानाही मला तो वाडा सोडून जावू वाटत नाहीये. माझा जीव त्या निर्जीव भकास वाड्यात इतका गुंतलाय की मला हा आजूबाजूचा तुसडेपणा अजिबात छळत नाहीये. बस्स मी त्या वाड्यात आहे. एवढीच एक समाधानाची आणि आसक्तीची भावना आहे माझ्या मनात. पण काही करून ही गेली पाहिजे असंच माझ्या मैत्रिणीला वाटत असावं. त्यांनीच माझ्या जाण्याचा दिवस कन्फर्म केला. गाडीची वेळ, तिकीट कन्फर्म केली. आता काही क्षणात ही पिडा इथून जाणार म्हणून त्या खूप खुष होत्या. पण, मला तर जायचं नव्हतं. मी बॅग सुद्धा आवरली नव्हती. मग त्या तिघी घरातून बाहेर गेल्या. त्या परत येईपर्यंत मी माझी बॅग आवरून तयार असेन असा त्यांचा कयास होता. आणि त्या कल्पनेनेच त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटलेलं होतं. त्या वाड्यातून बाहेर गेल्या तरी मी मात्र तशीच भारून गेल्या सारखी उभी. पाठीमागच्या सोप्यात मोठमोठ्या अर्धगोल आकाराच्या खिडक्या आहेत तिथून त्या तिघी मला दिसताहेत. मी त्यांना पाहतीये. पण, त्यांना त्याची जराही भनक नाही. इतक्यात तिथे एक म्हातारी येते. तिच्या अंगावर फिकट गुलाबी रंगाची आणि सोनेरी किनार असलेली नऊवारी आहे. साडीची सोनेरी किनार सोडली तर तिच्या अंगावर कसलीही समृद्धीची खुण नाही. कपाळावर कुंकूही नाही. तोंडाच बोळक झालंय. डोक्यावर अदबीनं घेतलेला पदर बिनधास्तपणे मागच्या हवेशी खेळतोय. ती माझ्याकडे एक तिरपा कटाक्ष टाकून उभी आहे. तिच्या देहावरच्या सुरकुत्या हीच तिची कमाई असावी. मला माहित नव्हतं, ती कोण होती. मला माहितही करून घ्यायचं नव्हतं की ती कोण आहे. ती बऱ्याचदा आम्ही हसताना खिदळतानाही आमच्या मागे मागे घुटमळायची. त्या तिघींना तिच्या त्या तशा नजर रोखून घुटमळत राहण्याचा जणू काहीच त्रास नव्हता. किंबहुना ती घुटमळतेय अशी आपल्या आजूबाजूला याची त्यांना जाणीवही नसावी. त्यांना तशी जाणीव करून द्यावी असं मलाही वाटलं नाही. त्या आजीच्या भावशून्य नजरेचंही मला एक विचित्र आकर्षण होतं. तिने तसंच पाहत राहावं माझ्याकडे असं वाटायचं. ना तीला माझ्याशी काही बोलायचं होतं ना मला तिच्याशी काही बोलायचं होतं. पण, केवळ आमचं असणं आम्हा दोघींसाठीही हवहवंस होतं.

शेवटी त्या फेरफटका मारून घरात आल्या तरी मी तयार नव्हते. आम्ही पुन्हा बोलू लागलो. बोलता बोलता माझी मैत्रीण तिच्या एका मोठ्या बहिणीकडे हात करून म्हणाली, “काय कळत नाही तुला, फ्रेश राहत जा. सतत किरकिर करू नको.” परत माझ्याकडे पाहत म्हणाली. “येत्या २५ डिसेंबरला हिचा वाढदिवस आहे.” मी उत्साहानं त्यांच्या बोलण्यात सहभागी झाली. मी म्हंटल, “२५ डिसेंबर म्हणजे ख्रिसमसना! आम्ही एका मोठ्या खिडकी जवळ बसून अशा गप्पा मारत होतो. त्या खिडकीतून मला पाठीमागचा भला मोठाच्यामोठा चर्च दिसत होता. त्या चर्चाच्या काही मोजक्या खिडक्यांवर रोषणाई होती आणि मोजक्या खिडक्या अंधारात गडप झाल्या होत्या. ज्या खिडक्यात रोषणाई होती तिथे काही मुलं संगीत वाद्य वाजवत होती. काही मुलं मस्त रंगीबेरंगी ड्रेस घालून नाचत होती. त्यांना प्रत्येकांना त्यांचे शिक्षक शिकवत होते. जणू एखाद्या भव्य कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरु होती. इतका मोठा उल्हासाचा प्रसंग समोर असूनही त्या तिघींना ते अजिबात दिसत नव्हतं. मी म्हंटले “२५ डिसेंबर ना? मग हा चर्च रोषणाईने पूर्ण झगमगून जाणार. इथे संगीत वाजणार. नृत्य होणार. कित्ती मज्जा. तुझा वाढदिवस तर आनंदात साजरा होईल. मी ही खूप एन्जॉय करेन.” त्यांना हे वाक्य बिलकुल आवडले नव्हते. म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने मी अजून मुक्काम वाढवणार की काय याची त्यांना धास्ती होती. माझ्या मैत्रिणीनेच माझी बॅग भरायाला घेतली. त्या वाड्याच्या जुन्या फडताळात ठेवलेले माझे कपडे तिथून उचलण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. पण, आता ती भरतेयच तर नाही कसं म्हणणार? वाड्यात छोटी मोरी होती. मी तिथेच मोकळी व्हायला बसले. ती म्हातारी माझ्यावर नजर रोखून तशीच घुटमळत होती. आतल्या बाजूला माझी मैत्रीण माझी बॅग भरत होती अन तिथून जाणं माझ्या जीवावर आलं होतं.

शेवटी त्यांनी मला तिथून बाहेर काढलंच. कस काढलं माहित नाही पण मी एका बस मध्ये होती. दोन दिवसांनी मी पुन्हा त्याच गावात त्याच रस्त्यावरून एका भल्या मोठ्या गेटजवळ उभी होती. माझ्या हातात माझी बॅग होतीच. गेट पूर्ण गंजला होता. मी हाताने ढकलताच कीरकीर आवाज करत तो गेट उघडला. भल्या पहाटेची वेळ आहे. सूर्य उगवतोय. किरणे हळूहळू पसरत आहेत. दाट धुके किरणांना रस्ता करून देत आहेत. मी त्या गेटच्या आत पाउल टाकलं. मी एका पुलावर उभी होती. खाली नदीचा तळ स्वच्छ दिसत होता. नदी होती की शेती काहीच कळत नव्हतं. त्यात फक्त घोट्यापर्यंत  येईल इतकंच पाणी होतं. कुठे कुठे अगदी वितभर उंचीचे तण डुलत होते. ते पाण्याच्या वाहत्या प्रवाहाने डुलत होते. त्या शेतातून एक रबरी पाईप लांबवर कुठेतरी गेली होती. तिला चिरा गेल्याने त्यातून छोट्या कारंज्या उडत होत्या. रबरी पाईपच्या शेजारी एक भला मोठा अजगर डुलत होता. त्याचं भल मोठं जाडजूड सुस्त शरीर अजिबात हलत नव्हतं पण त्याला डूलायचं होतं, नाचायचं होतं, त्याला काहीतरी करायचं होतं आणि तो तसं काहीतरी हालचाल करण्याचा प्रयत्न करत होता. वरून मी त्याच्याकडे टक लावून पहातीये याचं त्याला जराही सोयरसुतक नव्हतं. मी त्याचं प्रचंड धूड बघून घाबरली होती. पण, त्याच्यात आणि माझ्यात सुरक्षित अंतर होतं. त्याच्या शरीरातील सुस्त लय मला भारावून टाकत होती. मी माझ्या मैत्रिणीला हाक देण्यासाठी बेंबीच्या देठापासून वाकून ओरडले. माझ्या हाकेचे ध्वनी विरतात न विरतात तोपर्यंत तिचा प्रतिसाद आला, “आलेच.” आणि ती आली. ती राजदूत सारख्या बाईक वर बसून त्या शेतातून धडधड धडधड करत माझ्यासमोर आली. तिने गुलाबी रंगाचा शॉर्ट घातला होता. त्या आजीची गुलाबी साडी आणि हा गुलाबी शॉर्ट अगदी एकाच रंगाचे. ती बाईकवरून उतरली आणि ती बाईक गायब झाली. मी तिला म्हंटल अगं इथे अजगर आहेत. ती म्हणाली कुठे आहे. मग मी आजूबाजूला पहिले तर छोटे छोटे अजगराचे पिल्ले शोभतील असे तपकिरी, पिवळ्या, हिरव्या रंगाचे दोन-तीन अजगर माझ्या पासून काही अंतरावर पडले होते. आणि ते मान वर करून माझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात ते छोटे छोटे अजगर तिने कागदाचे कपटे उचलावे असे उचलले आणि पुलावरून खाली फेकून दिले. तो पुलाखालाचा भला मोठा अजगर तिला दिसला होता की नाही. माहित नाही. मीही तिला तो अजगर दाखवण्याची तसदी घेतली नाही. त्याच्या त्या डूलण्याकडे पाहत पाहतच आम्ही निघालो. ती काहीतरी बोलत होती. तीच्या मागून आलेली तिची बहिण तिच्याकडे रागात पाहत होती. मी तिच्याकडे लक्षच दिले नाही. आम्ही काही बाही बोलत होतो. आजूबाजूला शेतात पिके डुलत होती. त्या पिकांच्या हिरव्या कंच पानावर मोत्याचे लड चिकटावेत तसे दवबिंदू लगडलेत. चमचमणारे दवबिंदू. त्यांचा ताजा गंध. ताजी हवा. दूरवर पसरलेली हिरवळ. हे सगळं पाहत मी मैत्रिणीला विचारतेय आता इथे अजून अजगर नसतील ना? ती म्हणाली, “नाही गं. असले तरी आम्हाला त्यांची सवय झाले. काही नाही वात.” शेताचे असे दोन-तीन लांबलचक पट्टे पार केल्यावर मी त्या वाड्या समोर उभी होते. नथॅनियल हॉथॉनच्या कादंबरीत असतो तसा तो भुताटकी, पछाडलेला आणि पडका वाडा पाहून मला हायसं वाटत होतं. वाड्याचा दरवाजा मैत्रिणीने उघडला तर समोरच कट्ट्यावर ती गुलाबी लुगड्यातील म्हातारी बसली होती. तिने तशीच भावशून्य नजर माझ्यावर टाकली. जणू तिला माहित होते मी परत येणार. ज्या भुताटकी वाड्यात जायचीही इतरांना भीती वाटेल अशा वाड्यात पोहोचून मला अपार आनंद झाला होता. वाड्याची ती पोकळी पाहून मी हसत होते, आनंदाने. त्या म्हातारीला पाहूनही मला आनंद होत होता. ती मैत्रीण आणि तिच्या त्या बहिणी आता दिसत नव्हत्या. फक्त मी, त्या वाड्यातील ती पोकळी आणि ती म्हातारी. एकटी असूनही मी आनंदी होते. माझं त्या म्हातारीशी आणि त्या गूढ-भुताटकी वाड्यातील त्या पोकळीशी काही तरी नातं असावं का?


मेघश्री

 

Post a Comment

8 Comments

जबरदस्त लिखाण.... अफाट. ♥️
Aishwarya said…
Khup Chan lekhan
खूप छान! हे स्वप्न कथेप्रमाणे शब्दांत उतरवले आहे। यात उत्तम गूढ कथेची बीजे दडली आहेत. तो जुनाट वाडा, त्या अर्धगोल खिडक्या, ती शेते, ते अजगर, पाणी यांच्या एक गूढ अर्थ असावा असे वाटत राहते.
Amit Medhavi said…
खूप छान.. ओघवती भाषाशैली तुमचे सामर्थ्य आहे.
poulo said…
आपली कथा खरोखरच एका अदभूत जगात घेऊन जाते.. ऑस्कर वाइल्ड यांच्या कथाची आठवण आली


Sheetal said…
अप्रतिम कथा गुंफली आहे