नक्की बदल होतोय?
माझं लग्न झालं तेंव्हा सोनी चार वर्षाची होती. ती
आईच्या पोटात असतानाच तिचा दारुडा बाप तिला आणि तिच्या आईला टाकून गेला होता. सोनी
पंधरा वर्षाची झाली आणि तिचं लग्न झालं. सोळाव्या वर्षीच तीही एका मुलाची आई बनली.
सोनीला शिक्षणाचा गंधही नाही. त्यामुळे तिला शिकवण्याच्या वगैरे भानगडीत पडलेच
नाहीत घरचे. त्यात वयात आलेल्या पोरीची जबाबदारी कोण घेणार म्हणून तिला शक्य तितक्या
लवकर नवरा करून देतात. एकदा नवरा करून दिला की तिच्या जबाबदारीतून मुक्ती मिळते.
पण, तिच्या जबाबदारीतून मुक्त होताना तिच्या कोवळ्या खांद्यावर किती मोठी जबाबदारी
लादली गेली याचा मात्र कुणीच विचार केला नाही. बाईच्या जातीचं शेवटी हेच हाल. आज न
उद्या तोच भोग म्हणून कोवळ्या सोनीवर लादलेल्या मातृत्वाचं समर्थन करणे ओघानेच
आले.
आमचे अजून एक शेजारी. त्यांचा मुलगा आठवी
नववीच्या वयात वाह्यातपणा करू लागला. मित्रांसोबत दिवस दिवस भटकणे, शाळेला
बुट्ट्या मारणे, शिक्षकांच्या खोड्या काढणे, आईवडील काही बोलले तर आत्महत्येची
धमकी देणे, त्याचा वाह्यातपणा वाढत गेला. नववी दहावी पर्यंत तर अट्टल दारुड्या
सारखा दारू पिऊन येई आणि आई वडिलांशी भांडण काढे. हातातोंडाशी आलेला मुलगा असा वाया जाताना पाहून वडलांना टेन्शन आले. त्यांना
अटॅक आला. आईने कसे तरी कर्ज वगैरे काढून त्यांचे ऑपरेशन केले. पण, इतकी मोठी वेळ
येऊनही मुलाच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. मग सगळ्यांनी सल्ले देणे सुरु
केले. थोर लोकांच्या थोर अनुभवानुसार त्याचं लग्न करून देण्याचं ठरलं. वयाच्या
अठराव्या वर्षी मुलगी बघून त्याचं लग्न लावून देण्यात आलं. तो अठरा वर्षांचा आणि
मुलगी पंधरा वर्षांची. पण, लग्न करूनही त्याच्या स्वभावात काही बदल नाही. उलट,
खाणाऱ्या तोंडात आणखी एकाची भर. मग, घरातील भांडणाला आणखी नवी कारणं आणि त्याला
जबाबदार ती कोवळी पंधरा वर्षांची पोर. मग निसर्ग नियमानुसार दोन वर्षात घरातील
सदस्य संख्या आणखी दोन अंकांनी वाढली. पण, त्याच्यात मात्र अजुनही कडीमात्र बदल
झालेला नाही. उलट, त्याची मिजास आणि गुर्मी अजून वाढतेच आहे. बायकोला सतत बदडत
असतो. तिच्या ओरडण्याच्या बोंबलण्याचा आवाज वरचेवर कानावर पडत असतो. पण, कुणीही
लक्ष देत नाही. कारण लक्ष घालयला गेले की हा जाऊन तिलाच चार लाथा घालायला मोकळा.
वरून सतत तिच्या घराच्याकडून पैशाची मागणी हे तर आहेच.
अंजू हे आणखी एक उदाहरण. अंजूच्या वडिलानेही
अंजूच्या आईला टाकून दिली होती. अंजू लहानाची मोठी मामाच्याच घरात झाली. अंजूच्या
मामाचे लग्न झाले नव्हते. अंजू लहानपणी मामला मुली बघायला जाताना स्वतः मोठ्या
हौसेने जायची. तिचा मामा दिसायला थोडा कुरूप. घरची जमीन वगैरे असूनही मुली त्याला
पसंतच करत नव्हत्या. शेवटी अंजूला पदर आल्यावर अंजूची आई आज्जी आणि मोठी बहिण
यांनी मिळून तिलाच मामाशी लग्न करण्यास तयार केले. १६ वर्षाच्या अंजूचे पन्नाशीकडे
झुकलेल्या तेही दिसायला अगदीच कुरूप असणाऱ्या मामाशीच लग्न लावून दिले. का तर
म्हणे एवढी मोठ्या इस्टेटीवर दुसरी कोणीतरी हक्क सांगणार मग आपल्याच घरातल्या घरात
राहिली जमीन आणि पोरगी पण तर काय बिघडलं? तीन वर्षे झाली लग्नाला तरी तिला मुल होत
नव्हते, म्हणून तिच्यावर दबाव.
आजूबाजूला अशी अनेक जिवंत उदाहरणे बघितली. जिथे
पंधराव्या सोळाव्या वर्षी मुलींची लग्ने लावून देण्यात आली आणि कमी वयातच त्या
संसाराच्या गाड्याला जुंपल्या गेला.
माझ्याच दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळी, दवाखान्यात
एक पेशंट अॅडमिट झाले होते. डिलिव्हरीचीच केस होती. सतराव्या वर्षी ती मुलगी
दुसऱ्या डिलिव्हरीसाठी अॅडमिट झाली होती. केस खूपच क्रिटीकल वाटत होती. सिस्टर
तिच्या नवऱ्याला अगदी झोडपून काढत होती. इतक्या लहान वयात इतकी मोठी रिस्क कोण
घेणार वगैरे वगैरे. नवरा मान खाली घालून ऐकून घेत होता. सिस्टरने त्याचे वय
विचारले तर २२ कि २३ सांगितले. पहिले मुल आणि दुसरे यांच्यात फक्त दोन वर्षाचे
अंतर होते.
शेजारच्याच बेडवर आणखी एक मुलगी होती. तीही
विशीच्या आसपासच असेल. तिचीही दुसरी खेप. पहिली मुलगी आणि दुसरीही मुलगी म्हणून
डिलिव्हरी झाल्यापासून रडत होती. चार पाच दिवस तरी सासरचे लोक मुलीचे आणि
बाळंतीणीचेही तोंड पाहायला आले नाहीत. तिनेही मुलीला लवकर अंगावर पाजायला घेतले
नाही. का तर मुलगी झाली म्हणून.
आणखी एक किस्सा असाच. दूर डोंगरातील गावात
दवाखान्याची सोय नसल्याने डिलिव्हरीच्या वेळेला डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. खूप
उशिरा घरचे जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात घेऊन आले आणि सीझर केलं. तरीही मुल हाती लागलंच
नाही. पहिलीच वेळ. तीही सीझर करावी लागली आणि मुलही हाती लागलं नाही ते वेगळच.
मुली म्हणून जन्माला येणं हा खरच गुन्हा आहे का?
ही आणि अशी कितीतरी उदाहरणं स्वतःच्या डोळ्यांनी
बघितल्यावर बदल झालाय म्हणजे काय झालाय? आणि बदल होतोय म्हणणारे कुठल्या जगात
राहतात हेच कळत नाहीये.
© मेघश्री.
Comments