मातृत्व

 आज आईचा दिवस. Mother's Day. आई काय असते हे ती आपल्या आयुष्यात "असते" तोपर्यंत कळत नाही.  असे जोशाने दिवस-बिवस साजरे करून आपण आपली जबाबदारी झटकतोय की आधीच जबाबदारीने वाकलेल्या तिच्या खांद्यावर अजून भार लादतोय याचा विचार होणं गरजेचं आहे. खरं तर प्रत्येक नात्याचं वय हे त्यातील गरजेवर अवलंबून असतं. गरज, स्वार्थ, ओलावा संपत आला की नाती मरायला टेकतात, पण मरत नाहीत. आपण मानुष्यप्राणी आपल्या गरजांसाठी नात्यांचं चित्र विचित्र जाळं विणतो. या जाळ्यात सर्वात जास्त गुरफटून जाते ती बाई.
आईपण समजून घेण्याऐवजी त्याचं उदात्तीकरण करण्यात आपण मानलेली धन्यता कोत्यावृत्तीचं द्योतक आहे. आपण आईपणाचा उत्सव करू पाहतोय पण आईपण वाटून घेऊ पहात नाही.
आई होणं ही फार व्यापक आणि सुंदर गोष्ट आहे. पण, आपण ही संकल्पना फक्त योनी, गर्भाशय आणि त्या गर्भाशयाची उत्पादकता एवढ्या त्रिसुत्रीत बंदिस्त केली. जी बाई मुल जन्माला घालू शकते तीच आई होऊ शकते आणि त्यातही जर तीने पुरूष जन्माला घातला तर ती सन्माननीय असते. मनुस्मृतीनं सांगून ठेवलंय, 'मुलगी झाली आणि कुणी विचारलंच काय झालं? तर, काहीही झालं नाही, असं उत्तर द्यायचं. म्हणजे मुलगी "काहीही" नसते.
पण तीच मुलगी जेव्हा प्रजननक्षम होते आणि पुत्र जन्माला घालते तेव्हा ती, माता, माऊली, जननी, होते, ममतेचा सागर होते, सौख्याचा आगर होते.
पण तिला काय व्हायचं आहे, हे कुणी ध्यानात घेत नाही.
 प्रजननक्षम असलेल्या तिला असं अनंत विशेषणांनी गोंजारताना, जिच्या जवळ प्रजननक्षमता नाही, अशा 'तिला' अव्हेरण्याचा, नाकारण्याचा, वाळीत टाकण्याचा घाट घातला जातो. तिच्याजवळ नसलेल्या मातृत्वाबद्दल तिला वांझोटी बनवून नालायक ठरवलं जातं. तिच्यातलं माणूसपण संपवलं जातं. जणू काही आई होणं हाच बाईच्या जीवनाचा एकमेव हेतू आहे आणि त्यातही पुरुषाची आई होणं तर आपल्याकडे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं.
आईपण खरंच इतकं संकुचित असतं का? मातृत्वाकडे आपण परंपरागत दृष्टीनं न पाहता, थोडा व्यापक दृष्टिकोन स्वीकारायला हवा.
माता ही अशी व्यक्ती असते जी तुमच्या तील सुप्त शक्ती जागृत करून सत्याच्या मार्गावर चालत राहण्याची प्रेरणा
 देते. जीवनाचा परिघ अधिकाधिक व्यापक करत, स्वत:सह इतरांच्या कल्याणाचा मार्ग दाखवते. मी पणाच्या कोत्या वर्तुळातून बाहेर काढून समष्टिकडे करुणेच्या भावनेनं पाहण्याची दृष्टी देते.
अशी माता होण्यासाठी लिंग, योनी किंवा गर्भाशयाची गरज नसते. तिथे गरज असते प्रज्ञेची, करुणेची, आत्मभानाची.
प्रज्ञा, करुणा आणि शील असलेली व्यक्तीच माता म्हणवून घेण्यास योग्य असते.
तुम्ही पुरुष आहात किंवा स्त्री त्याचा मातृत्वाशी काडीचाही संबंध नाही.
©मेघश्री श्रेष्ठी.

Post a Comment

3 Comments

तुम्ही पुरुष आहात किंवा स्त्री त्याचा मातृत्वाशी काडीचाही संबंध नाही. खरंय 💚
Meghashree said…
धन्यवाद लखन