खेळ मांडला


खेळ मांडला 

दुपारच्या वेळेत मी दुकानात जाण्यासाठी बाहेर पडले. दहा रुपयाची डाळ आणायची होती संध्याकाळच्या आमटीला. दारात गोट्या गोट्यांचा डाव मांडून बसलेला. तो आणि गल्लीतलीच आणखी दोन पोरं.
"का रे गोट्या शाळेत गेला नाहीस? शाळा चुकवून कसला खेळ खेळतोयस शाळेतून आल्यावर खेळायचं ना!" गोट्या तेंव्हा असेल दहा-बारा वर्षांचा.
गोट्यानं  माझं ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं...
घरासमोरच्या पडवीत गोट्याची आई म्हशीला पाणी पाजत होती.
"आगं ये कुणाला येरे जारे करतीयास गं? व्हय? दिसत न्हाय का दीर हाय तो धाकला लहानगा असला म्हून काय झालं तेला मानानं बोलवायचं ध्यानात घी नीट. व्हय त्यो शिकलेला तोरा न्हाय दावायचा हितं. हां सांगितलं न्हाय म्हणशील पुना.."
मी गांगरून गेले,
म्हंटल,
"भावोजी, अहो शाळेत जायचं नाही का?"
आत्ताही गोट्यानं ऐकून न ऐकल्यासारखंच केलं पण आत्ता जरा त्याचं नाकही फुरफुरल शेवटी त्याच्या आईनं मला झापलं होतं.
मी तशीच दुकानात गेले. लाजतकाजत दहा रुपयांची डाळ मागितली. हो लाजतकाजत कारण दुकानदारांना हल्ली पाच-धा रुपयांचं गिऱ्हाईक आवडत नाहीत. ते बोलून दाखवतात, "काय कळतं का तुम्हाला अशी पाच-धा रुपयाची डाळ मागत्यात व्हय अडाणी माणसागतनी?"
मग काय गप्प खाली मान घालून उभं राहायचं.
असं बोलला तरी तो दहा रुपयांची डाळ द्यायचा वजनात बसवून.
डाळ घेऊन मी मुकाट्यानं घरी चालले. गोट्या आत्ता दारात न्हवता.
मी घरात आले आणि माझ्या कामाला लागले.
दर एक दोन  दिवसांनी मला गोट्या दारात दिसायचाच. कारण दर एक-दोन दिवसांनी मलाही दहा रुपयाची डाळ आणायला जायला लागायचच.
गोट्या एकदम हडकुळा आणि काळा कुळकुळीत. त्याच्या काळ्या रंगानं त्याची रेखीव चेहरेपट्टी अगदी खुलून दिसायची. सरळ आणि धारधार नाक, पाणीदार डोळे, रेखीव ओठ, तजेलदार आणि स्वच्छ चेहरा. कधी मधी शाळेत जायचा मनात आलं तर, नाही तर सतत गोट्यांचा डाव मांडलेला. आजूबाजूची पोरं पण तशीच... कुणालाच शाळेच गांभीर्य नाही. पण गुरांना वैरण घालणे, त्यांना धुणे, गोटा स्वच्छ ठेवणे, हे सगळं मात्र आवडीचं काम.
माझ्याकडं गावातली काही पोरं शिकवणीला यायची... त्यांच्या फी मधून माझ जेमतेम भागायचं. कधी कोण कोण महिनाभर यायचं आणि फी मागितली की बंद व्हायचं. गोट्या मात्र कधी शिकवणीला आला नाही. त्याला मुळातच शाळेची आवड नव्हती मग शिकवणी तर लांबच. हळूहळू पोरं वाढतील तशी माझी शिकवणी चांगली चालायला लागली. नवर्याला पण शेजारच्या गावातल्या खाजगी शाळेत नोकरी होती. पण पाच-सहा महिने पगारच व्हायचा नाही, त्त्यात आमच्या सासऱ्याला टीबी झाल्याला. निम्मा पगार पाणी तर त्याच्या औषध पाण्यावरच जायचा. हातात शिलक काही उरायचंच नाही कधी. मग मीच विचार केला, एका हाताला आणखी एक हाताची मदत झाली तर, चार पैसे ज्यादा मिळतील. तसं पण अजून काही मुलबाळ नव्हत त्यामुळ कसला गुंता नव्हता. घरातलं आवरलं की बराच वेळ राहायचा. मी शहरात वाढलेली, जास्त नाही पण ग्रॅजुएशन झालेलं. त्यामुळ शिकवणी घ्यायला काही अडचण वाटली नाही. लोकांनी पण चांगली साथ दिली. सासूबाई एक म्हैस पाळायच्या. असं एकाला दुसर्याची मदत व्हायची, त्यामुळं किमान हातातोंडाची तरी गाठ पडायची. हळूहळू मी शिवणाचे आणि विणकामाचे क्लासही सुरु केले. आत्ता थोडे बरे दिवस होते. दहा रुपया ऐवजी अगदी आठवड्याचा का होईना पण बाजार भारता यायचा... वर्ष अशीच सरून गेली... मला मुल बाळ काही झालच नाही. बघता बघता गोट्याची दहावी आली. तरीही त्याचे उद्योग काही बदलले नव्हते.
खरं तर त्याला दोष देण्यासारखी त्याची ही चूक नव्हतीच. घरात मुळातच कुणी शिकलेलं नव्हत, आई-वडील मोल-मजुरी करूनच जगायचे, त्यात जेमतेम घर कसबसं चालायचं. शाळा म्हणजे गोट्यासाठी तुरुंगच कारण आई-बापाच्या मागून त्यालाही रानामाळात भटकायला मिळायचं. गुराढोरामध्ये हुंदडायल मिळायचं. आई-बापाच्या मागून शेतात गेलं कि पोराची जात म्हणून त्याच्या पण हातात कधी भुईमुगाच्या शेंगा, भाजीपाला, मक्याची कणस, कुणीकुणी द्यायचं. मोठा होत गेला तसा वैरणीचा भारा पण आणू लागला. दारुडा बाप खंगत चालला तसा, गोट्या स्वतःहूनच हे सगळ मनापासून करू लागला. त्याला आईची काळजी वाटायची. बापाच्या तुलनेत आई तरणी दिसायची. प्रत्येकाची नजर काही सरळ असतीच असं नाही. आईकडं उगाच कुणी निरखून बघायला लागलं, तिच्याशी उगीच कुणी जास्त चेष्टा मस्करी करायला लागलं की गोट्याचा संताप व्हायचा. बर त्याला हे कुणाजवळ बोलूनही दाखवता यायचं नाही. त्याच्या परिस्थितीन त्याला अकाली प्रौढ बनवलं आणि तो लवकरच घरातलं कर्ता माणूस झाला. खर तर त्याच्या बद्दल होत गेलेले हे बदल इतक्या बारकाइन कधी टिपले गेलेच न्हवते. हे सगळ आत्ता आठवतय कारण, तो अकाली प्रौढ झालेला गोट्या असाच अवेळी मरून गेला, म्हणून.
"आर ये माकडा लक्ष कुट हाय रं....! आरं निट नेम धरून हाण की लेका... " सोम्या सांगत व्हता मला ....
"व्हय व्हय"
"गोट्या ही कोण रं आत्ता तुला भावोजी म्हणाली?" सोम्यान इचारलं
"आर वैनी हाय माजी"
"काय सारकसारक लेका अब्यास कराय सांगती र .... तिला लय आवड आसल तर तूच शिकजा म्हणावं की..."
"अय्ये लेका... काय झालं रं सांगितल म्हून? काय घालीवला का तुला लगी शाळत?"
सोम्याला कुणी शाळत जा म्हणाल की तेच डोस्कच फिरायचं...
"वैनीला बी काय करायचंय आमी शाळत जाऊ नाय तर नाय जाऊ...."
******************************************************************************
बर झालं आईनं चांगलीच झापवली पुना काय बोलनार नाय....
आमच्या अक्ख्या गल्लीत ह्यो मह्यादा तेवढाच शिकलेला.... बाकी सगळी अशीच दहावी-बारावीतनंच शाळा सोडल्याली. काय करणार शाळा आणि ढोरांचा व्याप काय एकदम सांभाळायला जमतंय व्हय...! आणि तसं बी शाळेत काय आपल लक्ष लागत न्हाय... आपल रानामाळातलं कामच बरं वाटतय. कसाय की शाळात काय आलं न्हायी का मास्तर लगेच कायबायी बोलत्याती... मारत्याती, मारून काय टकुर्यात जाणारय का ते काय शिकवत्यात ते? नकोच वाटती ती शाळा. खरंच. सारख आपल असलं कागद आणा, तसली व्हइ आणा, हे लिवा नी ते लिवा... लिवून कुठ काय मिळतय तवा...आता ह्यो मह्यादाच बघा की, पुण्यातन शिकून आलाय तरीबी चांगली नोकरी न्हाय... कुठ कामासाठी नुसता वनावना हिंडत असतो.... कस काय ब्वा एव्हढ शिकून बी नोकरी लागत न्हाय कुणास ठावूक, अवघड हाय का नाय आत्ता...? कशाला शिकायचं मग? ते शिकून बी परत श्यान-घाण काढायची काय सुटत न्हाय तर...?
आणि लय शिकलं की श्यान घाण बी काढू वाटत न्हाय.... त्यापरीस आपला आत्तापासूनच ढोरं आणि शेतीभातीचीकामं केलेली बरी,.... सवय बी हुईल आणि चार पैस बी हातात खेळतील.... कस हाय कवा न कवा.... हातात ईळा घायचाच हाय तर तो अत्तापास्नच घेतलेल्या बरा... पुढ जाऊन तरास नग...व्हय...!
आता तो सखू काकीचा विशल्याच बघ कि, त्या मह्यादाच्या मागन बारावी झाला. लगेच अबसंग ट्रॅक्टरवर जाय लागला नाही तोवर आता त्याला वेगळ कामपन मिळालं. मग अस हाय.... आण ह्यो शिकलेला गडी बायकोला धा रुपयाची डाळ आणायला घालवतुय! हाहाहा..!!!

"ये गोट्या आरं लेका, चल कि एक डाव मांडू"
सोम्यानं आवाज दिला तसा गोट्या परत भानावर आला.
काय नाय रं सोम्या, ही वैनी बग की लेका! किती बिचारीच हाल असत्याल न्हायी? एवढा शिकलेला नवरा केला तरी जन्माच दरींदर काय फिटना आणि आमास्नी संगती वर अब्यास कराय.... काय मिळलं असल रं ह्यास्नी अब्यास करून? न्हाय तरी, एक वेळच जेवण बी मिळना.... त्यापेक्षा आमचं बरं  दुधाच्या बिलावं कुणी उदार तर द्यायला तयार होतंय. भ्या नाय वाटत उदारीच."
"जाऊदे कि लेका, तू का फुकट तेंच्यासाठनं रगात आटवतोयास इचार करून चल खेळ कि गप्पगुमान."
आमचा डाव परत रंगात आला.
दादा संध्याकाळी दारू ढोसून पडलेला असतो नुसता... आईच त्वांड बडबडा चालू असतंय. कशाला एव्हढ्या शिव्या घालायच्या? शिव्या देऊन काय सुदरनार हाय का ते मानुस? त्यापेक्षा आईन गप्प बसावं. माझ्याबी जीवाला शांती... आय;अ हेंच्या अशा भांडणातनच काय सुचत न्हाय. तेन दारू पिऊन पडायचं आणि हीन शिव्या घालायच्या... रातभर तमाशा करत्याती नुस्ता.
पण दादान तर कशाला अस वागायचं. मर मर कामं करायची लोकांची आणि दारू पिऊन यायचं घरला. तेला म्हणायला येत न्हाय का! मला दारू नगं पैस द्या म्हून! अस कुटवर ह्यो दारूपायी काम करायचा अशान जाईल एक दिस त्या सुर्या बापुवाणी मारून. म्हंजे कळल. आई बोलती म्हंजी तिला कळतंय म्हून बोलती. आत्ता दादाला सारखा सारखा त्या रक्ताड्यांच्या कामावर घालीवनारच न्हाय. आत्ता मीच जाईन कामाला. काय हुतंय! न्हाय तरी शाळत आपन कवा जातच न्हाय.
सातवी आठवीला असल्या पासून गोट्या आईच्या मागून कामावर जायला लागला. भांगलायचं, कापणी, म्हशीला गवत, धार काढायची, दुध घालायचं, हळू हळू त्यान सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दादाच्या हातच काम सुटाव आणि त्याची दारू पण सुटावी म्हणून. त्याला वाटायचं आपण थोडा घरातला भार हलका केला तर घरात सगळं सुरळीत होईल.
"गोट्या, आर शाळा सोडलीस व्हय रं?" सदा आबान गोट्याला विचारलं.
"न्हाय आबा, नांव हाय कि शाळत खरं, आज गेलो न्हाय, आईसंग आलो जरा."
आर मग अब्यास कसा व्हायचा रं?"
आवो! आबा त्यो काय ध्यान दिऊन शिकतुय व्हय? नुसता ढोरं, श्यान घाण वैरण, दुध आणि दुधाचा पैसा झाला म्हंजी झालं बगा, आं... काय करायचं सांगा, शिकायचं वय हाय मग शिकून घ्यावं कनाय, बसतोय रानोमाळ हिंडत, शिकला तर कुट तर चार पैशाची नोकरी करल म्हंटल... तर ह्याच काय श्यान न्हाय त्या शाळत! आबा सांगा जरा शिकला तर तेचच चांगल हाय काय आमच्यासाठन सांगतोय व्हय आमी?"
"आर गोट्या आय एवढ गाड्यावाणी काम वडतिया घरातलं, ढोराच, बहिरच... ते काय तू असा रोजगार करावा म्हणून व्हय रं, आर लेका समजून घ्यावं कवा तर!"
"हं" एवढंच बोलून गोट्या परत आपल्या कामाला लागला.
असेच दिवस जात राहिले. आता गोट्या दहावीत असायला हवा होता. पण त्याच्या घरच्यांच काही त्यानं कधी ऐकल नाही. एकदा त्यानं शाळा सोडली ती सोडलीच. आता तो ऊस तोडीवर किंवा शेतातल्या रोजंदारीवर जायचा. हातात ताजा ताजा पैसा खेळायचा.
"अय गोट्या चल कि जरा हितनं यीऊया"
"कशाला रं आता यवड्या संद्याकाळचं?"
आर य हिकड सांगतु."
दारात उभारलेल्या गोट्याला सोम्यानं हाक मारली.
ह्या सोम्यानं पण कधीचीच शाळा सोडल्याली. असाच काम मिळंल त्या दिवशी करायचं आणि नाही मिळंल त्या दिवशी हिंडायचं, असा त्याचा दिनक्रम.
काय रं सोम्या कशाला हाक मारत हुतास?"
"चल कि जरा लेवल लाऊन यिऊ लेका सकाळपास्न डोस्क जड झालंय, लेका. आईनं नुस्तं डोस्क उटीवलय बग."
"का? आता तिला काय झालंय?"
"हेच कि लेका, घराची वडातान, शाळा शिक म्हनत हुती. अपुन काय तिला भिक घातली न्हाय, आता बोम्बालती.... भाडयानं कव्वा कव्वा ऐकलं न्हाई म्हून."
"चल आरं जाऊदी आमच्यात बी तेच हाय, लेका ह्यास्नी आमी वज्जी वादात हुतो तवा गॉड वाटायचं आणि आत्ता घरच भागना म्हून बोम्बालत्यात. आत्ता म्हागाई वाडली त्येला आमी काय करायचं? करतुयाच न्हव कळतंय तवा पास्न? आं! अवघड हाय लेका!"
"तर काय, बर कमावल्याल आमी हेंच्याच हातात घालातुय न्हवं! का कुटं जीवाची मंबई केली आं? तेच चुकतंय बग आपलं. आयला चड्डीत असल्या पास्न राबतुय खर आपन कवा जीवाची मंबई केली न्हाई. आता हितन पुढ आदी आपला जीव, खाणं, पिणं, ऐश करन, मग हेंच घर, बगतुचकाय करत्यात."
"म्हंजी काय करणार हायीस तू?"
"पिणार हाय." गोट्या सोन्याच्या तोंडाकड बघतच राहिला.
*****************************************************************
रात्रीचे ९-१० वाजले.
गोट्याची आई सैरभैर झालेली. गोट्या अजून घरात आला न्हवता. ती गल्लीतून येरझार्या घालत होती. कोण जाणारं येणारं दिसलं तरी, गोट्याला पाहिलं का विचारायची.
आम्ही नुकतच जेवण आटोपून दारात येऊन बसलो होतो. ह्यांनी तिला आवाज दिला.
"काके काय गं, काय झालं अशी का बावरलीयास?"
"काय न्हाय बग मह्या आरं गोट्या आला न्हाई अजून. एवढा वेळ कदी करत न्हाई बग म्हनून बगाय आलू बाहीर."
"यील की काके काय ल्हान हाय व्हय, एवढी काळजी करायला? जेवलीस का न्हाईस अजून?"
"न्हाय बाबा, कदी न्हाई ते पॉर येवडा उशीर आल्याल न्हाय आणि तुकडा गीळतुय व्हय? नाही बाबा अजून जेवल्यालू, तेचीच वाट बघतुया कवाधरन! का आला न्हाई अजून कुणास ठावक?."
त्या दोघांची चर्चा सुरूच होती तोवर कुणाचा तरी आवाज आला. आवळ कसला बरळणच ते...
"ये दोस्ती हम नहीं छोडेंगे...."
अग बाई हे काय गोट्या आणि सोन्या भेलकांडतच येत होते. गोट्याची आई तर किंचाळलीच.
"अरे देवा! काय रं हे? हे दिस बागाय जिती र्हालुय व्हय... अरे देवा काय रं दिस दाखवलस हे? आत्ता काय करू करू?" तिने तर अगदी गहिअवरच घातला.
त्याची ती अवस्था बघून ह्यांना पण राग आला. हे दात ओठ खाऊन शीव्या देतंच ते पुढे गेले. त्याच्या शर्टची कॉलर धरून त्याला गदागदा हलवला.
"बेट्या, लय शहाणा झालास काय? हरामखोर, नालायक...."
एक हातांनी त्याची कॉलर धरून दुसर्या हातांनी त्याला थोबाडात ... ह्यांनी शिव्यांचा भडीमार सुरूच ठेवला.
गोट्यालाही राग आला तो ही शिव्या देऊ लागला.  तो ह्यांच्या वर हात उचलणार इतक्यात, काकी मधी पडली आणि तिने गोट्याला ह्यांच्या हातातून सोडवून घेतला....
"ये कुणाला बे हरामखोर बोलतोस साल्या, तू हरामखोर, तुझा बाप हरामखोर...!! साला मला शहाणपण शिकवतो काय बे साला!!"
"चल बाबा चल, उगी कुणाच्या तोंडाला लागू नगं.... चल गरीबाचं दिसलं कि समद्यांचच हात शिवशिवत्यात काय करणार लेका चल आपल तू घरात."
काकी त्याला काही बोलण्याऐवजी त्याचीच बाजू घेऊन त्याला पाठीशी घालत होती.
"आई, मी पिलेली न्हाई ग आई तुजी शप्पत!" त्याला आत्ता नीट बोलताही येत नव्हत.
"जेव जेवून घे अगुदार बागू! तसं झ्वाप लागणार न्हाय.... चल रं बाबा चल जेव अगुदर."
"व्हय व्हय आई, तुलाच माजी काळजी, दुसर कोण हाय का मला आई? थांब जेवतो खर खर दादा कुट गेलाय?"
"हाय की हाय दादा, जेवून झोपलाय. तेला काय होतंय. पडलाय की ढोसून."
"किती वकूत झालं वाट बघतुय तुजी लेकरा परत असं करू नगस बर का एक वेळ झालं ते बास झालं. आत्ता तूबी बावाणी मझ्या नशिबाला तेच आनु नगं बग..." तिचा आवाज अडखळत होता. डोळे भरून आलेले.
असाच काहीबाही बोलून तिने गोट्याला चार घास कसबस खायला घातलं आणि ती झोपली.
ह्यांचा आपला उगाच पारा चढलेला.. मी म्हंटल, "राहूदे हो त्याची आईच त्याला पाठीशी घालते मग आपण काय करणार? वर आपण काय बोलायला गेलो तर आपल्याशीच भांडण करतील."
"अग पण याच वय काय अस झिंगत घरी यायचं? एक तर शाळा सोडली ते सोडली तेंव्हाही किती समजावलं तरी ऐकलं नाही. काकून तेंव्हा पण त्याचीच बाजू घेतली. म्हणूनच हे दिवस आले."
असुदे आत्ता तो ही शुद्धीत नाही आणि काकूही रागात आहे. नंतर बघू आपण त्यांना कस समजवायचं ते."
मनाची कशीतरी समजूत घातली आणि आम्हीही झोपी गेलो.
*******************************************************************************************
'मायला डोकं इतकं जड जड का झालंय? अंह... चांगलंच ठणकायला बी लागलंय.'
"आये ए आये...."
"का रं बाळा, काय झालं काय झालं?" ती घाबरल्या आवाजात म्हणाली.
अगं येवड घाबराय काय झालय? मेल्याल्लो न्हाय मी!"
कुणीतरी थोबाडीत दिल्यासारखी ती गप्पच उभी राहिली.
"डोस्क दुखतंय, वायच बाम असला तर चोळ." तो आईला म्हणाला
बाम कुठला रं माज्याकड? जा तुज्या दादाकड असला तर विचार." एवढं बोलून ती तिथून निघून गेली. आत्ताच शेणाच्या पाट्या टाकून आली होती. अजून तिला धार काढायची होती.
मी ओठून दडकड गेलो आणि बाम हाय का विचारलं.
दादा पण नाही म्हणाला.
मग तसाच उठून चूळ भरली. च्या घितला, पायाला जाऊन रामादाच मेडिकल गाठलं.
"रामादा, डोस्क लय दुखतंय बघ, गोळी दे कि एक."
"काय रं काय झालं? रात्री लय दंग ऐकू येत व्हता रं, तुमच्या बाजूला काय झाल्त?"
मला कससच झालं, आपल्याला काय म्हाईत नसल्यागत मी म्हणाल, "काय म्हाईत न्हाय बा. तीवढी गोळी देकी."
रामान गोळ्या माझ्या पुढ्यात ठीवल्या.
"काय संगतुयास लेका माहित न्हाई म्हणून? तुमचा तो मह्या अंगावर आला म्हणं तुझ्या. लेका अत्तापास्न दारू ढोस्तुयास कसं व्हायचं रं तुमचं, त्या आईकड तर बघून दिवस काढायचं. लेका बाचं कसंकसं हाय बगतुयास बी आणि असलं धंद सुचत्यात व्हायरं..."
आत्ता सकाळ सकाळ ह्यां कशाला लांबड लावायची. काय गरज होती का!
"तुला काय करायचं रं बघीन माझ मी... उगाच सकाळसकाळ लय ज्ञान नगं शिकवूस."
"आर, म्हाईत हाय की लय शाना हायस ते पार आत्ता पास्न अस वागू नगस एवढंच म्हणालो न्हवं का काय दुसरं म्हणालो लेका तुला? लय शाना झालास व्हय लेका."
"हे बघ लय शानपन नग शिकवू गप्प गुमान पैसं घी आणि गप्प बस."
"तर लेका लय पैसे वाला झालास व्हय?" चांगलीच मस्ती आलीय की."
रामाला येवड बोलायची गरज नव्हती. डोकं आधीच भाणभाणत होतं आणि ह्येन सकाळसकाळी कॅसेट लावलीया. काय गरज व्हती का?
धरल गच्चुरच. ये गप्प बस म्हून संगतुय न्हवं तुला. काय समजतोस काय रं तू? काय वाटलो तुला कुणी विचारणार न्हाय म्हणून ऐकून घिवून गप्प बशीन काय. व्हय हाय मला मस्ती.
हाणल्याच  दोन थोबाडीत रम्याच्या.
तेव्हढ्यात आजूबाजूची माणसं गोळा झालीत. रामानं बी माझा गच्चुरा धरीन दोनीला चार दिल्या ठिवून. त्येचा भाव होता तिथंच.
दोघांनी पण चांगलंच डाव साधला. राम्यान पोटात बुक्क्या घातल्या तेच्या भावानं पेकाटात लाथा घातल्या.  
तोंडातून रागात यित व्हत. गुढग्याला आणि घोट्याला चांगलाच मार बसला हुता. आय दुध घालय निघाल्याली मला मारत्याल बघून पळतच आली. तिनं हातपाया पडून तेंच्या विनवण्या केल्या. तवा कुठ मला सोडलं.
तिथन आयन सरळ दवाखान्यातच नेलं.
मलमपट्टी केल्यावर मी आयसंग घरला आलू. आय लय रडत व्हती. शिव्या देत व्हती.
"कुठलं नशीब घिऊन जन्माला आलू. नवरा दारुडा ते दारुडा म्हणाल ल्योक तरी नशीब उघडल तर तेबी तसलाच पडला पदरात. नगं नगं झालाय जलम. कुटतरी जाऊन जीव द्यावा वाटतय. असली जगण्यापरीस मेलेली बरी. भाड्या शाळा शिक म्हणताना काम धंद्याच्या माग लागला आणि आत्ता बसला जन्माच धेंडपवाड करून. अशान वर याचा हाय का आत्ता ह्यो भाड्या." अस म्हणत ती हाणून बडवून घिवू लागली.
"च्या आयला एक तर सक्काळ सक्काळ डोकं दुखत्याल. औषध आणाय गिलु तर त्या भडव्यान आय घातली आणि आत्ता ही बोंबलाय लागलीया."
"व्हय व्हय भाड्या बोम्बलतुय मी. काळजाला घरं पडल्याती माझ्या.... म्हणून बोम्बलतुय तुला काय र होतया कुत्र्या." आय माझ्यावर एकदम पिसाळली.
मग मी बी घातल्या शिव्या... त्यात दादा मधी पडला... तिघांच बी जोरात भांडान लागलं. आजूबाजूला समदी ऐकत हुती खर, कुणी बी मदी पडलं नाय.
पायाल दादा नी आय भांडायची आन मी मदी पडायचो आत्ता, माझं अन आयाच जुपल की दादा मदी पडतो. आय तेला तर माझ्या दुपटीन शिव्या घालती.
"भाड्या, मुडदा बशिवला तुझा, तुझी बांधली तिरडी तुझी, तू लायकवान असतास तर पॉर धड निघाल   असत. तुलाची पायली जलमाची अक्कल नाय मग पोराची काय चूक. तुझ्याच वळणावर जाणार त्यो पण." मरा जावा म्हणत ती कडाकडा बोटं मोडायची.
*****************************************************************************************

असेच दिवस सरत होते. आम्हाला आत्ता फार चणचण भासत नव्हती. ह्यांना एक कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी भेटली होती आणि माझी ट्युशन्स पण चांगली चालली होती. आत्ता घरात एखादा पाळणा हलावा म्हणून सगळे आग्रह करत होते. तरीही मुलांची जबादारी घेण्याइतपत मी सक्षम झालेय असं वाटत नव्हत.
"मला काही मुलांची जबाबदारी पेलायची नाही, इतक्यात कशाला पाहिजे मुलं?" मी, हे आणि घरचे सगळे एकत्र गप्पा मारत बसलो होतो. माझ्यावर मुलासाठी सगळे जण आपापल्या परीने दबाव आणू पाहत होते. पण मला काही पटत नव्हत.
"चार वर्ष झाली कि लग्नाला... आत्ता पण एखादं पॉर नको व्हय? असं कसं, आमी कवा बगायचं तुमचं सुख सोहळं." सासू बाई म्हणाल्या.
"तसं नाही, पण आत्ता कुठं यांना नोकरी लागली... अजून घर धड नाही... आत्ता कुठं आपली परवड जरा थांबले. आत्ता कुठं सगळ नीट मिळतय. जरा तरी निवांत पण नको का? आत्ता क्लास चा जम बसलाय... परत एकदा मुल झालं की, पुन्हा मला वेळ मिळणार नाही क्लास साठी."
"बघा बाई, तुम्हाला कस योग्य वाटलं तसं. आमचा जीव वढतोय म्हणून सांगितलं. परत कोण कशाला सांगायला जातंय. एकदा नाद केला तेवढा बास." सासूबाई एकद्म्म तोडूनच बोलल्या....
मग मी पण पुढे काही विषय वाढवला नाही.
आम्ही अंथरून पांघरूण पसरून झोपी गेलो...
"ये ऐकतेस काय," हे हळूच माझ्या जवळ येत बोलले.... "मला पण वाटतय आत्ता एक तान्हुलं आपल्याला हवं."
"अहो, असं काय पण इतक्यात मला तरी नको वाटतंय पण.."
मी एवढच बोलले, पण पुढ ह्यांनी काही बोलू दिलच नाही...
पुढच्या महिन्यात माझी पाळी चुकली... युरीन टेस्ट मध्ये प्रेग्नन्सी पॉजीटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले.
सगळ्यांना आनंद झाला, शेवटी त्यांच्या मनासारखं झालं होतं. पण त्यानंतर जे उलट्या सुरु झाल्या त्यांनी मी पुरती हैराण झाले... अडीच-तीन महिने झाल्यावर तर मला अगदीच थकवा यायला लागला. पण सुसुबाईना काही माझ वागणं पटेना... मी ज्या दिवशी काही काम नाही केलं किंवा झोपून राहिले तर, त्यांचे टोमणे सुरु होत.
मला पाचवा महिना लागला तसं हाता-पायांना सूज येऊ लागली.
मला  पूर्वी सारखी काम जमेनात. मग घालून पाडून टोमणे सुरु झाले. मी ह्यांना सरळ सांगून टाकलं. मला हे सहन होत नाहीये... आपण वेगळं राहूया...
पण ह्यांना काही ते पटेना... माझी नुसतीच घुसमट सुरु झाली...
सातवा महिना लागल्यावर मी माहेरी निघून गेले.
पण ह्यांच्या आणि सासू-सासऱ्यांच्या स्वभावात काही फरक पडला नाही.
अशा नाजूक अवस्थेत अशी वागणूक मिळणं, मला अजिबात पटत नव्हतं. पण काय करणार इलाज नव्हता.
मी आई-बाबांशी बोलले.
"आई, मी प्रेग्नंट राहिल्यापासून माझ्या घरचे नुसतेच....धुसफूस करत असतात. अजिबात काय हवं नको पाहत नाहीत. नवर्याला म्हंटल वेगळ राहूया तर तोही काही अजिबात मनावर घेत नाहीये."
"बघू काही तरी तोडगा निघेल, जावई बापू इकडे आले की मी ह्यांना बोलायला लावते त्यांच्याशी." आईनं माझी समजूत घातली.
आठवा महिना संपला. नववा महिना सुरु झाला. आई काही बाही करून घालण्यात गर्क होती... का तर एकदा डिलिव्हरी झाली की, पथ्य-पाणी सुरु होईल म्हणून.
दरम्यान हे एकदा भेटायला आले. पप्पा घरीच होते... पप्पांनी माझ्या घराचा विषय काढला...
"स्वातीला तुमच्या घरच वातावरण सुट होत नाही.. आत्ताही काही मी तिला लवकर पाठवणार नाही.. तुम्ही घरातून बाहेर पडण्याच काही नियोजन करा... माझ्या बहिणीच्या कंपनीत काही जग निघतील आणखी दोन-तिन महिन्यांनी... स्वातीने तुमच्या परिस्थितीशी फार मिळतं-जुळतं घेतलं.. आम्ही तिला या आधीच निघून ये म्हणालो होतो... पण तिचं प्रेम तुमच्यावर.... त्याला काय करणार? असो आत्ता तरी तुम्ही तिचा आणि बाळाचा विचार करायला हवा असं वाटतं..."
पप्पांच्या पुढे हे काहीच बोलले नाहीत. पण माझीही काही विचारपूस केली नाही. अगदी जुजबी बोलून निघून गेले.
त्यानंतर पंधरा दिवसांनी माझी डिलिव्हरी झाली. मुलगा झाला. सासूबाईना फार आनंद झाला. त्यांनी फोनवरून माझी विचारपूस केली.. मी माहेरी अल्यापासुनचा हा त्यांच्या पहिलाच फोन.
पण लवकर पाठवणार नाही हे ऐकून नाराज झाल्या.
आमच लव्ह-मॅरेज असल्यानं दोन्ही घरच्यांचं एकमेकांकडे जाणं-येण होत नव्हतं. मलाही पप्पांनी चार वर्षांनी घरात घेतली... तेही प्रेग्नंट आहे कळाल्यावर... तो पर्यंत ते माझ तोंडही पाहत नव्हते की फोन ही करत नव्हते. पण कित्ती दिवस राग धरणार शेवटी त्याचं काळीज पाघळलच.
मी बाळात चांगलीच गुंतून गेले....
******************************************************************************************
मी, भालेकरांचा पकू, यादवांचा सोन्या आणि नाईकांचा सोम्या सगळी कोपर्यावर उभी होतु. हित उभं राहून उगाच पोरींची माप काढायची कुणाला राखी सावंत म्हणायचं कुणाला करीना म्हणायचं असलं आमचं उद्योग मजेमजेत चालायचं. यात मी जरा मगच असायचो... माझ्या डोक्यात नुस्त आय अन दादाच याड. नुसती भांडून भांडून जीव काढायचीत माझा... मला दारूची चटक लागल्याली... म्हणून भांडण लागायची. हि दोस्त मंडळी कवाकवा गरज काढत्यात माझी... पण आय कद्दीकद्दी इचारत नाय...
"अय, लेका गोट्या ती बघ की, ती जीन्सवाली रं, लेका मला तर वाटतय ती तुझ्या बरुबर लय गॉडगॉड बोलती रं कसं काय?" पक्या बोलला.
"ये गप्प लेका तिची आय येती कावा तर आयकडन रेशनच तांदूळ, हे न्यायला. लहानपणा पास्न बागतुय लेका आमी एकमेकास्नी माग जरा बोललं तर काय झालं रं." मी  जरा चिडलोच पक्यावर.
आर, बोल की लेका मी काय नको म्हणतोय काय, मी म्हणाल लय गुलुगुलू बोलती तवा काय चालूय का काय तुमच्यात?" हे ऐकल्यावर तरआपलं डोकंच सणकल.
धरल गच्चुर पक्याच आणि एक दिली थोबाडीत ठिवून...
आमची थोडी हातापायी झाली...
आणि सगळ्या गावभर बातमी पसरली की, पोरींच्या नादान पोरापोरांत भांडण लागली म्हणून... खरं तर तसं काय झालाल्य नव्हत. मी कुठल्या पोरीसाठी भांडलो नव्हतो... फक्त त्यो माझ्यावर विनाकारण अदावत घेत होता तेच मला लय राग आलेला...
झालं घरात समजलं आन आयन पुन्हा गहिवर घातला... भाड्या कशाला आला असशील पोटाला जल्मल्याबरुबरच का मेला न्हाईस गरिबाला कवाशी बी फास लावतील कळायचं न्हाईत... भाडे नकाएवढ घावलं की पसाभर करतिली... उद्याच्याला कोण आलं दारात तर काय करू काय सांगू.. त्या भाड्याची सांगत तेव्हढी सोड .... आय हात जोडून माझ्या समोर बसल्याली.
आयचा तो गरिबावानी चेहरा मी पहिल्यांदाच बघत हुतो... माझ्या हातून काय बी चूक झाली तरी आय शिव्या घालायची पर हात जोडत नव्हती... पण आत्ता तिला पारच हरल्यागत वाटत हुतं.
तिचं ते चिमणीएवढ तोंड बघवणा मला बी रडू आलं. तवा पास्न मी गलीच्या कोपर्यावर उभं राहायचं बंद केलं... वैरानीला जायचं... ढोर हिंडवावी वाटली हिंडवायची. असलं पैसे तर एक-दोन ग्लास हानायचं, नाय तर गप्प गुमान पडायचं...
असच दोन चार दिस गेलं. खिशात दमडी नव्हती... आयकड मागितलं तर आय नाय म्हणाली.
चार दिस झालं मला प्यायला मिळालं नव्हत. मला कस तर व्हतहुतं. मी परत सगळ्या दोस्ताकडनी गेलू. माग आमी सगळी मिळून प्यायला बसलू.
जरा जरा पिऊन झाल्यावर पक्या बोलला, "लेका, लय राग केलास त्या दिवशी पर मी काय म्हणत हुतो ते खरं हाय का नाय ते विचार ह्या सगल्यास्नी?"
तो काय बोलतोय ते मला कायबी कळना. "काय खरं हाय रं?"
"आर, तेच की ती सपनी लेका जिवं टाकती तुझ्यावर..."
ऐकून एकदम सगळ्या अंगातन गुदगुल्या झाल्या... "गप्प लेका मी असा काळा, गरीब अडाणी आन ती कशापायी जीव लावलं माझ्यावर?" वरवर मी असं म्हणत असलू तरी मला आतन लय उकळ्या फुटत व्हत्या.... सगळ्या अंगातन रागात दोनशेच्या स्पीडन पळत हुतं... डोकं गार गार बर्फावाणी वाटत हुत... रातची नऊ-सव्वा नऊ ची येळ. मस्त शिरशीर येण्यासारख गार गार वारं! आभाळात चांदण्या चमचमत्याल्या! मोकळा माळ! सगळी कड एकदम चिडीचीप!
पक्या काय बाय सांगत हुता आनी माझ्या म्होरं सपनी लाजत मुरडत मध्येच हसायची आन मध्येच गायब व्हयाची! ती दिसली की मन भरून जायाच, आन गायब झाली की उदास वाटायचं!
"आर तू दोन दिवस दिसला नाहीस तर तिन तुला विचारलं. एकदा नव्हं! मस्त तिनदा!" पक्या सांगत हुता आन बाकी सगळी त्याच्या हो त हो मिसळत होते.
तिन तुला निरोप वी धडायला सांगितला हुता पार करणार काय तू घरकोंबड्यावाणी घरात बसलेलास!
"आरं, मग काय तुमाला घर म्हाईत नव्हत व्हय?" मी विचारलं.
"आत्ता, हे बग, आसं करू नगं हां... सांगून ठिवतो. तुज्या आयला..., खपत का आमी नजरेसमोर बी उभं राहिल्याल." पक्या बोलला.
बाकी पोरं बी तेच सांगत हुती. उदयाला तू रानात गेल्यावर आमी सपना वाहिनीला तिथवर पोचवतो असा शबुद त्यांनी मला दिला.
रातभर मनात नुसता मोर नाचत हुततं.
उद्या सपनी समोर असलं! नुसता तिचा चेहरा जरी दिसला तरी आभाळ हातात असल्यासारखं वाटत हुतं... आन ती प्रतेक्षात समोर आल्यावर काय व्हाईल? नुसता सपान बगतुय तरी इतक पाघळाय व्हायलय. उद्या काय खरं नाय बा आपलं.
*****************************************************************************************

दुसर्या दिवशी रानात मी सगळ्यांची वाट बगत बसलु. वैरण काढण्यात काय जीव लागना... नुसता सपनी सपनी हेच चाललेलं.. ती काय म्हणल आन मग आपण काय म्हणायचं? हेचीच प्रक्टिस चाललेली मनातल्या मनात!
वैरणीचा भारा बांधून झाला... तरीबी कुणाची काय पायरव लागना.
जरा आडोशाला बसलू.
तवर पक्या, सोन्या, सोम्या सगळी आलीती. तेंच्या मागनं सपनी पण हुती.
तिला बगुनच माजी धडधड वाढली.
सगळी एकत्र जमलो. पण कुणी काय बोलावं कुणालाच कळणा... सगळीच आमी एकमेकांच्या तोंडाकडनी बगून नुसतच बावराय लागालु.
मग सपनीनच इचारलं....
"झाली का वैरण काढून?"
"व्हय झाली की, तू कशी काय हिकड आलीस?" माज्या तोंडातून चुकून जाऊ ने तेच गेलं. मी हळूच जीभ चावली... सगळी हसाय लागली.
सपनी पण हसत हुती... कसली गॉड दिसती सपनी हसताना...
"आलू असाच शेताचा बांध कसला अस्तु ते बघायला...." सगळे अजून जोरात हसाय लागले... मग पक्या आन बाकी समदी कायबाय करणं सांगून निघून गेलीत. आत्ता राहिलो मी आन सपनीच. भर उन्हात दोघ त्या झाडाखाली उभं रहायल्यालो खरं कुणालाच काय बोलावं सुचत नव्हत. मग सपनीच म्हणाली, "असा खांबवाणी का उभा ऱ्हायलायस बोल की काय तर.."
माज्या जीवच नुस्त पाणीपाणी झालतं. आत्ता काय बोलू हिला?
"काय सूचना झालाय बग काय बोलू ती, तूच बोल की काय तर..."
"कुठं होतास दोन दिवस, दिसला नाहीस?"
"घरातच हुतो... कुठ जात न्हाई मी."
"हां पर दिसला न्हाईस म्हणून विचारलं... जाऊ का मी आत्ता लय उशीर झालाय."
ती नाराज असल्या सारखी वाटत हुती...
"का आत्ता तर आलीस लगेच काय झालं?"
"आत्ता तू काय बोलत नाहीस, मग मी काय झाडच वारं खायला थांबू काय हिथं?"
"तसं नाही गं!"
"मग कसं."
"अग, रागावू नगसं गं."
"हम्म"
"कशी काय आलीस हिकड?"
"तुला भेटायला."
"पण मला कस काय भेटावं वाटलं ते काय कळणा झालाय बघ."
"का वाटू ने का? काय म्हाईत न्हाय मला पण. पण, वाटलं भेटावं असं."
"तरीबी काय तरी कारण असलं की, खरं सांग..."
"तू त्या कोपर्यावर उभा राहून ह्या टपोरी पोरांच्याबर का म्हनून आम्हाला टोमण मारतू?"
"न्हाय गं मी तसं काय कधी केलेलं न्हाय... मी फकस्त त्यांच्याबर उभा असुत तिथं, पार मला काय ते टोमण मारण्यात इंटरिस्ट नाय... तुला काय तरास झाला आसलं, तर स्वारी प्र मला कुणालाच तरास द्यायचा नसतू तिथं उभं र्हाऊन."
"तसं नाय पर तुमच्या टोमान्यांमूळ आमची पंचाईत हुती... म्हणून बोलून सांगायचं हुत एवढच!"
तिनं एवढच म्हंटल्यावर माझ काळीज लक्खकन हाललं.
म्हणजे मी काल पश्न इचार करत हुतु तसं काय न्हाय तर..
"तू का माझी वाट बघित हुतास...?"
"सपनी तू मला आवडती... आन तुला बी मी आवडतो असं तो पक्या बोलला... मला म्हनून मी वाट बघत हुतो..." कसलीच फिकीर न करता मी सगळं एकाच दमात बोलून गेलू.
"व्हयच की मग तो काय खोट सांगत हुता.." एवढ बोलली आन ती जायला वळली...
"उद्या येशील?"
"हम्म"
बगता बगता टी निघून गेली.. मी तर हवेतच हुतु... वैरणीचा भारा घितला आन घराकड आलू...
आज माज्यात काय तरी बदल झाल्याला आयला जाणावल असणार.
"काय र लय खुशीत दिसतूस काय वैरनीच्या खाली सोन्याचा हांडा-बिंडा घावला का काय?"
"कुठला हांडा आन कुठलं काय गावातय आय... असाच आज मूड चांगला हाय..."
व्हा तसच र्हात जा.." आय म्हणाली.
मी वैरण जनावरांच्या पुढ्यात टाकली... गोटा साफ केला... सगळा गदाळा बाजूला करून ठिवला... सगळी काम आवरली.. मग जरा झोपलो...
आज काय सांच्याला गावात जायाच न्हाय ठरवलं. गीलूच तर उगीच चिडवतील सगळी...
मी गेलू न्हाय तरी... रातच्याला पक्यान येऊन उठवलच. रातच धा वाज्ल्याल...
परत आमचा सगळा घोळका माळावर जमल्याला...
"काय लेका लाजून बसत्यात व्हय असं घरात... काय मर्दुमकी गाजवालीस आमाला बी सांग की जरा..
आमी काय काय बोल्लो ते मी सगळ त्यास्नी सांगितलं... पर तेंचा काय इस्वास बसना.
"काय लेका, संगतूस एवढा चानस घावून नुस्त बोलण... ते बी तुका भेटली आन मी का भेटलु... काय उपेग न्हाय मर्दा तुझा...." सोम्या बोल्ला.
"मग काय काराय पायजे हुत ते तर सांगा की..."
सगळी खोखो हसाय लागलीत...
"एक-दोन गल्लास घेतलं कि तुला आपोआप कळल काय कराय पायजे..."
जरा पिली आन गप्पगुमान घरात यिऊन झोपलो...
उद्याच्याला परत भेटाय जायचं हुतं...
त्याच येळला सपनी त्याच जाग्यावर आली... मी वाटच बघत हुतू.
"झाली का वैरण काढून?"
"व्हय झाली की."
"काय मग कालचा दिवस कसा गेला?"
"लय आनंद झालता बग... तुला...?"
"मलाबी..."
"पार उद्या हिथ न्हाय येणार मी... हं ... उद्या आपण गावाबाहीर्च्या डोंगरावर भेटूया... पार कुणाला काय बोलू नगस... तुझ्या दोस्तास्नी पण...." एवढच बोलली आणि ती परत गेली.
मी पण घरला आलू... कालच्या एवढा न्हाय खर... आज जरा बरं वाटत हुतं.
आज कुणी बी बोलावलं तरी जायाच न्हाय असाच ठरवलं... उगीच काय बी चिडवत बसत्याती....
रात्री पक्या आला तरी मी उठलूच न्हाय... आयन घातल्या शिव्या...
"रातच्यालाबी भाडे झोपू देत न्हाईत.''
तसा पक्या पळाला.
*********************************************************************************************
बाळाला एक-दोन महिने होऊन गेले तरी हे फिरकले नाहीत.
रोज फोन मात्र असायचा...
ह्यांचे फोन आले तरी... हे आमच्या ऐवजी आपल्याच माणसाच काहीबाही सांगात बसायचे...
गोट्या आत्ता मोठा झालेला... रेखीव बांधा आणि तुकतुकीत शरीरयष्टी... शिवाय वयात आलेला... कुणाशी भांडण केली... पोरींसाठी... अस काही बाही सांगत होते... ह्यांनी प्रत्येकाला किती वेळा तरी शिकण्यासाठी आग्रह केला... मी स्वतः सुद्धा प्रत्येकाला, मी अभ्यास घेईन खाऊ देईन अशी किती तरी आमिष देऊन पहिली... पण परिस्थितीच सगळ्यांच्या नाड्या आपल्या हातात ठेवते... तिथे दोष कुणाला देणार?
पण काय कुणास ठावूक ही भांडण मला मात्र कुठल्याश्या... अशुभाची चाहूल वाटत होती.
मी त्यांना तसं बोलूनही दाखवली..
"तुला बाहेरचं जग माहिती नाही... एवढ्या तेवढ्या भांडणांनी काही होत नाही.. "अशी त्यांची पुन्हा माझी समजूत घातली...

पप्पांनी बरस थाटात करावं, अशी त्यांच्या आईची इच्छा होती का तर लग्नात काहीच मान-पान झाला नाही. उलट रजिस्टर पद्धतीनं लग्न केल्यानं त्यांची मान खालीच झाली होती. पण पप्पांची इच्छा नव्हती. म्हणून सासरकडची मंडळी रुसली होती.
फक्त फोनवरच बोलण व्हायचं.
"मम्मी आश्चर्य वाटतंय त्यांना एखादही दिवस बाळाला बघावं अस वाटत नसेल?"
"काय सांगता येत काय बुद्धी फिरली एखाद्याची तर? असुदे काही तरी कामात असतील, वेळ मिळाला की येतील नक्की." आईच्या ही मनात कितीतरी शंका होत्या पण ती आपली माझी समजूत काढायची.
पप्पांना ही कधी कधी खूप टेन्शन यायचं...
ते म्हणायचे, "करू नको म्हणत होतो ते करून बसलीस... आत्ता? इतकं सोप असतं का अशी मनानी नाती जोडण... चार दिवसाचं प्रेम संपलं की माग डोळे उघडतात...आत्ता काय करशील?"
"असं काळीज फोडू नका पोरीचं... दुध पितं मुल आहे तिचं .... तिला धक्का बसला तर दुध मागं सरल.... तुम्ही उगाच नसत्या शंका पेरू नका तीच्या मनात बरं... त्यांचा राग माग गेला की, येतील ते... त्यांचाही जीव अडकलायच की पोरात... त्याशिवाय का सकाळ-संध्याकाळ फोन येतोय...?"
असं म्हणून आईच आमच्या मनातील शंकाकुशंका परतवून लावी....
एक दिवस हे आले आणि आत्ताच्या आत्ता घरी चल म्हणून असून बसले... पप्पांना मात्र त्याचं हे वागण काही पटेना...
"हे बघा, एक तर... दोन-तिन महिने तुम्ही जराही इकडे फिरकला नाहीत... आणि आत्ता अचानक असं घेऊन जातो म्हणालात तर कसं? मी तुम्हाला मागेच सांगितलंय... तुम्ही त्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या... "
"मी माझ्या घरातून बाहेर पडू शकत नाही ....."
"का?"
"माझ्या आई-वडिलांना मी एकटाच आहे. त्यांना सोडून मी कुठही जाणार नाही."
"स्वाती देखील माझी एकुलती एकच मुलगी आहे, मीही तिला तुमच्या त्या घरी पाठवणार नाही."
दोघांचीही अशी बरीच वादावादी झाली... ते आले तसं रागानं निघून गेले...
रात्री बाळ झोपला... तरी मला झोप लागेना... आत्ता माझ काय होईल... माझ भविष्य काय, या तान्हुल्याच भविष्य काय... याला घेऊन मी कुठे जाणार... बरेच विचार घोळत होते डोक्यात... झोप अजिबात येत नव्हती...
पप्पा जवळ आले... त्यांना पाहून माझे डोळे डबडबले... पप्पांनी मला जवळ घेतलं...
"धीर सोडू नकोसं, मी अजून तुझी साथ सोडलेली नाही... जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी... तुझ्या पाठीशी मी उभा राहीन... पोरगी असलीस तरी तुही माझ्या काळजाचा तुकडा आहेसच... आणि काळजाच्या तुकड्याला आपण किती जपतो हे आत्ता तरी तुला समजलं असेल. आमच काही एक न ऐकता गेलीस...." पप्पांनी एक दीर्घ उसासा सोडला...
"तुम्ही काही काळजी करू नका पप्पा मी खंबीर आहे, माझा धीर खचलेला नाही... "
यापुढे मीही काही बोलू शकले नाही...
आम्ही दोघांनी एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न केला... कारण त्या घरात आत्ता काही परत जाणं शक्य नव्हतच...
ह्यांनी येतानाच बालासाठी म्हणून आणि त्यांच्या आई-वडिलांचा मान-पान म्हणून, भली मोठी यादी दिली होती.... ही हाव वाढत गेली तर आयुष्य भर नुसताच पश्चाताप करण्याशिवाय काही हाती उरणार नाही... हे एव्हाना मीही ओळखलेलं.
"लग्न पूर्वी तर .... महेश कित्ती कित्ती पुढारलेपणाच्या गोष्टी बोलायचा.... जिभेवरून तर नुसता मध ओसंडायचा. पण लग्नानंतर मात्र सगळ हळूहळू पालटत गेलं...
त्यानं दिलेल्या सगळ्या आणा-भाकांना थुका लावला.
पप्पा म्हणत होते ते काही खोटं नव्हतं.... नशीब अशा अडचणीच्या वेळी पप्पांनी माझी साथ सोडली नाही....
*********************************************************************************************
त्या दिवशी मी अशीच सापनीची वाट बघत बसल्यालो. मनात इचार सुरु व्हतं, त्यो मह्या द येवडा शिकल्याला, चार पैसे कमवतोय, तेबी इज्जतीन... असं कुणाची बी पडलं ती कामं करून न्हवं, तरीबी तेच्या सासू-सासऱ्यान तेंच त्वांड बघितल्याल न्हाय अजून. मी तर असा... फटका... शिक्षण नाय मग नोकरी कोण दिल?... आयला कसं व्हायचं आपलं आन सापनीच... तिनं बी ह्यो इचार कवा केला आसल का नसल?
तेवढ्यात सपनी आलीच... लैच नाराज वाटत होती...
गोट्या, तुझ्या त्या मह्या दाच्या घरात काय भांडान लागलंय म्हनं खरं का रं?"
"तुला गं कुणी सांगितलं?"
"आमच्या घरात इशय निघल्याला.... त्या पोरीला सरळं पटवून घीत न्हाईत म्हनं... त्या पोरीला म्हणजे तुझ्या वयनीला..."
"मग तू का दुचित व्ह्त्यास?" मी इचारलं.
"आर मग मलाबी तुम्ही असच  पटवून नाय घितल म्हंजी?" सपनी अडखळली...
"एक तर माझ बी आई बा माझ त्वांड बगणार नायती, तुझ्या संग लगीन केल्यावर... आत्ताच तेंनी स्थळ बी बगाय सुरुवात केलीया ... कसं व्हायचं गोट्या आपलं? एक तर तू शिकल्याला बी नाहीस... लांब कुठ तर तुला नोकरी मिळल म्हणायचं तर... मग तुज्यासंग कशी लगीन लाऊन दितीली माझ..." तिचा आवाज कापत व्हता आणि डोळं डबडबल्याल...
मी पुढ कायचं बोललो नाय काय बोलणार व्हतो... काय सांगणार व्हतो...
पर मला सपनीला राणीवाणी ठीवायची व्हती.. राणी वाणी...
लय लय जपायचं व्हतं.... पोळ्यातल्या मधावानी...
व्हातीच ती तशी गोड...
माझी सपनी... एवढाच इचार सुरु व्हता डोस्क्यात...
मह्या दाच आणि वयनीच काय पयल्या पास्नच पटत नव्हतं...
वयनी शेरात वाध्ल्याली... वरच्या जातीची... तिला आमचं वागणं पटायचं नाय... मला तर लहान असल्या पश्न कवा तिन हाक दिकील मारली नाय... का तर मी शाळत जात नव्हतू... वयनीचं ऐकलं असतं तर...

तर आत्ता सापनीला म्हणाल असतं... दुनयेत कुठं बी तुला राणीवाणी जपीन... पर... आत्ता...? आत्ता...?
नाय म्हणू शकत...
डोळ्याला धार लागल्याली.... पुसुन पुसून डोळं ... लाल भडक झालीती... चुणचुणाय लागल्याली.
"पक्या लेका, हे पिरीम बी लय वंगाळ असतंय बग. नुसता चिप्पाड पाडतं आपल."
"का रं गोट्या, काय झालं?"
"सापनीचा आय-बा तिचं लगीन ठरीवनार हाय या आठवड्यात..."
"माग काय झालं तू आन ती पळून जावा... तेला काय होतंय....? नाही तरी आत्ता सगळीकडं तेच कि चाललंय लेका..." पक्या म्हणाला.
"पार त्याला सपनी तयार नगं? ती म्हणती मी जर काय वेड-वाकड पाऊल उचललं तर माजी आय जीव दिल..."
"हे बघ तू बी तिला धमकी दे तू जर का माझी नाय झालीस तर कुणाचीच व्हणार नाय... मी एक तर तुझा जीव घीन नाय तर माझा जीव दिन..."
"तेन काय होणार... ? तिचा जीव घ्यायचं काय पटत नाय बा आपल्याला... जिच्यावर जीव लावला तिचाच जीव कसा रं घ्यायचा.."
"तू नुस्त म्हण तरी, मी काय तुला खरच तिचा खून कर म्हणत नाय.... तुझ्या धमकीनं ती पाघळल शंबर टक्के."
"ठीकाय तू तिला उद्या दुपारी रानात बोलावलंय म्हणून निरोप दे मग बघू."
वरीस-दीड वरीस कसं एकदम भुर्रकन गेलं... सपनीच्या सपनातच आन अचानक आत्ता ते सपानच तुटणार...? सपनी दुसर्या कुणाची तरी व्हणार... मग मला जीव कोण लावील? गोट्या तुला सगळी अशी गोट्या म्हणत्यात ते मला आवडत नाय... तुझं खर नांव काय हाय... अर्जुन .... त्याच नावांन हाक मारायला लाव सगळ्यास्नी... मी पण तुला अर्जुनच म्हणीन... तू तेवढी दारू सोड आणि काही एक चांगलं काम बघ मग कशाला आय चिडल तुझ्यावर? आयला तर काय तुझ्यावर चिडायला चांगल वाटत असल का? तू काम बघ... नाय तर सोत्ताच.... काय तर सूरु कर... तू चांगला  कमावला लागला ना की तुमच्या घरातली भांडण कामी होत्याल... कित्ती ते शानपण शिकवायचं? आत्ता कोण शिकवलं?.... व्हय बग सपने, मी जर चांगलं पैसे कमावले असते ना तर कुणालाच काय बी प्रोब्लेम नसता बग... पण मला लै...लै... पैसे कमवायचं कसं तेच नाय माहिती.... कुठ शिकणार मी आत्ता हे..'
दुसर्या दिवशी मी यीळभर सापनीची वाट बघितली पार ती काय आली नाय....
संध्याकाळी सोम्या म्हणाला,
"काय लेका, हातात घावल्याली पोरगी तुला टिकवायची कळलं नाय, म्हणून पोरी घावल्या का त्यास्नी अशाच सोडून द्यायच्या नसत्यात..."
तेन पुढं आय बोलण्याआधीच मी तेच्या कानाखाली एक शिलगावून दिली... जाळ झाला असलं नुसता... "अशी नाय सोडायला काय रस्त्यावर पडल्याल्या असत्यात व्हय र पोरी,.... उद्या तुझ्या बहिणीलाच कुणी अशी वापरून फेकली म्हणजी रं भाड्या... बोलशील का पुन्हा?"
सोम्या रागानं धुमसतच गेला....
एवढ्यात पक्या आला,
"काय झालं रं सपनी का नाय आली आज रानात." मी तेला इचारलं.
"तिला बघायला आलंतत आज पावणं.... दोन चार दिसावर साखरपुड्याचा मुहूर्त ठेवलाय...."
एवढच बोलून पक्या निघून गेला...
मी उठलो आणि सरळ दारूच्या दुकानात गेलो.... गेलं सोन-चार महिनं.... सापनीला शबुद दिल्यापासून मी घेतलेली नव्हती... खर खर आज...! आज, सगळा दोन-चार... महिन्याचा सगळा स्टॉक भरून काढला...
झिंगत झिंगत येऊन घरात पडलो.... तसा आईचा दंगा सुरु झाला.... एक शिवी दिली हासडून.... परत मला शुद्धच रायली नाय....
सपनीचा साखर पुडा झाला....
*****************************************************************************************
पप्पांनी परत त्या घरात स्वातीला पाठवणार नाही, रीतसर घटस्फोट घ्या असा निरोप महेशला पाठवला... त्यान जराही हरकत घेतली नाही... तो लगेच तयार झाला...
काय म्हणावं आत्ता याला... असा कसा काय बदलला हां... इतका विश्वासाला किती चटकन तडा घालवला... बाळ आत्ता सात-आठ महिन्याचा झाला... तो वरच सगळ खात-पिट होता...
"स्वाती, बाळ आत्ता सगळ वरच खाऊ लागेल, तू त्याच्यासाठी घरात बसू नको, तूझ्या पुढच्या शिक्षणासाठी तू बाहेर  जावस अशी माझी इच्छा आहे... त्यासाठीची सगळी सोय मी करीन.... तू फक्त तुझ्या मनाची तयारी कर....
मी काहीच बोलले नाही... बाळाला पोटाशी घेऊन नुसती बसून राहिले...काही दिवसांत त्याची आणि माझी ताटातूट होनर होती... बाळ मात्र हसत माझ्या चेहऱ्यावरून हात फिर्व्ह होता..मोठमोठ्यानी खळखळून हसत होता...
बाळ वर्षाचा झाला. साधे पणानेच त्याच्या बड्डे केला. मला बाहेर  गावी म्हणजे पप्पा दिल्लीला पाठवणार होते... तिकडे हॉस्टेल... कॉलेज सगळ्याची सोय केली आणि दुसर्या दिवशी मला ट्रेनला बसवून दिलं...
बाळापासून वेगळ राहावं लागणार याचीच एक खंत होती... नाही तर... माझ्या आयुष्याच्या वेगळ्या प्रवासाची मलाही उत्सुकता होतीच आणि आनंदही.. मम्मी माझ्याइतकीच बाळाची काळजी घेईल याची खात्री होतीच... त्यामुळे.... फार काही ताण घेतला नाही....
आणि मी निघाले ही महेशला अजिबात न कळवता....
****************************************************************************************
"पक्या अरे रानात ये लेका मला चक्कर यायला लागली....लवकर ये... ली कस तर होतंय बघ."
"काय तर चेष्टा करू नको लेका, आत्ता चांगला सोताच्या पायांन चालत गेलायीस आन आत्ता कशान र चक्कर येती तुला..."
"मी...मी.... औशीद खाल्लंय... ताणावर मारायचं.... औशीद...."
"गप्प लेका तुला काय झालं मारायला... लेका पोरीसाठी कुणी जीव देत व्हय..."
मी लै येळा फोन केल्यावर मग पक्याला ईश्व्सास बसला...
मग तो आय कड पालट गेला.. तोवर रानात सोम्या आणि सोन्या आलीत... त्यांनी गाडीतन मला स्वख्ण्यात नेलं....
आय रडत आरडत तिथं पोचली..
"कुणी माझ्या लेकराला काय केलं...आर... कित्ती गरीबितन लेका म्या तुला वाढीवलं.... काय हे पांग फेडलस आईचं.... दादा गप्प गार एक कोपर्यात उभा व्हता... सगळ्या अंगात नुसता जाळ घुमत व्हता... पाणी पाणी करून जीव कोरडा पडला... डाक्टरांनी हात-पाय खाट संग बांधल्याल.... मी पाणी-पाणी करत हुतो आन आय नुसती ..... उर बडवून रडत होती....लेकराला एक घोट पाणी पाजायची बी तिला सत्ता र्हायली नव्हती....
"आय तुला ऐकायला येत नाय काय आय..."
"आर, पर तू कशासाठी आस केलंस रं माज्या वासरा...! तुला कशाची चिंता व्हती? तू का बोलला नाहीस.... आई जवळ तुझ काळीज का फोडलं नाहीस?"
"आय पाणी दे तेव्हढ पाणी....आय."
मी सापनीला बोललो होतु, तुझी हळद निघायच्या आत माझी तिरडी निघाल...
उद्या सपनी हळद काढायला यील...
तेच्या आदी माझ्या तिरडीची बांधणी सुरु झाली व्हती....
तिला कळाय पायजे, मी ख्योळ मांडला नव्हता.
  
©®मेघश्री श्रेष्ठी -नाईक 






















Post a Comment

2 Comments

Unknown said…
खूप सुंद