तरंग....अंतरंग

तरंग....अंतरंग


'छे! काहीच सुचत नाहीये....भुणभुण भुणभुण किडे भुणभुणतायत डोक्यात. का होतय असं....!!  आत्ता कधीच 

बाहेर नाही का पडता येणार याच्यातून....?? बाहेर...?? बाहेर...?? कशातून बाहेर पडायचंय आपल्याला नेमकं? 

ते तर कळतंय का आपल्याला....? छे...! जे काळतही नाही आणि वळतही नाही, त्याचा असा जीवाला लाऊन 

घेऊन वेड्यासारखा विचार करत राहणं कितपत योग्य....??? जाऊदे आपण नकोच विचार करायला.... 

थांबवायला हवं आत्ताच्या आत्ता.... आत्ताच्या आत्ताच. शांत राहणं.... शांत.... शांत.... एव्हढंच करू शकतोय 

आपण सध्या. बस्स.... शांत राहता यायला हवं. एकही शब्द उमटू नये आत्ता मनाच्या पटलावर एकही. शांत... 
शांत....शांत....'

"ये पोरी, लक्ष कुठाय? अग त्या पोराला चार की, काय तर जरा... किती वेळ झालाय खेळतंय ते एकटच... आं... 

तेच्या एक ध्यानात येत नाही तुला ते काय कळतंय का न्हाय? व्हय तसं बसलं मोकळच म्हंजी झालं काय? उठ 

उठ बाई, चार त्या पोराला काय तर....!!" सासूनं आवाज दिला, तशी ती उठली आणि पोराजवळ गेली.

'आत्ता किती वेळा चारायचं ह्याला दिवसातून? कधी खाणार हा स्वतःच्या हातांनी? कधी मोठा होणार? किती 

दिवस घालवायचे ह्यातच? चारा-भरावा, धुवा-पुसा, रडलं, हागलं, मुतलं....वैतागलाय बाई जीव माझा... बरं मीच 

केलं पाहिजे सगळं असं कायय का? इतर वेळी तर माप पाडं, सोनं, ह्यांवत्यांव काय काय असतो कि 

कुणाकुणाचा.... अशाच वेळी का मीच लागते ह्यांना...? जाऊदे....!'

"व्हय कि किती वेळ झाला चारून तेला, चारते कि आत्ता."

"पिल्लू भूक नाही लागली माझ्या बाळाला... चला खाऊ खायचा खाऊ...? पिल्लुडी ग माझी शयनी बबली-
छबली." असं म्हणत तिने त्याला जवळ घेतलं.

"हे बघ काय आगाव तरी ग बाय तुझं, आगं आदी खाणं तयार कर मग तेला घे जवळ... कसं गं बाई व्हायचं 

तरी.... हेंच...? आत्ता एक घर भरून मानस हायती म्हनून काय नाय... एकटीच असतीस ते काय त्या पोराचं 

हालच की झालं असतं. तुझ्यान काय संभाळणं झालं असतं व्हय तेला...? आण बाई आण इकड आदी खायचं कर मग कर लाड तेच... मोकळाच लाड व्हय ह्यो असला...?"

तिनं मुकाट्यान पोराला तिच्याकडे दिलं.

'माहिती नाही का तुमचं प्रेम कसलं ते, एव्हढीच मया हाय तर घालायचं ना आपण करून, मीच कशाला लागते 
ह्यांना.'

चूल पेटवून तिनं बाळाचा खाऊ शिजवला. पातेलं उतरून खाली घेतलं. वाटी चमचा सगळ जवळ घेतलं.

"द्या इकडं, चारते मी बाळाला."

"थांब जरा... चूल पेटवलीसच तर आमाला च्या बी ठिव वायच...तवर गार बी व्हइल ते खाणं..."

तिनं परत सगळ्यांसाठी चहा ठेवला. तेव्हढ्यात बाळ रडायला लागला. ती गडबडीन उठून त्याला घायला गेली.

"झाला च्या..?"

"नाही रडतोय ना तो...."

"हाय कि हितं आमी तेला... जा आदी च्या आण."

ती मुकाट्यानं परत आत गेली.

'हाय म्हणं आमी मग आवाज कशाला द्यायचा मला.... सगळच करायचं कनी आपणच. किती तो हक्क आणि 

धाक दाखवायचा काय प्रमाण....!!' त्याच आवेशात दोन-तिन शेणकुटं मोडून चुलीत कोंबली आणि नुसता धुराचा लोटच सुरु झाला.

"काय गं बाई.... काय एक काम सांगायची सोय न्हाय... जा.... जा... जा..... बाई चार जा त्या पोराला.... कुठलं सुख 

आलंय नशिबाला बाई.... जनम हाय तोवर असाच जायचा.... राबराब राबुनच मरायचं लिवलय का काय 

सटविनं....रांडनं कुनास ठावक...?" सासूनं गाऱ्हाणं सुरु केलं. तिनं बाळाला मांडीवर घेतलं. तो तर चांगलाच 

खवळलेला.... काही केल्यानं त्याला ते खाणं खायचं नव्हतं. मग तिनं आधी आपलं थान त्याच्या तोंडाला लावलं. 

तो थोडा शांत झाला.

"काय गं...? काय करतंय पॉर?" पोराच्या आवाज येईनासा झाल्यानं सासूनं विचारलं.

"दुध पितोय...."

"आत्ता व्ह्यय ते केल्याल चारायचं सोडून दुध कशाला पाजत बसलीस?" मागन खायचं नाही ते केलेलं आणि 

टाकून द्याय लागलं. ते काय केलयस ते चार आदी."

"व्हय..."

अस म्हणून तिनं बाळाला चरायला घेतलं. पण त्याला आईच्या दुधाचीच ओढ लागलेली, त्याचं पिणं सोडवल्यावर त्यानं पुन्हा टाळा पसरला... कसंबसं हरणंपाडं दाखवत त्याला खायला चारलं.

'बाळ पण एकदा हट्टाला पेटला कि काही केल्यानं खायला नको याला... खा बाबा खा.... पटपट.... कामं पडलेत 

माझी... परत रात्री तुझ्याच खाण्याला उशीर होईल... एकदा झोपलास कि परत उठायचा पण नाहीस... खा ना बाबा...!'

बाळाला बहुतेक तिने न बोलताच केलेली विनवणी कळाली असावी. दोन-चार घास पोटात गेल्यावर तो शांत पणे खाऊ लागला.

'दिवस-दिवस सगळा बाळाचं आणि घरातलं करण्यातच जातोय माझा... कुठं जाणं नाही येणं नाही. खूप कंटाळा 
आलाय... रोज रोज तेच तेच करायचं आणि किती केलं तरी रोजचंच बोलून घ्यायचं... खरंच यातून कधीच नाही 

का सुटणार आपण? रोज रोज किती मारावं मन आणि किती भिऊन भिऊन जगावं. का भितो आपण या 

लोकांना... एका अक्षरान आपण कधी यांना उलट उत्तर करू नाही शकत... आपली काही चूक नसतानाही 

किती बोलून घेतो आपण पण कधीच वलावला तोंड करून भांडलो नाही. किती समजवायचं स्वतःलाच.... 

जाऊदे आपलीच माणसं काय होतंय बोलली म्हणून अस म्हणायचं आणि आपणच आपली समजूत काढायची... 

हे अस झुरत राहणं नकोय... वरवर उगाच हसायचं आणि आतल्या आत कुढायचं...'

"आपण थोडं फिरून येऊया काय हो... बाळाला पण झोप लागले तेव्हढेच पाय मोकळे होतील, सकाळपासून 
कुठेच नाही गेले मी..." रात्री जेवण झाल्यावर अगदी भीतभीतच तिने नवर्याला विचारलं.

त्यानं नुसतच तिच्याकडे पाहिलं आणि एकही अक्षर न बोलता तो तसाच मक्ख बसून राहिला. तिने पुन्हा एकदा 

विचारलं, "जाऊया काय...?"

पुन्हा त्याच तेच वागणं ऐकून न ऐकल्यासारखं करून त्यानं अंथरुणावर पाठ टेकली... तरीही तिनं परत एकदा 

विचारलच "अहो...., बोला कि कायतरी... जाऊया काय...?"

"साडे धा होऊन गेल्यातं कुठं जातायासा एव्हढ्या रातच्याला... आणि ते पॉर उठलं..., तर तेला कोण बघायचं. 

झोप गप्प. राजा.... जाऊ नको बग आत्ता रातच्याला बाहीर..." सासूनं फर्मान सोडलं... तशी ती गप्प बसली.

'राजा म्हणे राजा... राजा कसला भिकारी कुठला... एक दिवस बोलायला वेळ नाही नुसता बैला सारखं आपलं 

काम आणि आपण. बाकी एक गोष्टीची चौकशी नाही... कसली विचारपूस नाही...' रागानं तिचा चरफड होत 

होता... डोळे पाण्याने डबडबलेले... तीही तशीच उठून अंथरुणावर जाऊन पडली. सासू अजून सासर्याची वाट 
बघत जागीच होती.

ती जाऊन अंथरुणावर पडली, तशी त्याचा हात तिच्या अंगावरून फिरू लागला.... जितक्या उत्सुकतेन त्यानं 

तिला जवळ ओढली तेव्हढ्याच निकरान प्रतिकार करून तिनं त्याला दूर ढकलून लावला. त्यानं पुन्हा हात 

टाकला.. तिनं पुन्हा ढकलून लावला.. किती तरी वेळ दोघांचा हा शिवाशिवीचा खेळ सुरूच राहिला.. कंटाळून 

त्यालाच कधीतरी झोप लागली असावी, बाकी हिचं कूस बदलणं सुरूच होतं. कधी बाळ कुरकुरला म्हणून कधी 

त्यानं लंगोट ओली केली म्हणून, कधी त्याला दुध हवं म्हणून.. पण रात्रभर काही तिचा पापणीला पापणी 
चिकटली नाही.

सकाळ उजाडली ती... तिच्या जडावलेल्या अंगाने आणि त्याच्या दुखावलेल्या अहंकाराने....

एक तर त्याला लवकर उठणं माहिती नाही... उशिरा उठायचं आणि वेळ होतोय म्हणत काही न खाता पिता तसच बाहेर पडायचं... रोजचाच हा दिनक्रम...

"काय बाई पॉर माझ वाळूनवठून गेलंय पाक, खात नाही पीत नाही, तेच्या वेळेत काय ह्या बाईच उरकत नाही... 

मीच करून आग्रह केला ते कसबस चार घास खातंय, नाही तर तसा पळतंय.. एकाद्यान दांडगाव्यानं करून 

घेतलं असतं नाहीतर का मला देत नाहीस म्हणून रट्ट्या लावला असता.. असलं काय म्हणायचं हे दुसर्याच्या 

काळजीन सोताची आतडी कुपावर घालून घ्यायची...? तुला बी कळत न्हाई व्हय गं... आपला दाल्ला हाय... तेला काळजीन कस करून घालावं, त्याला पायेज नको बघावं... तेची काय विचारपूस करावी... आमी काय आमचं लेकरू हाय म्हणून करणारच कि किती झालं तर तेच... एव्हढ एव्हढ नक्काडा होता त्याचा एव्हढा मोठा बाप्या केला.. तवा कराय कटाळलु न्हाई आनि आत्ता कटाळा करीन व्हय तेच आमी.. खर.... तू तेचं केलस तर तेच जीव तुझ्यावर बसल.... न्हाई तर काय मग मिळल तिथ खायचं म्हंटल तर गड्याला रेट मिळतंय बाहेर गेल्यावर... खरं अपुन बाईची जात अपुन पायसुदिनं र्हायलं..तर तेचा बी जीव रमल संसारात...." सकाळी सकाळी मिसरी घासतघासतच सासू तिला समजावत होती... त्यातलं सगळच काही पटत नसलं तरी काहीकाही गोष्टी तिला पटत होत्या... तिला उगाचच अपराधी वाटू लागलं.

कमी अधिक फरकानं रोजचाच दिवस असा होता... बघता बघता बाळ दीड वर्षाचा झाला... आत्ता त्याला बोलता येत होतं... चालता येत होतं... सततच्या त्याच्या व्यापातून आता थोडी मोकळीक मिळत होती...

आत्ता घरात बसण्यापेक्षा काही तरी काम शोधावं असं राहून राहून तिला वाटू लागलं.

"अहो, बाळ आत्ता मोठा झालाय, तो मला सोडून राहू शकतो किमान दिवसभर तरी तुमच्यासोबत मला पण 

काही काम बघा ना... अत्त्या आणि मामांची पण तब्बेत आत्ता फारशी बरी नसते, त्यांना बाहेरची कामं 

पहिल्यासारखी होत नाहीत. मला पण काम मिळालं तर घराला थोडा हातभार लागेल...."

"काय गरज हाय बाहेर जाऊन कामं करायची....? तू काम करून मला कमवून घालावस म्हनून काय मी लग्न 

केलं नाय तुझ्याशी... बाळ अजून लहान हाय तेला गरज असती आईची.... आणि माझ्या आई-वडिलांची तू 

काळजी करू नको. माझा मी समर्थ हाय सगळ्या जबाबदार्या पेलायला... तुला काय कमी पडत न्हाई नं मग 

शांत बस कामाबिमाच खूळ डोक्यातनं काढून टाक."

"का काढून टाकू... इतकं शिकले ते काय चूल फुंकत बसायला का? लग्नाला दोन-अडीच वर्ष झाली एक गॅस 

कनेक्शन घेता आलं नाही. एकट्याने करायचं आणि चार तोंड खाणारी अशानं काय प्रगती होणारे... बघता बघता बाळ मोठा होईल शाळेत जायला लागेल, त्याचं तरी किमान काही चांगलं होईल असं बघायला नको का....? खा रे पोटा, जा रे दिवसा, अशा जगण्याला काय जगणं म्हणायचं काय? एक साडी नवी घ्यायची म्हंटल तर दहा वेळा विचार करायला लागतोय... कसली म्हणून हौसमौज होत नाही तुमच्या एकट्याच्या पगारात... बरं तुम्हाला तरी धड काम मिळतय म्हणावं तर तसही नाही पंधरा दिवस काम करता, पंधरा दिवस लोकांची हांजीहांजी करत फिरता... तेंव्हा कुठे चार पैसे मिळाले कि त्यातून जेमतेम आठवड्याचा बाजार भरणार... परत तिचं परवड... परत तसंच मन मारत जगायचं... का कशासाठी माझी अशी फरपट चालवले तुम्ही...? मला नाही जगायचं अस कळकट आयुष्य...!!"

तिच्या चढलेल्या आवाजाने त्याचाही तोल गेला... त्यानं तिचे खांदे धरले आणि गदागदा हलवली, "का गं 

मादरचोद तुला म्हाईत होतं किनी अशी परिस्थिती हाय माझी, सटवे का छळतीस अशी..." हाताला धरून 

फरपटत नेलं आणि तिला बाहेर ढकलून दिली... ''जा जा नकोय ना तुला माझ्यासोबतच आयुष्य, नकोय ना 

माझी गरिबी... जा चालती हो... हरामी साली... नुसता पैसा आणि मजा मारायला पाहिजे... " रागारागान परत 

तिच्या जवळ गेला तिला परत ओढत घरात आणली... "हे बघ तुला काय पायजे ते दीन पण सरळ रहा... का गं 

तुला हात लावलेला पण सोसत नाही तुझ्या अंगाला..." तिची हनुवटी वर उचलून जोरात हलवली, "कोण कोण 

हाय मी बघितलस काय माझ्याकड नवरा हाय मी. मी... मी हात नाही लावायचा तुला कसला असला न्याय 

तुझा.... का नाही हात लावायचा गं मी तुला... दुसर्या कुणासाठी जपून ठेवतीस काय हे सगळं..? अस म्हणत 

जोरात तिच्या छाती पिरगळली....

"आई गं...." तिने जोरात त्याचे हात झिडकारून लावले. " ये कुत्र्या, नवरा हायेस महितीय की मला पण, हाड 

भाड्या... हात लावायलाच तेव्हढा असतोय होय रे नवरा.... बाकी काय मन सांभाळायला कोण दुसरा बघू काय... 

दोन वर्षात तुला कधी निवांत बसून बोलायला वेळ नाही.. काही मनातल सांगायला बोलायला गेलं कि 

पिसाळलेल्या कुत्र्यासारखा अंगावर येतोस... कद्धीकद्धी मायेनं जवळ घेतलं नाहीस तुझ भागलं कि झालं... कधी तरी रे किमान हसून गोड बोलावं... कुठे चार माणसात सोबत न्यावं... एखादी साडी राहूदे चड्डी घेण्याची पण ऐपत नाही तुझी... दुसर्यांनी वापरून जुनी केलेली फडकी त्यांनी भिक दिल्यागत द्यायची आणि मग मी ती घालायची... आला मोठा नवर्याचा तोरा गाजवायला...."
"मी कुत्रा...? मी कुत्रा....? कुत्रा काय....? दाखवीन थांब तुला..." अस म्हणत त्यानं थडाथडा समोरच्या खांबावर 

डोक आपटून घेतलं..

रागाच्या भरात आपण किती अपशब्द वापरले हे तिला कळून चुकलं... ती पुन्हा त्याला अडवायला धावली... त्याला ओढून जवळ घेतलं.

"सोड मला.... सोड, कुत्राय मी... सोड... मला..." राग असला तरी त्याचं अवसान गळालेलं तिनं तसंच बसून त्याचं डोकं आपल्या मांडीत खुपसून एखाद्या लहान मुलाला थोपटावं तशी त्याला थोपटत राहिली.... कितीतरी वेळ दोघं अशीच बसून राहिलीत.... बाहेर कोणाची तरी पावलं वाजल्यावर दोघेही उठून सावरून बाजूला झाले... बाळ त्याच्या आज्जीसोबत बाजारात गेला होता. तो धावत धावत आला आणि त्याच्या पायांना त्यानं मिठी मारली... "पप्पा मला आजिनं एकत तोकलेट घेतलं... पप्पा मला आदून एक पायजे... पप्पा द्या की मला पैते..."

"मी संध्याकाळी आणीन हं बाला, भालपूल चोकलेट अनणाल मी बालासाठी..." असं म्हणत त्यानं बाळाचा पापा घेतला.

तिनं त्याच्याकडे पाहिलं दोघांच्याही नजरेत अपराधी भाव होता.

" जा मम्मिनी तुझ्यासाठी गोड गोड खाऊ केलाय हं जा खाऊन घे हं मी जाऊ आत्ता बाहेर...?"

"थांबा कि पप्पा मी पन येनाल तुमच्याबलोबल..."

"नको नको, मी लांब जानालये तू बस हं मम्मीजवल... आज्जीजवल हं....! श्यान बाल."

"ये ये मझ्याकडं ये आपण जाऊया हं चोकलेट आणायला... माझं श्यानं बाल...." तिनं बाळाला त्याच्याकडून घेतलं... तो बाहेर निघून गेला.

सासूची परत तिच कॅसेट

"माझ्या बाळाच्या जीवाला जरा गारिंदा न्हाय...."

'कुणाच्या जीवाला हाय गारिंदा...? माझ्या...? लेकाची होरपळ दिसते माझी नाय दिसत...? माझी आई असती 

तर..... तिला कळाली असती का माझी अवस्था...?' तिला आईची आठवण आली... 'जाऊदे जे माणूस परत 
आपल्याकडं येणार नाही त्याची काय आठवण काढायची?'

सगळे विचार पाठीवर टाकून ती पुन्हा आपल्या कामात गुंतली.

पण दर आठवडा पंधरा दिवसान त्यांच्यात हे असे खटके उडतच राहिले... बाळाच्या डोळ्यात पाहून दोघांनाही अपराधीपणाची भावना छळत राहायची. कधी कधी बाळाच्या निमित्तानं त्यांच्यातल अंतर मिटायचं पण कधी कधी दोघांच्याही अहंकारानं मतभेदांची दरी रुंदावत जायची.

'किती दिवस चालायचं हे असंच....? मी काही प्रश्न केले तो भांडणार, अंगावर धावून येणार.... मी कसंबसं दिवस काढतेच.... पण माझ्या बाळाच्या वाट्यालाही हीच परिस्थिती...? त्यालाही मन मारतच मोठ व्हावं लागेल का...?कसं होईल त्याचं....? जाऊदे जे होईल ते होईल नशीब त्याचं.... आपण काय करणार.... मी एकटीनच का करावा प्रत्येक गोष्टीचा विचार... इतर वेळी तर मला त्याच्यावर साधा ओरडायचाही हक्क नाही... सतत सासूनं माझं बाळ माझं बाळ करायचं... अगदी चार माणसांत आणि तेही आपल्या देखत सांगते.... मी हाय म्हणून पोरगं हाय... माझ्या पोरावरही माझा हक्क नाही इथे आणि मी मात्र सतत माझं माझं करून मरत राहावं या माणसांसाठी...? काही नाही मला नाही राहायचं इथे. पण इथे नाही राहायचं तर जायचं तर कुठे...? आणि बाळ..? त्याला कसं तोडता येईल...? एव्हढ्या तेवढ्या कारणांनी कोणी पोर टाकून नाही जात. का राहून राहून असले भलतेसलते विचार यावेत मनात? अशीच राहणारे का परिस्थिती कधी तरी बदल होईलच...!!!'

"अहो बघा न पेपरला अॅड आले केमिस्ट दुकानात कामगार पाहिजे म्हणून मी जाऊ का? चौकाशी करायला?"

"हे बघ तुला जे योग्य वाटेल ते कर, मला काही विचारू नको."

'हेच तर, नेहमी म्हणतो धड काही कर म्हणत नाही धड नको म्हणत नाही. धड स्वतः काही करत नाही... जाऊदे यावेळी घरात नाही बसायचं जायचंच आपण विचारायला. नाही तरी बाळ आपल्याकडे असतोच कुठे? तो तर नेहमी आजीच्या मागं मागं....'
ती त्या दिवशी त्या दुकानात जाऊन आली. अंतर थोड लांब होत पण, महिना पाच हजार रु. पगार... तिने कामावर जायचं पक्क केलं. सकाळी ९ ते संध्याकाळी ७ अशी कामाची वेळ होती.
दुसर्या दिवशी तिने सरळ सांगून टाकलं घरी, "आजपासून मी कामावर जाणारे."

"आनी पॉर...? ते काय र्हायाच हाय व्हय आमच्याजवळ दिवसभर"

"आई तिला काय करायचं करू दे तू काय बोलू नको."

"काय करायचं करू दे म्हंजे तुम्हाला कोण इचार-पाचारणार नाहीच अस वाटतंय काय तुम्हाला? काय काम 

करायचं ते कर कि पॉर मोट्ठ झाल्यावर... कुणाला विचारून तू काम करायचं ठरवलस आणि तू बी जाऊदे 

म्हणतोस तरण्याताठ्या बाय माणसान असं आपल्याच मनाच खरं करून चालत नसतंय. काय झालं गेलं तर 

काय करशील उद्या...?"

"काय तर म्हणजे काय होईल?" तिनं विचारलं.

"काय बी घडतय आजच्या काळात. माणसं काय चांगलीच भेटत्यात असं नाय. कुणाचा काय भरोसा द्यावा..."

'चांगल कधी सुचणारच नाही का ह्यांना... कधी एखादा विचार पटलाय असं नाही... सतत काही न काही खोट 

काढायची सवयच घाणेरडी.'

"हे बघ आनि म्हनशील मी पुढं जातुय आनि सासू आडवी पडतीया काय करायचं ते पायसुदिनं करा."

'पायसुदिनं' एव्हढाच शब्द तिच्या डोक्यात घोळत राहिला.

९ वाजता दुकानात पोहचायचं तर घरातून साडे सात वाजताच बाहेर पडावं लागायचं. कधी घरातलं सगळं 

उरकायच तर कधी कामं तशीच रहायची. सासूला जास्तीची कामं पडली कि धुसफूसणार.

"ये बाबा आवर कि लवकर, किती जीव काढतोस.... एकटीनं करायला लागतंय घरातलं सगळं तुझ्याच मागं 

कितीदा लागायचं बाबा" सासू बाळाला बोलत होती, तो अंघोळ करत होता.

'मी कधी आवाज चढवलेला आवडत न्हवता आनि आत्ता आपण ओरडलेल चालतंय..!'

"अगं आय थाम्ब कि का अशी करतीयास, का वराडतीयास...?"

बाळाचा आवाज चढलेला.

त्यांचं असं एकमेकांवर ओरडण खेकसण नेहमीचंच झालं होत...

पाच हजार पगार कशालाच पुरत नव्हता... हळूहळू घरातली सगळीच जबाबदारी तिच्यावरच पडली...

''मी एकटीनच सांभाळायचय का घर? तुमची काही जबाबदारी आहे कि न्हाई?"

"तुला कोणी सांगितलं सगळं सांभाळायला... मग मी बाहेर निघाले कि घरातलं काही न काही सामान संपलेलं 

असतं, ते आणून दिल्याशिवाय बाहेर जाता येत नाही अशी  परिस्थिती असते."

"मग आणू नको ना तू..."

'एव्हढ बोलला कि संपली जबाबदारी तू आणू नको, तू करु नको.... नाही तर, तुला काय करायचं ते कर... 

काहीच सोयरसुतक नसल्यागत असा कसा हा माणूस? किती दिवस असा राहणार हा...'

"बाळाचं पण वागणं बिघडत चाललय इथे काही तो सुधारत नाही आपण वेगळं राहूया का?"

ती बोलली नाही तोवर त्यानं खाडकन मुस्कटात लावली. यानंतर तिनं परत वेगळं राहण्याचा विषयही काढला 

नाही. आज आणलेलं सामान दोन दिवसात संपलेलं असायचं.

'सासूची रोजची काही न काही कुरकुर... हे संपल ते संपल. पण काय करणार नाही आणून दिल तर नाखीन 

हिशोब विचारेल आम्ही दिवसभर सांभाळतो पोराला आणि हिला घरात काही द्यायला नको...'

म्हणजे नोकरी केली तरी परीस्थीत फारसा काही फरक नव्हताच पण वरून सगळं घरही सांभाळाव लागायचं... 

कधी कधी तर पगाराच्या आधी याच्यात्याच्या कडून हात उसणेही घ्यायला लागत.

'नाशिब कोणी काही बोलत नाही. दर वेळी कसे तुम्हाला advance लागतो म्हणून, पण सारख अस हात पसरण बर नाही वाटत.'

"काय मॅडम बघेल तेंव्हा कसल्या विचारात असताय?"

पलीकडे बसलेल्या माणसानं विचारलं.

तिने त्याच्याकडे एकदा पाहिलं, 'याला काय करायचय मी कसल्या विचारात असते ते, हा माणूस नेहमी असतो 

या बसला एव्हढीच आपली आणि याची ओळख बाकी काय करायचय याला.'

"अहो रोज बघतोय मी तुम्हाला जाताना येताना... चांगल्या घरातल्या वाटताय पण बघेलं तेंव्हा आपल 

विचारातच असल्यागत असताय म्हणून विचारलं."

"काही नाही."

"मिस्टर काय करतात तुमचे फॅक्टरीवर आहेत कामाला..."

"पर्मनंट कि टेम्परवारी."

"टेम्पररी."

"मुलं काय हायेत?"

"एक मुलगा, दोन वर्षाचा."

"चांगल हाय कि मग"

"हम्म"

तिचा स्टॅाप आल्यावर ती उतरली.

'घर, मुल, नवरा, आधार तुटलेलं माहेर, प्रत्येकाचा विचारच तर करते नेहमी, लोकांना कस कळतं पण आपण 

विचार करतो ते, खरंच कळत असेल कि आपल काही बोलायचं म्हणून तो बोलला असेल...'

            "किती केलं तरी तुमच्या आईच काही केल्यानं समाधान होत नाही सतत कसली न कसली भुणभुण 

लावत असते, मला तर न राहूच नये वाटतंय या घरात... तुमची एक तर्हा वेगळीच... का सहन करायचं मी 

प्रत्येकाचं? आज बाळानं गरम चहा सांडून घेतला अंगावर हेच मी असताना झालं असतं तर किती दंगा झाला 

असता घरात...."

"एव्हढीच काळजी वाटते तर रहा कि मग घरात... तुला कुणी जबरदस्ती केले कामावर जायची तू नाही गेलीस 

म्हणजे काय आम्ही उपाशी नाही मारणार."

"सतत माझं कामावर जाणं का काढता, त्यांच्याजवळ असतो तर मग काळजी नको का घ्यायला."

"ती किती काळजी घेते मला माहितेय, तिला होत नाही तरी सगळ घरातलं करते न... काही बोलते का ती तुला, 

तरी तिच्या नावांनी खडे फोडतेस? चांगलीच मस्ती चढलेली दिसते... थांब बघतो..."

जवळ पडलेलं दांडक्यान त्यानं सणकन पाठीत रपाटा घातला... हल्ली जराही काही बोलल तर तो असाच 

अंगावर धावून यायचा.

तोंड दाबून ती मुकाट्यानं पडून राहिली.

'जास्त काही बोलले तर हा उगाच दंगा करेल सगळी गल्ली गोळा करेल.. माझा कोणी विचार करणारे का..? 

नाही. सगळी आपल्यालाच दोष देतील त्यापेक्षा गप्प राहिलेलं बर.

दुसर्या दिवशी तिनं बस मध्ये पाहिलं, कालचा तो माणूस आज आला नव्हता.

'कोण असेल तो? का उगाच त्याची आठवण काढली आपण? रोज रोज कोण विचारणारे आपल्याला कसल्या 

विचारात आहे म्हणून...! आणि विचारलं तर आपण तरी अनोळखी माणसाला कशाला सांगू आपले विचार.. 

ज्याला पटायला हवं त्याला पटेना आणि दुसर्यांना सांगून काय फायदा...?'

एक दोन दिवस आड घरात असा मार भेटणं आता नेहमीच झालेलं. तिने घरात बोलणच सोडून दिलं त्याचाही 

त्याच्या डोक्यात राग...

"कुत्रे माझी खातर नाही लागत तुला कामावर काय जायला लागली लय शानी झाली तू....? का नाही बोलत तू 

माझ्याशी बोल....? बोल.....? दंडाला गच्च धरून गदागदा हलवत त्यानं विचारलं, "बोल....ना ये.... बोल...."

"मार मार कुत्र्या मार, काय मारायचं ते मार.... मारूनच टाक एकदा म्हणजे कटकट संपल."

त्यानं तिचा हात सोडला...

हात एकमेकांत दुमडून ती खाली बसली. गप्प बसली मात्र. तो परत तिच्या दिशेनं वळला, "उठ..." तिच्या 

हाताला धरून त्यान उठवली. तिच्या भेदरलेल्या नजरेची त्याला दया वाटली असावी, तिचे विस्कटलेले केस 

सरळ करत, "हे बघ आपण काही एकमेकांचे शत्रू आहोत का अस एकमेकांवर सतत राग धरायला, आपल्या 

बाळा शप्पथ मला तुला खूप सूखात ठेवायचीय पण तू पण मला समजून घे ना. घरात सगळ्यांशी बोलत जा... 

बाळाची नीट काळजी घेत जा... तू त्याच्याकडं दुर्लक्ष केलस तर तो तसच उद्धट होत जाणार, त्याला पण आणि 

मला पण तू हवी आहेस.. तू हवी आहेस आम्हाला..."

त्यानं तिला जवळ घेतली आणि हमसून हमसून रडू लागला.  

त्याला तसं अगतिक झालेला पाहून तिलाही आश्चर्य वाटलं.

'खरच आपण सतत असा राग राग करणं बरोबर नाही... कुठेतरी आपणही अति हट्टीपण करतोय... थांबायल हवं 
हे सगळ... आपल्यासाठी, आपल्या बाळासाठी.'

त्यानंतर कित्येक दिवस दोघांनीही खटके उडतील अशा विषयांवर बोलायचंच टाळलं. दोघे मिळून बाहेर जाऊ 

लागले, घरी परतताना एकत्र परतू लागले.

'खरच सुख आलंय आयुष्यात की पुन्हा हि देखील एक हुलकावणीच ठरेल. आलेलं सुख सुद्धा आत्ता आपलं म्हणू 
वाटत नाही. त्यात गुंताव असं वाटत नाही. पळून जावं वाटतय या सुखापासून सुखाच्या आडून काही तरी नवं 

संकटच आलं असेल अस वाटतं. या माणसांनी अशी सुखी राह्ल्याची... समाधानी राहिल्याची नाटकंही करू 

नयेत उगाच खोट्या समाधानानं भरून गेल्यावर पुन्हा त्या फुग्याला कसल्याशा आरोपाची सुई लाऊ नये... 

नाहीच.... नकोच इतकं आनंदी राहण्यात काहीच अर्थ नाही निराशा कधीही पुन्हा परतू शकते... त्यांना परत 

आपल्यात काही ना काही खोट दिसेलच पुन्हा काही कुरापती निघतीलच, पुन्हा ये रे माझ्या मागल्या.... सुरूच 

राहील... आभास असतो हा सगळ काही ठीक असल्याचा खर तर अस सतत सगळ काही ठीक असू शकत 
नाही... नाही...'

"आज जरा हसरा चेहरा बघून बर वाटलं बघा... " गर्दीतून वाट काढत तो नेमका तिच्या जवळच येऊन बसला, 

"बाहेर गेलेलो फिरायला टूरवर म्हणून आलो नाही या भागात, खूप दिवसांनी बघितलं तुम्हाला... आणि आज 

फ्रेश पण दिसताय."

'याला काय करायचय आपलं दिसण...! खर तर आपल्या वाट्याला काही फार सासुरवास आहे असं नाही. 

कितीतरी जणींना यापेक्षा किती तरी भयानक सोसावं लागतं... मग आपणच का इतका बाऊ करतो प्रत्येक 
गोष्टीचा.... राहतात न कितीतरी जणी सोसत मुकाट्यानं. आई म्हणायची, तेच खर असावं आपल्याबाबतीत, 

आपल्यातच नाही सहनशीलता म्हणूनच सतत त्रास... त्रास... त्रास एव्हढाच विचार करतो आपण.'

ती आपल्याच तंद्रीत उतरून गेली.

दुसर्या दिवशीही 'तो' स्टॉपवर होताच. तिने पाहून न पहिल्या सारख केलं. तरी तो तिच्याच दिशेनं येत होता, तिन मान खाली घातली.
"तुम्ही कुठं काम करता?"

"अरिहंत मेडिकल स्टोअर."

"मी एका शैक्षणिक संस्थेत काम करतो, आमच्याकडे सध्या ग्रज्युएट कॅडिंडेट हवे आहेत. तुम्ही उद्या १० वाजता तुमचा बायोडाटा घेऊन या पत्त्यावर या."

अस म्हणून त्यान एक व्हीजिटिंग कार्ड तीच्या हातात दिलं. तिनंहि ते घेतलं. तो निघून गेला.

"हे बघा, हे व्हीजिटिंग कार्ड दिलय एका माणसांनी आज सकाळी, उद्या इंटरव्ह्यूसाठी बोलावलंय."

"कोण माणूस? तुला कुठे भेटला?" त्यान ते कार्ड बघितलं.

"मला नाही माहिती कोण पण बसमध्ये असतो रोज."

"मग अनोळखी माणसासोबत बोलायची गरजच काय तुला?"

"मी नाही बोलले, त्यानच येऊन दिलं, स्वतःहून."

"पण, तुला ना जरा नीट वागता येत नाही, कोणी अनोळखी माणूस तुला येऊन काहीही देणार आणि तू 

बावळटासारखं त्यांचं ऐकणार?"

"अहो, कुठे काय ऐकल मी..? मी फक्त दाखवतेय न तुम्हाला हे त्यांनी दिलं म्हणून."

"काही नको दाखवू मला...." त्यानं ते कार्ड चुलीत घातलं...

ती अपराधीपण पदरात घेऊन गप्प बसली.

"हे नसते उद्योग करायला मी तुला जा म्हंटल नव्हत..."
'नसत उद्योग?' तिच्या कपाळावर आठ्या चढल्या.

"काय नसते उद्योग केले मी? सांगा न काय नसते उद्योग केले?"
त्यानं उलट्या हातांनी आधी एक थोबाडीत दिली,

"हे बघ जेवढ करतेस तेव्हढच बस्स झालं... काही गरज नाही नवी कामं शोधायची.... कोणी अनोळखी माणूस 

तुला कार्ड देइल आणि तू जाशील काय हपापल्यागत कामासाठी... काय गरजच काय बिन ओळखीच्या 

माणसांशी बोलायची. इथे घरात ते एक शब्द तोंडातून निघत नाही आणि बाहेर जाऊन गप्पा झोडत बर 
बसायला मिळत हेच उद्योग करतेस काय बाहेर जाऊन?"

"काहीही काय आपल ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलू नका, कुणाशी गप्पा झोडत बसायला नाही जात मी. कोण तो मी ओळखत पण नाही पण त्याला वाटलं म्हणून त्यान दिलं ते कार्ड... आणि जायचंच असल तर मला तुम्हाला विचारून जायची काय गरज न्हाई मी अशी पण न सांगता गेलेच असते..."

"तेच तेच करणार ग तू... तूला नकोचय मी... म्हनून तर सतत दुस्वास करतेस.. म्हनून तर सतत भांडण उकरत 

असतेस.. रोज काही न काही निमित्त भेटतच तुला अबोला धरून झोपायला."

तिने एकदाच त्याच्याकडे पाहिलं तसाच बडबडत तो कपडे हातात घेऊन अंघोळीसाठी निघून गेला.

'हेच होत राहणार का या घरात काही कराव म्हंटल तर सतत आपल्या हेतूवर संशय, आत्ता तर... कहरच झाला. हेच जर हा आपल्या आईवडलापुढे बोलला तर ते गह्जबच करतील. त्यापेक्षा जितकं करायला मिळतय तेच ठीकाय नसती पिडा माग लाऊन घेण्यापेक्षा गप्प राहिलेलं बरय.'

तिने मुकाट्याने घरातली कामं आवरली आणि निघाली. तिला वाटलं तो थांबवेल कदाचित,

 'काय म्हाईत एकदा डोक्यात संशय बसला कि काही खरं न्हाई.'

पण तो काहीच बोलला नाही.

'काहीच कळत न्हाई या माणसाच, कधी पिसाळलेल्या जनावरासारखा अंगावर येतो आणि कधी नुसताच गरीब 

गायी सारखा शांत राहतो. कधी वाटतं तो आपल्याला छळतोय, कधी वाटतं आपण त्याला छळतोय..... कि 

परिस्थितीच दोघांनाही छळतेय.'

तिच्या विचारांचा असा प्रवाह सुरूच होता. पाय चालत होते म्हणून रस्ता सरत होता. ती मात्र ढवळत होती 

स्वतःच्याच आतला गाळ.

स्टॅापवर आली तर बस नव्हती अजून.

तिच्या मनात सकाळची त्याची वाक्यं घोळत होती.

"तेच करणार गं तू.......!"

'तेच करणार आपण... किती विश्वास याला.... श्शी..! कस काय सुचल असेल बरं याला असं फालतू बोलणं....! 

कुणी शिकवत असेल का....? कुणी का बरं विष ओतावं असं एखाद्याच्या कानात? खरच तसं काही होईल का 

आपल्या हातून..... 'तू तेच करणार गं....!!' तेच 'ते' काय 'ते' कस करतात 'ते'... आत्ता एक मुल झाल्यावर, 

संसाराचा एव्हढा राडा झाल्यावर, खरंच परत कुणावर तरी आपण प्रेम करू शकू...? करू पण कदाचित. होईल पण कदाचित. आपण कुठे विचार केला तेंव्हा यातून बाहेर पडायचा असाही मार्ग असू शकतो.'

मनात चालेल्या या नव्या विचारानच आधी ती हादरून गेली. द्रोहाचा विचार, व्याभिचाराचा विचार, कुनीतीचा 

विचार, अभद्राचा विचार. एकाच वेळी हे विचार तिला खेचतही होते, अन दुसर्याच क्षणी तिला त्यातला फोलपणा 

हि जाणवत होता. हृदय जोरात धडधडून जणू  त्याला नकारात्मक प्रतिसाद देत, त्यांना कुचकामी ठरवत होतं, 

त्या विचारांचा निषेध नोंदवत होतं.

'हो ना कित्येक दिवसांत आपण आपला विचारच केलेला नाही. नुस्ताच नवरा संसार, सासू, सासरा आणि मुल. 

यापलीकडचा कुठलाच विचार आपल्याला शिवला नाही, आणि आत्ता हा म्हणतो, "तू तेच करणार गं तेचं...!" 

म्हणे, हो करेन मी तेच. तेच ते, नक्कीच करेन द्रोह तुझ्याशी आणि स्वतःशी.'

अशीच तंद्रीत उभी होती. थोडावेळ तिने जरामान हलवून इकडे तिकडे पाहिलं. तिला उगाचच अस वाटलं कि 

आपण मघापासून जो विचार करतोय तो आजूबाजूच्या माणसांना कळलाय आणि ते तिच्याकडे पाहून कुत्सित पणे हसतायत.

'हसू देत हसणारच काहीही केलं, किंवा नाही केलं तरी ते हसणारच. हसणं हा तर त्यांचा निसर्गदत्त अधिकार, आपल्यालाच हसत असतील कशावरून?'

गाडी येऊन स्टॉपवर थांबली. ती नेहमी इतक्याच यांत्रिकपणे गाडीत चढली. गर्दी न्हवती तरी आज ती मुद्दाम 

एक पुरुषा शेजारीच बसली. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि त्यान एकदा तिच्याकडे पाहिलं. बाकी काहीच नाही. ती स्वतःशीच हसली, 'पागल झालोय का आपण? अस कधी होईल का प्रेम जबरदस्तीनं स्वतःवरच स्वतः करायचीय जबरदस्ती. का पण? कशासाठी? नुसत्याच दुराग्रहासाठी, हट्टासाठी.'

तो दिवस नेहमीप्रमाणेच गेला. पण सकाळच्या.... स्वतःच्याच विचारांचं गरुड काही उतरलं नव्हतं आणि 
असल्या फालतू विचारांचं अप्रूप तर होतच पण कुतूहल जास्त होतं.

'खरचं जमणारे का आपल्याला द्रोह करणं? आणि खरंच करायचाय तरी कशासाठी? नाही तरी हेच असंच किंवा यापेक्षा बरं किंवा कदाचित यापेक्षाही वाईट जगणं सगळ्याच बायकांच्या नशिबी येतंच. मग आपल्यालाच का सुचवा हा दळभद्रीपणा? जाऊदे मनात विचारही येउच नये अस काही नाही, शेवटी तो बोलला तसं म्हणून आपण असा विचार केला, त्यानं तरी पुरतं कुठं जाणलंय आपल्याला? आणि उद्या झालाच काही असं तरीही म्हणेल, अशी असशील असं वाटलं न्हवतं. जाऊदे विचार ते विचारच शेवटी आपण किती रोख लावणार? किती आवरणार?'

बाळाच्या शेजारी ती तशीच पडून राहिली, त्याला झोप लागली होती, सासू भाकर्या बडवत होती. कदाचित ती 

पण कंटाळली असावी भाकर्या बडवत बडवत काही तरी पुटपुटत होती.

'हीच हे पुटपुटण नेहमीचंच. कधी बाळाला असं जवळ घेऊन पडायला त्याला पोटभर बघून घ्यायलाही भेटत 

नाही. घर, काम, नोकरी आणि नवरा झालं इतक्यातच दिवस संपला. त्याला जरी म्हंटल मला आज तुझ्यापेक्षा 

बाळाला कुशीत घेऊन झोपावं वाटतंय तरी त्यालाही ते पटत नाही. दिवसभर कितीही तो गरीब वाटत असला 

तरी रोज रात्री मात्र तो आपल्याला कुरूप राक्षसच वाटतो. नुस्ताच ओरबाडत राहणारा... राक्षस .... रात्र एवढी 

होऊच नये वाटतं. एकदा चुकून आपण बोलता बोलता... बोलता बोलता कसलं भांडता भांडता आपल्या 

तोंडातून गेलं 'तुझ्यासोबातची रात्र म्हणजे नकोशी  वाटतेय आत्ता,' बोलण कमी पण भांडणच जास्त.... आणि 

ह्याचा रुसवा काढण्यासाठी तरी म्हणून मला याच्या जवळ जावं आणि सगळ काही व्यवस्थित पार पडावं असं 

वाटायला हवं म्हणे! फालतू अपेक्षा अपेक्षा नुस्ता अपेक्षा....!! नुस्ताच भिडत राहण्यात कसला डोंबलाचा आनंद 

मिळतो याला काय म्हाईत! कित्येक दिवस.... न्हवेच बाळ झाल्यापासून, म्हणजे आत्ता तो दोन-अडीच वर्षांचा 

झाला, हं म्हणजे दोन-अडीच वर्षं आपण तो आनंदच अनुभवलेला नाही जो पूर्वी असायचा... तो उत्साह, तो 

हुरूप, कणाकणान दाटून येणं आणि त्याच्या मिठीशिवाय आत्ता आपण फुटून तुटून जाऊ अस वाटनं या 

कित्येक दिवसात अनुभवलेलंच नाही. नकोच वाटते ती जबरदस्तीची घट्ट मिठी... नुस्ताच भिडत राहण्याचा, 

झुंजत राहण्याचा खेळ. नकोच. नकोच.'

हा नकोच नकोचचा जप सुरु झाला की तिला त्याची किळसच वाटायची. आणि मग हीनं धुडकवायचं, त्यानं 
ओढत राहायचं....

'किती निष्ठेनं बायका संसार करतात दारुड्या नवर्यासोबत पण आणि आपला इतका चांगला असूनही 

आपल्याया अशा अभद्र कल्पना सुचतात. खरच कित्ती नीच मानसिकता ती स्वतःचीच. पण तीरस्कार तरी किती करावा स्वतःचा आणि त्याचाही. थांबवूया न हे कुठेतर... पूर्वीचा आपल्याला भावणारा 'तो' शोधूयात त्याच्यात. 

ह्याह्याह्या.........!!! किती शोधणार? रोज रोज आपण तिथेच येतोय त्याच्यातून हरवलेला 'तो' शोधून शोधूनही 

वैताग आलाय आत्ता. नाही सापडतेय 'तो'. कदाचित नाहीच सापडला तर रोज उठून तोच डाव खेळायचा का? 

लपाछपी आणि झोंबाझोंबी. जाऊदे कित्ती करावं स्वतःचं काऊन्सलिंग स्वतःच.'

स्वतःच्या मनात गाडलेल्या या बंडाच्या विस्तवाची धग मात्र तिला हवीहवीशी वाटत होती. उबदार धग. तर कधी 

कधी वाटायचं हीच धग स्वतःसह सर्वांनाच पोळून काढेल.

पण त्यादिवसा पासून ती पुन्हा स्वतःकडे थोडं लक्ष देऊ लागली. केसांची वेगळी स्टाईल केली, नवे ड्रेस घेतले.... 

सासून नाक मुरडलं तरी तिच्याकडे साफ दुर्लक्ष करून तिने स्वतःला आवडेल तसं राहायला सुरुवात केली.

'किती मन मारलं तरी काही त्यांच्या मनाला येत नाही मग का मारावं आपणच आपल मन आणि कुणाला खातर 

पडले त्याची. आत्ता नाही तर कधी म्ह्तारे झाल्यावर नीटनेटके राहणार का आपण? आणि एक मुल झालं 

म्हणजे सगळं संपल अस कुठे असतं? आपणच आत्ता थोडं आपलं स्वतःच मन राखूयात, इतरांचा सतत विचार 

करण्यापेक्षा!'

"व्वा...! अशी छान राहत जा कित्ती सुंदर दिसतेस, तू अशी असलीस ना समोर की तुला अशी नुसतीच चोखून 

खावं वाटतंय." त्यालाही तिच्यातला बदल भावात होता.

"झालं सुरु.... लगेच...."

"अगं झालं म्हंजे काय? बायकोला चोखाव नाही वाटणार तर काय दुसर्या कुणाला म्हणू का असं? अशी काय 

करतेस?आत्ता होतंय ना सगळं तुझ्या मनासारखं मग तू पण जरा कर न माझ्या मनासारख."

"हो... पण आत्ता कुठे? चार वाजलेत, कोणी तरी येईल आत्ता एव्हढ्यात..."

तिच्या लटक्या प्रतिकाराला न जुमानता त्यानं सरळ ओढून जवळ घेतलं.... ओठांनी ओठांना सलाम दिला... घट्ट 
पाशात बंडाची आग विझुन गेली.

इतक्यात बाहेर कुणाची तरी कुजबुज ऐकू आली तशी ती बाजूला झाली.

"कोण हाय घरात."

"हां या कि मावशी हाय की मी."

"कित्ती हाळ्या मारल्या कवा ओ द्याचीस? आगं बाई तू बी हाइस व्हय आज कसा काय घरात? कामावर नाही 

गेलास?" त्याची मावशी आलेली.

"नाही गं, मावशे आज जरा बाहेरच काम होत म्हणून थांबलेलो आत्ताच आलोय बघ. बस की यील आत्ता आई." 

तिच्याशी बोलत बोलत तो बाथरूम कडे वळला.

तिनं मावशीला पाणी दिलं.

मावशी चूळ भरून आत आली, आतल्या विस्कटलेल्या अंथरुणाकडं पाहून ती बोलली,

"हे चाललय व्हय काम तुमचं, तुला पण दिसापासच काय पडल्याल नाय? आत्ता कस बाई एकाद्या माणसान 

तुझ्या घरात पाणी प्यावं?" मावशी तिच्याकडं बघून बोलली.

तिनं मान खाली घातली, तो बाथरूम मधून फ्रेश होऊन आला, तिला वाटलं तो काही तरी बोलेल पण तो काहीच न बोलता गप्प बसला, कपडे चढवले,

"बस मावशी तू मी जरा गावात जाऊन येतो, आई भेटली तर सांगतो तरी तू आलीस म्हणून." त्यानं मावशीला 

सांगितलं आणि तो बाहेर पडला.

"व्हय बाबा जा सांग तेवढं नाही तरी काय आत्ता तुझ्या कामाचा सगळा खोळंबाच झाला."

तिनं शरमेन मान खाली घातली. तो निघून गेला.

'त्याच हे नेहमी अस कुणी काही बोलाल तरी साफ कानामाग टाकायचं, कस काय जमत असेल बर याला. हिला 

पण आत्ताच टपकायच होतं. आले ती आले आणि वर टोमणे मारते. पाण्याला खाण्याला काय विटाळ होणारे आत्ता माझ्या मूळ?'

एव्हढ्यात सासू आलीच.

"अक्का कधी आलीस गं? कशी हायीस? बरी हायीस का? पोरांस्नी एखाद्या तरी आणायचं नाही काय एकटीच 

आलीस व्हय? कित्ती दिवस झालं पोरास्नी बागू वाटतय गं कावा नजर पडत नाहीत."

"नाय बाई म्हणाली, सांगिताला चल म्हणत हुतो, खर नाय म्हणाली, बाई."

"पाणी दिलस का आत्तीला?" सासून तिच्याकड बघून विचारलं.

"हां दिल की."

"कसलं बाई पाणी आणि काय तेंच्या कामाचा खोळंबा झाला माज्यामूळ" मावशी खोचक पणे बोलली,

"व्हय घरात कोण नसलं की असतयचं तेंच काम, कामाला काय तोटा नाय, घरातलं होणार नाही खर लय लाडक 
व्हायचं नुस्त तेचच." सासून री ओढली.

'लेकाला नाही का लागतं तुमच्या बायको....! सगळच कस माझ्यावर फोडायचं, तो ह्यांचा आणि मी मात्र परक्याची शेवटी,"

"चांगल नसत अस दिसापासच करणं, गड्याच्या जीवाला धोका असतो." मावशी तिच्याकड तिरपी नजर टाकून बोलली.

"तेला काय कळत न्हाय पर हिला कळाय नको? लांब राहायचं जरा दिसाच सारखच खेटून बसल्यावर तो तर 

कशाला गप्प बसलं? तो काय गाडी हाय शेवटी गद्याच मन ताब्यात रहाताय व्हय, बाईनवच आळा घातला तर, 

न्हाई तर लावशील बाई फास माझ्या लेकाला, कामा धंद्यावरन तेच लक्ष उडाल तर काय करशील? लय सवं 

लावायची न्हाई, लय लाडकं व्हायचं न्हाई." सासून पण तिचीच बाजू उचलून धरली.

'घ्या न तेला समोर आणि सांगा सगळ समजून, कित्ती ते मलाच दोषी धरायचं?'

"मम्मे मला खायला कर काय तरी, भूक लागले." बाळ बाहेरून आला आणि त्यानं तिच्या पायांना मिठी घातली.

तिने आधी त्या सासूच्या बहिणीला आणि सर्वाना चहा बनवला. मग बाळाचा खाऊ, मग त्याला भरवण्यातच एक 

तास गेला.

"नुसतं असं पोराचं केल म्हंजी झालं व्हय हीच काम, घरातल्या कुठल्या कामाला हात लावती का न्हाय?"

"कुठलं हात लावलं पोराचच आवरत नाही तिला, त्यात कामाचं आनी निमित्त कुठलं काय होतंय उगाच आपलं 

आमी काय बोलत न्हाय म्हनून चाल्लय आपलं." सासूनं उत्तर दिलं.


तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि आपल्या कामाला लागली.


'काय करणार उलटं बोलुन फायदा तरी काय, गप्प बसलेलं बरं, नाही तरी काही बोलत नाही तर इतका दंगा 

बोलले तर गहजबच करतील.'

सकाळी लवकर आवरून सासू आणि तिची बहिण देवाला निघाल्या.

"जाऊन येतू ग आमी, तवर जमल तेवढ तरी आवरून ठिव र्हयल्याल मी माग आलू कि आवरीन."

"हां आवरीन की. या तुम्ही जाऊन, बाळाला पण नेता काय सोबत?" तिने भीतभीतच सासूला विचारलं.

"बरं आवर तेचं नेतु तुझं अवरलं कि तू जाशील मग निगुनश्यान." सासू अगदी शांतपणे बोलली.

"हां थांबा हां आवरून देते." तिने बाळाला तयार केल तोही फिरायला जायचं म्हणजे खूषच असतो.

तिघेही आवरून बाहेर पडले, सासरे कधीचेच, अगदी पहाटेपहाटेच बाहेर पडलेले  कामासाठी. या वेळी दोघच 

घरात. तो झोपलेला, कारण कामावर जायची फारशी चिंता नाही. वेळ झालाच तर अगदी उपशीही जायला 
तयार.

ती एक डोळा घड्याळावर ठेऊन तिचं आवरण चालेलं असायचं.

'पंधरा मिनिट जरी उशीर झाला तर गाडी चुकेल, एकदा गाडी चुकली कि पुन्हा अर्धा तास गाडी नाही, मग 

उशिरा गेलं की सगळे बघणार एखादी पाल अंगावर आल्यासारख जणू काही मी मुद्दामच उशिरा येत असते. तो माने तर हमखास काही न काही टोमणे मारणार. आज काय झालं? कुजक्यासारखं हसून विचारणार. सुरुवातीला मला वाटायचं विचारत असेल सहज...! पण नंतर लक्षात आलं... हे काही सहज वगैरे नाही, त्यातून त्याला उगाच डिवचत राहायचं असतं. किती त्या चौकश्या. बस मिळाली नाही तर कुणाची तर गाडी मिळते का बघायची म्हणे, कुजका कुठचा. वेळ, उशीर, ऑफिस, टेन्शन एव्हढंच घोळत रहायचं डोक्यात.

"ये काय करतेस इकडं ये जरा." त्यानं आवाज दिला.

"नाही मला आवरून जायचंय उगाच परत कामं तशीच पडलीत तर माझ्या नवान शंख नको आल्यावर."

"एखाद्या वेळेस तुला ऐकाव वाटत नाही. कसली असशील?"

त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिन जमेल तितकं आवरलं आणि टी घराबाहेर पडली.

तरी बस थोडक्यात चुकलीच.

'चुकुंदे चुकली तर काय करणार? जाता येईल मागच्या बसनी.'

पाठीमागे एका हॉटेलच्या बाहेर एक बाकड ठेवलेलं होतं, ती त्याच्यावर जाऊन बसली. बस ज्या दिशेने येणार 

त्या दिशेला तिने नजर लावली.

'आपण कितीही बघत राहिलो, म्हणून काय बस लवकर येणारे का... तरी आपली नजर सारखी तिकडेच वळते.'

 स्वतःचच हसू आलं तिला. मग तिने थोड आजूबाजूला पाहिलं,

'कोणाचच लक्ष नाहीये आपल्याकडे, नाहीतर बघणार्यांना काय वाटेल का बसले ही बाई इथं उगीच. मुरवतीच्या 

बाईनं असं कुठबी बसूनी लोक नावं ठीवत्यात. ठेऊ देत ठेवली तर.... पायांवर  किती भार देणार? हॉटेलच्या 

बाहेर बसलं म्हणून काय मुरवत कमी होत न्हाय कुणाला काय बोलायचं ते बोलू दे... तसही खरच कुणाला 

वाटतय का तसं हे पण आपल्याला माहिती न्हाई आपण उगाच आपल्याच मनात नसत्या शंका काढत कुढत 

बसतो. कुणाच्या लक्षात तरी रहील का उद्या आपण आज या हॉटेलबाहेरच्या बाकड्यावर बसलेलो. आपल्याही 

राहणार न्हाई तरी आपण लोक काय म्हणतील याचा विचार करतो. हॉटेल म्हणजे फक्त पुरुषांनी बसायची 

जागा, हे काय शहर हाय का इथे बायकांनी हॉटेलात येऊन बसायला.'


तिने आतून एक नजर फिरवली.  एकही एकटी बाई तिला आत दिसली नाही. एक दोघी होत्या, त्यांच्या सोबत 

कुणी ना कुणी होतंच. तिने पुन्हा नजर बस ज्या दिशेने येणार त्या दिशेला लावली.

'काय वैतागय खरंच, अधीच घरातुन बाहेर पडायला उशीर झाला, आत्ता बसला उशीर'

बस आली पण, गर्दी खूप होती. तिने कसाबसा बस मध्ये पाय ठेवला, कंडक्टर सर्वाना सूचना करत होता.

"चला मागे चला, जागा आहे माग चला पटपट."

हि अजून पहिल्याच पायरीवर उभी होती. कंडक्टरच हिच्याकडे लक्ष गेलं आणि अचानक तो गप्प झाला.

'स्मार्ट आहे कि  कंडक्टर असून....! शी हे कस काय सुचलं आपल्याला आत्ता काय आपण कॉलेज गोईंग स्टुडंट आहोत का तेंव्हा असला विचार यायला.'

पण विचार तर आला होता, मग तिने त्याच्यावरून नजर खाली वळवली.

ही हळूहळू पुढे सरकत वर आली.

'पाठीमागे जाण्यापेक्षा इथेच बसुया उतरताना आणि बोंब नको.'

कंडक्टरच्या शेजारची सिट रिकामीच होती. ती तिथेच बसली. तो जरा आत सरकला.

'एव्हढ अंतर मध्ये असताना उगाच नको तितकी सरकायची काय गरज, काय खाणारे का मी, जाऊदे त्याला 

सरकायचंय तर सरकू दे. आपण बसू निवांत.'

गाडी सुरु झाल्यावर कंडक्टर तिकीट काढण्यासाठी सिट मधून बाहेर पडला. थोड्या वेळाने तो परत आला. तो 

हिशेब करण्यात मग्न झाला. तरी तिला अस उगाचच वाटलं की समोरच्या काचेत पडलेल्या तिच्या प्रतिबिंबाकडे 

तो चोरून पाहतोय, तिने एकदा समोरच्या काचेत पाहिलं आणि परत त्याच्याकडे पाहिलं. तो पूर्वीपेक्षा अधिक 

खाली मान वाकवत कामात गुंतला. ती उगाचच इकडे तिकडे पाहत राहिली.

थोड्या वेळाने त्यान सगळा बोजाबिस्तारा गुंडाळून ठेवला आणि निवांत बसला.

"कुठे उतरणार?" त्यानं विचारलं.

"स्टॅंडला." तिने तुटक उत्तर दिलं.

तो गप्प झाला. खिशातून मोबाईल काढून त्यावर एक नंबर नुस्ताच टाइप केला. हीच लक्ष त्याच्या कडेच होतं.

'ऐका आत्ता हेची कीटपिट. आता बसेल जोरजोरात बोंबलत त्या फोन वर .....

अरे किती वेळ झालं हा नुसता नंबर टाइप करतो डिलीट करतो. जाऊदे काही का करेना मोठमोठ्यान 

बोंबलन्यापेक्षा हा उद्योग बरा आहे. ह्या ह्या ह्या.'

त्यान मोबाईलची स्क्रीन हिला दिसेल अशी तिरपी धरली. सारखी नजर फिरवून तो नंबर हिला पाठ झाला देखील.

'पण आपण का पाठ करतो हा नंबर.... रट्टा मारायची सवय काही सुटत नाही, आणि हा नंबर लक्षात ठेऊन 

आपण करणार तरी काय? आपल्याला माहितीही नाही हा कुणाचा आहे नंबर आहे? आपल्या कामाचा तर 

अजिबातच नाही आणि तरी आपण उगाच वाचून रट्टा मारतोय. ह्या ख्या ख्या गमतच.'

तीचा स्टॉप आल्यावर ती उतरायला निघाली.

"हिथच उतरायचंय का तुम्हाला? कुठे जाणार आहात तुम्ही?" त्यान विचारलं.

"हो इथेच उतरते मी रोज." तिचं उत्तर.

"रोज...!" त्यानं भुवया उंचावल्या.

ती उतरून गेली.

'कुणाचा असेल बर तो नंबर .... बघावा का डायल कारून?..... काय गरज पडले नसत्या उचापत्या करायला...? 

आत्ता काय लहान आहोत एका आपण असल्या उचापत्या करायला आणि काही झालच तर कुणाचा असेल 

त्यान पिच्छाच धरला तर ...... काहि काय विचार करायचा असा कुणी पिच्छा कशाला करेल.... सांगता येईल रॉंग 

नंबर लागला म्हणून....'

शेवटी तिने नंबर डायल केलाच.

"हॅलो.... स्मिता.... अग आलेस काय ऑफिसला?"

"हॅलो... कोण बोलताय मी स्मिता नाही स्वप्नील बोलतोय.."

"स्वप्नील...? सॉरी हां चुकून लागला नंबर.... सॉरी..." तिने फोन कट केला.

चालत चालत ती ऑफिसला पोहोचली. कामांचा ढीग होताच नेहमी सारखा.... दुपारपर्यंत तर तीला बस, फोन 

आणि स्वप्नील सगळ्याचाच विसर पडला.

दुपारी लंच ब्रेक मध्ये डब्बा खाल्ला आणि थोडा वेळ टेबलवर डोकं टेकवून निवांत बसली. इतक्यात फोनचा 
मेसेज टोन वाजला.

मेसेज अननोन नंबर वरून होता.

: who are you?

तिने उलटा रिप्लाय दिला...
: who are you?


लगेच त्या नंबर वरून फोन आला.

"हॅलो...?"

"हॅलो... कोण बोलताय?" हिचा आवाज चढलेला....'मेले आत्ता आवाज चढवून काय फायदा मघाशीच कळायला 

हवं होत....' तिचच मन तिला टोकत होतं.

"अहो मघाशी या नंबर वरुन कॉल आलेला." पलीकडच्या व्यक्तीनं अतिशय नम्र आवाजात माहिती दिली.

"अहो सांगितलं ना... रॉंग नंबर होता...."

"असा कसा काय मॅडम रॉंग नंबर लागू शकतो?" त्याने विचारलं.

"लागू शकतो न काय झालं? सॉरी बोलले न?"

"ओके."

tumach naav kay te tari sanga.... त्या नंबर वरून परत टेक्स्ट मेसेज आला.

ka? तिचा रिप्लाय

: tumhi maghashi gadit hota ka?

: kuthlya gadit?

: bus o, bus mdhe.
: nahi
: ok.

मेसेज बंद झाले एकदासे. तिने सुस्कारा सोडला. म्हणजे हा त्याचाच नंबर होता.


अर्ध्या तासांनी परत मेसेज आला.

: tumach naav kay?

: Kon tumhi?

: Swapnil.

: aho sangital na chukun lagala phone. Kiti vela sorry bolu?

: Aho mala vatal maghashi tya bus madun utarlya tya tumhich ahat?

: ho mich hote.

: khrach?

: ho.

: tumch laksh hot majhya phone kade?

: Ho.

: Atta kuthe ahat?

: office

: Kay karata?

: medical madhye account sambhalte.

: ok. Udya phone kela tr chalel? atta mi busy ahe.

: nahi kela tri chalel.

: Ok. Ghabaru nka mi kahi tras nahi denar tumhala. Bye.

: Bye.

 पण तिचं लक्षच लागेना कामात.

'किती मोठी चूक केली आपण? आत्ता यांनी सारखेच मेसेज केले तर? काय करायचं.......? ब्लॉक करायचं एवढं 
काय त्यात...!'

घरी जायला अजून दोन तास तरी अवकाश होता. पण तिचं काही लक्ष लागतं न्हवत. ती मोरे सरांकडे गेली.

"सर, आज मला थोड लवकर घरी जायचं होत जाऊ का मी?"

"का तब्बेत ठीक नाही का?"

"हो, सर... जाऊ का?"

"ठीकाय."

सरांनी ठीकाय म्हंटल्यावर ती लगेचच बॅग घेऊन बाहेर पडली.

झपाझप तिने बस स्टॉप गाठला. बसला बराच उशीर होता. तोवर पुन्हा त्याचा फोन.

तिने कट केला.

मग मेसेज : ph uchla plz.

मग पुन्हा तिने फोन उचलला.

"हॅलो...?"

""हॅलो... अहो घाबरू नका. मी काही त्रास देणार नाही तुम्हाला."

"बर मग ..."

"पण बोलायला काय हरकत आहे...?"

"बोला "

"तुमची रोजची येण्या जाण्याची वेळ तिचं असते का?"

"नाही मी रोज लवकर बाहेर पडते... आज उशीर झाला..."

"बर झालं.."

"काय?"

"काही नाही...."

"मग घरी किती वाजता पोहोचता?"

"सात पर्यंत संध्याकाळी...." 'पण आपण याला इतकी खरी खरी माहिती का देतोय?'

"ओक ठेऊ आत्ता?

"हां ठेवा."

तिने फोन कट केला.

आज ती लवकरच घरी पोहोचली. तिला फारच अस्वस्थ वाटत होतं.

'परत परत येईल का त्याचा फोन? काय करेल तो? बोलण्यावरून तर काही वाटत नाही पण तरीही.... काय 

सांगाव?'

दुसर्या दिवशी ती वेळेत कामावर पोहोचली. दुपार नंतर परत त्याचा मेसेज

: hi, alat kamavr?

तिने दुर्लक्ष केलं. थोड्या वेळाने त्याचा फोन आला. तिने कट केला.

: bola na. kay zal?

: nantr bolate atta kam ahet.

: ok. bye TC.

ती परत कामात गुंतली. त्यानं पुन्हा मेसेज केले नाहीत.

संध्याकाळी ती नेहमीच्याच वेळी बाहेर पडली. तेंचा मात्र परत त्याचा मेसेज आला.

: hi, sampli ka kam?

: ho  हळू हळू ती त्याच्या बाबतीत बिनधास्त होऊ लागली.

: atta ghari nighala asal. mla vatal nhavat tya divashi tumhi majha nmbr ghyal.... i'm surprized.

: Ok... स्वतःच्या  भोंदू पणाचं काय समर्थन कराव तिला कळेना.

: udya mi asen parat tyach dutyvr.

: mi nasen matr... पुन्हा एकदा ती खरं बोलली.

: ok. bhetu kadhitari...

' हे काय आत्ता..! का कशाला मला भेटणार?'

: ka? kay kam hot?

: kahi nahi. tumhala rag lagech yeto. kahi kam nahi... fakt.... pahayla...

'पहायला? हा काय आत्ता पिच्छा सोडत नाही आपला...'

: tumhi mla sarakhe msg karu naka. plz.

: Ok. tumhala tras nahi dyayacha.

: Ok. Bye.

'त्रास नाही द्यायचाय. मग फोन कशाला करतो? काय होईल? काय माहित? पण... तसा चांगला वाटतो तरीही 

अनोळखी माणसावर विश्वास ठेवणं चुकीचंच ना, उद्या काही झालंच तर सगळे आपल्यालाच दोष देतील.....'

फोन आणि त्याचे मेसेज एवढंच काय ते सतत तिच्या डोक्यात घोळत होतं.

 दुसर्या दिवशी त्याच वेळेत पुन्हा त्याचा मेसेज आला.

: jevala ka?

: atta kamat ahe nantr bolate.

: ok. Bye.

'याला दुखवाव असंही वाटेना, पण आत्ता या तिन दिवसात कुठे काही वेडावाकड बोललाय तो, तेंव्हा.... सतत 

संशयच का घ्यावा...? बोलायला काय हरकतेय'

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिने स्वतःहून फोन लावला.

"अरे वा आज काय सूर्य पश्चिमेला उगवलाय."

"नाही, तुम्ही का मला मेसेज करता रोज रोज, माझ लग्न झालंय, एक मुलगा आहे मला, माझ्या मिस्टरांना कळाल तर प्रॉब्लेम होईल. समजून घ्या जरा. "

"अहो माझं पण लग्न झालंय. मला पण एक मुलगा आहे. प्रॉब्लेम मला पण येतील. पण फक्त तुमच्यासाठी मी ही रिस्क घेतोय."

हे ऐकून तिने फोन कट केला.

'माझ्यासाठी रिस्क...? ह्या ह्या... वेडाय का हा माणूस.... का असच गोड बोलणारा लफंगा.... का बरं मागे लागला 

असेल हा... पण काही झालं तरी चूक आपलीच आपण विनाकारण अनोळखी व्यक्तीला फोन केला.... काही 

गरज नसताना विनाकारण पीडा मागं लावून घेतली.'

मेसेज टोन वाजला...
: tumhala baghital na bus mahe chadhatana tevhanch majhi viket padali. as kadhich zal nahi purvi.... plz aho... mla vait samaju nka .... majhya balachi shappaath....

मेसेज वाचून डिलीट केला अन नंबर ब्लॉक केला.

गाडीत बसली तरी तिच्या डोक्यातून तो विचार जात नव्हता... प्रेमात ...... आत्ता..... बाळाची शप्पथ.... खर बोलत 

असेल का? जाऊदे काय करायचंय ...... आपण आपल्या बाळाचा विचार करायला हवा... उद्या काही झालं तर 

तो मोकळा आपणच जाऊ हातच्याला..... पुन्हा आपण याला कधीही फोन करायचा नाही आणि घ्यायचा पण 

नाही.'

दोन दिवस निवांत गेले पुन्हा त्याचा फोन आला नाही... ती निर्धास्त होती.

दोन दिवसांनी दुसर्या नंबर वरून पुन्हा त्याचाच कॉल.

"सांगितलं न करू नका फोन मला..."

"अहो ऐकून तरी घ्या... मी काही त्रास नाही देणार तुम्हाला... मी जबरदस्ती नाही करत.... पण ब्लॉक कशाला 

करताय.... आपण फक्त बोलत राहू.... as a friend..."

तिने फोन कट केला.

थोड्या वेळाने तिने ब्लॉक लिस्ट मधून त्याचा नंबर डिलीट केला.

: ok as a friend thikay. bolu apan.

: thanks....

: nav kay bolalat tumach....

: swapnil

 कित्येक दिवसांत आपल्याला कुणीही विचारलं नाही कशी आहेस? पण आत्ता कुणी तरी आपलं आहे 

विचारणारं याचाच जास्त आनंद होता. बोलता बोलता एकमेकांचा चांगलाच परिचय झाला.. तिला आत्ता 

त्याच्याबद्दल जास्त विश्वास आणि ओढ वाटू लागली. मनातलं सगळं फक्त त्याच्याशी बोलावं वाटायचं, जणू 

जिवाभावाचा सखाच.

'आपण इतका विश्वास टाकतोय याच्यावर ... कोण कुठला माहिती नाही... असाच जीव लाऊन कुठे तरी हरवून 

जायचा आणि आपण बसायचो रडत कुढत....'


"हॅल्लो.... कधी भेटणारेस? आत्ता येऊ का मी थोड्या वेळानी तुझ्या ऑफिस बाहेर?"

"ये ना.... चालेल..."

"कुठे भेटायचं? ऑफिसच्या बाहेर...."

"ऑफिसच्या बाहेर कस भेटणार बाळा? बघतील न तुझ्या ऑफिसची लोकं...?"

"हो ... पण तू ये मग बघू.... बाहेर जाऊया..."

"ओक. पिल्लू. bye. miss u. luv u. bye umma umma umma."

"हम्म.... बाय. ठेव आत्ता...."

त्या दिवशीच्या बस भेटी नंतर ..... सामोरासमोर भेटण्याचा ही पहिलीच वेळ.

"मनातल्या मनात एव्हढ्या उकळ्या फुटतायत आपल्याला पण.... खरंच यातून काय निष्पन्न होणार.... आपण 

चुकतोय ..... चांगला निर्व्यसनी नवरा.... एक मुल, तेही पोरगा... एव्हढ सगळं चांगल असताना का बरं असे 

भिकेचे डोहाळे लागावेत आपल्याला....तो I LOVE YOU बोलला तेंव्हाच त्याला ब्लॉक करायला हवं होतं... 

त्याच्या पासून दूर रहायला हवं होतं ..... पण भुललो आपण फक्त तीन शब्दांना....गुंतत गेलो त्याच्यात.... आत्ता 

...?  आत्ता हि जे होईल ते होईल.... मन गुंतल कि त्याला सावरणं सोप काम नाही. कुणीतरी असावं न आपल 

म्हणून .... सैरभैर मनाला एखादा आडोसा हक्काचा.... जिथे रडता येईल... हसता येईल.... स्वप्नातली खरी खोटी 

जादू आणि गम्मत वाटून घेता येईल.... रुसता येईल.... फुगता येईल.... लाडिक बालिश अल्लड मनाच्या भवूक 

गुजगोष्टी उलगडता येतील.... अशी फक्त एक जागा.... दुसरं काय हवंय आपल्याला.... फक्त एव्हढ्यासाठी 

इतका मोठा धोका पत्करायचा....साधी सरळ जगण्याची अपेक्षा पण तीही पुरी करायला ..... चोर व्हावं लागतंय, 

बदफैल व्हावं लागतंय....  जगण्याचा साधा  हक्क मिळवण्यासाठी गुन्हेगार व्हावं लागतय.... असुदे ते इतरांच्या 

नजरेत .... स्वतःच्या नाही... तेही उघड झालं तर.... गुन्हेगार.... तर गुन्हेगार...! करायचाय हा हवाहवासा गुन्हा. 

हवाय मला स्वप्नील.... स्वप्नील.... '

"हां आले थांब पाचच मिनिटांत आले..."

ऑफिस मध्ये रीसीस झाली होती. थोड्या वेळासाठी ती बाहेर जाऊन येऊ शकत होती. तिने आपल्या 

सिनियरला सांगितलं आणि ती बाहेर पडली.

"काय हे किती वाट बघायला लावायची गरिबाला...."

"तू गरीब .... तुला कोण गरीब म्हणेल....?"

"बर सांग लवकर कुठे जायचं.?"

"इथे जवळच कोल्ड्रिंक हाउस आहे तिथे जाऊया....?"

"ओक चला बस गाडीवर ....."

"निळा रंग छान दिसतो कि तुला.... मस्त एकदम...."

लाजून हसली फक्त .....

"तू काय कमी स्मार्ट आहेस का?"

"ऑर्डर दे पटकन ..."

"का तू देऊ शकत नाहीस का?"

"भांडू नको पहिल्याच भेटीत...."

"भांडते कुठे तू दे न ऑर्डर तू जे देशील ते चालेल मला.."

"ओके...."

"एक चोको कोकोनट आयस्क्रीम आणि एक फ्रुट सालड विथ आयस्क्रीम"

तुझ्या मुलाच नावं काय बोललीस?"

"विराज"

तुझ्या...?

"सोहम ....."

"अरे व्वा छान आहे की.... "

"हा बघ फोटो..." त्यानं मोबाईल काढून फोटो दाखवला.

"सुंदर आहे नाही ..... ? तुझ्यासारखाच....."

मग काही वेळ असाच शांतेत गेला... त्यालाही कळत न्हवत काय बोलावं तिलाही कळत न्हवत कुठून सुरुवात 

करावी? कधी एकमेकांकडे नजर गेलीच तर उगाच पुन्हा इकडे तिकडे बघायचे...

तेव्हढ्यात वेटर आला दिलेली ऑर्डर घेऊन.

"खा आधी.... मग बघ... तशी....."

"कशी " बारीक आवाजात तिने विचारलं.

"खा ना.... बघू नको तसं कस कस तर होतं...."

"कुछ कुछ होता है....." डोळे हळूच बारीक करत.... एकदम मखमली आवाजात ती बोलली.

"हम्म ....." तो गालातल्या गालात हसला....

'इतका हँड्सम माणूस वाटतही नाही याचं लग्न झालं असेलं आणि हा आपल्या प्रेमात पडलाय... मला तर खरच 

नाही वाटतं ..... आपण याला खरच भेटतोय.... स्वप्नात असू का सध्या आपण....'

"चल निघूया तुला परत ऑफिसला जायचं असेल... मला पण कामं आहेत.... "

"हो जावच लागेल...." नाक मोडत ती बोलली जणू जाण्याची अजिबात इच्छा नाही हे त्यानं स्वतःहून ओळखावं.


तोही हुशार तिच्या इच्छेकडे त्यानं मुद्दामच दुर्लक्ष केलं... जणू लक्ष दिलच तर त्यालाही भुरळ पडेल...

नव्हे ती तर कधीचीच पडली होती... दोघांनाही...

बाहेर पडताच तो गाडीवर बसला आणि सुसाट सुटला...

'असा कसा हा किमान एकदा बाय तरी बोलायचं... '

ती नाराज झाली. हळू हळू चालत अगदी अनिच्छेनच ती ऑफिस पर्यंत  पोहोचली...

तोवर त्याचा मेसेज आलाच

:sorry dear, kaka majhi vat baghat hote baher, so gadbadin nighun alo... naraj nko hou.

:nahi re...

'काहीही लादायचं नाही तुझ्यावर, भेटलाच पाहिजे, फोन केलाच पाहिजे अस झालच पाहिजे तसं केलच पाहिजे काहीही नाही .... तुझ सोबत असणंच खूप मोलाचय माझ्यासाठी.....' डोळे उगाच पाणावले....

: khar sangu as vataty ...... icecreame eivaji mich viraghalale tujhyat... तिने त्याला मेसेज टाकला आणि 

त्याच्या रीप्लायची वाट पाहत बसली. एक दोन सेकंदही तिला मोबाईल खाली ठेवावा वाटायचं नाही. तब्बल १० 

मिनिटांनी त्याचा मेसेज आला.

: mla pan same vatal ag..

: kahihi..

:ho bala, trust me..

:ilu

:umma

आता कामं आटोपण गरजेच होत. नाईलाजाने तिने मोबाईल पर्समध्ये टाकून दिला आणि मधल्या वेळेतली 

काम हाता वेगळी करण्यात गुंतली.

घरी आली तरी तिची तिच अवस्था.

"काय गं बगल तवा काय त्यो मोब्याल घिवून बस्ती? कवा धरनं पॉर रडतय खायला दे म्हून आने ही पुढ्यात नुस्तं भगुलं घेऊन डोकं त्या फोनात घालून बसलीया..." सासूचा पार चढलेला...

तशी हिची घाबरगुंडी उडाली.... एकाच वेळी डोकं आणि छाती फुटेल कि काय असं वटावं इतक्या जोरात उडू लागली. हे असं नेहमीच व्हायचं जेंव्हा ती घरी पण त्याच्याशी चॅट करायची.

: bye dear. udya bolu atta kam ahet.

: kay yaar baghel tenvha tujhi kam astat... bar bye. umma

: umma

फोन बाजूला ठेवला. मग उठून हात पाय धुतले.

'हुश्श... अजूनही डोकं ठणठण ठणकतय. आत्ता घरी आली कि काळजी घ्यायला हवी नाही तर ही  बया 

नवऱ्याच कान भरेल आणि तो मर मर मारेल ... तेव्हढ्यावरच थांबला तर ठीक नाही तर मारूनही टाकेल...."

तिने स्वयंपाक आटपला. बाळाला चारलं. त्याला चारल्यावर सगळं घर आवरलं... एकदम नीटनेटकं

इतक्यात नवरा आला.

"आज लवकर आलात?" आल्या आल्या तिने पाण्याचा तांब्या हातात देत विचारलं.

"हम्म लवकर निघालो..." त्यानं उत्तर दिलं.

तरीही मन पाखरू झालेलं.... कधी घरट्यात कधी मळ्यात....

'दिस चार झाले मन पाखरू होऊन....'

कधी एकदा घरातून बाहेर पडते आणि कधी त्याच्याशी बोलते... जणू फक्त त्याचं बोलण एवढाच एक जालीम 
उपाय होता तिच्या सगळ्या प्रश्नावर .....

'काय बोलतो एव्हढ जगावेगळं...? तरीही सतत फक्त त्याच्याशीच बोलावं वाटतं ..... का बर..? इतक की कधी 

कधी आपल्याला भानही राहत नाही... आपण कुठे आहोत... बस, रिक्षा, घर, स्टॅण्ड, ऑफिस... कुठल्याच 

ठिकाणच भान नसतं आपल्याला...कुणी पाहिलं तर काय विचार करेल... एव्हढ्यासाठी घराबाहेर पडते 

म्हणतील... बघा या बायका एकदा घरातून बाहेर पडल्या कि कशा ताळतंत्र सोडून वागतात... ह्यांना घर आणि 


मुल एवढच काय ते काम पाहिजे लय सैल सोडलं कि लगेच अस डोक्यावर चढणार ह्यांना अब्रू लाज शरम 

कशाचा काही विचार नाही.... हेच तर बोलायचे न शेजारी पाजारी जेंव्हा आपण कॉलेजला जायचो... पोरी 

शिकल्या कि त्यांचं काही खरं नाही...

चुकीच करतोय का आपण? काय चुकीच पण कुणाची चोरी केली? कुणाचा खून केला? कुणाला लुबाडलं? वाईट ते काय जीव लावला एक जीवाला .... हेच ना हे इतकं मोठ पाप का बर असावं?

'पाप पुण्य' हा शब्द मनात येताच ती जोरात हसली.... आजूबाजूला पाहिलं

'नशीब रस्ता रिकामाच होता... किती हिशेब ठेवायचो आपण आधी पाप पुण्याचा... एखादा डास मारायचा म्हंटल 

तरी विचार करायचो.... पण काय फरक पडतो कुणाला आपण काही कुणाला लुबाडत नाही, कुणाच काही 

चोरत नाही... यात कसलं आलंय पाप ....?...'

फोनची रिंग वाजली... स्वप्नीलचाच फोन होता.

"आज कस काय न विचारता फोन बर ..."

"आज लवकर संपणारे ग ड्युटी येशील काय भेटायला?"

"बापरे एवढ्या लांब मी नाही बाबा ... मला भीती वाटते..."

"मग मी येऊ ? भेटावसं वाटतंय यार सजून घे ना...."

"मला नाही का वाटतं? बर मग तूच ये ..."

"कुठे भेटायचं ?"

"परवा भेटलो तिथेच भेटू.."

"नको तिथे नको.."

"का?"

"कळत कसं नाही तुला? तिथे काही व्यवस्थित भेटता येत नाही..."

"व्यवस्थित म्हणजे आणि कसं?"

"येडपट हायेस खरंच... सगळ कस फोडून सांगाव लागतं यार तुला...इथं आजूबाजूला माणसं हायेत आणि मी 
तुला व्यवस्थित म्हणजे कसं ते सांगू काय?"

"अच्छा ...." ती लाजली  "मग मला न्हाई म्हाईत कुठं भेटायचं .... तूच बघ"

"मीच कसं बघणार तू पण बघ ना...."

आता मात्र तिला राग आला ...

"मी कसं बघणार? भेटणार असशील तर भेट नाही तर राहूदे.." तिने फोन कट केला.

'अरे हे काय केलं आपण .... अस रागवायला नको होत .... शट आता नाहीच त्यानं फोन केला तर....'

परत रिंग झाली...

"सॉरी अरे मला खरच नाही माहिती कुठे भेटायचं ..... " ती काकुळतीला येऊन बोलली.

"कस काय गेली असशील ना आधी कधी तरी ..." त्याचा प्रश्न.

हा प्रश्न तिला खटकला

" आधी कुणासोबत जाईन मी?"

"अरे कुणासोबत म्हणजे नवर्यासोबत... अशी कशी तू.."  तो चिडला.
"मला नाही माहिती कुठे जायचं ...गेल्या वेळी आपण भेटलो तिथेच ये भेटणार असशील तर...."

"मला तसं नाही भेटायचंय.."

"मग तूच शोध पर्याय मला काही नाही करता येणार...ठेवू आत्ता?" ती ठसकली.

"हां ठेव उद्या फोन करतो मी..."
हल्ली ऑफिस मधली काम तिला उरकायची नाहीत आणि त्यात मनही लागायचं नाही... सतत ते हिशेबाच्या 
बेरजा आणि वजाबाक्या ....  शिलकीचे रटाळ तपशील.... हजारोंचा व्यवहार तरी कफ्फलकतेची कोरी करकरीत 
जाणीव.... कुठल्याच पद्धतीनं  समाधान कशात असतं, असावं, कुठे शोधावं हे कळत न्हवत नेमकं...

'स्वतः कमावल तरी जीवाला शांतात नाही... कमवलेल कुठ पुरवायच आणि कुठ उरवायच हा गोंधळ 
निस्तरण्यातच सगळ्या समाधानाचा चुथडा होतो. ऑफिसातला हिशेब आणि घरातलं हिशेब कुठच्या कुठे 
तफावत हिथे हजारोंचा हिशेब न चुकता लागतो दररोज मात्र घरात शंभर रुपयांचा हिशेब लागतं नाही. दिवसभर बाळापासून दूर रहायचं तरी त्याला काहीच देता येत नाही... आपल्याला जाणवणारी ही उणीव कशानेही भरून काढू शकत नाही.... का जन्म दिला असेल आपण त्या लेकराला.... तो म्हणत होता ते खरं होत तेंव्हाच अबोर्शन केल असतं बर झालं असतं.... घर आणि बाळ यांची आठवण झाली कि प्रचंड कालवाकालव होते.... काळीज तुटून बाहेर पडेल असं वाटतं पण छे ते तर कुठच अस बाहेर पडतंय .... तेही असच वाकुल्या दाखवत इतरांसारख.... आणि आत्ता हा नवा अध्याय.... स्वप्नील ..... खूप हवाहवासा वाटतो... किती हलकं हलकं  वाटत त्याच्याशी बोलताना .... जीवावरचा सगळा ताण नाहीसा होतो.... असं मोकळेपणान बोलणार कुणी भेटलच न्हाई या कत्येक वर्षात.... सगळे नुसतेच धडे देणारे.... कसले धडे तर नवऱ्याच मन कस सांभाळायच ... त्याच्याशी कस प्रेमाने बोलायचं त्यान कितीही हाड्तुड केल तरी कस दासी होऊन त्याच्या पायावर लोटांगण घ्यायचं हेच शिकवलं आणि एवढाच उद्देश आयुष्याचा बस त्याला सुखी ठेवलं तर संसार सुखी आणि आनंदी पण आल्या सुखाच काय... आपण जितक मन मारू तितके आपण ग्रेट... थोर.... भले....

मन मारून मारून इतकी कोंडी झाले आत्ता का आत्ता काही मारायला किंवा मारून जगायला गेलो तर आपणच मरू असं वाटतंय....
कुठे भेटायला जायचं आत्ता उद्या स्वप्नीलला .... हातात हात घेऊन मस्त गप्पा मारता येतील.... साचलेला डोह सगळा उकलता येईल... किमान सगळं विसरून मनसोक्त हसता येईल....'

हातात काम आणि डोक्यात हे असे विचार मग काय काही न काही घोटाळा व्हायचाच तिच्या हातून....

त्या दिवशी घरी परतताना गाडीत फारशी गर्दी न्हवती... तिच्या उजव्या बाजूच्या बाकड्यावर एक जोडपं बसलं 

होतं... हातात हात घालून त्यांच्या काही तरी गुजगोष्टी चाललेल्या... ती सतत त्याला चिमटे काढत होती आणि तो 

मोठमोठ्यांनी हसत होता.... हेवा वाटला तिला त्यांचा ...

'कधीच आपण असा प्रेमाचा नटखट संवाद केला नाही... त्याची नुसती घाई बाहेर गेलं तरी... बाहेरही 

आमच्यापेक्षा याला याचे मित्र मैत्रिणी... नातेवाईक, काका, मामा आणि कोण कोण भेटणार आणि त्यांच्यातच 

मश्गुल राहणार .... या वागण्यान आताशा त्याच्या सोबत बाहेरहि जाऊ वाटत नाही... त्यापेक्षा घर आणि घरातली काम बरी... आपली कुणी दुर्लक्ष केल्याची बोच तरी नाही....'

आज सकाळी उठल्यापासूनच छातीतली धडधड वाढत होती....

कशी बशी तिनं पटापट काम उरकली. एखादही काम राहून जायला नको अस वाटत होतं आज तिला. कामाच्या आणि मुख्य म्हणजे विचारांच्या तंद्रीत किती वेळ गेला कळलच नाही.
"आज जात नाहीस व्हय ग कामाव?" सासूनच विचारलं.

"नाही, जाते की, आवरते."

असं म्हणत तिनं स्वतःच आवरलं... पोराचा एक पापा घेतला आणि ती घरातून बाहेर पडली...

घरातून बाहेर पडेपर्यंत तिच्या जीवात जीव नव्हता...

उरात उगीच धुमाकूळ चाललेला. जणू काही एखाद्या खूप जोखमीच्या मोहिमेवरच निघालेली.

'मोहीम...(हाहाहा) मोहीम तर काय, कसं काय पण इतकं धाडस दाखवलं... आपल्याला जराही त्याच्या बद्दल 

संशय किंवा अविश्वास वाटत नाही. खरच काही वाईट तर घडणार नाही ना... नाही तर उगाच हातच्याला जायचं आयुष्य... सध्या सरळ चाललेल्या आयुष्याची बिनकामाची धुळवड व्हायची. आपलं काय होईल ते होईल. पण, आपल्या एका चुकीच्या पावलाचे परिणाम आपल्या बाळाला भोगावे लागतील.'
या विचारानं तिचे डोळे भरून आले.
'
काही वाईट नाही होणार, विश्वास ठेवलाय आणि आत्ता निर्णय घेतलायच तर उगाच अभद्र शंका नको. काही 

नाही होणार.' स्वतःलाच ती जोखत राहिली संपूर्ण प्रवासात...

शेवटी स्टॉप आला. ती बसमधून उतरली. तो कुठे दिसत नव्हता... तिच्या उरात हळूहळू धडधड वाढली... 

इतक्यात फोनची रिंग वाजली. त्याचाच फोन होता. गडबडीन उचलला...

"इकड बग कि कडव्या तिने इकड तिकड बघितलं. उजव्या बाजूला तो होता. फोन कट करू नको, फक्त 

माझ्या मागून ये... त्याचा हुकुम...

हे मात्र तिला खटकलं. पण गेली त्याच्या मागून....

धडधड सुरूच होती.... जसजशी त्याच्या जवळ पोहोचेल तशी तर जास्तच धडधडू लागलं. एक लॉज बाहेर तो 

थांबला. ती पाटी बघून तर उरत धस्स झालं....

'काय करतोय आपण? छे या पेक्षा दुसर काही ठिकाण नसतं का याला सुचलं?'

पण काहीच बोलली नाही... शेवट पर्यंत मुकाट्याने त्याच्या मागे मागेच...

रूमच लॉक त्यान उघडलं. आधी ती आत गेली, मग तो. पायातले सगळे त्राण जणू संपल्यात जमा झालेत आणि 
पोटात अक्षरशः गोळा फिरतोय अस वाटत होतं.

तो जवळ आला तसं त्याला घट्ट बिलगली. त्याला तिच्या उरातली धडधड जाणवली असेल, कदाचित. त्यानं 

केसातून हात फिरवला जणू थोपटत सांगत होता शांत हो.. शांत हो... डोळे मिटलेले... नुसतीच त्याची घट्ट मिठी 

अनुभवत किती तरी वेळ....

तास दोन तास गेल्यावर तिला भां आलं... लवकर निघायला हवं घरी पोहोचायला उशीर होईल...

तरीही त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवणं जीवावर आलेलं...

'जायचंय आपल्याला शेवटी कितीही बिलगलो तरी....' याची जाणीव झाली कि अजून घट्ट ओढून घ्याव वाटायचं 

त्याला... आणखीन एक तास असाच गेला...


मग त्यालाही जाणीव झाली निघायला हवं...


जाता जाताही ओठांचा पाउस गाल चिंब करत होता... आणि मन न्हाऊन निघत होतं.... सगळ्या तनामनावर 

आनंद लहरी लपेटून राहिलेल्या... जणू हा दिवस, ही वेळ हा क्षण कधीच संपू नये... असच विरघळून जावं 

मातीच्या ढेकाळासाराख त्याच्या टणक देहावर.... आणि मउशार काळजात शिराव अलगत... त्याच्याही न 
कळत...

'याला तर कळत असेल का या क्षणी मला याच्यात असं विरून जावं वाटतय ते....' तिने त्याच्या डोळ्यांत खोलवर नजर रुतवली आणि जाणवलं तिलाही एक वेगळी ओळख स्वतः ची स्वतःशी जी आधी कधीच झाली नव्हती... 

त्याच्या डोळ्यांत तेच होतं जे तिच्या मनात होतं... पण शेवटी नाईलाज होता... जाणं तर भागच होतं.


'बस मध्ये बसलोय तरी असं वाटतंय कि आपण हरवलोय कुठे तरी. त्याच्या जवळ जाऊन शोधावं स्वतःला... दे 

माझी 'मी' मला... मला 'मी' हवीय जी तुझ्यात विरली आणि तुही हवायस कारण आत्ता तुझ्यातली 'मी' पुन्हा 

माझ्यात नांदू शकणार नाही...' डोळ्यात उगाच तळं साचलं.

एक मेसेज केला त्याला, : मला हवय

त्याचा रिप्लाय, : मलाही...

बस्स मग पुढे काहीच नाही... रंध्रारंध्रात सामावलेला त्याचा सुंगध वार्याच्या झुळकीनं उगाच तिची छेड काढत 

राहिला आणि ती हसत राहिली..ओठातल्या ओठात.

घरी पोहोचली तरी आज ती लक्ख प्रसन्न होती. जणू तिचं विश्व बदलून गेलेलं... ती 'ती' राहिलीच नव्हती.

त्याच्या बोलण्यातली शांतता, माधुर्य याला एक वेगळीच किनार होती... ती अधिकाधिक गुंतत चालली... यापेक्षा 

आणखी गुंतण तरी काय?

तिच्या सततच्या मेसेजेस न तो मात्र कधी कधी वैतागायचा...

मग फोन वर झापायचा, "अरे, सुचत नाही काय, इथे किती अलर्ट राहावं लागतं बाळा? थोडीशी चूक झाली तरी 

हिशेब लागत नाही. मला दोन वेळा हिशेब भरून काढावा लागला यार.. प्लीज, इतके मेसेज करू नको... मी 

घरी गेलो  कि बोलेन."

"ओक, ठीकाय, बाय."

'छे इतका मूर्खपणा कसं काय करू शकतो आपण? हे लक्षात यायला हवं होतं आपल्या... जाऊदे परत असं 

होणार नाही याची काळजी घेता येईल....'

घरी आली तरी मोबाईल सतत जवळ.

"मम्मे, काय गं सारखंच त्या फोनात तोंड खुपसून बसतीस बोल न माझ्याशी जरा..." बाळ असं काही बोलला की तिला अपराधी वाटायचं.. मग ती नाराज व्हायची.... विरहाची धग पोळून काढायची तिला... बाळाशी हसण्यात खेळण्यात वरवर दाखील व्हायची...
सतत अशा दुहेरी जगण्याचा ताण यायचा...


'जीव पोखरून निघतोय  अस वाटतंय, हळूहळू आपण पोकळ होतोय कळतंय का हे त्याला? त्याला कसं 

कळेल... तो कुठे? आपण कुठे? दुसर्या कुणाला कळत असेल का आपली हि अवस्था? छे कधीच नाही कळणार कुणाला फक्त आपल्याशिवाय कशी कळेल? इतका तळ कुणी नाही गाठू शकत कुणाच्या मनाचा... मग तो सुनील कसं बोलला बरं आपल्याला.. मॅडम काही तरी विचारात असल्यासारख्या वाटताय म्हणून? बोलला असेल असंच. म्हणून काही सगळं कळाल असेल किंवा त्यांना अपला संशय येत असेल असं नाही होत... आणि आला कुणाला संशय तर येऊ दे. काही घाबरून जायचं नाही.... तसेही चेहऱ्यावर मुखवटे पांघरून फसवत राहणारे किती तरी जण असतातच की. पण आपण फसवतोयच ना नवऱ्याला, बाळाला, घरच्यांना .... एक निवांत कोपरा स्वतःसाठी शोधणं म्हणजे इतरांना फसवणं? का फसावं ह्यांनी? का गृहीत धरावं आपण कोणी गुलाम असल्यासारखे...? गुलाम नाही पण तरीही पातिव्रत्य भंग केलासच ना? कुलटा झालीस ना?... असो काही असेल ते... पण त्याच्यातून सोडवून घेणं तरी कुठं सोपं राहिलंय...'

असं द्वंद्व सतत सुरु राहायचं तळात.... डोह गढळून निघायचा.

महिन्यातून एकदा तरी भेट व्हायचीच.. त्याच्या असण्यानं जगण्याला एक अर्थ आलेला...

पण हल्ली त्याला आवडत नाही सारखं मेसेज करणं, फोन करणं...

"अरे फोन टॅप होतात रे काही प्रॉब्लेम झाला तर काय करशील...? माझं काही नाही पण तुझी किती बेक्कार 

अवस्था होईल लक्षात घे जरा.... बाईलाच दोष देतात सगळे, मी कसाही निसटेन. आपण जेंव्हा प्रत्यक्षात कधी 

भेटू तेंव्हाच बोलायचं सारखे फोन नाही करायचे..."

"आणि कधीच नाही भेटू शकलो तर?"

"तरी मी तुझी वाट पाहीन आयुष्यभर... तू माझ्या मनात आहेस... तिथून तरी कोणी नाही बाहेर काढू शकत 

तुला... तू जीव आहेस माझा.... आणि असं सतत निगेटिव्ह का बोलतेस रे... भेटू न आपण ... मी नाही राहू शकत 

तुझ्याशिवाय. काही नको तू दिसलीस तरी मला पुरेस असेल...!! पण उगाच काही तरी वाईट व्हायला नको.."

"ह्म्म्म" आणि जीव भरून यायचा गुदमरेपर्यंत इतका की पुढे काही बोलताच यायचं नाही... हे त्याच्या लक्षात 

यायचं की काय म्हणून तो बाय करून फोन ठेऊन द्यायचा.

'कधी कधी खरच किती समंजस बोलतो... हे खरच बोलतो कि आपल्याला टाळायला असं बोलतो...?

पण टळेल तरी कसं? तसंही नाही वाटत... मग बोलायचं ना बोलायला काय जातंय याचं? कळत नाही का... काय होतं...माझं? कसं सांगाव पण? त्याच्या शहाणपणा समोर आपण अगदीच बुद्दू होऊन जातो...'
डोळ्यातल्या धारा मन शांत करायच्या...

आणि तसंही घरात बसून असं उगाच आसवं ढाळण्यात तरी काय अर्थ होता? उगाच नसता ताप मागं लागला 

असता एव्हढं नक्की.... घरात आल्यावर आपण घरातल्याच आहोत... याचं सतत भान जपावं लागायचं...

 हळू हळू फोन शिवाय राहणं जमू लागलं होतं तिलाही.... 'त्याची इच्छा नसेल किंवा खरच तो म्हणतोय तर 

आपण खबरदारी घायला हवी. तसही तो म्हणतोय तसं खरच कुणाच्या नजरेत आलं तर .... नकोच त्यापेक्षा 

मनाला बांध घालणं सोपंय.'

'पण आठ-पंधरा दिवसांनी तरी किमान बोलायला काय जातंय.. आणि बोलला तरी पहिल्या सारखा उत्साह 

नाही.. हुरहूर नाही.... फक्त एकच प्रश्न भेटणार कधी? कसं सांगाव मलाही आत्ता भेटण्याचीच भीती वाटते... 

आणि भेटतानाच कुणी पाहिलं तर...?'

मग तीही भेटण्याचा विषय टाळायची... याचा मात्र त्याला जाम राग यायचा.

"अरे काय हे एक-दीड महिना झालं आपण भेटून. काही वाटत नाही का तुला? भेटावं वाटतंय, बोलावं वाटतंय, 

बघावं वाटतंय तुला... तू मात्र सतत भेटण्याचा विषय टाळतेस.."

"भेटूया उद्या किंवा परवा दोन दिवसांत"

मग भेट व्हायची तशीच आणि तिथंच.

सारखं काय अरे इथंच भेटायचं? दुसरीकडे काही नाही का जागा? इथे कसं तरी वाटत अरे?"

"पुढच्या वेळी बघू जागा आत्ता फक्त मला बघ..."

"तुला बघायला तर हा जीवाचा धोका पत्करायचा.... "

आणि तो हळूच ओठ टेकवायचा तिच्या कपाळावर किती सुंदर होता तो अनुभव... ह्यासाठी तर जीवावर उदार 

होण्याचंही काही वाटायचं नाही... मिठीत घेऊन कितीतरी वेळ तो सांगायचा,

"तू किती महत्वाची आहेस... तू ठीक राहिली पाहिजेस... भेटणं न भेटणं काही असो. पण तू जिथे असशील तिथे 

नीट राहिली पाहिजेस"

आणि घट्ट धरून ठेवायचा तिला उराशी जणू लपवून घेतोय आपल्या पिंजर्यात शाबूत ठेवण्यासाठी....

पण फोन करायचा नाही हे मात्र सतत बजावत राहायचा... मिठीत ही. हे मात्र खटकायचं तिला.

मग उगाच तोंड फुगवून बसायची आणि तो हसायचा फुगलेल्या तोंडावर.... मग फुगा फुटून हास्याचे लोट 
लागायचे...

हळू हळू तिला आठवणीच पुरेशा वाटू लागल्या हसण्यासाठी. एक दोन महिने गेल्यावर तिच्या लक्षात आलं कि 

आपण फोन केलेला नाही. तरी त्याला स्वतःहून एकदाही फोन करावा वाटला नाही.

उगाच रागावली आणि फोन केला. त्यान फोन कट केला.बापरे दोन महिन्याने फोन केला तरी कट....!! डोळे 
भरले.

पुन्हा केला. पुन्हा कट.

तो दिवस गेला. तिने परत दोन दिवसांनी केला. यावेळी मात्र त्याने फोन रिसीव्ह केला.

"अरे कळत नाही का तुला फोन कट केला म्हणजे काही तरी अडचण असेल न... समजून घेत जा ना एकदा 

कट केला की, परत परत नको न करत जाऊ फोन बाळ..."

"हम्म"

"चल जरा गडबडीत आहे..."

"सारखी कसली गडबड?"

"अरे समजून घे सारखी भांडत नको जाऊ, मार्च एंड आलाय कामं असतात. तुमच्या सारखे काय रिकामे आहोत का?"

"हम्म" आता मात्र तिला खूप राग आला... मी काय रिकामी वाटले का याला, जाऊदे टाळायचं असेल म्हणूनच असं करतो...

तिने परत अजिबात फोन करायचा नाही असं ठरवलं...

घरातलं वातावरण होतं तसच त्यात काही फरक नसायचाच. त्यातून बाहेर पडायला तिला त्याच्या आठवणींचीच 
सोबत.

पण फोन करायची सोय नाही. त्यासाठी ही कुढत बसावं लागायचं.

बाळ आता मोठा झाला. पाच वर्षांचा. माग त्याची शाळा, त्याचे मित्र, अभ्यास... यात बराचसा वेळ जाऊ लागला... तीही मुद्दाम यात नाही त्यात मन गुंतवू लागली.... आठवणी हव्याशाही वाटायच्या आणि क्षणात नकोशाही....!

नवऱ्याचंही तसच चाललेलं नेहमीप्रमाणे... कुठे काही कायमच काम नाही. मग घरात धुसफूस आणि हिच्यावर 

सगळा राग... कधी त्याला वाटलच तर अचानक लोण्यापेक्षा मऊ व्हायचा. पण तेही ठराविक क्षणांपुरतच. एकदा वेळ गेली, तो भरून पावला संबध संपला...!

बाकी तिच्या कुठल्याच मानसिक गुंतागुंतीशी किंवा ताणतणावाशी त्याची धड ओळखही नव्हती...  तिच्या आतल्या गाभार्यात जाण्याचे त्राण त्यानं कधी घेतलेच नाहीत....

मग नवरा आणि 'स्वप्नील' यात ती तुलना करत रहायची. तरी कुठेच त्यांची तुलनाही होऊ शकत नाही हेही 

तिला जाणवायचं...

गाभार्यापर्यंत तर स्वप्नीलही पोहोचू शकला नाही.

पण तो काही क्षण विसावा तरी नक्की बनतो... जिथ निवांत डोक टेकवता येतं...

त्याच्या आठवणीत हरवणं हा जणू एक नित्यक्रम बनला तिच्या जीवनातला...

आणि तिला जाणवलं की या निखळ, निरागस आठवणीच पुरेशा आहेत. शिदोरी सारख्या....

सतत त्याला आणि स्वतःला छळत राहण्यापेक्षा ही मिळालेलीच शिदोरी आयुष्यभर जपण्यातही सुख आहे...

आता त्या मोरपिसी आठवणी आणि तो शेवट पर्यंत वाट पाहिल ही सुखद अशाच, तिच्या आयुष्यातली अनमोल 

श्रीमंती होती....जी तिला जीवापाड सांभाळायची होती.







Post a Comment

2 Comments

Meghashree said…
''तरंग ... अंतरंग ''


ही दीर्घ कथा दोनदा मन लावून वाचली. प्रतिक्रिया कळवण्यास फारच विलंब झालाय , याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.

या कथेची मी तीन भाग भागात विभागणी करु इच्छितो. पहिल्या भागाता नायिकेला ' वाढा , रांधा , उष्टी काढा ' या पारंपारिक चौकटीतून जावे लागते. पोटापुरतंच कमावून आणणारा नवरा तिच्या कुठच्याही भौतिक गरजा पूर्ण करण्यास असमर्थ आहे. "एखादी साडी राहू दे चड्डी घेण्याची पण ऐपत नाही तुझी ! " ... हे नायिकेचे एकच वाक्य तिच्या नवऱ्याची परवड व्यक्त करण्यास पुरेसे ठरले आहे. एवढं चपलख ' बोल्ड ' लिहिण्यालाही एक नैतिक अधिष्ठान लागतं , ते लेखिका म्हणून तुम्ही सहज साध्य केलंय .

प्रथमतः बाळाचा खाऊ बनवण्यासाठी आग्रही असणारी सासू नंतर खाऊ तयार झाल्यानंतर मात्र चहा बनवून मागताना बाळाची भूक विसरते. हा मानवी मनाचा ' आधी मला ' हा कंगोरा छान मांडलात .

आर्थिकदृष्ट्या सेटल होण्याच्या प्रयत्नात असताना वाढणारा घरखर्च तिला व्यथित करतो. घराबाहेर पडल्यानंतर अनोळखी व्यक्तीकडून आलेला चांगल्या नोकरीच्या पर्यायाचा संदर्भ नवऱ्याने धुडकावून लावल्यानंतर ती स्वतःचा कोंडमारा करुन आहे ती नोकरी करण्यात धन्यता मानते , या प्रसंगाला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलेत आपण !

दुसरा भाग म्हणजे स्वप्नीलचं तिच्या आयुष्यात येणं .. असं मला वाटतं .स्वप्नीलसोबतचे संवाद खूपच लडिवाळ आहेत. खूप छान रोमँटिक फील येतो , ते वाचताना. पण ते जरा पाल्हाळिक झालेत . तेथे कटौतीची गरज आहे.

"जाता जाताही ओठांचा पाऊस गाल चिंब करत होता आणि मन न्हावून निघत होतं ." सुखाची समाधी यालाच म्हणत असावेत . स्वप्नीलने तिला दूर लोटण्याचा प्रयत्न चालवलाय , हे लक्षात येताना ...
" दे माझा 'मी' मला ! मला हवीय ... पासून .. डोळ्यांत उगाच तळं साचलं " पर्यंतची शब्दरचना अंतर्मूख करुन जाते.

वैवाहिक जीवनात शरीर सुखाची गरज महत्त्वाची आहेच! पण मानसिक सुख , अलवार स्पर्श , छोट्या-छोट्या गोष्टीतील सुखाच्या जागांना पारखी झालेली नायिका प्रथम स्वतःच्या मनाविरुद्ध , बुरसटलेल्या परंपरांच्या पगड्याखालील नैतिक-अनैतिकतेच्या जाणीवा जुगारून बंड करुन उठते. वैवाहिक जीवनात शरीर सुखाची गरज महत्त्वाची आहेच!

तिसऱ्या भागात ती एकाकी पडली असताना तिच्या आयुष्यात प्रचंड उलथा-पालथी होवूनही... " बाकी तिच्या कुठल्याच मानसिक गुंतागुंतीशी किंवा ताणतणावाशी त्याची धड ओळखही नव्हती . तिच्या आतल्या गाभाऱ्यात जाण्याचे त्राण त्यानं कधी घेतलेच नाही ." या वाक्यातून तिच्या नवऱ्याची तिच्याबद्दलची बेफिकिरी अधोरेखित होते.

शेवटाकडे जाताना ... " गाभाऱ्यात तर स्वप्नीलही पोहोचू शकला नाही ... पण तो काही क्षण विसावा तरी नक्की बनला , जिथं निवांत डोकं टेकवता येतं. " या वाक्यामधून नायिका मानसिक सुखाला किती भुकेली होती , याचा प्रत्यय येतो.
...................

एकंदरित कथेचा विषय , कथा बीजाच्या अनुषंगाने आलेले बारीकसारीक संदर्भ अत्यंत सूक्ष्मपणे टिपलेत आपण ... शिंपल्यात पावसाचा थेंब अलगद पडून निर्माण झालेल्या मोत्यासारखे !
काही धाडसी , बोल्ड संवाद बोलणारी नायिका बंडखोर वाटली मला. तिची प्रारंभीची परवड , नोकरीसाठीची फरफट , नवऱ्याकडून होणारा छळवाद , स्वप्नीलचं आयुष्यात येणं , आयुष्य चैतन्यमयी होण आणि शेवटी पहिला पाढा पंचावन्न !

सारंच कसं सिनेमॕटिक . कथेला चांगली ट्रीटमेंट दिलीत .

हार्दिक अभिनंदन!
________________
जयसिंगराव माळवी
पत्रकार
कोल्हापूर
खुप मस्त आहे.. तुमची एखादी कथा पाठ्यपुस्तकात झळको. ही सदिच्छा