मी चुकते...


अंगात ताप थंडी असतानाही,

मी भिजवते बदली भर कपडे,

काढत राहते मळ,

हात दुखेपर्यंत,

तेंव्हा म्हणत नाहीस,

तू चुकतेस.

पायात गोळे येतात,

पाठ ताठते उभी राहून,

तरी भाजते भाकर्या, शिजवते डाळ-भात,

पोटात ठरत नाही अन्नाचा कण तरी,

विचार करते,

मी नाही केलं तर,

उपाशी राहतील लेकरं,

दिवसभर थकलेल्या तुला

काही झालं तरी मिळायलाच हवेत दोन मायेचे घास,

म्हणून रांधत राहते पुन्हा

तेंव्हा म्हणत नाहीस,

तू चुकतेस.

तो रडू नये, तुला होऊ नये

 त्रास त्याच्या आवाजाचा,

म्हणून मांडीवरच घेऊन त्याला,

अवघडून बसते रात्रभर,

तेंव्हा म्हणत नाहीस,

तू चुकतेस.

तुला जायचं असतं ऑफिसला,

तेंव्हा तुझ्या आधी उठून,

आवरते डबा आणि तुझा नाष्टा,

मात्र तुझ्या आधी,

घासही घालत नाही तोंडात,

तेंव्हा म्हणत नाहीस तू चुकतेस.

तुझे नातेवाईक येणार म्हणून,

कुठे जयाचय समारंभाला,

तुझ्यासोबत म्हणून,

मी रजा टाकते,

एक दिवस कामाला बुट्टी मारून,

मिरवते तुझ्यासोबतच सहअस्तित्व,

तेंव्हा म्हणत नाहीस,

तू चुकतेस.

जेंव्हा केंव्हा वेळ येते,

दोघांपैकी एकाने घरीच रहायची,

तेंव्हा मी टाळते बाहेरची काम माझी,

तेंव्हा म्हणत नाहीस तू चुकतेस.

पण,

महिन्या-पंधरवड्यातून येतात माझ्या मैत्रिणी,

आणि मी बसते गप्पा छाटत

किंवा जाते त्यांच्यासोबत फिरायला,

तेंव्हा मी चुकते.

तूला बसवून घरात,

मी बाहेर जाऊन येते,

तेंव्हा मी चुकते.

मी बसले कधी घरकाम न आवरता,

निवांत लोळत पडले,

हातात मोबाईल घेऊन,

मी फारच चुकते.

मी करत नाही व्रत-वैकल्य,

उपास तपास,

तुझ्या दीर्घायुष्यासाठी,

मानत नाही,

तुझ्या आई-वडिलांचे

सांस्कृतिक अट्टाहास,

तेंव्हा तर मी कहर असते.

कधी कुठल्या अनवट वळणानं,

येऊन उभे राहतात,

माझ्यासमोर,

व्हिस्कीचे दोन पेग,

आणि मी पिते....

तेंव्हा मी ....

तेंव्हा मी बघते तुझ्यातला जखमी अंहकार.

तुझ्या डोळ्यातली असाह्यता पाहून

हसतात माझे

छद्मी डोळे.

पण तेंव्हा मात्र मी चुकते.

© मेघश्री श्रेष्ठी-नाईक.

Post a Comment

2 Comments