मी कोण?


मी खूप सभ्य आहे,

असं ते म्हणतात...

मी फारच शांत आहे,

असंही तेच म्हणतात...

मी कधीच वागत नाही,

अल्लड, अवखळ...

हे सुद्धा तेच म्हणतात,

मी सोशिक, समंजस आहे म्हणे,

असं ते म्हणतात...

मी सात्विक, सुशील आहे म्हणे,

असं ते म्हणतात...

मी घराची मर्यादा आहे म्हणे,

असं ते म्हणतात...

मी संस्काराची शिदोरी आहे,

असं ते म्हणतात...

मी गुणवान आहे,

रूपवान आहे,

भाग्यवान आहे,

असंही तेच म्हणतात...

माझ्या निरुपद्रवी व्यवहाराचा,

खरा मुखवटा त्यांनी ओळखला नाही अजून,

ते ओळखतात जिला,

ती मी न्हवेच...

त्यांना नाही माहित,

माझ्या मानसिक स्वांतत्र्यावर,

भावनिक आवेगावर,

बौद्धिक अस्तित्वावर

सतत ...

चढणाऱ्यांच्या बुडाखाली

स्फोट करण्यासाठी...

दारुगोळा जमा करणारी,

मीही एक 'फुलन' आहे.

© मेघश्री श्रेष्ठी-नाईक.

Post a Comment

0 Comments