ती आणि सावल्या
ती आणि सावल्या ...
दुपारचं रणरण ऊन...
सभोवार बघेल तिथवरचा प्रदेश उन्हानच
व्यापलेला... सगळ्या धरतीला सूर्य असा भाजून काढत
होता. आजूबाजूला सगळी जमीन मोकळी
पडलेली. जमिनीच्या भेगा ठळक झालेल्या... आणि अशा
उन्हात तो एकटाच चाललेला काही तरी
विचारांच्या धगीन त्याच्या आतल्या कातळावरही लाह्या
फुटत होत्या... स्वप्नांच्या
लाह्या... भाजून निघालेल्या...
मघाशी ती इकडच आलती, एकटीच...! कुठ
दिसना कशी?
शामा तिचाच विचार करत चालत होता....
चालत चालत तो बर्याच दूर आलेला. दूरवर पसरलेला
माळ दिसत होता. दूर दूरवर कुणीही
न्हवतं
न्हवतं
पण अजूनही ती काही नजरेला पडली नव्हती.
'कुठ गेली असलं ती? इकडच तर आली होती...
रोज तर इकडच भेटती आज काय झालं?'
विचार करत तो खाली नदीच्या दिशेन
निघाला.
तरी तिचा पत्ता नव्हता. आत्ता त्याची
धडधड वाढली. अस कधी होत नाही... आणि आजच...
पूर्ण नदीच्या काठापर्यंत जाऊन आला
तरी ती न्हवती... आत्ता मात्र त्याला जाम भीती वाटू
लागली.
लागली.
'कुठ गेली आसल?'
'येताना तर दिसली आपल्याला आणि आत्ता न्हाय
इथ कुठंच... आत्ता कुठं म्हून शोधायची हिला?'
तो परत फिरला... परतताना पण त्याला
वाटत होतं,
'ह्या झाडामागं दडली आसल काय? आसल बी यील समोर आपण पुढं
गेल्यावर ... इकडून
यील तिकडून यील .... '
छे ..! पण कुठच न्हवती ती..
तो परत तिच्या घरासमोर जाऊन थांबला...
"ओव! कोन हाय का न्हाय घरात कुठ
गेल्यात समदी?"
सुधीरची बायको बाहेर सोप्यात आली.
'' न्हाय वं भाऊजी कोण घरात.''
''कुठ गेल्यात म्हणायची समदी?''
"आवं संध्याकाळ पास्न तायसाब कुटं
दिसल्याला न्हायता... सगळी त्यास्नीच बगाय गेल्याती."
"आस व्हय बर बगतू जातु मी पण....
मग"
'तायसाब दिसना झाल्यात...' एव्हढंच
त्याच्या डोक्यात घुमत होतं...
तो तसाच चालत राहिला... नेमकं कुठे
जावं त्याला कळत न्हवतं. घरी जावं तरीपण लक्ष लागणार
नाही. इथच थांबूया कुठतर....
असं त्यान ठरवलं...
मग तो मारुतीच्या देवळाबाहेरच्या
ओसरीवर जाऊन बसला... गावातली अनेक वयस्क माणसं
तिथं जमलेली...
तिथं जमलेली...
संध्याकाळची वेळ, धारा काढून लोकं डेअरीकडं
लगबगीनं जात होती, एकमेकाला आवाज देत,
हसत-बोलत माणसांची ये जा सुरु होती...
गाड्यांचे हॉर्न, सायकलची घंटी, लोकांचा आपसात
बोलण्याचा आवाज, सगळ मिसळत होत
एकमेकांत, नुसते ध्वनींचे पुंजके पुंजके अफाट पुंजके...!!
आपल्या आपल्या दुखण्यातून आणि घरातल्या एकटेपणातून
बाहेर पडून म्हातारीकोतारी इथंच
यायची. जरा विरंगुळा इथेच भेटायचा त्यांना.
त्यांचे जुने दोस्त, मग त्यांच्या आठवणी, कुणामुळ
कुणाच चांगल झालं, कुणी कुणाच्या
अडचणीच्या वेळेत कशी मदत केली, कोणाच्या घराची
वाताहत झाली, कुणाचा पूर्वीचा दरारा
कसा होता...! आत्ता मुलांनी कशी त्यांच्या इभ्रतीची माती
केली, अशा बर्याच विषयावर गप्पा झोडता यायच्या. तेही
आपल्या हसण्या-बोलण्यात रमलेले...
हा मात्र स्वतःतच मग्न. कशाशीही काही
देणं-घेणं नाही असा... उगाचच आतून पूर्ण उन्मळून
पडलेला...
याच्या डोक्यात एकच वाक्य घोळत होतं...
"आवं संध्याकाळ पास्न तायसाब कुटं
दिसल्याला न्हायता... सगळी त्यास्नीच बगाय गेल्याती."
कुठं गेली असलं, त्याच्या मनात नसत्या
कुशंकानी घर केलं...
तिकडून पांडबा आला त्याचा चेहरा पडला
होता...
"काय रं पांडबा कुनीकडनं आलास?"
"आर, आबा पाटलांच्या मळ्याकडन आलू बग..."
"एवढा का भेदारलायीस?"
"आरं त्या पोरीनं हिरीत उडी
मारली न्हव का... पोरगी गेली बग लेका
आबाची."
रेल्वेचं इंजिन धडधडावं तसं याच्या उरात
धडधडू लागलं.... जीव दिला तिनं ....???
"काय खरं! व्हनारच व्हतं हे एक ना
एक रोज. किती जपणार तरी असलीला?"
तो अजूनही भानावर आला न्हवताच.
त्यामुळं पांडू काय बोलतोय याकडं त्याचं अजिबात लक्ष न्हवतं.
तो तसाच उठला आणि तिच्या घराकडं
निघाला....
वाटेत सतत तो तिचा गोल, हसमुख चेहरा
नजरेसमोर येत होता...!! जणू ती जिथं पोहचली
तिथूनच त्याच्याकडे पाहून हसर्या
डोळ्यांनी सांगतेय कि मी इथे ठीकाय... तू जीवाला नको लाऊन
घेऊस....!!
दहा-बारा वर्षापूर्वीची ती...!!
कित्ती हसरी आणि प्रसन्न असायची ती...
जणू फुललेली जास्वंदी...
हो अगदी तशीच उठावदार....
संयमी बोलणं, खळखळून हसणं, तिच्या
सगळ्या हालचालीत एक लय होती. तिच्या आत कुठे
निराशेचा टिपूस असेल असंही वाटत
न्हवतं...
आपलं कधीच धाडस नाही झालं, तिला
सांगण्याच. चंद्राशिवायही कितीतरी रात्री सरल्या पण
तिच्या आठवणींशिवाय एकही रात्र
सरली नाही...
मनातली गोष्ट मनातच राहिली... आणि एक
दिवस ती गेली, माप ओलांडून तिच्या धन्याच्या
घरात...
बक्कळ होतं तिचं सासर... सोन्या
चांदीन नुसती मढून गेलेली दिसायची, कधी येईल तेंव्हा...
पूर्वी तर या कृत्रिम शोभेशिवायही
तिचं रूप कितीतरी झळाळून निघायचं. पण आत्ता...!!
आत्ता, ती सगळी झळाळी तिच्या आतल्या
करून रुदनाला जास्त गडद करायची...
मला वाटलं उगाच आपलं काही तरी ... आपण
आपलं प्रतिबिंब का पाहतो तिच्यात? ती सुखी आहे
तिच्या संसारात...
कधी समोरासमोर भेटलीच तर आपुलकीनं
विचारायची... तेंव्हा कितीदा वाटलं तिचे डोळे
चमकताहेत...त्यात साचलेल्या आणि सतत
हेंदकळनार्या डोहाला काही सांगायचंय वाटायचं...
पण आपण दुर्लक्ष करत राहिलो... स्वतःकड
आणि तिच्याकडंही...
चार पाच वर्षांच्या संसारात तिच्या
पदरात दोन जिवांच दानही पडलं. आत्ता तरी तिचं एकदमच
सुरळीत झालं असा भ्रम पक्का
झाला...
हो भ्रमच होता तो .... कदाचित कधीतरी
आधीच आपण जाणून घ्यायला हवं होतं त्या डोळ्यांना
नेमकं काय सांगायचंय ते...
खूप उशीर केला आपण. खूपच. आत्ता तर
सगळच नाहीस झालं भ्रमही आणि आशाही.
अशीच कधी पाडव्याच्या जत्रत भेटलेली...
"कसा हायीस?" तिनं विचारलं...
"बेस हाय आत्ता... तुझं कसं
चाललाय?"
''चाललय ते बेसच म्हणायचं...व्हावटळील्या
पानाला आपल्या मर्जीनं चालता येतय व्हय?"
मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही
तिनं प्रश्नानच दिलं... आणि पुन्हा तिच्या डोळ्यात काही तरी
चमकलं जे अधिपेक्षा
जास्त गडद होतं... तरीही आपण दुर्लक्ष केलं.
दोन चिमण्या आणि राजा राणी. कुणालाही
वाटलच असत संसार सुरळीत चाललाय. पण तसं
न्हवतं. हे तेंव्हा कुठं कुणाला कळलं असतं
जर तो काळा दिवस उगवला नसता तर?
त्या दिवशीची सकाळ जहर प्यायल्यासारखी
कडवट होती.
'मानसिंग थोरात यांना बलात्काराच्या
गुन्ह्यात अटक.' मथळा वाचला आणि पहिल्यांदा त्या
डोळ्यातली चमक आठवली. मानसिंग
तिचा नवरा... पण बाहेरख्याली... त्या मोबदल्यात तिला
नुसतीच दागदागिन्यांचा रतीब...
मुकाट्यानं सहन करत राहिली... रात्र रात्र झुरत राहिली... कूस
पालटून रात्र जागत
राहिली.... कधीतरी देहाच्या अगीनं त्या पहाडाला वितळवलं असेल आणि त्या
वितळन्यातून
जन्मले दोन सोनेरी ठसे. बस एवढाच संसाराचा गोडवा. बाकी सगळा नुसताच
तूरुंग....!!
जिथे ओलाव्याच्या दोन शब्दाचाही दुष्काळ...!!
सगळं आयुष्य कोरडं ठणठणीत पडलेलं.
तिला कसलीच अशा उरली नव्हती... मुलांनाही होस्टेलवर
टाकलेलं. तेव्हढंच त्यांना
त्या दुषित वातावरणापासून दूर ठेवण्याचा अट्टाहास. तोही पोकळ
अट्टाहास... खरं तर
त्यांच्या पासून दूर राहून ती अजूनच एकाकी झालेली.... पूर्णतः एकटी...
शेवटी त्या बातमीन तिचं उरलंसुरलं बळही
हिसकावून घेतलं.
मुलांना सुट्टीला म्हणून घेऊन आली...
बछड्यांसोबत चार दिवस स्वतःही उंडारली. मनसोक्त वारं
भरून घेतलं.... फुफ्फुसात ....
शेवटचा श्वास कायमचा गुदमरावा म्हणून....
बिचार्या कोकरांना माहिती असतं आपली
कचकडी सारखी आई इतकी क्रूर वागणारय आपल्याशी,
तर त्यांचा विश्वास उठला असता तिनं
पाजलेल्या पन्ह्यावरचा आणि तिच्या कोमल
वात्सल्यावरचा....
तिनं आधी दोन्ही लेकरांना ढकलून दिलं
विहिरीत आणि नंतर स्वतःही पडली....
भयाण क्रौर्य कुठून संचारल तिच्यात..? आपल्याच
काळजाशी द्रोह करण्याचं अमाप धाडस कुठून
आलं तिच्यात? कसं आलं ...? कस काय हे तिलाच
माहिती पण ती क्रूर वागली... तरीही दुर्दैव इथंच संपल नाही तिचं....
लेकरांना तर गमावलंच पण स्वतःचा
आत्माही गमावला तिनं. पुन्हा एकदा क्रूर जगाचा क्रूर
व्यवहार अनुभवायला ती जिवंत
राहिली.... जणू वाती विना पणती....
हो तिच्यातील ज्योत कधीच विझली त्या
पाण्यात. तिच्या काळजाच्या तुकड्यांसोबत. नुसतं कलेवर
राहीलं ज्यात एक निष्प्राण
हृदय उगाच धुकधुक करत होतं.
पण ती परत सासरी गेली नाही... तिच्यातल
भान कधीचच हरपल्यान त्यांनंही पुन्हा नेली नाही...
मग इथंच राहिली... आपल्या सावलीत
पोरांना शोधायची. त्यांच्याशी बोलायची... फक्त
त्यांच्याशीच ..... त्यांच्या त्या
आभासी सावलीतच रमायची. कधी कधी त्या सावल्यांमाग
पळायची... इतकी सुसाट पळायची की
वाटायचं इतक्यात पार करेलही क्षितिज आणि पकडेल त्या
सावल्या... पण थकायची खूपच
लवकर इतकी थकायची की पुन्हा दोन दिवस जाग देखील यायची नाही....
कधी कधी मीही तिच्या सावल्यांशी बोलू
लागलो... मग ती, मी आणि सावल्या....
तिच्या सावल्यांना मी, माझ्या सावल्या
बनवल्या आणि त्यांच्याशी बोलू लागलो... तिच्यासारखंच.
ती म्हणायची, ''या सावल्या मला बोलवतायत...
त्या असुसाल्यात माझ्या पदराखाली निजायला....
तू पण घे तुझ्या हातावर आणि निजव
ह्यांना.... ओरडून ओरडून फुटलीत त्या... आपण निजवूया
त्यांना.... आपण दोघं...."
तिच्या हो ला हो करणं, बस्स एवढच तर
करत होतो मी तिच्यासाठी....
कधी कधी त्याच सावल्या तिला डोहात
दिसायच्या.... नदीत दिसायच्या.... विहिरीत दिसायच्या
.... आणि ती झेप घ्यायला
बघायची...
तिला एका क्षणासाठीही विसंबण धोक्याचं
होतं...
हो आणि आज तेच झालं शेवटी...
सावल्या आज कदाचित गाढ झोपल्या असतील
तिच्या पदराखाली.... शांत आणि तृप्त झाल्या असतील....आज.
ऊन कधीचच ढळल होतं... अंधारान सगळ्यांनाच
कवेत घेतलं...
तो चालत होता... भरकटत...
त्यानं माग पाहिलं. त्याचीही सावली...
गडप झाली होती... पूर्णतः गडप.
मेघश्री श्रेष्ठी-नाईक.
Comments
ग्रामीण मराठी बोलीचा कथेतील वापर ही आपल्या आसपासच घडणारी घटना असल्याच्या जिवंततेचा प्रत्यय देणारी...
उत्तम!!