दिव्य न्याय

हुश्श आवरलं एकदाच....
सकाळ पासून मर मर कामं करावी तेंव्हा कुठे थोडा दुपारचा विसावा...
नवऱ्याची ड्यूटी साडे सातची, पोराची शाळा साडे आठ, धाकट्या लेकाची साडे नौवाची...! एकएकाचं सगळ आवरून द्यायचं. कुणाचा रुमाल सापडत नसतो, कुणाची पाणी बॉटल, कुणाची पेन्सिल रबर... सगळ्या शोधाशोधीत कमरेची पुरती.... वाट लागते... हे ऐकायला मात्र कुणाला वेळ नाही... असो..
१२ वाजले... म्हणजे अजून धाकट्याला यायला एक तसं आहे... राहिलेला कोट थोडा तरी विणून होईल.... लोकरीची गुंडाळी ठेवलेली... भली मोठी कॅरी बॅग काढली. विणलेला तुकडा बाहेर काढून दोरा बोटाला गुंडाळला आणि सुरु झाल एक सुरी विणकाम... नवी स्टार डिझाईन चांगली जमत होती.. एक ओळ कशीबशी पूर्ण झाली... तोवर दारावर थपथप ऐकू आली...
दरवाजा उघडला...
पोस्टमन होते..
त्यांनी एक लखोटा माझ्या हातात दिला आणि ते गेले...
मी तो लखोटा तसाच ठेवला बाजूला आणि पुन्हा माझं एकसुरी विनण सुरु..
थोड्या वेळानी गाडीच जोर जोरात हॉर्न वजला.. बाळाच्या स्कूल बसचाच हॉर्न असणार...
हो तोच होता त्याला घेऊन मी घरात आले...
मग काय दोरा लडीला गुंडाळून पिशवी परत टाकली कोपर्यात... आत्ता कशाचा तिला हात लागतोय..
त्याचे हातपाय धुवून होतात न होतात तोवर त्यांचे पप्पा...
सगळ्यांच आवरून, जेऊन उठेस्तोवर ... थोरले चिरंजीव...
मग त्याचं खाणंपिणं ... इतकं आवरल्यावर मग परत घरातली आवराआवर.
 दिवस असाच गेला... त्या लखोट्या कडे काही आमच कुणाचच लक्ष न्हवतं...
संध्याकाळचे चार-पाच वाजले...
एक गाडी दारात थांबली.
त्यातून खाकी फूल्ल पॅंटा घातलेले   तिन चारजण उतरले...
अनोळखी होते... माझ्या भुवया थोड्या वाकल्या...
ते हसत आले आमच्याच दिशेने.
"तुम्हाला न्यायालयाची आज्ञा झाले... ताबडतोब यायला हवं नाही तर मुसक्या आवळून न्यावं लागेल....''
"का बरं..?"
"सेवकाला असे प्रश्न करायचे नसतात... फक्त चला सोबत..."
"सकाळी एक लखोटा तुम्हाला पाठवण्यात आलेला तो वाचला असता तर हे प्रश्न विचारायची वेळ आली नसती..."
आम्ही गडबडीने त्या लखोट्याकडे वळलो..
त्यात लिहील होतं,
'तूमच्या हातून ब्रह्म हत्येचे पातक झालेने, अंतर्दृष्टी न्याय मंडळाच्या वतीने तूम्हाला साधक न्यायाधीशासमोर  हजर राहण्याचा हुकुम फर्मावर आहोत.'
एव्हढच लिहिलं होतं त्यात...
कसल पातक? कुठलं आंतरदृष्टी न्यायालय? सगळच अजब होतं... पण तरीही...
मग आम्ही सगळेच त्या आंतरदृष्टी न्यायालयात हजर होण्यासाठी त्या स्वयंसेवकामागून निघालो.
चांगल्या तीन माजली ऐसपैस पसरलेल्या एका इमारतीसमोर गाडी उभी राहिली. सेवकाने आम्हाला उतरण्याचा इशारा केला.
आम्ही उतरलो.
एक नंतर एक असे तीन माजले चढून शेवटी आम्ही त्या साधक न्यायाधीश महाराजांसमोर हजर झालो.
अगदीच एखादे पाप हातून घडल्यासारखं आम्ही हात बांधून मानाखाली घालून उभे. हीच कृती आमच्या पोरांनी पण केली. आश्चर्यच वाटलं ... त्यांना एवढं शहाण्यासारखं वागताना पाहून.... बर झालं इथे तरी सुधारले...
न्यायाधीश महाराज... आपल्या नाकावरच्या चश्म्यातून नजर वर काढून आमच्याकडे पाहत होते...
आम्ही पण प्रश्नार्थक चेहरे घेऊन नुसतेच उभे.
त्यांनी आम्हाला सुनावलं की,

"तुमच्या हातून ब्रह्म हत्येच पातक घडलेलं आहे. तुम्हाला त्यासाठीच इथं बोलावण्यात आलंय."
मी उगाच भुवया आक्रसून म्हणजे नेमकं काय घडलं अशा अर्थानं विचारत मान पुढे केली.
"ब्रह्म हत्या..!"  शब्दावर त्यांनी जोर देत माझ्याच स्टाईलने मला उत्तर दिलं.
तरीही नेमकं काय घडलं हे काय आम्हाला उमगलं नाही.
आमचे कोरे करकरीत चेहरे पाहून त्यांना मात्र आम्ही काय विचार करतोय ते नेमकं उमगलं, ते पूढे म्हणाले,
"तुम्ही सकाळी, पोळ्या केल्या ना?"
"हो"  मान वर खाली हलवत, मी उत्तर दिलं.
"मग सकाळी तुम्ही पोळ्या बनवतानाच तुमच्या हातून हे महा पाप घडलं... हे लक्षात नाही का आलं तुमच्या?" अगदी तुच्छतेने त्यांनी विचारलं...
"नाही"
"हे बघा, आम्ही असं मानतो की, नाही किंबहुना हा आमचा दवाच आहे की, या सृष्टीतील प्रत्येक जीवात ब्रह्म सूक्ष्म रूपाने वास करतो... अगदी छोट्यातल्या छोट्या जीवातही.... तुम्ही सकाळी सकाळी जेंव्हा पोळ्या बनवत होता तेंव्हा तुम्ही नीट लक्ष ठेवत नाही...पोळी लाटून जेंव्हा तव्यावर टाकत होता त्याच वेळी एक सूक्ष्म जीव ज्याला आपण डास  म्हणतो, तो तव्यावर भ्रमण करत होता आणि तुम्ही अंत्यंत निर्दयीपणे त्याच्याकडे अजिबात लक्ष न देता पोळी टाकलीत बिचारा पोळी आणि तव्याच्या मध्ये अक्षरशः तडफडून मेला. तुम्हाला असं करताना जराही दया आली नाही? वर ती पोळी निर्लज्ज पणे सर्वांनी खाल्लीत... तुमच्या या अंत्यंत निंदनीय आणि घृणास्पद कृत्याबद्दल तुम्हाला कठोरातील कठोर शिक्षा ठोठावण्यात येत आहे."
मुलांनी आणि ह्यांनी माझ्याकडे एक वार जळजळीत कटाक्ष टाकला..
ते ऐकूनच मला उचमळून आलं. (याक श्शी...) हे असं काही घडलेलं मला तरी काही आठवत नाही. पण आता हे आंतरर्दृष्टी न्यायालय... तेही साधक न्यायाधीश... ब्रह्म जाणणारे ह्यांच्या समोर काय बोलणार जे काही घडलं ते ह्यांनी आपल्या दिव्य अंतरदृष्टीने पाहिलंय... म्हणून आम्ही सर्वानीच माना खाली घातल्या...
न्यायाधीश महाराजांनी आम्हाला शिक्षा म्हणून तब्बल पंधरा दिवस बिन मिठाचं आणि बिना चटणीच कुत्र्याच्या हाडांचं सूप पिण्याची शिक्षा फर्मावली..
अर्थातच ते अंतरदृष्टी न्यायालय असल्याने तिथे वकील नेमणे किंवा बाजू मांडणे वगैरे काही प्रकार न्हवंताच ...
थेट न्याय... तो हि साधा सुधा न्हावे दीव्य न्याय...
हा निकाल ऐकून आम्ही थेट गच्चीत धाव घेतली आणि तिथून उडी मारली ....
पण कसलं काय छे..! नशीबच खोट...!
आम्ही गच्चीच्या खाली दुसर्या मजल्यावर बसवलेल्या जाळीत अडकलो....
वरून न्यायाधीश महाराज पाहत होतेच आमच्याकडे ....
डोळे बारिक करून, मान हलवत ते बोलले,
"हं आम्हाला चांगलच ठावूक आहे. इथले न्याय ऐकून आरोपी असलेच प्रयत्न करतात... म्हणून  काळजीपूर्वक आम्ही ही खबरदारी घेतलेली आहे..."
त्यांचा काळा कोट, सुटलेली ढेरी... जाड फ्रेमचा चष्मा... डोक्याचं टक्कल ... सगळं पाहून मला उगीचच वाटलं की हा आधुनिक यमराज असावा...
त्या अधांतरी बांधलेल्या नेटवर पोरं आपसूकच जम्पिंग जपांग खेळू लागली आणि आम्हीही अनिच्छेनं उडत होतो...
वरून आमचं शरीर आणि आतून आमचं हृदय... दोन्ही थाडथाड उडत होतं... ती भयानक शिक्षा ऐकल्या पासून...
तेवढ्यात तिकडे आम्हाला वर उचलून घेण्यासाठीचे प्रयत्न तातडीने सुरु करण्यात आले...
काय करणार  न्यायाधीश महाराजांकडे दिव्य दृष्टी असली तरी अशी आपसूक खेचण्याची सिद्धी त्यांना अजून प्राप्त झालेली नाही...
त्यासाठी त्यांना अजून थोडी कठोर साधना करावी लागेल.

मेघश्री श्रेष्ठी-नाईक.

Post a Comment

0 Comments